व्यक्तीच्या ठिकाणी ‘मी हे केले, मी ते केले’ हा जो कर्तेपणा आहे, ह्याचे कारण अज्ञान आहे. हीच अहंता मनुष्याला परिच्छिन्न बनविते. संसारात जेवढे धक्के बसतात, ते सर्व कर्ता आणि भोक्त्यावरच बसतात. जर आपल्या मनात कर्तेपणाचा अभिमान नसेल तर मार पण पडणार नाही. वास्तविक महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी परमेश्वराच्या कर्मावर, भोगावर आणि त्यागावर दृष्टी असेल, तर मनुष्य कधीही आपल्या अभिमानाच्या वश होणार नाही. कर्तृत्वाची शिथिलता भगवंताच्या शरणागतीने होते. जोपर्यंत आपला कर्तेपणा आहे, तोपर्यंत जीवनात ईश्वराचा आविर्भाव होत नाही.
पाहा! येथे अधिकाऱ्याचा भेद आहे. जर एखादा निकामी (निष्क्रिय) अधिकारी असेल, तर त्याला ‘काम (कर्म) कर’ असे सांगितले जाते. जेव्हा तो कर्म करू लागतो, तेव्हा ‘निषिद्ध कर्म करू नको, तर विहित कर्म कर’ असे सांगितले जाते. जेव्हा तो सकाम विहित कर्म करू लागतो; तेव्हा त्याला ‘निष्काम कर्म कर’ असे सांगितले जाते आणि जेव्हा तो निष्काम कर्म करू लागतो तेव्हा ‘तू कर्तेपणाचा अभिमान धारण करू नको’ ह्या उपदेशाचा तो अधिकारी होतो. कर्तृत्वाभिमानी व्यक्तीच्या कर्तेपणाला निवृत्त करण्यासाठी शरणागतीचा उपदेश केला जातो. खरे तर सर्व कामे भगवंताच्या सत्तेने, महत्तेनेच होतात. जर सकाम कर्म करणाऱ्याला अथवा निषिद्ध (वाईट) कर्म करणाऱ्याला देखील ‘हे सर्व भगवानच करवीत आहेत’ असे सांगितले, तर हा अध्यारोप पूर्णत: अयोग्य (व्यक्तीच्या) ठिकाणी झाला! वस्तुत: भगवान कोणाला रिकामे ठेवीत नाहीत. बिनाकामाचे तर प्रेत असते! निषिद्ध कर्म भगवान करवून घेत नसून आपली वासनाच करवून घेते. सकाम कर्म भगवान करवून घेत नसून आपला स्वार्थच करवून घेतो. अशाप्रकारेच आपल्यामध्ये जो कर्तेपणाचा अभिमान आहे, तो भगवान देत नसून आपली मूर्खताच देते; म्हणून जो ज्याचा अधिकारी असतो, त्याच्यासाठी त्याच प्रकाराचा उपदेश शास्त्रांमध्ये केलेला आहे. जर व्यभिचारी मनुष्याला ‘ईश्वर तुझ्याकडून व्यभिचार करवून घेत आहे’ असे सांगितले, तर हे सर्व बोलणे अविवेकमूलक आहे, मूर्खताजन्य आहे, मनुष्याला ईश्वरापासून पृथक् करणारे आहे.
ईश्वराच्या कृपेने माझ्याकडून चांगले काम झाले; परंतु माझ्याकडून जे वाईट काम झाले ते माझ्या चुकीने झाले – अशाप्रकारे आपण अनुभविले पाहिजे. याच दृष्टीने तुलसीदासजींनी म्हटले आहे – गुण तुम्हार समुझहिं निज दोसा । जेहि सब भाँति तुम्हार भरोसा ॥ म्हणून एखादे चांगले काम केले तर अभिमान करू नका, ते ईश्वराच्या प्रेरणेने झाले आहे असे समजा आणि निषिद्ध कर्म झाले तर ते आपल्या प्रमादामुळे झाले असे समजा आणि असे समजून जर आता तुम्ही असे म्हणाल की, ‘मी कर्ता नाही, तर ईश्वरच कर्ता आहे,’ तर ते योग्य आहे. भक्ताच्या मनात असेच येत असते. शरणागत म्हणतो की, “हे देवा मी तर काहीच केले नाही, तूच सर्व केले; म्हणून तूच जाण.” अशाप्रकारे परमेश्वराच्या ठायी पूर्णपणे कर्तृत्व टाकणे, पाहाणे आणि शरणांगत होणे – ही अभिमान विच्छिन्न करण्याची युक्ती आहे. जर तुम्ही क्रमाने आपले अंत:करण शुद्ध करण्यासाठी उत्थान कराल, तरच तुमची उन्नती होईल. अन्यथा मध्येच काहीतरी पकडून बसाल आणि म्हणाल की, “अहो! चांगले-वाईट तर सर्वांकडूनच होते, कामना तर सर्वांच्याच हृदयात असतात, चांगले-वाईट कर्म तर सर्वांकडूनच होतात;” परंतु तेव्हा आपल्या जीवनात जी उन्नतीची प्रक्रिया सुरू होणार होती, प्रगतीचे जे रसायन निर्माण होणार होते, त्याचे द्वारच बंद होऊन जाईल! म्हणून कर्मारंभापासून परिपूर्ण ब्रह्मापर्यंत यज्ञाचीच गती आहे.