ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!
ज्याप्रमाणे झोपल्या नंतर तुम्हाला स्वप्न पडते, त्याप्रमाणे जागे असताना तुम्ही रिकामे बसले आहात त्यामुळे पूर्वी घडलेल्या घटना पुन्हा-पुन्हा स्मरण होऊन तुम्हाला त्रस्त करीत आहेत. धीरः – त्यामध्ये धैर्य धारण करा.
बरे, आम्हाला सहा महिन्यानंतर अमुक-अमुक काम करावयाचे आहे – अशी भविष्यविषयक कल्पना निर्माण झाली, तर तेव्हा तुम्ही असे समजू नका की, आज जो वेग-आवेश (तीव्र प्रवृत्ती) आला आहे तो सहा महिन्यापर्यंत तसाच राहील. अरे! तो आवेग तर तासा-अर्ध्यातासात शिथिल होऊन जाईल व दुसरा आवेग येईल. पुन्हा तिसरा आवेश येईल. हे तर ज्याप्रमाणे, स्वप्नापाठीमागून स्वप्ने येत-जात राहातात, त्याप्रमाणे! धैर्यपूर्वक त्यांना येऊ द्या आणि नाहीसे होऊ द्या. त्यांचे मूल्यांकन करू नका- त्यांना काही किंमत नाही. असे नाही की, चांगले-चांगलेच विचार आले पाहिजेत. माझ्या मनात चांगले-चांगलेच भाव, विचार आले पाहिजेत असा जो प्रयत्न करतो त्याला सुद्धा खूप दुःख होते. अरे बाबा! जसे स्वप्नावर कोणाचे नियंत्रण नसते- स्वप्न कधी चांगले पडते तर कधी वाईट! तसेच हे जे मनोराज्य होतात, ते अनियंत्रित मनात होतात. होय ना! अरे! प्रवाह आला आणि निघून गेला- गंगेमध्ये कधी पुष्पमाला वाहत गेली; तर कधी प्रेत वाहत गेले; ह्याप्रमाणेच आपल्या मनात देखील दोन्ही प्रकारची दृश्ये येतात.
पूर्वी ठाकूरसाहेब लोक होते ना! ते आपल्या दरवाजात पलंगावर बसून राहत असत आणि हुक्का ओढीत असत. कोणा अस्पृश्य व्यक्तीच्या घरी विवाह होता. त्याचा मुलगा घोड्यावर बसून तेथून निघाला. तेव्हा त्यांनी विचारले हा घोड्यावर बसून कोण जात आहे?- त्यांना माहिती मिळाली की, अमुक अस्पृश्य व्यक्ती आहे. तेव्हा ते म्हणाले- ‘त्याला पकडून घेऊन या’ – ‘तू आमच्या दरवाजाच्या समोरून घोड्यावर बसून जातोस?’ असे म्हणून त्याला जोड्याने मारू लागले. तेव्हा त्या जमीनदाराची जशी मनोवृत्ती होती तशी मनोवृत्ती त्या साधकाची आहे अर्थात् मनामध्ये काही वाईट विचार स्फुरला तर लगेच जोडा घेऊन त्याला मारण्यासाठी धावलाच! तेव्हा, एकतर दूषित मनोवृत्ती निर्माण झाली आणि दुसरे म्हणजे त्याच्यावर पुन्हा क्रोध केला! म्हणून धैर्य ठेवा.
तुमचे ज्ञान हे स्वच्छ, निर्मळ, निर्विषय, निर्द्वन्द्व आहे, अविनाशी आहे, परिपूर्ण आहे. हे जे तुमचे ज्ञान आहे ना! ज्ञानस्वरूप, याच्यावर दृश्याची कोणतीच छाप (ठसा) राहत नाही – दृश्य येईल आणि आपला तमाशा दाखवून वाहून जाईल, तुम्ही कशाला उद्विग्न-हैराण-भ्रमित होता? याला ‘धैर्य’ म्हणतात. धैर्य – बाहेर कोणी मरू द्या, नाहीतर जन्मू द्या, कोणी येवो अथवा जावो, बाहेर गरीबी असो अथवा श्रीमंती असो, अथवा मनामध्ये कसलेही स्वप्न येवो आणि कसलेही मनोराज्य होवो, त्याला मनोराज्य-मात्र समजा, त्याला स्वप्न-मात्र समजा. तुमच्या काळजात पर्वत शिरला आहे असे समजू नका. हलके राहा, हलके राहा आणि आपल्या जागेवर बसून राहा – धीरः!
अशाप्रकारे बाहेर किंवा आत ज्या परिस्थिती येतात व जातात त्यांच्याकडून, त्यांच्या आघातापासून वाचून – ‘धैर्यवान् झाले पाहिजे. त्याचा घाव आपल्यावर लागू देऊ नका – अरे! आले तर आले, गेले-तर गेले!