मनाचा आवाज विश्वासघातकी आहे – हे मी मोठ-मोठ्या अनुभवी लोकांकडून प्राप्त आणि आपल्या अनुभवात आलेली गोष्ट आपल्याला सांगतो.
एका महात्म्याने लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – “जर तुमच्या समोर ईश्वर प्रकट झाले आणि वैराग्य व निवृत्तीच्या विरूद्ध आदेश देऊ लागले, तर त्यांना असे म्हणावे की, ‘माझ्या मनात वासना राहिली असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही असे म्हणत आहात. आम्हाला वैराग्य आणि निवृत्तीच्या विरूद्ध का घेऊन जात आहात? आमची आसक्ती आणि वासना ह्यांना नाहीसे करून टाका ना! तुमचे सामर्थ्य आहे. आमच्या अंत:करणातील अशुद्धीला दूर करीत नसून उलट त्यांना पूर्ण करण्याचा सल्ला देत आहात! तुम्ही असे कसे आहात?’ ईश्वर सन्मुख आला असता, असे बोलले पाहिजे.” असे त्या महात्म्यांनी आम्हाला शिकविले होते.
आपण म्हणाल की, ‘आमचे अंत:करण शुद्ध आहे, त्याचा हा आतला आवाज आहे.’
परंतु तुमचे हे म्हणणे बरोबर नाही. कारण की, तुमच्या अंत:करणात किती संस्कार आणि किती वासना लपलेल्या आहेत, हे तुम्हाला ज्ञात नाही; म्हणून आपल्या इष्ट देवाच्या प्राप्तीसाठी आणि वासना शांत होण्यासाठी शास्त्रानुसार, गुरूंच्या आज्ञेनुसार चालले पाहिजे.
ह्या अंत:करणाचा आवाज एक दिवस असा दगा देतो की, मनुष्य होत्याचा नव्हता होऊन जातो! ‘इलहाम-इलहाम’ असे जे म्हणतात ना!; ती अन्त:प्रेरणा महात्म्यांना होते, सर्वांना नाही आणि ती कधी-कधी खरी सुद्धा होते.
आपल्या वासनेच्या विपरीत इलहाम असेल तर तो माना आणि आपल्या वासनेच्या अनुकूल असेल तर मानू नका. उदाहरणार्थ- एखाद्याला पाच रुपये देण्याचे मनात आले आणि ‘देऊ नको’ अशी अन्त:प्रेरणा झाली, तर तेव्हा ईश्वराने देण्यास मनाई केली असे तुम्ही समजता काय? – नाही, ईश्वराने मनाई केली नाही, तर तुमच्या लोभाने मनाई केली! परंतु आपण ही गोष्ट चांगली ओळखत नाही.
‘या मुलीबरोबर विवाह कर’ – अशी जर अंत:करणातून प्रेरणा झाली, तर तेव्हा ती ईश्वराने आज्ञा दिली आहे काय? – नाही. ईश्वराने आज्ञा दिली नाही, कामाने आज्ञा दिली आहे. हे मनुष्य ओळखू शकत नाही.
मनाच्या सांगण्याप्रमाणे वागू नका. ही वासना दोन्हीकडून बुडविते.
१) जेव्हा आपण आपल्या वासनेप्रमाणे काम करतो व ते जर सफल झाले तर ‘माझ्या बुद्धिमत्तेने हे काम झाले’ असा अभिमान होतो. यामुळे आपल्यामध्ये बुद्धिमत्तेचा अहंकार येतो. अहंकार पुन्हा दुसऱ्या, तिसऱ्या वासनेमधे प्रवृत्त करतो. तेंव्हा मनुष्य अहंकार आणि वासनेच्या भोवऱ्यात सापडून परमार्थापासून च्युत होतो.२) जर वासनेप्रमाणे काम झाले नाही तर?- दुःख होते – हाय हाय! माझी वासना पूर्ण झाली नाही!’ मग अंत:करणाचा प्रसाद (निर्मलता) आहे, भंग होतो- अंत:करण अशुद्ध होते.
तेव्हा, आपल्या वासनेप्रमाणे जे कर्म करतात, त्यांना सफलता प्राप्त झाली तरी सुद्धा ते वाईट मार्गावर जातात आणि विफलता मिळाली तरी सुद्धा ते वाईट मार्गावरच जातात. कारण अहंकार व वासनेची सृष्टी अशीच आहे.