जिज्ञासू – “भगवन्! व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही चिंता येते आणि जेव्हा चिंता येते; तेव्हा सर्व काही विसरून जातो, तसेच अगोदर होत असलेले भजन सुद्धा बंद होते. ही चिंता कशी नाहीशी होईल?”
महात्मा- “चिंता कोणत्या गोष्टीची आहे?- शरीर आणि शरीराच्या संबंधीयांमुळे चिंता प्राप्त होतात. अमुक वस्तू मला पाहिजे किंवा माझ्या कुटुंबीयांना पाहिजे, ती कशी मिळेल? कोठे मिळेल? लौकिक चिंतेचे हेच स्वरूप आहे. पारलौकिक चिंता अंत:करणाच्या संबंधाने होतात. सार गोष्ट ही आहे की, आपल्याजवळ जो काही संग्रह असतो, त्याच्या रक्षणाची चिंता असते आणि जर संग्रह कमी असेल, तर तो कसा वाढेल याची चिंता असते.
चिंता नाहीशी करण्याचा सर्वात उत्कृष्ट उपाय हा आहे की, आपल्या जवळ आंतरिक किंवा बाह्य असा कोणत्याही प्रकारचा संग्रह असता कामा नये. वास्तविक, संग्रह तर आंतरिकच असतो, बाह्य नव्हे. जेव्हा ‘ही वस्तू माझी आहे’ – असे ज्या कोणत्याही एखाद्या वस्तूला मनाने पकडले जाते, तेव्हा तीच वस्तू बाह्य संग्रहात रूपांतरित होते. मनाने कोणत्याही वस्तूला आपली मानू नका, हवे तर शरीराच्या आसपास पुष्कळ वस्तू ठेवलेल्या असू द्या! शरीराला सुद्धा आपले मानू नका. इतकेच नाही तर मनाला सुद्धा आपले मानू नका. तसेच आत्मासुद्धा ज्याचा अंश आहे, ज्याचा आपला आहे, जो आहे, त्याला तिथेच राहू द्या, त्यामध्ये सुद्धा अहंकृतीचा भाव येऊ देऊ नका. वास्तविक हे शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, आत्मा हे सर्वच्या सर्व भगवंताचे आहेत. जे यांच्या संबंधी प्रतीत होत आहेत ते सुद्धा भगवंताचे आहेत. मग यांच्या किंवा त्यांच्याबरोबर आपलेपणा कशासाठी ठेवला पाहिजे? ही ममताच चिंतेची जननी आहे. ममता नष्ट झाल्यावर चिंता देखील नष्ट होते.
तुमचा भगवंतावर विश्वास नाही काय? तो परमात्मा सर्व पाहत असताना, त्यांच्यामध्येच सर्व काही असताना किंबहुना सर्व काही तोच असताना, ‘कोठे काही अन्याय होऊ शकतो? तुमची काही हानी होऊ शकते? तुमचे काही कोणी चोरू शकते?’ ही सोळा आणे खोटी गोष्ट आहे. ह्याचा अर्थ अजून तुमचा भगवंतावर विश्वासच बसलेला नाही.
भगवान जे काही करतात, त्यामध्ये संतुष्ट राहिले पाहिजे. योगक्षेमाची चिंता न करता निरंतर त्यांचेच चिंतन केले पाहिजे.
शरीर आणि शरीराचे संबंधी ह्यांच्यासाठी भगवंताचे चिंतन सोडून द्यावे, इतके महत्त्व आपण त्यांना देतो काय? ही गोष्ट जर खरी असेल, तर ‘अजून आमच्या साधनेची सुरूवातच झालेली नाही’ असे समजावे. साधना प्रारंभ होताच भगवत् स्मरण आणि भजनात रस येऊ लागतो आणि त्याच्यासमोर त्रैलोक्याचे राज्य सुद्धा तुच्छ ठरते. तर मग चिंता कोणत्या गोष्टीची? निरंतर भजन करीत राहा. जगद्गुरू तुकोबाराय तर म्हणतात – आमच्या स्वप्नात देखील िंचंता येत नाही, काळ ब्रह्मानंदामध्ये जात आहे-
संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥ काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥धृ॥
स्वप्नी तेही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥३॥ तुका म्हणे ब्रह्मरसें । होय सरिसे भोजन ॥४॥
(श्रीतुकोबाराय)