१०) प्रयत्न करा.

मनुष्य-जीवनात चुका होत असतात. चूक होणे म्हणजे अपराध नव्हे; परंतु चूक न सुधारणे हा दोष आहे. प्रयत्नपूर्वक साधन करीत राहिले तर मनुष्याचे मन शुद्ध होते आणि तो आपल्या परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार करू शकतो; म्हणून ‘प्रयत्न करा.’
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हें ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरी ॥धृ।।
दोरे चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥३॥

तुका म्हणे कैंचा बसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकी ॥४॥ ( तु.म.)
मी लहानपणी शिक्षणासाठी जात होतो. गावचा रस्ता म्हणजे पाऊलवाट होती. पावसाळ्यात अनेक वेळा घसरून पडत असे. जर पडल्यावर सुद्धा शाळेत गेलो तर ठीक होत असे; परंतु पडल्यावर घरी आलो तर बोलणे ऐकावे लागत असे.
‘पडणे’ अपराध नाही; परंतु ‘पडून न उठणे’ हा अपराध आहे. उठूनही पाठीमागे वळणे-पाठ दाखविणे म्हणजे घाबरटपणा आहे – ‘उठा! आणि पुरुषार्थाने आपल्या लक्ष्याकडे उन्मुख व्हा.’ पडत- उठत अनेक जन्मामध्ये आम्ही आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणारच-आम्ही परमगती प्राप्त करणारच! हे खरे आहे की, पूर्वाभ्यास आपल्याकडे ओढून घेतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या मनुष्याला प्रवाह वाहून नेतो, त्याप्रमाणे पूर्व जन्माच्या अभ्यासाने मनुष्य विवश होऊन तिकडे ओढला जातो. पूर्वाभ्यास रुची-प्रवृत्ती देत असतो; परंतु प्रयत्न केला तर ती रूची-प्रवृत्ती नष्ट होऊन जाईल.
तुम्ही व्यापारासाठी किती प्रयत्न करता? भोग भोगण्यासाठी किती व्यस्त असता? वासना पूर्णतेसाठी आपण काय-काय करीत नाही? समाधी, भगवत्‌-प्राप्ती अथवा ब्रह्मज्ञानच सर्वात इतके निकृष्ट-टाकाऊ आहे काय, की त्याच्यासाठी आपण काहीच प्रयत्न करू इच्छित नाही? – याचा अर्थ परमार्थामध्ये तुमची रुची नाही – जहाँ चाह वहाँ राह। – ‘इच्छा असेल तर मार्ग सापडतो.’ जर आपल्या मनात परमार्थ प्राप्तीच्या इच्छेचा उदय होईल, तर कधी ना कधी, कुठून ना कुठून आपल्याला मार्ग अवश्य मिळेलच. जर आपल्याला मार्ग मिळाला नाही, तर आपली इच्छा दुर्बल आहे असे तुम्ही समजा. जर आपल्या मनात समाधी लावण्याची अथवा ईश्वराला भेटण्याची किंवा आपल्या स्वरूपात अवस्थित होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो; तेव्हा त्याचे पाप नष्ट होते, त्याच्या वासना दूर होतात, त्याचे चित्त शुद्ध होते. आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनात हा दृढ आग्रह असला पाहिजे की ‘मी परमात्म्याची प्राप्ती अवश्य करून घेणारच!’
जनम कोटि लगि रगरि हमारि । बरौ संभु न त रहउँ कुमारी ॥
शता एका तरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटी येईल दया ॥३॥ (तु.म.)
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥
चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥

ग्रंथ हवा असल्यास पोस्टाने पाठविण्याची सेवा उपलब्ध आहे, तरी बाजूच्या व्हॉटसॅप आयकॉन वर क्लिक करून आमच्याशी संपर्क करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top