मनुष्य हा धर्म, योग किंवा ज्ञानाची साधना करण्यास असमर्थ ठरण्यास त्यामध्ये काही बाधा-विघ्ने आहेत-
१) मानसिक दुर्बलतेमुळे पावलोपावली वासनेच्या वशीभूत होऊन दुश्चरित्राच्या खड्ड्यात पडणे. २) हीनतेच्या ग्रंथीने आबद्ध होणे.
३) भोग्य वस्तू तसेच ममतास्पद व्यक्तिविषयी अनर्थकारक आसक्ती.
४) विद्या-बुद्धी-धन इत्यादी आगंतुक विनश्वर वस्तुंविषयी मिथ्याभिमान.
५) अज्ञानालाच ज्ञान समजणे. आपल्या अयोग्यतेमुळेच मनुष्य साधना करू शकत नाही.
या अयोग्यतेपासून वर उठविण्यासाठी एखाद्या प्रबळ आश्वासनाची अथवा दृढ आलंबनाची आवश्यकता असते. घसरत असलेला सावरला जावा, पडलेला उठावा, मागे पडलेला अग्रेसर व्हावा, ह्यासाठी एखाद्या दृढ आश्रयाची अपेक्षा असते. पडलेल्याला उचलून अंकावर घ्यावा, दीन-हीन व्यक्तीला हृदयाला कवटाळावा, आश्रय नसलेल्याला आश्रय व्हावा, असा कोणी ना कोणी असला पाहिजे आणि असा अवश्य कोणी आहे!
तो असा असला पाहिजे की, ज्याने आमच्या अयोग्यतेकडे पाहू नये. त्याने आपल्या सहजशीलस्वभावानेच आमचे रक्षण, पालन-पोषण तसेच संवर्धन करावे. मनुष्याच्या ह्याच आशेच्या पूर्णतेसाठी भागवत-धर्म अथवा भक्ती प्रकट झाली आहे.
भागवतधर्मात आमच्याकडून कोणतेही कर्म होवो, ते भगवंताला अर्पित झाले पाहिजे. कर्म- विशेषाचा नियम नाही, तर समर्पण-भावाची विशेषता आहे; म्हणून शरीराने-वाणीने-मनाने इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराकडून, संस्कारजन्य स्वभावाने, जे काही (कर्म) केले जाते, ते सर्व अंतर्यामी परमेश्वर नारायणाच्या उद्देशाने समर्पित करा.
भक्ती-माता आपल्या कोणत्याही पुत्राला आपल्या कडेवर उचलून घेते आणि त्याच्या रोम-रोमाला आपल्या वात्सल्य रसाने आप्लावित (सिक्त) आणि आप्यायित (तृप्त) करते. तिला शास्त्रोक्त अधिकारी, एकांताभ्यासी अथवा जिज्ञासूपेक्षा जो अज्ञानी आहे, अबोध आहे, साधना करण्यास असमर्थ आहे, एकांतात जो रडतो, घाबरतो, ज्याला मुक्तीची इच्छा नाही, प्रेम-माधुरीचे बंधनच ज्याला आवडते तो बालक अधिक प्रिय वाटतो. तो कधीकधी आपल्या मातेला सुद्धा विसरतो; परंतु माता त्याला विसरत नाही. माता आपल्या अबोध बालकावर करूणेची गंगा प्रवाहित करते. भगवती भक्ती जेव्हा पाहते की, ‘माझा बालक मलिनतेने गिरबडला आहे, अग्नीमध्ये हात घालू पाहत आहे, अहंकार-ममकाराच्या विघ्न-बाधेने दु:खी होत आहे; तेव्हा ती आईप्रमाणे त्याला जवळ घेते आणि आपल्या स्नेह माधुरीने त्याला निर्मळ करते, कुमार्गापासून त्याचे रक्षण करते; त्याच्या तन-मनात हास्य भरून टाकते, ती अज्ञान्याला ज्ञान देते, मलिनतेला स्वच्छ करते, पीडिताला सुखी करते. ती अबोधाचा सांभाळ करते, मलिनता दूर करण्याविषयी रूची ठेवते, स्वत: हास्य रसाचा विस्तार करून मुलाच्या मुखकमलाला विकसित करते, रडणाऱ्याला गप्प करते, गप्प असलेल्यास हसविते, तहानलेल्याला-भुकेलेल्याला तृप्त करते. तिला भगवंताच्या कोणत्याही रूपाविषयी, कोणत्याही शिशुविषयी, कोणत्याही लीलेविषयी निषेध-हरकत नाही.
सर्वांमध्ये आपल्या प्रभूचा अनुभव करणे; हाच भक्तीचा स्वभाव आहे.
ग्रंथ हवा असल्यास पोस्टाने पाठविण्याची सेवा उपलब्ध आहे, तरी बाजूच्या व्हॉटसॅप आयकॉन वर क्लिक करून आमच्याशी संपर्क करू शकता.