येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो-
वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते.
जे ईश्वराचे खरे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये काही असे असतात की, जे ईश्वराच्यासमोर जाण्यासाठी थोडे घाबरतात; त्यांची हिंमत होत नाही. त्यांना या गोष्टीचा संकोच वाटतो की, ‘आम्ही इतके घाणेरडे आहोत, मग ईश्वरासमोर कसे जाणार?’ अशा लोकांचे मन ईश्वराची कृपा, ईश्वराचे प्रेम, ईश्वराची कोमलता यांना तर विसरते आणि केवळ आपलेच ध्यान ठेवते. आपल्या दोषांना निवृत्त करण्याच्या दृष्टीने ते दोष पाहणे हे योग्य आहे; परंतु त्या दोषांमुळे पतित-पावन परमेश्वराजवळ जाण्यासाठी संकोच करू नका.
इच्छा असून देखील जे आपल्या अयोग्यतेला पाहून भगवंताजवळ जात नाहीत, ते भक्त तर आहेत; परंतु ते आत्मनिष्ठ आहेत. त्यांचे मन स्वत:कडेच राहते, ईश्वराकडे जात नाही.
जेव्हा भक्ती अग्रेसर होते; तेव्हा आपल्याकडे पाहणे सोडून देते; तेव्हा भक्त भगवंताकडेच पाहतो. ‘आम्ही कसे आहोत’- हे भगवंताला पाहावयाचे असेल तर पाहू द्या, आणि पाहाण्याची इच्छा नसेल तर नका का पाहिनात! आम्ही तर भगवंतालाच पाहतो! भगवान आम्हाला पाहतील तर त्यांची दृष्टी पडताक्षणीच सर्वकाही ठीक होईल. आम्ही कसेही असलो तरी त्यांचे आहोत, आमच्या आत गुण कोणते आहेत, दोष कोणते आहेत, हे आम्ही जाणत नाही; परंतु हे प्रभू! आम्हाला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, अत्यंत कोमल आहात, अत्यंत उदार आहात, आमच्यावर अतिशय प्रेम करणारे आहात. तुमच्याविषयी आम्हाला सर्वकाही ज्ञात आहे; पण आमच्याविषयी आम्हाला काहीच माहीत नाही. तुम्हाला जर आमची कोणती चूक ज्ञात झाली, तर तिला दूर करा. मी जसा आहे तसाच जर तुम्हाला मान्य असेन, तर मला बदलण्याची काहीही आवश्यकता नाही. मी जन्म-जन्मान्तरपर्यंत असाच राहीन. हे आहे भगवत्परायण भक्ताचे चिंतन!
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरी तारी मारी ।
जवळी अथवा दुरी धरी । घालीं संसारी अथवा नको ॥१॥
जोपर्यंत मनुष्याचे मन आपल्या स्वत:विषयी विचार करते, तोपर्यंत भक्तीचा प्रारंभ होत नाही; परंतु जेंव्हा मन ईश्वराविषयी विचार करावयास लागते, तेव्हा त्याची भक्ती प्रारंभ होते.
आता प्रश्न हा आहे की, आपल्याला ज्याच्याविषयी प्रेम आहे, त्याला आपल्या इच्छेनुसार सुख देण्याची इच्छा करता काय? – जर आपण त्याची इच्छा दाबून आपली इच्छा त्याच्यावर लादवण्याची इच्छा करीत असाल, तर ही सुख देण्याची रीती नाही. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला सुख देऊ इच्छित असाल, तर त्यासाठी आपल्याला त्याच्या अधीन व्हावे लागेल; म्हणून प्रेमी आपल्या प्रियतम प्रभूच्या अधीन असतो. जैसे जैसे रखियत है, वैसे वैसे रहियत हौं हे हरि!- ‘हे हरि! तुम्ही जसे ठेवाल, तसे आम्ही राहू,’ असे वृंदावनचे भक्त म्हणतात.
ठेविले अनंते तैसेंचि रहावें । चित्तीं असों द्यावे समाधान ॥धृ॥ (तु.म.)
समयासी सादर व्हावे। देव ठेवील तैसे रहावे ॥धृ॥
कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर। कोणे दिवशी पालखी सुभेदार।
कोणे दिवशी पायीचा चाकर। चालूनी जावे॥१॥ (सावता म.)