आमच्या आजोबांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – श्रीमद्भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी हे पूर्वी अशिक्षित, मूर्ख, अगदी ढ होते! एक अक्षरही त्यांना येत नव्हते. ते विजयनगरमध्ये राहत होते. तेथील राजा एक दिवस छतावर आपल्या मंत्र्यासोबत फिरत होता. मंत्री अत्यंत बुद्धिमान होता. ईश्वराच्या उपासनेने असंभव गोष्टी देखील संभव होतात अशा प्रकारचे बोलणे त्यांच्यात चालू होते. तेवढ्यात खालून श्रीधर स्वामी, सोळा-सतरा वर्षाचे वय, हातात वाहना आणि त्याच्यात तेल भरून घेऊन जात होते. त्यांच्यावर राजाची दृष्टी पडली. त्यांनी विचारले की, “हा कोण आहे?” मंत्र्याने सांगितले – “कोणी ब्राह्मण पुत्र आहे.” राजाने म्हटले, “बोलवा त्याला इकडे.” त्याला बोलविण्यात आले. राजाने त्याला विचारले की, “जोड्यात तेल का घेऊन जात आहेस?” तो म्हणाला की, “मी तेल्याच्या घरी तेल आणण्याकरिता गेलो होतो, पात्रात जेवढे तेल मावत होते, तेवढे पात्रात घेतले आणि बाकीचे तेल जोड्यात घेतले.” राजा म्हणाला, “हा महामूर्ख आहे.” राजाने मंत्र्याला विचारले की, “ठीक आहे! हा मूर्ख विद्वान होऊ शकेल, अशी ईश्वराच्या उपासनेत शक्ती आहे काय?” मंत्र्याने म्हटले की, “हो! ईश्वराच्या उपासनेने हा अवश्य विद्वान् होऊ शकतो.” राजा म्हणाला, “ठीक आहे! याला विद्वान करून दाखवा.”
विचारपुस केल्यावर श्रीधर स्वामींनी आपले आई-वडील असल्याचे सांगितले. राजाकडून त्यांच्या भरण-पोषणाची सर्व व्यवस्था करण्यात आली. मंत्र्यांने श्रीधर स्वामींना नृसिंहतापिनी उपनिषदामध्ये वर्णित भगवान श्रीनृसिंहाच्या मंत्राचा उपदेश केला आणि श्रीधरस्वामी त्याचे अनुष्ठान करू लागले. एक दिवस ते अनुष्ठान करीत असताना त्यांनी पाहिले की, झाडावरील पक्ष्याच्या घरट्यातील एक अंडे खाली पडले आणि ते फुटले व त्याच्यातून एक लहान पिल्लू बाहेर पडले; परंतु खाली पडूनही ते मेले नाही. त्याचे तोंड कधी उघडायचे तर कधी बंद व्हायचे. ते भुकेने अत्यंत व्याकुळ झाले होते. त्याला कोण अन्नपाणी देणार? ते दीर्घ श्वास घेत होते. श्रीधर स्वामींना वाटले की “आता हे मरणार! आता त्याला अन्न-पाणी कुठून मिळेल?” – असा विचार त्यांच्या मनात आला. इतक्यात असे झाले की, दोन माशा परस्परात भांडू लागल्या. जेव्हा त्या माशा भांडू लागल्या, तेव्हा त्या पिल्ल्याचे तोंड उघडले आणि त्या दोन्ही माशा त्याच्या तोंडात जाऊन पडल्या आणि त्याचे तोंड बंद झाले अशाप्रकारे त्याला त्याचे भोजन मिळाले.
श्रीधर स्वामी आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की, अरे याला तर पंख देखील नाहीत, त्याच्या जवळ त्याची आई देखील नाही आणि याच्या तोंडात हे अन्न कुठून आले? या दोन्ही माशांचे भांडण कोणी लावले? आणि ते अगदी बरोबर त्याच्या तोंडात कोणी पाडले? ही ईश्वराची लीला आहे! तर मग मलाही आई-वडिलांच्या भोजनाची चिंता करण्याची काय गरज आहे? आपल्या भोजनाची चिंता करण्याची काय आवश्यकता आहे? मी तर आता केवळ भजनच करणार! त्या पिल्यास ज्याने भोजन दिले, तोच आम्हाला देखील भोजन देईल!
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जगासी एकला तो ॥ध्रु॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्हीं ॥२॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥३॥
तेणें तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥४॥
तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥५॥
त्यानंतर त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाले. श्रीनृसिंह भगवान प्रसन्न झाले. आणि त्यांना असे ज्ञान प्राप्त झाले की, श्रीमद्भागवता विषयी असे सांगितले जाते -
व्यासो वेत्ति शुको वेत्ति राजा वेत्ति न वेत्ति वा ।
श्रीधर: सकलं वेत्ति श्रीनृसिंह प्रसादत: ॥
– ‘श्रीमद्भागवताचा यथार्थ अभिप्राय भगवान् व्यास जाणतात आणि परमहंस शिरोमणी शुकदेव महाराज जाणतात, राजा परीक्षितीने जाणले की नाही – यात संदेह आहे; परंतु भगवान श्रीनृसिंहाच्या कृपेने श्रीधराचार्य श्रीमद्भागवताचा अभिप्राय संपूर्ण जाणतात.
🙏🙏 जय हरि, धन्य काळ संत भेटी पायी मोठी पडलितो .. अशीच कृपा व्हावी.. धन्यवाद.
राम कृष्ण हरी