श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा)

लेखक – डॉ हरीश नवले.

ह. भ. प. डॉक्टर नारायण महाराज जाधव. आळंदी देवाची
ज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार २०२४
महाराष्ट्रात संतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच पर्श्वभूमीवर राज्य शासनाने २००८ सालापासून ज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार सुरू केला. संत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभ्यासक आणि साधक मंडळींची गौरव या पुरस्काराद्वारे शासनाकडून केला जातो. ज्या मंडळींना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आला त्या व्यक्तींमुळे पुरस्काराचा मान वाढला यात शंका नाही. या पुरस्काराचा मान वाढविणारे या वर्षीचे मानकरी आहेत ह भ प डॉ नारायण महाराज जाधव. वारकरी सांप्रदायाने अनेक महात्मे जगाला दिले. त्यातील एक डॉक्टर नारायण जाधव महाराज आहेत.

डॉ नारायण जाधव हे पारनेर येथील कर्जुले हर्या नावाच्या छोट्या गावात एका वारकरी कुटुंबात जन्माला आले. लहानपणीपासून त्यांचा स्वभाव विरक्त होता हे स्पष्ट करतील अशा काही घटना त्यांच्या बालवयात घडलेल्या होत्या. घरातूनच आध्यात्मिक संस्कार मिळाले होते. वडिलांचे छत्र लवकरच हरपले. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे चुलत्यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टरांनी चुलत्यांचा जेवढा आदर केला तेवढा आदर क्वचितच इतर कोणी केला असेल.

डॉक्टर स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास कॉलेज जीवनात करत. पुढे BAMS ची  पदवी घेतली.  ९० च्या दशकात डॉक्टरांनी टाकळी ढोकेश्वर हे नगर कल्याण महामार्गावरील गाव असल्यामुळे  तिथे दवाखाना चालू केला. अत्यंत साधी राहणी असल्यामुळे दवाखाना चालेल का याची मित्रांना शंका होती. पण डॉक्टर नारायण जाधव प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे वात्सल्य पूर्ण उपचार त्यांच्याकडे होत. हा कालावधी म्हणजे आजच्या तुलनेत खूपच वेगळा आणि मागास होता. आर्थिक दारिद्र्य सर्वदूर होते. पारनेर मध्ये शिक्षणाची कास धरून काही कुटुंबे विकासाच्या प्रवाहात येत होती. यातच एखाद्याने वैद्यक शिक्षण घेणे हे दुर्मिळ असे.

वैद्यक प्रॅक्टिस करताना अनेक गोष्टी घडत होत्या. डॉ नारायण जाधव रुग्णांना तपासत, ज्यांच्याकडे त्यांची फी द्यायला पैसे नसायचे त्यांची फी माफ होत असे. त्याकाळी असे काही रुग्ण असायचे की त्या एसटी च्या तिकिटाचेही पैसे नसायचे. ज्या रुग्णांकडे घरी मागे जायला एसटी च्या तिकिटाला पैसे नसायचे डॉक्टर त्यांना पैसे द्यायचे. या सर्व डॉक्टरांच्या वैद्यक व्यवसायाच्या गमतीशीर कथा पंचक्रोशीत पसरत होत्या. खरे तर डॉक्टरांना व्यवसाय करायचा मानस कधीच नव्हता. त्याचा विरक्त स्वभाव अधिकच विरक्त होत गेला. व्यवसायात मन रमेना. निदान आणि गुण उत्तम येत असे पण व्यवसाय होणे नव्हते.

डॉक्टरांनी लवकरच वैद्यक व्यवसायातून आनंदाने निवृत्ती स्वीकारली  आणि  थेट संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी गाठली. डॉक्टरांच्या गावचेच असलेले त्याकाळी ह भ प कै. तुकाराम शास्त्री आंधळे यांनी अध्यात्मात उंची गाठून वारकरी संप्रदायात चांगले नाव कमावले होते. तुकाराम शास्त्रींनी लहानपणीच घरातून पळून जावून शास्त्री पदवी संपादन केली. तुकाराम शास्त्रीं उत्तम कीर्तन करत. एक विद्वान कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती पसरली होती. त्याकाळी शास्त्री पदवी संपादन केलेले कीर्तनकार कमी प्रमाणात असत. डॉक्टर महाराज सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या गावाने बहुतेक गावकरी बांधतात त्याप्रमाणे आळंदीत एक धर्मशाळा बांधली होती. धर्मशाळा चांगली होती. डॉक्टर एकटे येवून तिथे अध्यात्मिक अभ्यासाचे धडे आनंदाने गिरवू लागले. विरक्त आणि संन्यास सदृश जीवनाची एका अर्थानं दीक्षा त्यांनी स्वीकारली.

ज्ञानेश्र्वरीची अनेक पारायणे हा अध्यात्मिक जीवनाचा पहिला पाठ डॉक्टरांनी कधीच पूर्ण केला होता.

अत्युच्च दर्जाची प्रगल्भता, उत्तम बौध्दीक क्षमता, आणि माणूस म्हणून प्रेम आणि वात्सल्याचा मूर्तिमंत पुतळा असल्यामुळे ज्ञान देखील या व्यक्तिमत्त्वात येण्यासाठी अतूर झाले असणार यात शंका नाही. आळंदीत मूळचे श्रीगोंद्यातील सुरेगाव  येथील पटवर्धन जहागीरदार घराण्यातील भूमिगत चळवळीत भाग घेऊन पुढे दंडी सन्यास घेतलेले आनंद आश्रम स्वामी, आळंदीच्या गोपाळ पूर्यात एका आश्रमात रहात. तो आश्रम मूळ साखरे महाराजांच्या पैकी एका महात्म्याच्या होता. या आश्रमात कन्हैया चे छोटे मंदिर आहे. त्यामुळे याला कन्हैया आश्रम म्हणतात. आनंद आश्रम स्वामींनी वैराग्याच्या साधनेमुळे मोठा अध्यात्मिक अधिकार प्राप्त केलेला होता. स्वामींनी डॉक्टरांची उंची ओळखली आणि अध्यात्मिक ज्ञानाची त्यांच्याकडून  घोटून उजळणी करून घेतली. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी , विचार सागर, या प्रमुख ग्रंथांचे अनेक वर्ष किती वेळा आश्रमात पाठ झालेले असतील त्यांची मोजदाद नाही. यातील काही पाठांना बसायची संधी मला माझ्या आईवडिलांनी मिळवून दिली. हे पाठ म्हणजे मोठे brain  storming  असायचे. एकेका शब्दाचा किस काढला जायचा. उन्हाळयात भर दुपारी वेदांताच्या प्रक्रिया वर चर्चा चालायच्या.  प्रक्रिया आणि ऊन यांच्या मध्ये जणू तीव्रतेची स्पर्धाच लागली की काय असे माझ्यासारख्याला वाटायचे. पण प्रक्रिया प्रचुर वेदांत ज्ञाना चा जणू गारवाच या सर्वांना लागत अशी.  स्वामी सर्व प्रक्रिया आणि तत्त्वज्ञान डॉक्टरांकडून सोडवून घेत. आणि अनेकदा खुश होवून ‘ वा रे पठ्ठ्या‘ अशी कौतुकाची पाठीवर थाप मारत. स्वामी आणि डॉक्टर हे सर्व केवळ स्वतः च्या अध्यत्मिक सरावासाठी करत. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन यात नसे. माझ्यासारख्याला फक्त रज्जू सर्प हे शब्द कानावर पडलेले समजत. त्याचा अर्थ लागणे कठीण!!! आश्रमातील अध्यात्मिक ग्रंथांची चर्चा ही अत्युच्च दर्जाची असायची. यात सर्वांचे स्वागत असायचे पण आळंदीतील अतिशय अत्यल्प विद्यार्थी तिथे असायचे. अर्थात दोन संन्याशांच्या अध्यात्म छंदात कोण सहभागी होणार.  आळंदीत एक वेगळेच जग आहे .हे जग माणसे बदलायला निघाले आहे. इकडे विद्यापीठात मनसे जग बदलायला निघाले आहेत. हे सर्व अनुभवताना मोठी मजा येते. निवृत्ती महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यातील गुरु शिष्याच्या अद्वैत नात्याचा प्रचिती स्वामी आणि डॉक्टरांच्या नात्यातून नकळत व्ह्यायची.

आळंदीत राहून आत्मानंद मिळविणे हे म्हणाव तेवढ सोप नाही. किंबहुना व्यावहारिक दृष्ट्या अजिबात सोपे नाही. एकतर आळंदीत अध्यात्माचा नसला तरी स्वच्छतेचा वानवा. मुक्कामाला राहण्यासाठी धर्मशाळा. तिकडे जेमतेम सोयी. तसेच अभ्यासला अनेक व्यत्यय. जेवणासाठी मधुकरी वर अवलंबित्व. मधुकरी म्हणजे अनेक घरांमधून भिक्षा मागून आणायची आणि त्या सर्व एकत्र झालेल्या भाज्या खावून राहायचे. मधुकरी दिवसातून एकदाच milate.. संध्याकाळ चे जेवण नसते. सर्व मोसमात थंड पाण्याने पहाटे अंघोळ करावी लागते.  कोणत्याही डॉक्टर पदवी घेतलेल्या तरुणास हे केवळ अशक्य ठरू शकते. पण डॉक्टर नारायण जाधव यांनी हे सर्व आनंदाने स्वीकारले.

डॉक्टरांना अनेकदा वाटे की त्यांच्या आईने आळंदीत राहून आपले उतार आयुष्य अध्यात्मात घालवावे. . त्यासाठी त्यांनी अनेकदा तिला आळंदीत आणले देखील पण आईला गावीच धन्य वाटे. आपल्या कुटंबियांच्या सोबत शेतात काम करणे यालाच तिने धर्म मानून आपला पुरुषार्थ त्या मातेने साध्य केला. डॉक्टरांसारखे पुत्र रत्न देवून त्या मातेने अनंत उपकार केले असे म्हटले तर कोणी वावगे ठरवणार नाही याची मला खात्री आहे.

डॉक्टर नारायण जाधव हे आळंदीतील सर्वच विद्यार्थांच्या  आजारांचे डॉक्टर झाले. जणू माऊलींनीच त्यांना ती जबादरी दिली असावी. महाराष्ट्र भरातून अनेक मुले आळंदीत वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने येतात. त्यातील अनेकांनी आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. त्यांच्या आजारावर चालता चालता औषधे देवून बरे करण्याची  विद्या डॉक्टरांना साधली आहे. अनेक जणांचे अजार असेच डॉक्टरांनी बरे केले. हा कालावधी तसा जुना आहे. आज आळंदीत कमालीची गर्दी रोज असते. अगदी कोविड पूर्वी देखील परिस्थिती बरी होती. डॉक्टर त्यामुळे केवळ अध्यात्मिक ज्ञानाचे आधारस्तंभ नव्हते तर ते आजारातील आरोग्यासाठी देखील विद्यार्थ्यांसाठी   आशेचे किरण आहेत. डॉक्टर स्वतः च्या आरोग्याबाबत तसे निष्काळजी आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना अनेक व्याधी त्रास देतात. परंतु त्यांचा कदाचित स्वतः च्या शरीराकडे बघण्याचा  हा अद्वैती बाणा असावा.  असो…. तुलनेने आज विद्यार्थ्याची परिस्थिती सुधारली आहे.. देणगीदार अनेक आहेत. पूर्वी सर्वांचीच परिस्थितीत हलाखीची असे.

डॉक्टरांकडे पहिले तर साने गुरूजी किंवा विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आठवण येते.  डॉक्टर म्हणेज भक्ती आणि ज्ञानाचा अप्रतिम संगम. माऊलींनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितली आहे. डॉक्टरांना वारकरी अद्वैत वेदांताचे अनुयायी समजतात. पण डॉक्टरांच्या अभंग निरुपणातील भक्ती चे विवेचन इतर कोणत्याही कीर्तनकारापेक्षा उजवे वाटते. मला वाटते की डॉक्टर महाराज हे आता केवळ लोकसंग्रह पद्धतीने जीवन व्यतीत करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्ञानोत्तर भक्तिनंतर देखील हे मुक्त पुरुष समाजो उद्धारासाठी आपले जीवन व्यतीत करण्याचे कर्तव्य करत असतात. हे परम कर्तव्य डॉक्टर महाराज करत आहेत. त्यांच्या संगतीत असणाऱ्या लोकांचे मोठे भाग्य आहे.

डॉक्टरांचे वक्तृत्व प्रचलित  अंगाने सामान्य आहे. पण त्यांच्या वाणीचा केवळ ज्ञानानेच आश्रय केलेला असल्यामुळे त्यांचे व्याख्यान ऐकत राहावे वाटते. अद्वैताचा परीस स्पर्श असल्यामुळे भक्तीचे विवेचन समजले नाही तरी काहीतरी मूलभूत ऐकल्याचे कानांना समाधान लाभते. डॉक्टरांचा संस्कृत ग्रंथाचा अभ्यास उत्तम असल्यामुळे काशितील अनेक विद्वान त्यांना चांगले परिचित आहेत. उत्तर भारतात स्वामी अखंडानंद सरस्वती हे अद्वैता चे मोठे अधिकारी पुरुष होवून गेले. हिंदीमध्ये त्यांनी सोप्या भाषेत अद्वैताचे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. माऊलींची परंपरा चालवत डॉक्टरांनी या ग्रंथांचे सुलभ मराठीत भाषांतर करून मराठी बांधवांसाठी ते ज्ञान खुले केले. हे असे २० ते २५ ग्रंथ असावेत. ते तसेच पाठ भेदासहित ज्ञानेश्वरीचे संपादन केले आहे.

गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या द्वारा संपादित ग्रंथसंपदा पाहण्याकरिता व पोस्टाने मागविण्याकरिता पुढील व्हाट्सॅप लिंक वर क्लिक करा

https://wa.me/c/918080372752

डॉक्टरांनी आळंदीत आष्टदशा हा अठरा दिवसांचा ग्रंथ चिंतनाचा नवीन प्रकार रूढ केला. माऊलींनी ज्ञानाची दिवाळी करायला सांगितली आहे. त्यामुळे हा आठरा दिवसांचा अध्यात्मिक अभ्यास दिवाळीच्या दरम्यान आयोजित केला जातो. अनेक भाविक यामध्ये सहभागी होतात.

नारायण डॉक्टरांना मी माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ओळखतो. अनेकदा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. त्यांच्या अनेक आठवणी स्मृतीत आहेत. त्यांची प्रवचने, पाठ रेकॉर्ड करून मोबाईल वर ऐकण्याचा सराव मी आजही करतो. दार्शनिक ज्ञानावर मोठी सखोल दृष्टी त्याच्यातून समोर येते. डॉक्टरांच्या सानिध्यात कमी पण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे माणसाने त्यांना लाभली. डॉक्टरांसारखा महात्मा होण्याचे दिवस कदाचित संपले आहेत असं मला वाटते. माझे भाग्यच आहे की माझ्या आईवडीलांच्या व्यासंगामुळे मला डॉक्टरांचा सत्संग लाभू शाकला. डॉक्टरांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटना सांगता येतील. त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीच्या ते कुटुंबातील एक जबाबदार सदस्य या नात्याने च त्या व्यक्तीची काळजी घेतात, याचा अनुभव सर्वांना आहे.

गीतेमध्ये सांगितलेल्या लोकसंग्रह संकल्पनेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर महाराज होत.  प्रसिध्दी ला इतका परांड.मुख असलेला माणूस मी अद्याप पहिला नाही. पण लोकांची मदत  करण्यात कोणत्याही क्षणी तयार असतात. इतकी वर्षे आळंदीत राहून ही प्रचलित अर्थाने अजिबात शिष्य वर्ग निर्माण केला नाही. अनेकांना अध्यात्म  जरूर शिकविले. त्यांचा साधेपणामुळे या पुरस्कारासाठी कोणी त्यांची दाखल घेईल का असा प्रश्न पडायचा. अर्थात त्यांचा  अधिकार एवढा आहे की त्यांच्या पुढे जगातील कोणताही पुरस्कार मोठा नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. तरीही ज्यांनी कोणी त्यांची या पुरस्कारासाठी शिफारस केली असेल त्या सर्वांचे आभार मानावे  तेवढे थोडेच आहेत. कारण एकच आहे की हा जनतेच्या वतीने शासनाने चालू केलेला पुरस्कार अजून एका  मोठ्या उंचीवर गेला. 



डॉक्टर महाराजांचा परिचय आणि गौरव सर्वांना माहीत व्हावा या शुद्ध हेतूने हा लेख प्रपंच केला.

ज्ञानदेव तुकाराम पुरस्कार पुन्हा एकदा धन्य झाला.



डॉक्टर नारायण जाधव महाराजांना त्रिवार प्रणाम.🙏🙏🙏🌹🌹🌹💐🌺

डॉ हरीश नवले.

जरूर हे स्तोत्र संपूर्ण ऐका डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अर्थासहित स्तोत्र दिलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top