३१) नित्यानित्य विवेकाने परमार्थाची सुरूवात आणि आत्मानात्मविवेकाने, सत्य मिथ्या विचाराने सर्वं खल्विंद ब्रह्म ह्या अनुभूतीने परमार्थाची परिसमाप्ती होत असते.
३२) जीव जर अहंकाररुपी निद्रेत कधीच झोपला नाही तर त्याला सुखदुःख कधीच होतच नाहीत.
३३) अहंकार म्हणजे आत्म्याव्यतिरिक्त अनात्म पदार्थांना ‘मी’ आहे असे म्हणणे.
३४) कल्पित पदार्थ हा अधिष्ठानस्वरूप आहे परंतु अधिष्ठानावर कल्पित पदार्थांची सिद्धीच होत नाही.
३५) अंतःकरण आणि आत्मा यांच्या अध्यासिक तादात्म्यसंबंधामुळे जगाचे अनेकत्व प्रतीतीला येते.
३६) वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगते, ते ऐक, नाही ऐकले तर कायम या दुःखाच्या खाईत पडत रहा आणि दुःख भोगत रहा.
३७) ज्याला वर्तमान व्यवस्थित जगता येत नाही तो मरणाच्या वेळी कसा व्यवस्थित असेल?
३८) मरणाचा विचार आला की वैराग्य आपोआप निर्माण होते.
३९) नित्य मृत्यूची टांगती तलवार आपल्यावर आहे हा विचार नित्य करावा.
४०) परमार्थामध्ये श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे ती कोठेही बाजारात मिळत नाही. श्रद्धा ही भगवद्कृपेवर अवलंबून आहे. अनेक जन्माच्या पुण्याईने ही श्रद्धा उत्पन्न होते.