४१) विचारापुढे जी टिकत नाही ती अविद्या ‘/ माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते ब्रह्म.
४२) अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्यावर कोणतेही ज्ञान अंतःकरणात परिपक्व होण्यास साहाय्य होते.
४३) आत्माच ब्रम्ह आणि ब्रह्मच आत्मा अशी यथार्थ अनुभूती म्हणजे अध्यात्म.
४४) मला परमात्मा प्राप्त होईल का, यापेक्षा मी त्यासाठी जे काही साधन करतो ते अतिशय प्रामाणिकपणे करतो काय – याची चिंता करावी आणि आयुष्यभर सदैव भगवद्चिंतन करीत राहावे आणि परमात्मा मला प्राप्त होईल की नाही अशी शंका घेऊ नये तो मला प्राप्तच होणारच!
४५) परमात्मा कधी भेटेल याची चिंता न करता जो प्रामाणिकपणे सदैव साधनावर आरुढ असतो त्यास परमात्म्याची लवकर भेट होते.
४६) अनुभव हेच सर्वात प्रबल प्रमाण आहे.
४७) संशय घेण्यापेक्षा साधना करत करत चांगला काळ जातो.
४८) अभ्यास करणे म्हणजे पुन्हा पुन्हा भगवदाकार वृत्ती करणे, वृत्तीची धाव कोठे आहे हे पाहून तदनुसार मनाचा निरोध करून वृत्ती आपल्या स्वस्वरूपी लावणे.
४९) परीच्छिन्नतेमध्ये दुःख आहे आणि व्यापकामध्ये सुखाशिवाय दुसरे काहीच नाही.
५०) व्यावहारिक सत्तेतील आकाशास जर इतर व्यावहारिक सत्तेतील चार भूते काहीच करू शकत नाहीत.
तर पारमार्थिक सत्तेतील आत्म्यास व्यावहारिक सत्तेतील पदार्थ कसे काय करू शकतील? म्हणजे आत्म्यास मलिन किंवा आवृत्त करू शकत नाहीत.