नवीन प्रकाशन अ. १६ – “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट.

नवीन प्रकाशन – श्रीमद् भगवद्गीता अध्याय – १६.  लवकरच सोळाव्या अध्यायाचे प्रकाशन होईल त्याच्यातील ‘सत्यं’ पदावर आलेली एक गोष्ट.

“सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट.

सत्याकरिता थोडा त्याग हवा, थोडी हिम्मत हवी. एक डाकू होता. त्याचे नाव होते – राकब. एकदा तो एका महात्म्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की, “महाराज माझ्याकडून आणखी दुसरे तर काही होणार नाही, आपण मला एखादी अशी गोष्ट सांगा की, जिचे मी पालन करू शकेल.” महात्म्यांनी त्याला सांगितले की, “ठीक आहे! तू दुसरे काही कर अथवा करू नको; परंतु सत्य बोलत जा!” तो बिचारा, भोळा डाकू! वेदांत वगैरे काही शिकला सवरलेला नव्हता. त्याने ते मान्य केले. वेदांत शिकलेला असता तर लवकर मान्य केले नसते. वेदांती लोक तर म्हणतील की, ‘कसले सत्य आणि कसले खोटे? बोलणे कोठे आहे आणि न बोलणे कोठे आहे? मी बोलणारा थोडाच आहे? दिल्लीमध्ये एक साधू होते. त्यांना एका माणसाने विचारले की, “महाराज! कोठून आले आहात? त्याने सांगितले की, “अमृतसरहून आलो आहे.” दुसरा एक माणूस आला आणि विचारले की, “महाराज कुठून आला आहात?” त्याने सांगितले, “कलकत्त्याहून आलो आहे.” तिसऱ्या माणसाने विचारल्यावर त्याला मथुरेहून आलो आहे असे सांगितले. मोठा वेदांती होता तो. तेव्हा, अगोदर ज्यांनी विचारून तेथे बसले होते, त्यांनी त्या महात्म्याला विचारले की, “महाराज! कुणाला काही सांगता, कुणाला काही सांगता, असे का महाराज?” म्हणाले की, “मी खोट्यात खोटे मिसळत आहे. हे जगत खोटे आहे, त्यामुळे हे खोट्यात खोटेच मिसळणे आहे.” त्यामुळे मी जरा विचार करून सांभाळूनच ह्या वेदांती लोकांबरोबर बोलतो.
तेव्हा, महात्म्याने त्या राकबला ‘तू सत्य बोलत जा’ असे सांगितले. आता त्या राकबाला राजाचा एक घोडा चोरावयाचा होता. तो तबेल्यात गेला. पहारेकरांनी विचारले, ‘तू कोण आहेस?’ त्याने सांगितले की, ‘मी डाकू आहे.’ त्यांनी विचार केला की, ‘हा खरोखर डाकू असता तर याने ‘मी डाकू आहे’ असे सांगितले असते काय? असे कोणीही सांगत नाही. हा डाकू असू शकत नाही. महाराजांचा कोणीतरी माणूस असेल. आपली परीक्षा घेण्याकरिता हा असे बोलत आहे. तो राकब तबेल्यात शिरला आणि महाराजांचा अत्यंत सुंदर उत्कृष्ट जो सफेद घोडा होता, त्याच्यावर बसला आणी तिथून निघाला. नंतर सैनिकांना कळाले की, महाराजांचा घोडा चोरीला गेला. सैनिकांनी त्याचा पाठलाग केला. तो पळून जाता-जाता एका ठिकाणी सत्संग चालू होता, कथा-कीर्तन चालू होते. तो त्याठिकाणी गेला आणि त्याने घोड्याला एका झाडाला बांधले आणि स्वत: सत्संगामध्ये जाऊन बसला. शिपायांनी तेथे येऊन त्याला पकडले आणि विचारले, ‘तू कोण आहेस?’ त्याने सांगितले की, ‘मी डाकू आहे.’ ‘तू डाकू असशील तर डाका काय मारला आहेस ते सांग?’ त्याने सांगितले- “मी महाराजांचा घोडा चोरला आहे.” त्या शिपायांनी विचार केला की, “हा डाकू असता तर ‘मी डाकू आहे’ असे कशाला सांगितले असते? हा कोणीतरी महात्मा आहे असे वाटते. सत्संगामध्ये बसल्या-बसल्या यांना महाराजांचा घोडा चोरी झाल्याचे कळाले असावे.” तेव्हा, त्या शिपायांनी त्यांना प्रणाम केला आणि विचारले की, “महाराज! आपण इतके अंतर्ज्ञानी आहात, तर मग तो घोडा कोठे आहे हे सांगण्याची कृपा करावी.” त्याने सांगितले, “झाडाला बांधलेला आहे, जाऊन पाहा!” आता ते सैनिक जेव्हा झाडाला बांधलेल्या घोड्याला पाहायला गेले, तेव्हा त्यांना तो घोडा सफेद न दिसता काळा दिसू लागला. इतके सत्याचे माहात्म्य आहे!” ते म्हणू लागले की, “हा तर महाराजांचा घोडा नाही!” त्या घोड्याला तेथेच सोडून ते शिपाई तेथून निघून गेले. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top