बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला)

१) सर्वांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे.
२) उठल्याबरोबर भगवंताचे स्मरण करावे तसेच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ याप्रमाणे भगवंताची स्तुति करावी.
३) आपल्यापेक्षा वडील असणाऱ्यांना नमस्कार करावा.
४) प्रात:र्विधी स्नान वगैरे करून दंड-बैठका, धावणे-कुस्ती इत्यादी शारीरिक व्यायाम आणि योगासनादि करावे.
५) रामप्रहरी हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ अथवा जय जय रामकृष्णहरी या मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करावा. ज्यांचा यज्ञोपवित संस्कार झालेला आहे, त्यांनी सूर्योदयापूर्वी संध्या आणि कमीत कमी एक माळ गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा.
६)  श्रीमद्भगवद्गीतेच्या कमीत कमी एका अध्यायाचा अर्थासह पाठ करावा. त्यासाठी प्रतिपदेला-पहिल्या, द्वितीयेला-दुसऱ्या, तृतीयेला-तीसऱ्या, या प्रकारे एकादशीला-अकराव्या अध्यायाचा पाठ करून द्वादशीला-१२व्या आणि १३व्या, त्रयोदशीला-१४व्या आणि १५व्या, चतुर्दशीला-१६व्या आणि १७ व्या तसेच पौर्णिमा आणि अमावस्येला १८ व्या अध्यायाचा पाठ करावा. या प्रकारे प्रत्येक महिन्यात भगवद्गीतेचे दोन पाठ करावेत. एखाद्या महिन्यात तिथीचा क्षय असेल तर त्या महिन्यांत ७व्या आणि ८ व्या अध्याचा पाठ एकाच दिवशी करावा आणि तिथीची वृद्धी असल्यास १६ व्या आणि १७व्या अध्याचा पाठ वेगवेगळ्या दिवशी करावा.
७) विद्यालयात नियत वेळेवर जावे. शिक्षक शिकवित असलेला विषय एकाग्रतापूर्वक श्रवण करावा. रात्री झोपताना भगवंताचे स्मरण करून, दिवसभरांत शिकविलेल्या  अभ्यासाचे चिंतन व मनन करावे.
८) विद्यालयांतील प्रार्थना व सांस्कृतीक कार्यक्रमामध्यें प्रेमाणे व मन:पूर्वक सहभागी व्हावे. हा सहभाग मन:पूर्वक नसेल तर वेळ खर्च होऊनही त्याचा कांहीच फायदा होत नाही.
९) मागील पाठाचे तसेच पुढे शिकविल्या जाणाऱ्या पाठाचे स्मरण केल्याने, पाठातील शिकवित असलेल्या विषयात उत्साह टिकून राहतो.
१०) शिकत असलेला विषय फारच कठीण आहे असे कधीच समजू नये.
११) आपल्या वर्गामध्यें आपण सर्वांच्यापेक्षा आदर्श होण्याचा प्रयत्न करावा.
१२) एखादा विद्यार्थी अभ्यासात आपल्यापेक्षा पुढे गेला तर त्याला पाहून उद्वीग्न होऊ नये. उलट प्रसन्न व्हावे, हा खरोखरच उन्नती करीत आहे, मीही त्याच्याप्रमाणें अभ्यास करून  प्रगती करीन अशी त्यापासून प्रेरणा घ्यावी.
१३) आपल्या सहाध्यायीचा द्वेष करू नये. तसेच तो अभ्यासात आपल्यापेक्षा मागे पडावा म्हणजे लोक आपल्याला त्याच्या तुलनेत चांगला म्हणतील अशी इच्छा करू नये.
१४) कोणतीही विद्या किंवा कला शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण नवनविन विद्या आत्मसात करणे हा विद्वानाचा गुण आहे.
१५) स्वत:ला अतिविद्वान समजू नये तसेच त्याविषयी कधीही अभिमान बाळगू नये, त्यामुळे पुढील प्रगतीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
१६) नेहमी थोरामोठ्यांची आणि दीन-दु:खतांची कांही-ना-कांही सेवा करीत जावी.
१७) अपंग, दु:खी, अज्ञानी अथवा चूकणाऱ्याला पाहून हसू नये.
१८) मिठाई, फळे इत्यादी खाण्याचे पदार्थ प्राप्त झाले असता, ते प्रथम दुसऱ्याला देऊन मगच खावेत.
१९) विधीनें प्राप्त झालेल्या वस्तूचाच वापर करावा.
२०) दुसऱ्याची वस्तु त्याने दिली, तरी सहसा स्वीकारू नये.
२१) ज्या खाद्य-पदार्थांना अनेकांचा स्पर्श झालेला आहे, ते खाद्य पदार्थ सहसा खाऊ नयेत.
२२) कोणताही अपवित्र खाद्य पदार्थ खाऊ नये.
२३) कोणताही खाद्यपदार्थ ईश्वराला अर्पण करून मगच खावा.
२४) नेहमी भूकेपेक्षा थोडे कमीच खावे.
२५) भोजन करताना नेहमी प्रसन्नचित्त राहावे.
२६) भोजन करताना क्रोध, शोक, दीनता, द्वेष इत्यादी भाव मनांत आणू नयेत, ते मनांत राहिल्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही.
२७) भोजन करण्यापूर्वी दोन्ही हात, दोन्ही पाय आणि तोंड या पाचांना अवश्य धुवावे.
२८) भोजनापूर्वी आणि भोजनानंतर आचमन करावे.
२९) भोजनानंतर तोंडात चूळ भरून तोंड खळखळून धुवावें, दांतांत अन्नकण राहिल्याणे पायरिया सारखे दाताचे रोग होतात.
३०) चालताना-फिरताना-पळताना तसेच अशुद्ध अवस्थेत किंवा अशुद्ध ठिकाणी अन्न-पाणी ग्रहण करू नये.
३१) स्नान आणि भगवत्पूजा केल्याशिवाय भोजन करू नये.
३२) कांदा, लसुन, मांस, अंडी, दारू, ताडी इत्यादी पदार्थांचे कधीही सेवन करू नये.
३३) बाटलीबंद थंड पेये, सोडा, लेमन, बर्फ इत्यांदीचे सेवन करू नये. त्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते.
३४) मादक पदार्थांचे कधीही सेवन करू नये.
३५) बाजारातील मेवा-मिठाई, बिस्किटे,दूध, दही, लोणी, इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. दुकानदार लोभापोटी ते पदार्थ तयार करताना त्या पदार्थाच्या शुद्धतेकडे आणि खाणाराच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते.
३६) विडी, सिगारेट, तंबाखू, भांग इत्यादी नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन कधीही करू नये.
३७) अन्न आणि पाणी या व्यतिरिक्त अन्य पदार्थांची शरीराला सवय लागू देऊ नये.
३८) नखे दातांनी कुरतडू नयेत.
३९) दांत घासणें आणि तोंड धुणे वगळता इतरवेळी तोंडात बोटे घालू नयेत.
४०) पुस्तकाची पानें उलटताना बोटांना थुंकी लावू नये.
४१) कोणाचेही उष्टे खाणे, तसेच कोणालाही आपले उष्टे खावू घालणे निषिद्ध आहे.
४२) रेल्वेमधील शौच्यालायातील नळाचे अपवित्र पाणी तोंड धुण्यासाठी किंवा गुळणा करण्यासाठी वापरू नये.
४३) कधीही खाटे बोलू नये, नेहमी खरे बोलावे.
४४) कोणाचीही कोणतीही वस्तु कधीही चोरू नये. परीक्षेत कॉपी करणे ही सुद्धा चोरीच आहे तसेच कॉपी करण्यास मदत करणे ही सुद्धा चोरीच आहे. यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे.
४५) आई, वडील, गुरु इत्यादी वडीलधाऱ्या मंडळींच्या आज्ञेचे तत्काळ आणि आनंदाने पालन करावे. मोठ्यांच्या आज्ञेचे पालन केल्यानें त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे पारमार्थिक आणि लौकिक प्रगती होत असते.
४६) कोणाशीही भांडण-तंटा करू नये.
४७) कोणाशीही शिवीगाळ गरू नये.
४८) अश्लील आणि घाणेरडे शब्द उच्चारू नयेत.
४९) कोणाशीही मारामारी करू नये.
५०) कोणावरही रूष्ठ होऊ नये, तसेच कोणाशीही स्पर्धा करू नये.
५१) कोणावरही क्रोध करू नये.
५२) दुसऱ्याचे वाईट चिंतू नये, तसेच कोणाचीही चुगली करू नये.
५३) शिक्षक आणि गुरुजनांची थट्टा मस्करी करू नये; उलट त्यांचा आदर-सत्कार करावा. एवढेच नाही तर ते जेव्हां शिकविण्यासाठी वर्गावर येतात तेव्हां आणि शिकवून झाल्यानंतर परत जाताना उभे राहून आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा सन्मान करावा.
५४) समवयस्क आणि लहानांशी प्रेमाणें वागावे.
५५) विनयपूर्वक, हितकारक आणि थोडक्या शब्दात बोलावे.
५६)  सर्वाच्या हितासाठी प्रयत्न करावेत.
५७) सभेमध्यें अनुज्ञा घेऊन विनम्रतापूर्वक जावे, कोणालाही ओलांडून पुढे जावू नये.
५८) सभेमध्यें किंवा सत्संगामध्यें जाताना आपल्या पायाचा स्पर्श कोणासही होणार नाही याची खबरदारी घ्यावी. चूकून जरी कोणास पायाचा स्पर्श झाला तर त्याची हात जोडून क्षमा मागावी.
५९) सभेमध्यें बसलेल्या माणसांच्या मधून जाताना पादत्राणे घालून जावू नये.
६०) सभेमध्यें भाषण किंवा प्रश्नोत्तर करण्याची गरज पडल्यास ते सभ्यतापूर्वक करावे. तसेच सभेमध्यें आणि अभ्यास करताना गप्पागोष्टी करू नयेत.
६१) सर्वांना आपल्या प्रेमभरीत व्यवहारानें संतुष्ट करण्याची कला अवगत करावी.
६२) आपसातील वादाला आपल्या प्रेमपूर्ण वागणूकीने आणि समजूतदारपणानें नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा.
६३) कधीही प्रमाद आणि उद्दामपणा करू नये.
६४) हात, पाय अथवा डोके या शरीराच्या अवयवांना हलवित राहाणे ही वाईट सवय आहे. त्यापासून दूर राहावे.
६५) कधीही आणि कोणाचाही अपमान अथवा तिरस्कार करू नये.
६६) कोणालाही कधीही दुखवू नये.
६७) कोणाचीही थट्टा मस्करी करू नये.
६८) सदाचार, शुद्धाचार आणि साधेपणा यावर विशेष ध्यान द्यावे.
६९) आपली वेष-भूषा, आपला देश आणि आपला समाज यांना अनुकूल अशीच साधी असावी. फारच फॅशनेबल, भडक रंगाचे कपडे वापरू नयेत.
७०) अत्तर, सुंगधी-तेल, पावडर, चरबीपासून तयार केलेले साबण आणि व्हॅसलिन इत्यांदींचा वापर करू नये.
७१) आपले जीवन साधे-सुधे असावे. ते अधिक खर्चीक होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यासाठी आपले जेवण-खान, कपडे-लत्ते यावर कमीत कमी खर्च करावा.
७२) शरीर आणि कपडे स्वच्छ आणि शुद्ध ठेवावेत.
७३) शारीरिक आणि बौद्धीक बल वाढविणारे सात्त्विक खेळ खेळावेत.
७४) जुगार, पत्ते, द्युत तसेच बुद्धीबळ इत्यादी प्रमादी खेळ खेळू नयेत.
७५) टोपी, घड्याळाचा पट्टा, पाकीट, हॅन्डबॅग, कमरपट्टा इत्यादी वस्तु कातडी असतील तर त्या वापरू नयेत.
७६) नाटक, सिनेमा पाहू नये. त्यामुळे जीवन खर्चीक तर होतेच शिवाय त्यामुळे जीवन विलासी होते. शिवाय अभक्ष्य भक्षण, व्यभिचार इत्यादी दोषांचा आपल्यामध्यें शिरकाव होऊन जीवन पापमय होते.
७७) वाईट पुस्तके आणि घाणेरडे साहित्य वाचू नये.
७८) चांगले साहित्य वाचावे तसेच धार्मिक सम्मेलनामध्यें सहभागी व्हावे.
७९) गीता, रामायण इत्यादी धार्मिक ग्रंथांचा आणि संत साहित्याचा अभ्यास अवश्य करावा.
८०) पाठ्य-पुस्तके अथवा धार्मिक ग्रंथांना उंच ठिकाणी व्यवस्थित ठेवावे. त्यांना आपल्या पायांचा स्पर्श होऊ देऊ नये. चुकन पादस्पर्श झालाच तर त्यांना नमस्कार करावा.
८१) आपले ध्येय नेहमी उच्च ठेवावे.
८२) आपल्या कर्तव्य पालनांत नेहमी तत्परता आणि उत्साह असावा.
८३)  कोणतेही कार्य अशक्य समजू नये. उत्साही व्यक्तीला कठीण कामही सुकर होऊन जाते.
८४) कोणतेही कार्य करताना भगवान्श्रीरामचंद्रांचा आदर्श समोर ठेवावा.
८५) सर्व कार्यात भगवंत आपल्या पाठीशी आहेत असा विश्वास बाळगावा आणि उगीच चिंता करू नये.
८६) आपले काम आपण स्वत: करावे. शक्य असले तरी सुद्धा दुसऱ्याकडून सेवा करवून घेऊ नये.
८७) नेहमी आपल्याहून मोठ्या आणि उत्तम आचार असणाऱ्या श्रेष्ठांच्या संगतीत राहाण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणांचे अनुकरण करावें.
८८) प्रत्येक कार्य करताना याची जाणीव ठेवावी की, भगवंत मी करीत असलेले कार्य पहात आहेत आणि मी केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे यथायोग्य फळ ते मला देणार आहेत.
८९) नेहमी प्रसन्नचित्त रहावे.
९०) धर्म-पालन करताना होणारे कष्ट प्रसन्नतापूर्वक सहन करावेत.
९१) न्याययुक्त कार्य करताना होणारे कष्ट म्हणजे तप आहे असे समजावे.
९२) अचानक येणाऱ्या संकटांना भगवंताने कृपेने दिलेला प्रसाद समजावे.
९३) मोठ्या माणसांच्या आदेशाने एखादी गोष्ट मनाविरूद्ध करावी लागली तरी घाबरून जावू नये, उलट अधिक संतुष्ट आणि प्रसन्न व्हावे.
९४) आपल्या ठिकाणी असणाऱ्या मोठेपनाचा अभिमान बाळगू नये.
९५) दुसऱ्यांना हीन लेखून त्यांचा तिरस्कार करू नये.
९६) कोणाचीही किळस करू नये.
९७) आपले वाईट करणाऱ्याविषयी सुद्धा द्वेषबुद्धी ठेवू नये.
९८) कोणाचाही छळ-कपट, धोकेबाजी अथवा विश्वासघात करू नये.
९९) ब्रह्मचर्याचे पूर्णपणे पालन करावे. ब्रह्मचाऱ्यासाठी सांगितलेल्या नियमांचे यथाशक्ति पालन करावे.
१००) इंद्रियसंयम करावा. मनांत कोणतेही वाईट विचार येऊ देऊ नयेत.
१०१) आपणाहून लहान असणाऱ्या मुलामध्यें कांही चूकीचे वर्तन आढळल्यास त्याला त्याच्या हितासाठी; त्या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा किंवा त्याच्या पालकांना अथवा गुरुजनांना याची कल्पना द्यावी.
१०२) आपणाहून मोठ्या असणाऱ्या मध्यें कांही चूकीचे वर्तन आढळल्यास नम्रतापूर्वक ते त्याचे हित इच्छिनाऱ्यां व्यक्तींच्या  लक्षांत आणून द्यावे.
१०३) आपली दिनचर्या निश्चित करावी व तिचे तत्परतेने पालन करावे.
१०४) नेहमी दृढ प्रतिज्ञ असावे.
१०५) प्रत्येक गोष्ट तिच्या नियत केलेल्या जागेवर ठेवून तिचा योग्य सांभाळ करावा.
१०६) सायंकाळच्या संध्येच्यावेळी प्रात:कालीन संध्येप्रमाणें भगवंताच्या ‘हरे राम’ मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करावा. ज्यांचा यज्ञोपवित संस्कार झालेला आहे त्यांनी सूर्यास्तापूर्वी संध्या आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा.
१०७) आपल्यामध्यें असणारे दुर्गुण जावून सद्गुण यावेत यासाठी हृदयापासून भगवंताची प्रार्थना करावी. भगवंताच्या शक्तिबद्दल विश्वास ठेऊन निर्भय राहावे.
१०८) आपणास शिकविलेल्या भागाचे चिंतन करीत आणि भगवंताच्या नावाचा जप करीत झोपी जावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top