२) ब्रह्ममूर्ती श्री उडियाबाबाजी महाराजांचा उपदेश.

तत्त्वज्ञ पुरुषांच्या जीवनात अखंड ब्रह्माकार वृत्ती असते. ‘अविद्या निवृत्त झाली’ – अशा प्रकारचा अनुभव तत्त्वज्ञ पुरुषाला येत नाही. अविद्या नावाची वस्तू पूर्वी केव्हा तरी सत्य असती आणि नंतर निवृत्त झाली असती, तरच तत्त्वज्ञ पुरूषाला अविद्या निवृत्तीचा अनुभव आला असता; परन्तु नासीन्नास्ति न भविष्यति । – ‘अविद्या कधीही नव्हतीच!’- असा तत्त्वज्ञ पुरुषाचा अनुभव असतो.
निरंतर अभ्यास करीत राहिले असता आणि वासनांचा संपूर्ण नाश केल्यावरच अनुभवाची प्राप्ती होते. केवळ शास्त्र वाचून (अभ्यासून) काही होत नाही. चित्तात वासना असतील तर शांती प्राप्त होऊ शकत नाही. वासनारहित चित्तच परम तत्त्वाच्या चिंतनाचे अधिकारी असते. निरंतर अभ्यास करीत राहिल्यावरच वासनांचे निर्मूलन होते आणि तत्त्वाची उपलब्धी होते. वासनाक्षयासाठी विषयापासून नेहमी वैराग्य ठेवावे आणि अखंड भगवदाकार वृत्ती करावी.
वैराग्याचे फळ बोध आहे आणि बोधाचे फळ उपरती आहे. वैराग्य झाल्यावर विषयांच्या विषयी ग्लानी झाल्यामुळे ते विषय भोगावेसे वाटत नाहीत आणि उपरती झाल्यावर वस्तू समोर असून तिचा भोग घेण्याची प्रवृत्ती होत नाही – हेच वैराग्य व उपरती ह्या दोहोतील अंतर आहे. तदनंतर उपरतीचे फळ आहे – आनंद आणि आनंदाचे फळ आहे – शांती!
राग – जर मन हे कोणत्याही एखाद्या वस्तूच्या ठिकाणी अशाप्रकारे फसले-गुंतले जाईल की, कसल्याही प्रकारचा अपमान, निरादर किंवा दु:ख होत असून सुद्धा ते तेथून दूर होणार नाही, तर तेव्हा त्या वस्तुविषयी ‘राग’ आहे, असे समजावे. द्वेष – जर मन हे एखाद्या वस्तूपासून असे दूर होईल की, तिच्यात दोषच दोष दिसू लागतील, कोणताही गुण दिसणार नाही; तेव्हा त्या वस्तुविषयी द्वेष आहे, असे समजावे. राग-द्वेषाची उत्पत्ती ही गुण-दोष किंवा निंदा-स्तुतीच्या चिंतनानेच होते. निंदा-स्तुती न करण्याच्या प्रतिज्ञेने तसेच राग-द्वेषांपासून मुक्त असलेल्या पूर्णज्ञानी किंवा भक्त यांंच्या ध्यानाने राग-द्वेष निवृत्त होऊ शकतात. राग-द्वेषाचा त्याग केल्यानंतर चित्त हलके होते आणि  ते सत्त्वगुणप्रधान होते. त्याच्या ठिकाणी निर्विकल्प तत्त्वाच्या साक्षात्काराची योग्यता येते. राग-द्वेषवान्‌ व्यक्ती उन्नतीच्या सोनेरी पायवाटेने पुढे जाऊ शकत नाही. राग-द्वेषाची निवृत्ती केवळ विवेकाने होत नाही. विवेकाने तर राग-द्वेष सुटण्याची किल्ली (चावी) मिळते. त्यांची पूर्ण निवृत्ती ही भगवत्‌ प्रेमाने आणि आत्मप्रेमाने होते.
प्रतिष्ठा आणि गर्व माया-मोहात भटकवितील (फिरावयास लावतील) त्यांनी कोणता लाभ होणार आहे?
महाराजश्री जिह्वेच्या स्वादालाच सर्वं अनर्थांचे मूळ समजत होते. जीवन्मुक्ती काय आहे? असे विचारल्यावर ते म्हणत असत की, ‘ज्याप्रकारे अज्ञात भाषेत तुमची निंदा किंवा स्तुती केली जात असेल, तर तुमचे चित्त थोडेसुद्धा विचलित होणार नाही. त्याचप्रकारे जर परिचित

भाषेत तुमची निंदा किंवा स्तुती केली जाईल; तेव्हा सुद्धा जर तुम्हाला क्षोभ झाला नाही, तर ‘तुम्ही जीवन्मुक्त आहात,’ असे समजा. महाराजांच्या सत्संगात अशा अनेक अश्रुतपूर्व विचार परंपरा ऐकावयास मिळत असत. त्यांचे जीवनदर्शन आणि ब्रह्मदर्शन अभिन्न होते. मान-अपमानात समत्व, उदारता, क्षमा, अक्रोधाचे तर ते मूर्तिमंत प्रतीक होते. मोठ्यात मोठी विपत्ती, संघर्ष किंवा बाह्य घटना त्यांना स्पर्श करू शकत नव्हती. ते ब्रह्माचे व्यावहारिक स्वरूप होते. जिज्ञासूंसाठी ते ब्रह्मविद्वरिष्ठ महात्मे होते, भक्तांसाठी भगवान होते; परन्तु ते स्वयं कोण होते; हे ते सुद्धा सांगू शकत नव्हते. ज्ञान, प्रेम आणि आनंदाची ती मूर्ती आता कोठे पाहावयास मिळेल?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top