सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें झालें ॥१॥
उपक्रमें वदें निशब्दाची वाणी । जें कोठें बंधनीं गुंफों नेणें ॥ध्रु॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्तें जन ॥३॥
तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥४॥
॥ ज्ञानेशो भगवान् विष्णु: ॥
प्रस्तुत अभंग हा जगद्गुरू सन्त श्रीतुकोबारायांचा असून तो अद्वैतपर प्रकरणात समाविष्ट असून त्यामध्ये ब्रह्मरूप प्रत्यगात्म्याची नित्यसिद्ध असणारी साक्षी-भावाने असणारी प्रातिभ अद्वैतानुभूती सोपपत्तिक आणि औपनिषदीय सिद्धान्ताशी अविरोधी अशा सुसंवादी रीतीने शब्दांकन करून अपौरुषेय शब्दराशी असणाऱ्या वेदान्ताचे परमतात्पर्यच ह्या सूत्ररूप असणाऱ्या अभंगाच्या माध्यमातून ग्रथित करून मुमुक्षजनांसाठी –
परि श्रुतिस्मृतींचे अर्थ । जें आपण होऊनि मूर्त । अनुष्ठानें जगा देत । वडील जे, हे ॥ (ज्ञा.१७.८६)
ह्या ज्ञानेशोक्तीला अनुसरून आपल्या मन्त्रद्रष्ट्या ऋषीपरम्परेतील पूर्वसूरींच्या आध्यात्मिक वारशाचे जतन करीत चहूं वेदांचे हें केलें विवरण । अर्थही गहन करूनियां ॥ (रा.भट्ट) ह्या रामेश्वर भट्टांनी केलेल्या अन्वर्थक विधानानुसार श्री तुकोबारायांनी सूत्रकार, भाष्यकार आणि वार्तिककारांच्या रूपाने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकणाऱ्या अशा मराठी भाषेला एका कवीश्वराच्या-रसज्ञाच्या-तसेच रसाच्या माध्यमातून प्राधान्याने जनता जनार्दनाच्या हृदयाला शीतलतापूर्वक तत्त्वस्पर्श करवून देणाऱ्या आणि तद्द्वारा समाजपुरुषासाठी मोक्षाच्या द्वाराचे सहज उद्घाटन करणाऱ्या आणि जीवन्मुक्तीच्या विलक्षण सुखाचे मार्मिक रहस्य ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीच्या माध्यमातून सम्पूर्ण विश्वाच्या सम्बन्धी ब्रह्मदृष्टी प्रदान करणाऱ्या आणि महाराष्ट्र सारस्वताच्या प्रांगणात सन्तसम्राट ज्ञानोबारायांनी लावलेल्या ग्रंथपंचकाच्या रोपट्याचा वेल गगनापर्यंत विकसित आणि विस्तारित करणाऱ्या ह्या जगद्गुरूंच्या वाङ्मयमूर्ती अशा गाथा ग्रंथाचे प्रसन्न आणि गांभीर्याचे स्वरूप ज्या शुद्ध आणि वस्तुनिष्ठ बुद्धीमध्ये स्फुरद्रूप होते; त्या व्यक्तीच्या मुखकमलातून सहजच श्रीसन्त निळोबारायकृत स्तुतिसुमने वाणीच्या द्वारा आकार धारण करतात -
महाराज हा जन्मला मृत्युलोकीं । दुजी उपमा नाढळे इहलोकीं ॥
भवसिंधूसीं बांधिला सेतू जेणें । अनाथा दीनाकारणें तुकयानें ॥
(निळोबारायकृत स्तुती)
प्रस्तुत अभंगामध्ये कोणा एखाद्या अन्तरंग जिज्ञासूने की, जो तुकोबारायांच्या श्रोत्रियत्वासंबंधाने आणि औदार्याविषयी नि:संदेह असून अद्वैत अनुभूतीविषयी त्याचे अन्तःकरण अत्यन्त लालायित आहे; तेव्हा स्वसंवेद्य अशा अतीन्द्रिय आत्मानुभवाची की, जो अवाङ्मनोगोचर वस्तुनिष्ठ अर्थात् वस्तुस्वरूप आहे; त्याची जगद्गुरू तुकोबारायांच्या अनुभवाच्या रसाने आप्लावित झालेल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या स्वकीय आध्यात्मिक जीवनाचे उत्थान व्हावे ह्या प्रांजल उद्दिष्टाने आपला परमार्थमार्ग चोखाळण्यासाठी विचारणा केली असता, तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥ ह्या त्यांच्याच श्रीमुखातून प्रसृत झालेला अभंगरूप शब्दसमुदाय म्हणजे प्रस्तुतची काव्यरचना होय.
वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्त्वी परतत्त्व स्पर्शु जैसा ॥ (ज्ञा.१८.३४७)
ह्या ज्ञानेशोक्तीला अनुसरून प्रकट झालेली अपूर्व-अलौकिक ब्रह्मनिष्ठा अथवा प्रातिभ अनुभूती शब्दरूपाने प्रश्नकर्त्याला गंभीर अशा तत्त्वज्ञानाच्या अर्थाच्या गाभाऱ्यात नेऊन अर्थरूपता प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत ओज-माधुर्य-गांभीर्य ह्यांनी सुसम्पन्न झाली आहे.
पारमार्थिक साधकाने जगद्गुरू तुकोबारायांच्या वाङ्मयमूर्ती प्रसन्न आणि गंभीर अशा गाथेचे चिंतन करीत परामर्श घेण्याचा यशाशक्ती यथामती स्वकीय बुद्ध्यादिकांच्या मर्यादा जाणून त्यांच्याच कृपाकटाक्षाच्या शीतल छायेमध्ये राहून त्यांच्याच सत्तेतून वास्तवाचा वेध अथवा अनावृत्त त्रिकालाबाधित सत्याचे अन्वेषण करण्याचा सादर-सविनय-सप्रेम प्रामाणिक प्रयत्न केला असता, त्याच्या जीवनातील कर्मभ्रष्टता, भावनेतील व्यभिचार आणि बुद्धिजन्य ज्ञानातील संशयाचे पूर्णतया निराकरण होऊन
अहो, अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावे । बाप, श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ (ज्ञा. ९.५३४)
अशा प्रकारची अभिनव अलौकिक, अद्भुत, दिव्य श्रुती-युक्तीला अनुसरणारी संशय-विपर्ययरहित स्वानुभूती अधिकारी साधकाला प्रदान करणारे हे अभंग-रत्न आहे. कोणाही प्रमाणा वो नेदी मा असे दुर्बोध असणारे आत्मरूप ब्रह्मतत्त्व की ज्याचे निरुपण करतांना श्रुतीलाही ‘नेति नेति’ पदांची योजना करून अतद्व्यावृत्तीने कथन करणे भाग पडले आहे; वेद जाणो गेला पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचे । असे शान्तिब्रह्म श्रीनाथ महाराजांनी म्हटले आहे.
वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझें अांग । मग आम्हां तया मूग । एके पांती ॥ (ज्ञा.१४.११)
असा निर्वाळा भगवान् माउली देतात, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह । अशा प्रकारे भ्रम-प्रमाद-विप्रलिप्सा-कर्णापाटव इत्यादी माणवी बुद्धिकृत दोषांनी विवर्जित असणारा, भगवन्ताचे नि:श्वसित असणारा अपौरुषेय सर्वप्रमाणांमध्ये प्रबल प्रमाणरूपाने असणारा वेद भगवान् प्रतिपादन करतो; अशी शब्दातीत, इंद्रियातीत असणारी आत्मानुभूती कथन करणे आणि याशिवाय ती त्या श्रोत्याच्या अथवा पाठकाच्या हृदयात पूर्णतया संक्रमित करून त्याला निरङ्कुशा तृप्तीला प्राप्त करून देणे ही गोष्ट सिंहाच्या संकीर्ण जंगलातील दरीमधील गुहेत प्रवेश करून त्याच्या नाकातील केश अथवा मिशा उपटून आणून दाखविण्याइतके कठिण कार्य आहे; परन्तु मूळातच श्रीतुकोबारायांचे जीवनाचे उद्दिष्टच तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ॥ अशा स्वरूपाचे असल्यामुळे सिद्ध महापुरुषांचे ज्ञानोत्तर जीवन हे साधकांच्या कल्याणासाठी आणि सम्प्रदायपरम्परा प्रवाहित ठेवण्यासाठीच स्वेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने धारण केलेले असल्यामुळे आपल्याला आलेली सर्वोच्च कोटीची अनिर्वाच्य अनुभूती की जिचे वर्णन मौनाचेही निपटणे पिवूनी गेले । असे भगवदवतार श्रीसन्तसम्राट् माऊलींनी केले आहे; ती अनुभूती जगद्गुरू श्रीतुकोबाराय केवळ चार चरणांमध्ये प्रस्तुत अभंगरूपाने कथन करून –
फिटो विवेकाची वाणी । हो कानामना जिणी । देखो, आवडे तो, खाणी । ब्रह्मविद्येची ॥ (ज्ञा.१३.११६०)
ह्या ज्ञानराज माउलींचा प्रतिज्ञेचे अनुपालन करीत त्यांच्या प्रतिज्ञेला अन्वर्थक करण्याच्या प्रयत्नात तुका झालासे कळस ह्या श्रीसन्तसाध्वी बहिणाबाईंच्या उक्तीला जणू काय सार्थकता प्राप्त करून देतांना ह्या प्रस्तुत अभंगवाणीची अभिव्यक्ती झाली आहे, असा मनोमन परवचा द्यावा वाटतो. जणू काय ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु! ॥ (ज्ञा.१५.१५) ह्या भगवती ज्ञानेश्वरीच्या वचनामृताचे रसिक आणि तीव्रतम मुमुक्षुत्व धारण करणाऱ्या उत्तम अधिकारी भाग्यशील साधकासाठी प्रस्तुत अभंगाच्या रूपाने श्रीतुकोबारायांचे चित्त द्रवीभूत होऊन ते त्याला अमृतवचनाच्या द्वारा स्वसंवेद्य स्वानुभूतीचे रसपान करण्यासाठी प्रस्तुत अभंगाद्वारा कटिबद्ध आणि सुसज्ज झाली आहे.
असो; कोणा सुभग तीव्र जिज्ञासाधारकाने किंवा जिज्ञासूंच्या समुदायाने तुकोबारायांना ह्या स्वसंवेद्य अर्थात् सु+असंवेद्य=स्वला विषय न होणारी, तसेच अन्यालाही विषय न होणारी आणि विषय न करणारी स्वे महिम्नि प्रतिष्ठिता । असणारी आणि वस्तुनिष्ठासंपन्न असणारी अनुभूती विषयक विचारणा केली असता प्रथम चरणात तुकोबाराय म्हणतात –
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे झाले ॥१॥
तुकाराम महाराज त्या साधकांशी आत्मसंवाद करताना आपल्या स्वाभाविक नम्रतापूर्वक त्याच्या प्रश्नाला अनुमोदन करीत म्हणतात –
नये बोलो परी पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संती ॥ (तु.म.)
बाबारे! खरे तर
मुकियाचे परी जीवीं । साखर जेवीं खादली ॥३॥ तुका म्हणे काय बोलें । आता भले मौन्यचि ॥ ४॥
अशी वस्तुस्थिती आहे. ‘अनुभव चित्ता चित्त जाणे । ’ अशा अवस्थेचे वर्णन शब्दाच्या माध्यमातून करणे हे एक अनुभूतिसम्पन्न पुरुषाला आवाहनच आहे; पण पूर्वसूरींच्या, ईश्वराच्या, शास्त्राच्या अहेतुकी कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या स्वरूपस्थितीचे यथाशक्ती-यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरे तर –
तैसी, क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हे अनुभवाचि जोगें; नव्हे । बोलाऐसें ॥ (ज्ञा.१८.११५१)
अशी वास्तविकता असतांनाही तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्य: पन्था विद्यते अयनाय । ज्ञानादेव तु कैवल्यम् । इत्यादि श्रुतीवचनांचा डिंडिमा लक्षात घेऊन निरूपण करण्याचा प्रयत्न करणेही तितकेच क्रमप्राप्त आणि आवश्यक आहे. आपणाला श्रीगुरुकृपेने प्राप्त झालेल्या आध्यात्मिक अनुभूतीचे वर्णन करताना संप्रदायाच्या इमारतीच्या भरभक्कम पायाची रचना करणारे मूळ शिल्पकार माउली सुद्धा –
किंबहुना श्रीनिवृत्ती । ठेविलो असो जये स्थिती । ते काय देऊ हाती । वाचेचिया ॥
असा शब्दानेच परवचा देत शब्दातीत असणाऱ्या आत्मत्तत्वामध्ये अशब्दरूपाने स्थिती करून देतात. चारी वाणींचा आत्मतत्त्वामध्ये प्रवेश नाही; हे वाचाऋणपरिहारात वाणीनेच कथन करतात. त्या वेदमार्गाने आपल्या जीवनात अध्यात्माची वाटचाल करीत असता ज्ञेय-अज्ञेयाच्याही अतीत असणाऱ्या स्वयंप्रकाश स्वत:सिद्ध, नाम रूप सम्बन्धु । जातिक्रिया भेदु । ह्यांनी विवर्जित असणाऱ्या प्रत्यगात्म्याचा ब्रह्मरूपाने साधकाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार करून देण्यासम्बन्धाने
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यांसी ।
मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैसी । तरले तरती गा आणीकही विश्वासी ॥५॥ (तु.म.)
ह्या नियमाला अनुसरून सन्तमांदियाळीने ह्याच उपायाचा आपल्या उद्धारासाठी अवलंब केल्याचे सर्वविदित असल्याने त्याच शब्दमाध्यमातून
आहाच बोलाचि वालिफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि अंगा घडिजे ।
मग, सुखेसी सुरवाडिजे । सुखाचि माजिं ॥ (ज्ञा.६.२५)
अशाच साधनपथाचा आश्रय घेतल्यावाचून आपल्या अध्यात्मप्रवण जीवनयात्रेची फलपर्यवसायी परिसमाप्ती होणे सुतराम् असंभव असल्याने परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी वाणीच्या सहाय्यानेच परात्पर परमात्याला उराउरी आलिङ्गन करणे भाग असल्याने अगतिकपणे बोलणे भाग पडत आहे; परन्तु ही वाणी माझ्या पदरची नाही तर ही बोलाविता धनी वेगळाची । आहे; आणि माझी वाणी अथवा मुखातून प्रसृत होणाऱ्या शब्दसमुदायासम्बन्धी परिहारच द्यावयाचा झाला तर फोडिले भांडार धन्याचा हा माल । तेथे मी हमाल भारवाही ॥ ३॥ अशी वस्तुस्थिती आहे.
प्रश्नकर्त्या जिज्ञासूला स्वानुभूतीचे वास्तव प्रतिपादन करण्यापूर्वी जगद्गुरू तुकोबाराय आत्मविश्वासपूर्वक सांगतात की – तरी अवधान एकलें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड! ऐका ॥ (ज्ञा.९.१) मी जो तुझ्याशी आत्मसंवाद साधीत आहे; त्याच्या अर्थाच्या अंतरंग गाभाऱ्यात एकाग्र चित्ताने प्रवेश करीत असता सर्वांगाचे कान करून जैसे जैसे करावे श्रवण । तैसे होत जाय मन ॥ ह्या ओवीला अनुसरून अर्थाकार वृत्ती करीत-करीत एकाच वेळी श्रवण-मनन आणि निदिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेद्वारा तुला आत्म्याचा यथार्थ दृढ अपरोक्ष साक्षात्कार होऊन तू कृतकृत्यतेला अर्थात् परिपूर्ण बोधाच्या द्वारा निष्प्रतिबंध आनंदावाप्तीला प्राप्त होशील. कारण मी ज्या विषयांचे गंभीर रहस्यात्मक प्रतिपादन करीत आहे; त्या शब्दार्थाच्या अंतरंगात अनुभूतीचे स्वत: परत: उत्थान रहित एकप्रकारचे शब्दशक्तीचे प्रबल प्रामाण्य आहे; ह्याविषयी मी माझ्या मनाला साक्षी ठेवून हे निरुपण करीत आहे. श्री विठ्ठल परमात्म्याच्या कृपेने माझ्या जीवनात आध्यात्मिक विश्वातील काहीही सरते-पुरते अर्थात् उणेपुरे उर्वरीत ठेवलेले नाही –
अर्थांतरी असे अनुभव सेवन । परिपाकी मन साक्ष येथे ॥३॥
तुका म्हणे मज सरतें परतें । हे नाहीं अनंतें उरों दिलें ॥४॥
सिद्धपुरुष, मग ते युक्त योगी असोत अथवा युञ्जानयोगी असोत; ते नेहमी आपल्या जीवनात साधक पुरुषाच्या सहवासाची इच्छा करतांना त्यांच्या जीवनचरित्रात दिसून येते. श्रीरामकृष्ण परमहंसदेव श्रीविवेकानंदांच्या भेटीसाठी तसेच श्रीबाबाजी चैतन्य श्रीतुकोबारायांच्या भेटीसाठी, श्रीतुकाई महाराज श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भेटीसाठी अत्यंत व्याकुळ होऊन त्यांना दर्शन आणि उपदेश देत असल्याचे अध्यात्मिक परंपरेच्या इतिहासात दिसून येते. एकनाथी भागवतामध्ये शान्तिब्रह्म श्रीनाथ महाराज म्हणतात –
अग्नि कुंडामाजी स्वयंभ असे । तो घृतावदाने अतिप्रकाशे । तेवी सप्रेम प्रश्नवशे । सुख उल्लासे मुक्ताचे ॥ (ए.भा.२.१२६)
अथवा ज्ञानोबाराय म्हणतात –
अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ (ज्ञा.९.१८ )
अशी तुकोबारायांच्या चित्ताची झालेली जी द्रवीभूतता; तीच प्रस्तुत शब्दरूपाने साकार होऊन आपली नित्य सिद्ध-बुद्ध मुक्तस्वभाववति अनुभूती – (Poetry is the spontaneous overflow of powerful feelings (or permanent experience of soul) – आपल्या अपौरुषेय वेदाला अविरोधी आणि तदनुसारी भावनांचा अथवा आध्यात्मिक अनुभूतीचा उद्रेक म्हणजे काव्य. ह्या काव्यलक्षणाला अनुसरून अभंग वृत्तामध्ये अभिव्यक्त झाली आहे – त्यातील प्रथमचरण खालीलप्रमाणे आहे –
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे झाले ॥१॥
ह्या विश्वातील मानवजात अाध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खाने संत्रस्त झालेली आहे. अनेक प्रकारचे त्रिविध दुःखाचे निवारण करण्याचे लौकिक, वैज्ञानिक अथवा भौतिक तसेच आपापल्या धर्मपंथांना अनुसरून शास्त्रीय उपाय करूनही त्यांची आत्यंतिकी निवृत्ती झाल्याचा अनुभव कोणाही मानवमात्राला झाला असे दिसून येत नाही. फार झाले तर त्या दु:खांची लयरूप निवृत्ती होते; पण त्याची स्थिती म्हणजे ‘न्हावी उठला आणि खूंट फुटला’ अशा तत्कालीन स्वरूपाची असते. तसेच मानवी मनाची अंतरंग मागणी ही परमानंद प्राप्तीची अर्थात् दु:खम्बन्ध विवर्जित नित्यनूतन वृद्धिंगत होणाऱ्या दु:खसम्बन्धरहित नित्य आणि देशकालवस्तुने अपरिच्छिन्न असणाऱ्या शाश्वत सुखासम्बंधाने असते; ही गोष्ट दगडावरील रेघेप्रमाणे निर्विवाद आहे. सम्पूर्ण मनुष्यजात त्यासाठी रात्रंदिवस लालायित आणि प्रयत्नशील आहे. अनादिकालापासून निरंतर सक्रिय असूनही ह्या व्यापक सुखाची उपलब्धी झाल्याचा निर्वाळा मात्र अगदी विरळ्या महापुरुषांनी दिलेला आहे.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ॥ (गी.७.३)
तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटीवरी । परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निगे ॥ (ज्ञा.७.१३)
असेच दिसून येते. याउलट प्रायश: सर्वजनताजनार्दनाचे –
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ती यत्न नाहीं केला ।
हिंडतां दिशा शीण पावला । माया वेष्टिला जीव माझा ॥१॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहींच न करिती मजवांचूनि ।
सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु॥ (तु.म.)
इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी । एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी ॥ (ज्ञा.म.)
ह्या स्वसंवेद्य अनुभवाविषयी एकच मान्यता आहे. असे असले तरी आम्ही मात्र आमच्या अनंत जन्माच्या पुण्याईने ईश्वरभक्ती, निष्काम कर्मयोगानुष्ठान, गुरुसेवा, सत्समागम, सत्-शास्त्र ह्यांचा आश्रय घेऊन सश्रद्ध अशी परमार्थाची वाटचाल ‘देहं वा पातयामि कार्यं वा साधयामि’ अशा निश्चयाने करीत असता आम्हाला दुःखाचे कारण श्रुतिप्रदिपादित ‘द्वितीयाद्वै भयं भवति । ’ हा सिद्धान्त तंतोतंत असून त्याचे मूळभूत कारण ‘मी कोण आहे?’ ह्याचे अर्थात् आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रस्तुतचा जन्म आणि शरीर धारण करावे लागले आहे. हे शरीर हेच सर्व दु:खाचे अधिष्ठान असून रामगीतेत सांगितल्याप्रमाणे कारणनाशात् कार्यनाशः ह्या नियमानुसार ‘जे ज्याच्या अज्ञानाने भासते, ते त्याच्याच ज्ञानाने निवृत होते; अशा औपनिषदीय सिद्धान्तानुसार –
येथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ । या दोहीं, केवळ । साधन; ज्ञान! ॥ (ज्ञा.१८.१२४३)
अविद्यानिवृत्तिफलदर्शनात् (ब्र.सू.भा.)
अर्थात्
जे, प्राणियां कामी भरु । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ (ज्ञा.४.२०)
जे, बहुतां एकां अव्हांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला, म्हणौनि विसरु । आत्मबोधाचा ॥
(ज्ञा.७.१०३)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ॥
मनोमार्गे गेला तो येथे मुकला । हरिपाठि स्थिरावला तोचि धन्य ॥ (ज्ञा.म.)
इत्यादि संतवाक्याविषयी दृढ निष्ठा व प्रामाण्याची वृत्ती अन्तःकरणात निर्माण झाली आणि सद्गुरुंच्या मुखातून उच्चारण केलेल्या तत्त्वमसि महावाक्यविचारात प्रवृत्ती होऊन भागत्याग लक्षणेच्या द्वारा जीवब्रह्मैक्यज्ञान होऊन जगन्मिथ्यात्वाचाही दृढनिश्चय होऊन आमची त्रिविध दुःखातून निवृत्ती आणि परमानन्दाची प्राप्ती झाली अर्थात् नित्यनिवृत्ताची निवृत्ती आणि नित्यप्राप्ताच्या प्राप्तीचा भ्रमनिवृत्तिपूर्वक व्यवहार झाला आणि आज आम्ही -
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥ (तु.म.)
असा निर्वेध, निरुपाधिक, निर्विशेष, व्यापक घनीभूत अनिर्वाच्य शाश्वत आनंदाचा भोग घेत आहोत.
देशकाळवस्तु भेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥३॥
न झाला प्रपंच आहे परब्रह्म । अहं सोऽहं ब्रह्म आकळले ॥४॥
तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग । तेंचि झाला अंगें तुका आतां ॥५॥
आमच्या जीवनभरातील केलेल्या साधनेची परिसमाप्ती आम्हाला निरंकुशा तृप्तीच्या अनुभवाच्या रूपाने फलपर्यवसायि झाली आहे. आमच्या ज्ञानोत्तर जीवनात अविद्या लेशामुळे प्रारब्धप्राप्त लोकदृष्टीने व्यवहार होत असल्याचे लौकिकदृष्टीने दिसत असले तरी आम्ही ह्या व्यवहाराकडे कर्तृत्व-भोक्तृत्व बुद्धिने तत्त्वत: कधीच पाहत नाही. आमच्या दृष्टीने – श्रीगुरुंच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या ज्ञानचक्षू अथवा प्रज्ञाचक्षुद्वारा
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदुं आतां ॥ (ज्ञा.१६.१)
अशाप्रकारचे कृतज्ञतेचे उद्गार आमच्या मुखातून सहज नि:सृत होत आहेत.
आता आमच्या स्वरूपरूपी घरात प्रवेश करताना हा एवढा मोठा भासणारा प्रतीतीमात्र विश्वाचा पसारा आम्हाला मिथ्या अर्थात् त्रैकालिक अत्यंताभावरूप असल्याचा आमचा दृढ निश्चय झाल्याने अज्ञानकल्पित दुःख हे केवळ अाध्यासिक असून केवळ माझा ब्रह्मरूप प्रत्यगात्माच सत्य असून नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे । असा साक्षीत्वे या झालो गुणांचा देखणा । अशी संशय-विपर्ययरहित प्रातिभ अनुभूती स्फुरद्रूप होत आहे. आम्हाला आता सुखे करितो कीर्तन । भय विसरले मन । अशी अभयं वै जनक प्राप्तोऽसि । अशी नित्य निर्भयावस्था अर्थात् अभय प्राप्त झाले आहे. द्रष्टा-दर्शन-दृश्य, ध्याता-ध्यान-ध्येय, ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय इत्यादी सर्व त्रिपुटी बाधित होऊन सर्वांच्या निषेधावधिभूत असे एकमेवाद्वितीय असे स्वगत-सजातीय-विजातीय भेदरहित असे केवळ दृङ्मात्र स्वरूपाने नितिशय व्यापक आनंदाने सम्पूर्ण विश्व भरून गेले आहे आणि अज्ञान आणि अज्ञानकार्यरूप अंधकार आमच्या जीवनात नित्य-निरस्त झाला असून
धवळले जगदाकार । अंधार तो निरसला ॥
अस्त नाही आता एकची मोहरा । पासूनी अंधारा दूरी झालो ॥ (तु.म.)
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी ।
अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥ (ज्ञा.८.९०)
असे सहज धन्यतेचे उद्गार आमच्या मुखातून बाहेर पडत आहेत. लौकिक दृष्टीने अमच्या ठिकाणी भासमान व्यवहाराविषयी आमची तात्त्विकी दृष्टी मात्र पूर्णपणे परिवर्तित झाली आहे. आता आम्ही जन्म-मरण परंपरेला संसार मानत नसून जन्म-मरण परंपरेला सत्यत्व बुद्धीने पाहणे हाच संसार अथवा जीवदशा आहे असे आमच्या यथार्थ ज्ञानदृष्टीला करतलामलकवत् स्पष्टतया दर्शन होत आहे.
अगा, उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें । तो जीवलोकु, मी म्हणे । संसारु हन ॥ (ज्ञा.१५.३४७)
ह्या प्रस्तुत ज्ञानेशोक्तीवरील आमची निष्ठा उत्तरोत्तर दार्ढ्याला प्राप्त होऊन,
यथा स्वप्नप्रपंचोऽयं मयि माया विजृम्भिता । तथा स्वप्न प्रपञ्चोऽपि मयि माया विजृम्भिता ॥
अशा प्रातिभ अनुभूतीला आम्ही प्राप्त झालो आहोत. पूर्वीपासून अर्थात् अनादिकालापासून प्रपंच सत्यत्वाच्या भ्रमजालापासून आम्ही पूर्णतया सुटलो असून सहज लीळा मी साक्षी याचा । ह्या वेदान्ताला अभिप्रेत असलेली साक्षीभावाची – अर्थात् मीच साक्षीच आहेच आणि तो कोणी केलेला सापेक्ष साक्षी नसून अनादिसिद्ध, स्वयंप्रकाश, केवळ, नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वरूप अनिर्वाच्य आणि ती सुद्धा स्वयंप्रकाशरूप साक्षिता आहे आणि ती दृङ्मात्ररूपाने नित्य आणि सहज अर्थात् स्वाभाविक आणि विशुद्ध स्वरूपाने आहे; असा माझा दृढ निश्चय झाला आहे; पण तो बुद्धीने केलाला निश्चयही माझे वास्तव स्वरूप नसून –
हाचि निश्चय माझा । परी मी निश्चयाहूनी दुजा ॥
सरते कर्तृत्व माझ्याने । परी मी त्याहूनि असे भिन्न ॥ (तु.म.)
अथवा ज्ञानोबारायांच्या भरीव सिद्धांतानुसार –
पापपुण्यें अशेषें । पासीचि असतु; न देखें । अाणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी? ॥
(ज्ञा.५.८०)
अशी कर्माकर्मातीत, गुणातीत, प्रकृतीच्या अतीत अशी माझी वस्तुनिष्ठ अनुभूतीच्या आश्रय अथवा अधिष्ठानामध्ये अन्त:करणवृत्तीची सदा, सर्वत्र, सर्वगत, सर्वाधाररूपाने स्थिती झाली आहे. व्यवहारकालात माझी तात्त्विक दृष्टीने झालेली वास्तविक धारणा तर अशी आहे की,
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे झाले ॥१॥
अभंगाच्या प्रथम चरणाच्या प्रारंभी ‘सहज लीळा’ असा जो शब्दप्रयोग आला आहे. त्यातील ‘सहज’ पदाचा अर्थ जन्मापासून असणारा स्वाभाविक अथवा कोणताही उद्देश मनात न धारण करता आपोआप होणारे स्फुरण किंवा सहजरित्या अथवा सहजवृत्ती द्वारा धारण केलेला भाव, असा असून ‘लीळा’ शब्दाचा अर्थ क्रीडा, कौतुक किंवा सहज घडणारी क्रिया अथवा मौज असा शब्दकोशानुसार असून प्रथम उच्चारित ‘सहज’ शब्द हा लीळा पदाचे विशेषण म्हणून ग्रहण करता येणे शक्य आहे. कारण ‘लीळा’ शब्दाचाही अर्थ स्वाभाविक गोष्ट किंवा स्वाभाविक कृती असा अवतारवादाच्या दृष्टीकोनातूनही केलेला दिसून येतो. असो! ह्या भौतिक विश्वाच्या उत्पत्ती- स्थिती-लयासंबंधी वेदप्रामाण्याला प्रबल प्रमाण मानून श्रौत आस्तिकतेचे अनुसरण करून, औपनिषदीय तत्त्वज्ञानाचा सिद्धांत रूपाने संशय-विपर्यय रहित अंगिकार केला असता ह्या विश्वाच्या उत्पत्त्यादिकांचे कोडे खऱ्या अर्थाने उलगडल्याचे तुकोबाराय स्पष्टपणे प्रतिपादन करतात –
जेणे हे विश्व निर्मियेले । महर्षी देवां संस्थापिलें । एकवीस स्वर्गातें धरिलें । सत्तामात्रे आपुलिया ॥ ३॥
भगवान माऊली गीतोक्त श्लोकावरील टीकेत – भगवती ज्ञानेश्वरीमध्ये – ह्याच सहज ईश्वराच्या लीलेचे वर्णन करतात –
स्वमायेचे आडवस्त्र । लावूनि, एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौऱ्यांशीं लक्ष ॥ (ज्ञा.१८.१३०३)
ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ (गी.१८.६१)
असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या जागृत श्रुतीच्या रूपाने वस्तुनिष्ठ वर्णन करतात. परन्तु तुकोबारायांची ह्या ईश्वरनिर्मित – त्याच्या सहज लीळेत जीवाला सत्यत्वाने प्रतीत होणाऱ्या चित्रविचित्र मायिक सृष्टीविषयी स्वसंवेद्य असणारी दृष्टी मात्र साक्षिभावाची आहे. तुकोबारायांच्या ऋतंभरा प्रज्ञेला ही अद्भुत असणारी नानाविध वैचित्र्याने अनेकत्वाने युक्त असलेली सृष्टी ही त्याची सहजलीला आहे, असे नि:संदेह दृढ अपरोक्षज्ञान असून ‘त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता वो ॥’ अशी अवतारवादविषयकही दृढ अनुभूती आहे. इतकेच नाही तर ईश्वरसृष्टी ही त्या जीवाच्या सुख-दु:खाला कारण होत नाही, तर त्याने उभारलेली जीवसृष्टी ही सुद्धा तत्त्वत: सुखदुःखाला कारण नाही, तर ती सुद्धा स्वप्नापेक्षाही निकृष्ट अशी मनोरथमात्र असल्याने व्यष्टी-समष्टीचा असणारा औपाधिक भेदाचा निरास झाला असता, केवळ ब्रह्मरूपाने नित्य विद्यमान असणारा साक्षीभाव अर्थात् प्रत्यगात्मरूपाने ‘तदा द्रष्टु: स्वरूपे अवस्थानम्’ असणारी स्वरूपस्थितीच अवशिष्ट राहते आणि तेथे साक्ष्य पदार्थाच्या सापेक्ष असणारा साक्षिभावही वाच्यार्थाने सत्यत्वाने सिद्ध होत नाही, अशी अनिर्वाच्य स्वरूपाची शब्दातीत रूपाने आश्रय-विषयरहित दृङ्मात्र रूपाने उपलब्धी होते. त्यावेळी त्या महापुरुषाच्या स्थितीचे वर्णन पंचदशीकार करतात –
स्वयमेवानुभूतित्वाद् विद्यते नानुभाव्यता । ज्ञातृज्ञानान्तराभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥ (पंच -३.१३)
अशी अनिदृक् अतादृक् अलौकिक दिव्यानुभवरूपता प्राप्त होते. भगवान माउली वर्णन करताता –
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥ (ज्ञा.१५.२६७)
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्य पुरुष म्हणिजे । जयां ठायातें ॥ (ज्ञा.१५.२७५)
अशा प्रकारच्या वस्तुचे ज्ञान त्याला होते, असेही त्याला म्हणता येत नाही, तर तो ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति ह्या श्रुतीनुसार ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति । असे भगवती श्रुतीने त्याचे वर्णन केले आहे. हीच गोष्ट मुमुक्षुच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी प्रेमपूर्ण भावनेच्या द्वारा ह्या जीव-परमात्म्याच्या लीलामय व्यवहाराचा मी साक्षी असून ह्या स्थितीचे वाणीने वर्णन करणे म्हणजे शब्देवीण संवादु दुजेवीण अनुवादू । हे तंव कैसेनि गमे । परेही परते बोलणे खुंटले । वैखरी कैसेनी सांगे ॥पाया पडू गेले तंव पाऊलचि न दिसे । उभाचि स्वयंभू असे ॥ अशी माझी नि:शब्दावस्था झालेली आहे, असे तुकोबाराय प्रथम चरणात प्रतिपादन करीत आहेत.
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे झाले ॥१॥
प्रस्तुत चरणातून जगद्गुरु तुकोबारायांनी नित्य सिद्ध असलेले जीवब्रह्मैक्य आणि जगता विषयी दृष्टी-सृष्टीवादाच्या माध्यमातून अजातवादाचे अर्थात् प्रतीतीला येणाऱ्या कार्यरूप जगताचे आणि कारणरूप असणाऱ्या अज्ञानाचे पूर्णपणे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. शब्द निमाला वाद खुंटला अशी माझ्या वाणीची स्थिती झाली असून तिने मोनाचे मौन धारण केले आहे. ही अतीन्द्रिय अनुभूती अन्वय-व्यातिरेकात्मक शब्दात्मकतेच्या प्रक्रियेत कधीच सापडत नसल्यामुळे न बोलण्याचे काय घेशील? अशी कोऽद्धा वेद, मौनाचेही निपटणे पिऊनी गेले अशा रीतीने माझी वाणीच कुंठीत झाली आहे.
ह्यानंतर दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय त्या जिज्ञासूला म्हणतात –
उपक्रमें वदें निशब्दाची वाणी । जे कोठे बंधनी गुंफों नेणें ॥ ध्रु॥
बाबारे! आरंभापासूनच माझी वाणी नामरूपसम्बन्ध जाती-क्रिया-भेद ह्यांना विषय करण्याकडे कधीही प्रवृत्तच झाली नाही. कारण यत् कृतकं तदनित्यम् असा वेदाचा अकाट्य सिद्धांत गुरुकृपेने माझ्या मनी-मानसी नित्य-निरंतर बिंबित झाल्याकारणाने –
जैं अहंकार धरी सोहंपण । तै चित्ती प्रकटे चैतन्यघन । तेव्हा मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी ॥ (ए.भा.३.११३)
अशा अवाच्य स्थितीला प्राप्त झाल्यामुळे –
अनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥ ध्रु॥
अशी वस्तुस्थिती झाली आहे. लोकदृष्टीने आमच्या देहादिकांचा व्यवहार प्रतीत होत असला तरी यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधय: अर्थात् तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ॥ अशी सहजावस्था प्राप्त झाली आहे. ह्या स्वत:सिद्ध अवस्थेच्या दृष्टीने तिच्या ठिकाणी साध्यत्वाची संकल्पना करून साधनाच्या द्वारा ते साध्य करण्याच्या भ्रमाला वशीभूत होऊन आरुढपतित होण्याच्या धारणेचा आमच्या मनाला स्पर्श देखील होत नाही.
उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा । कनिष्ठा मूर्तिपूजा च तीर्थयात्राधमाधमा ॥
आमच्या इंद्रियातीत, त्रिगुणातीत, शब्दातीत, कार्यकारण भावातीत, निरूपाधिक, निर्विशेष, प्रमाणातीत ब्रह्मानुभूतीला नामरूपाच्या बंधनात गुंतविणे ही धारणाच आमच्या अन्तःकरणात स्फुरद्रूप होत नाही. अतद्व्यावृत्तीने अथवा शाखाचन्द्र न्यायाने साम्प्रदायिक परम्परने महावाक्याच्या प्रथम श्रवणातच –
तुका म्हणे कानी आइकिली मात । तोचि झाला घात जीवपणा ॥ ४॥
अथवा
कानावचनाचिये भेटी । सरिसाचि पैं किरीटी । वस्तु होऊनी उठी । कवणी एकु जो ॥ (ज्ञा.१८.९९१)
अशा अलौकिक अनुभूतीच्या बलावर आमची वाणी नामरुपाचे अतिक्रमण करून नि:शब्द, अशब्द अशा निरपेक्ष व्यापक अखण्ड दण्डायमान सच्चिदानंद, अद्वय स्वरुपात समरस झाल्याने चिरस्थिररूपाने प्राप्त झाली आहे. तिला आता कंठ, दंत, ताल्वादिकांशी संयुक्त होऊन अथवा केवळ मन अथवा बुद्ध्यादिकांशी संयुक्त होऊन उद्भूत अथवा अनुद्भूत अथवा वैखरी, मध्यमा, पश्यन्ती अथवा परावाणीच्या औपाधिक स्वरुपात प्राकट्याची इच्छाच राहिली नाही. कारण आता माझ्या अखण्ड स्वरूपात त्या वाणींना सत्यत्वाने प्रवृत्त करणे म्हणजे वाचाऋण वृद्धिंगत करण्यासारखे भारकारी आहे; म्हणून मी आता ह्या चतुर्विध वाणींचा भारवाही होऊ इच्छित नाही.
तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मण: । नानुध्यायात् बहून् शब्दान् वाचो विग्लापनं हि तत् ।
अशा वस्तुस्थितीचे निराकरण करण्यास स्वत: परत: व्युत्थान रहित असणारा मी एक प्रकारे असमर्थच झालो आहे.
आत्मसाक्षात्कार करण्यासाठी आत्मा वा अरे द्रष्टव्य: श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य: । ह्या श्रुतिवचनावरून आम्ही जन्मोजन्मी समर्पित भावाने जीवदशा ओवाळून टाकली. शब्दाच्याच आश्रयाने ज्याचा साक्षात्कार करावयाचा ते ब्रह्म ‘यत् साक्षाद् अपरोक्षात्’ अर्थात् साक्षात्कारस्वरूप असल्यामुळे द्वैतविवर्जित त्रिपुटीरहित घनानंद नित्यज्ञानस्वरूपात निरपेक्ष निमज्जन करणाऱ्या सर्वतंत्र स्वतंत्र अशा विशुद्ध स्वरूपानुभूतीमध्ये प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना अथवा विपरीत भावनेला स्थानच राहिले नाही, तर मग आम्ही महारण्यातील संकीर्ण अशा शब्दजालामध्ये स्वरूपरूप वाणीला भ्रमण करण्यास का बरे प्रवृत्त करावे? असे श्रीमंत तुकोबाराय उपक्रमे वदे निशब्दाची वाणी । जे कोठे बंधनी गुंफो नेणे ॥२ ॥ ह्या द्वितीय चरणात प्रतिपादन करीत आहेत.
उपक्रम शब्दाचे संस्कृत अथवा प्राकृत शब्दकोशानुसार आरंभ, सुरूवात, प्रवेश, हाती घेणे, एखाद्या विषयात प्रवेश करणे, भाषणाची प्रस्तावना करणे, संदर्भ अर्थात् कथानक, व्यक्ती अथवा वाक्यातील भागाचा सम्बन्ध, अनुसंधान, योजना, गुंफण, रचना अथवा जोडणे इत्यादि सर्व अर्थ प्रस्तुत चरणाचा अन्तर्मुखवृत्तीने गंभीर विचार केला असता अन्वर्थक झाल्याचे दिसून येते; इतकेच नाही तर उपक्रम हे पद वेदान्तसम्प्रदायामध्ये प्रतिपादन केलेल्या षड्लिंगाचे उपलक्षण म्हणून गृहित धरले तर तात्पर्याची निर्दुष्ट अभिव्यक्तीसाठी सुवर्णाला सुगंध अथवा चंदनाला फल लागावे, त्याप्रमाणे प्रस्तुत अभंगद्वारा रसास्वादनाच्याही अभिव्यक्तीचा अपूर्व आनंद प्राप्त होतोे; असे दिसून येते.
प्रस्तुत अभंगाचा अधिकारी, सम्बन्ध, विषय आणि प्रयोजन ह्या अनुबंध चतुष्टयाच्या आधारे, तसेच साधनचतुष्टय सम्पन्न अधिकाऱ्याच्या माध्यमातून, तसेच –
पदच्छेद: पदार्थोक्तिर्विग्रहो वाक्ययोजना । आक्षेपस्य समाधानं व्याख्यानं पञ्चलक्षणम् ॥
ह्या व्याख्यानाच्या लक्षणानुसारी भूमिकेतून तसेच पूर्वमीमांसा दर्शनाला अनुसरणाऱ्या शाब्दबोधाच्या सहकारी कारण असणाऱ्या आकांक्षा-योग्यता-तात्पर्य आणि आसत्ती अशा चतुष्टयाचा ज्ञानद्वारा वेदांतामधील महावाक्यांचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थाचा – तत्त्वंपदार्थशोधनासाठी उपयोग करता येतो. अधिक सूक्ष्म आणि गंभीर वस्तुनिष्ठ विवेक केला असता श्रीतुकोबारायांचे जीवनचरित्र आणि वाङ्मयमूर्तिरूप गाथा ह्यांचे हा साररूप अभंग हे सूत्र असून इतर अभंगवाणी जणू काय ह्या अभंगाचे भाष्य आणि वार्तिकरूपाने अलंकृत झाली आहे, असे मानण्यात
काहीच हरकत नाही. सर्व अाध्यात्मिक मुमुक्षुजनांना जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या गन्तव्याचे यथार्थ ज्ञान करून देऊन त्यातील नियत साधन-साध्यभावाचे स्वानुभूतीच्या सुदृढ पायावर अधिष्ठित अशा आश्वासक निमित्ताने, समाजपुरुषाला हा अन्तरंग लखोटाच जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगात समर्पित केला आहे. ह्या अभंगात ‘घागर में सागर’ न्यायाने मूर्तिमन्त ज्ञानस्वरूप आत्म्याचे अनावृत कलेवरच ज्ञानचक्षुच्या द्वारा प्रकट रूपाने अवतरीत केले आहे. असो;
ब्रह्मानुभूती आणि श्रोत्रियत्वाबरोबर सोपपत्तिक विवेचनाची सम्पत्ती असणारी व्यक्तीच गुरुपदाला भूषणावह असते. अन्यथा सच्छिष्याच्या बुद्धिवर सत्-तत्त्व सुलभरित्या नि:संदेह आरूढ होत नाही. ह्याच पूर्वसुरींच्या उपदेश परंपरेला अनुसरण्याच जगद्गुरू तुकोबाराय कसे विसरतील? अर्थात् विसरणे शक्यच नाही; म्हणून तृतीय चरणात सर्व समाजाला सुपरिचित असा अन्वर्थक दृष्टांत देत आहेत.
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥३॥
सूर्य आपल्या प्रखर किरणांच्या द्वारा संपूर्ण त्रैलोक्याला प्रकाशित करतो. माऊली म्हणतात –
जैसें बिंब तरी बचकेंचि एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ (ज्ञा.४.२१५)
तो सूर्य अंधकाराला नष्ट करतो. त्या प्रकाशात पक्षी आपली घरटी सोडून, पशु आपले गोष्ठ सोडून, लोक आपापली घरदारे सोडून किंवा घरादारातील आपली नियोजित कामे करतात. तसेच प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥ ह्या न्यायाने सात्विक लोक सुखपूर्ण ज्ञानाचे, रजोगुणीलोक पायाला भोवरा बांधून लोभानुसारी क्रियेचे फल दुःख भोगतात अथवा तमोगुणी लोक प्रमाद व मोहाला वशीभूत होऊन किंकर्तव्यमूढ अथवा निषिद्ध आचरण करतात. ह्या सर्व क्रियांच्या भावाभावाचा साक्षी असणारा सूर्य मात्र ह्या सर्वांपासून अलिप्त, असङ्ग, निर्लेप, निर्विकारच असतो. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष हा स्वतःला अकर्ता-अभोक्ता-सर्वद्रष्टा-सर्वसाक्षी-उदासीन, अपरिणामी-नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्त स्वभाववान् दृढ अपरोक्ष बोधसंपन्न कोणत्याही क्रियेचे साक्षात् अथवा प्रयोजक कर्तृत्वाने तत्त्वत: विवर्जित असल्याने सूर्यनारायणाप्रमाणे कोणत्याही प्रकृतीच्या गुणदोषाने लिप्त होत नाही. तो आपल्या स्वयंप्रकाशरूपाने स्वतःच्या महिमेत प्रतिष्ठित असतो. त्याप्रमाणेच आत्मज्ञ-तत्त्वज्ञ महापुरुष आपल्या महिमेत-मूलभूत स्वरूपनिष्ठेत स्थिर झालेला असतो.
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा दोहींपासुनी ॥ ध्रु॥
देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें तें बरें ॥ ३॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुकयाचें ॥ ४॥
अशा भूमिकेत अर्थात् आत्मरंगात असणारे तुकोबाराय सूर्याचिये परी । तुका लोकी क्रीडा करी ॥ अशी आपली अनुभूती सदृष्टान्त प्रकट करीत आहेत. असो;
शांतिब्रह्म श्रीसन्त एकनाथ महाराज श्रीमद्भागवतातील एकादश स्कंधातील यदू-अवधूत संवादामध्ये प्रस्तुत सूर्याचे उदाहरण स्पष्ट करताना म्हणतात –
सूर्य एखाद्या उथळ पाण्याच्या डबक्यात प्रतिबिंबित झाला असता, मूढ लोक त्या डबक्यात तो बुडून गेला असे मानतात. त्या पाण्यामध्ये वायूने चलनवलन झाले असता तो कंपायमान झाला अथवा पाणी मलिन झाले असता अथवा डहुळले असता त्याच्या मालिन्याचा आरोप सूर्यावर करून सूर्यच मलिन झाला असे मानतात; परन्तु त्या थिल्लराला स्पर्श देखील न करता त्याच्या धर्माहून सूर्य जसा आकाशात अलिप्त रीतीने स्थिर असतो; त्याप्रमाणेच ज्ञानयोगी पुरुष देहादिकांनी कर्मे करीत असता देहातीत-कर्मातीत असतो. बाधितानुवृत्तीने त्याचा व्यवहार होत असलेला प्रतीतीला आला तरी रज्जूवर भासलेला सर्प जसा कोणालाही दंश करून मृत्यूला कारण होत नाही; त्याप्रमाणेच हा पुरुष चिदाकाशरूप असणारा प्रत्यगात्मा मिथ्या असणाऱ्या देहादिकांच्या मिथ्या कर्मांनी कधीही लिप्त झाल्याच्या भ्रमाला प्राप्त होत नाही. आकाशस्थ सूर्य ज्याप्रमाणे आपल्याला जलरूप रूप उपाधीमध्ये प्रतिबिंबरूपाने झाल्याचे जाणतो; परंतु तत्त्वत: आपणच त्या जलामध्ये बुडालो असे मानीत नाही; त्याप्रमाणेच हा तत्वज्ञ संतांचा आपण देहातीत-गुणातीत-कर्मातीत असल्याचा निस्संदेह बोध त्याला कधीच कर्तृत्व-भोक्तृत्वाचा भ्रम उत्पन्न होऊ देत नाही.
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणे तें पाहीं । आन आहाति ॥ (ज्ञा.१५.३८१)
असे माउली त्या स्वात्मानुभवी महामानवाचे वर्णन करीत आहेत.
पुढील चतुर्थ चरणात आपणाला प्राप्त झालेली फलश्रुती अथवा प्रयोजन सांगून मुमुुक्षुने देखील जीवनात ह्याच परमप्रयोजनाची प्राप्ती करून घ्यावी आणि दु:खलेश विवर्जित निरंकुशा तृप्तीची प्राप्ती करून घ्यावी ह्या एकमेव उद्देशाने प्रस्तुत चतुर्थ चरणात प्रतिपादन करीत आहेत की –
तुका म्हणे येथे गेला अतिशय । आता पुन्हा नये तोंड दावूं ॥४॥
प्रस्तुत चरणातील ‘अतिशय’ शब्दाचा यौगिक अर्थ बाहुल्य, विपुलता, वाजवीपेक्षा अधिक असा असून त्याचा रूढार्थ अनर्थ, माथेफोड, अभिमान असा व्यवहारात केला जातो. तसेच ‘तोंड न दावणे’ हा वाक्प्रचार असून त्याचा अर्थ देशान्तराला जाणे, परत कधीही दर्शन न देणे, नित्य निवृत्त होणे, समूळ नाश पावणे असा लोकव्यवहारात करतांना दिसून येतो, ह्या सर्वच अर्थाची अभिव्यक्ती करणारे ‘विश्वतोमुख’ हे सूत्रलक्षण जगद्गुरु तुकोबारायांच्या उभयपदांच्या द्वारा यथार्थ रितीने सार्थक होताना स्पष्टपणे दिसून येते.
१) ‘अतिशय’ शब्दाचा अर्थ तादात्म्याध्यासाने झालेला अनर्थरूप बंध अर्थात् ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्’ हा आचार्य प्रतिपादित बंध अर्थात् संसारबंध थोडक्यात चिदचिद्ग्रंथी हे ह्या अतिशयाचे स्वरूप आहे.
२) तसेच अनात्म देहादिपदार्थांविषयी अहंता-ममता धारण करून कर्तृत्वाचा अथवा भोक्तृत्वाचा अभिमान धारण करणे हे सुद्धा अतिशयाचे स्वरूप आहे.
३) तत्त्वतः जीव ब्रह्मरूप असताना त्याचे सच्चिदानंदाद्वयत्व स्वतःसिद्ध असताना असत्-जड-दुःखरूप द्वैताला सत्य समजून त्याच्या अनुकूल-प्रतिकूल अशा कल्पित धारणेद्वारा स्वतःच स्वतःला बंधनात पाडून कारण नसताना दुःख भोगणे हा एक प्रकारचा अतिशयच आहे.
नसत्या छंदे नसत्या छंदे । जग विनोदे विव्हळतसे ॥अशी माथेफोड जीवाने स्वतःच ओढवून घेऊन त्याच्या निवृत्तीसाठी आत्मज्ञानाहून अतिरिक्त अपायरूप उपायांमध्ये प्रवृत होणे ही माथेफोड नाही तर दुसरे काय आहे? अर्थात् माथेफोडच आहे.
४) यौगिक अर्थाने बाहुल्य, वैपुल्य अशा अर्थाचे ग्रहण केले तरी तुकोबारायांचा अभिप्राय असा आहे की, संसारामध्ये आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक दुःखांच्या बाहुल्यामुळे गांजलेला जीव जेव्हा साक्षीस्वरूप ब्रह्मभावाला प्राप्त होतो; तसे त्याच्या दुःखाची ज्ञानसमकालातच कारणासह युगपत् आत्यंतिक निवृत्ती होते.
दुःख ते कैचे नये स्वप्नासी । भुक्ति मुक्ति झाल्या कामारी दासी ।
अशा दुःखसम्बन्धरहित स्थितीला तो प्राप्त होतो आणि ते अज्ञान नष्ट होऊन अविद्यालेश असेपर्यन्त अज्ञानकार्य असणारे प्रारब्ध तो भोगून संपवितो. संचित कर्म ज्ञानाने दग्ध होऊन, क्रियमाण कर्म असङ्ग बोधामुळे कार्यकारी होत नाही. त्यामुळे त्याला हा सदाचा निरस्त झालेला सम्पूर्ण संसार हा पुन्हा त्याला तोंड दाखविण्यास कधीच समोर येत नाही. तो निरतिशय निरपेक्ष अशा बृहद्भावाला अर्थात् नित्य-शुद्ध-बुद्ध असणाऱ्या ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतो. ‘संसार तो कोण लेखे । अशा निरंकुशा तृप्तीला प्राप्त होऊन धन्योऽहं धन्योऽहं । असे सहज उद्गार उद्घोषरूपाने त्याच्या मुखातून निःसृत होतात. आपल्या निष्प्रतिबंध स्वरुपप्राप्तीच्या स्वानुभवाची हीच गोष्ट श्रीतुकोबाराय अंतीम चरणात उद्धृत करतात –
तुका म्हणे येथे गेला अतिशय । आता पुन्हा नयें तोंड दावूं ॥४॥
असो; गुरुवर्य पितृतुल्य प्रातःस्मरणीय हरिभक्तिपरायण पाण्डुरंगस्वरूप पांडुरंगजी बाबांच्या चरणी प्रस्तुत अभंगाच्या यथाशक्ती यथामती प्रस्तुत अभंगावरील चिंतनाच्या रूपाने वाक्पुष्पाञ्जली समर्पण करून ‘स जीवेत् शरदः शतम् । ’ अशी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी श्रीजगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करून शब्दांना विराम देत आहे.
करविली तैसी केली कटकट । वाकडी की नीट देव जाणे ॥१॥
कोणा कारणे हे झालेसे निर्माण । देवाचे कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी तो आभिमाना वेगळा । घालूनि गोपाळा भार असे ॥३॥
***