विचार सागर तरंग १ (उपोद्घात) – भाग १


विचार सागर तरंग १ (उपोद्घात) – भाग १

१. मंगलाचरण आणि प्रस्तावना

(००:००)
“बुद्धी न जाणे आणि जाणही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मी असे. स्वरूप समुद्रावरती जनरंग (जलतरंग), सूर्य, चंद्र, वरुण, देवी, कुबेर तैसेचि. जो सर्वज्ञानी, दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करिती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान (होते). मजचि मागे होतसे, ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसतो. परी दोही ठायी ना सर्प, जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मच असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तोच आहे आत्मा ‘काम’ (इच्छाविषय), तरी नमन कोणा करावे म्या? (तो) प्रकाश, व्यापक, नामरूप अधिष्ठान, बुद्ध, निर्मल, प्रत्यक…”

(०१:०३)
“…निश्चिता मती. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी वेद प्रवृत्त झाला. तो वेद अनादी आहे आणि ‘अपौरुषेय’ आहे. वेद अनादी आहे म्हणजे, वेदाला – जसा हा ‘विचार सागर’ ग्रंथ कोणी लिहिला – तसा वेद कोणी लिहिलेला नाही. तर वेद ही ‘समाधी भाषा’ आहे. समाधी भाषा याचा अर्थ, ज्यावेळी सृष्टीचा प्रलय होतो, त्यावेळेला काहीच राहत नाही. मग वेद नावाचा ग्रंथ कुठे राहतो? असं नाही.

(०२:०४)
पण जसं झाड, संपूर्ण वृक्ष हा बीजामध्ये सामावलेला असतो, त्याप्रमाणे तो (वेद) ज्ञान स्वरूपाने त्या ठिकाणी राहतो. आणि ज्यावेळेला पुन्हा सृष्टी उत्पन्न होते, त्यावेळेला पूर्वीचा वेद जो होता, त्या वेदाचे परमात्म्याला जसंच्या तसं स्मरण राहतं. परमात्मा हा सर्वज्ञ आहे, त्यामुळे ‘धाता यथापूर्वमकल्पयत्’. ईश्वराने (नवीन) वेद केलेला नाही. ईश्वराच्या ठिकाणी फक्त पूर्वी जसा वेद होता, त्याच्या क्रमांकाप्रमाणे, आकार, उकार, ऱ्हस्व, दीर्घ हे सगळं – ज्याला वर्णांची ‘आनुपूर्वी’ असं म्हणतात – तो जसंच्या तसा क्रम त्या ठिकाणी राहतो. आणि हा वेद कोणी पुरुषाने केलेला नाही.
दुसरी गोष्ट अशी, काही ऋषींची नावं दिलेली आहेत वेदामध्ये. हे जे मंत्र आहेत, तर त्या मंत्राचे ‘कर्ते’ म्हणून त्या ऋषींची नावं दिलेली आहेत. पण याचा अर्थ ते मंत्राचे कर्ते आहेत असं नाही, तर ते ऋषी ‘मंत्रदृष्टे’ आहेत. म्हणजे ज्यावेळेला त्यांचं अंतःकरण अत्यंत निर्मल, शुद्ध, काम-क्रोध-लोभादी दोषाने विवर्जित होऊन परमात्म साक्षात्काराला प्राप्त होतं, तेव्हा त्या विशुद्ध अंतःकरणामध्ये हे वेदाचे मंत्र त्यांच्या समोर येतात आणि त्यांच्याकडून त्याचं ‘व्याहरण’ – म्हणजे व्याप्ती किंवा उच्चारण होतं. अशा प्रकारचा हा अपौरुषेय वेद आहे.

२. मानवी बुद्धीचे चार दोष (भ्रम, प्रमाद, करणापाटव, विप्रलिप्सा)

(०३:२४)
तर हा सर्वात आपल्याला, मानव जातीला अत्यंत हितकारक, कल्याणकारक विचार सांगणारा आणि ज्याच्यामध्ये अकल्याण किंवा अहित आहे, त्याच्यापासून परावृत्त करणारा असा हा वेद आहे. आणि त्याच्या ठिकाणी ‘अपौरुषेयत्व’ आहे, म्हणजे पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष नाहीत.
म्हणजे आपला कोणताही पुरुष (मानव) असला, तरी त्याच्या ठिकाणी चार दोष मानलेले आहेत. कोणते? भ्रम, प्रमाद, करणापाटव आणि विप्रलिप्सा नावाचे दोष असतात.
तर ‘भ्रम’ म्हणजे, आपल्याला जर संध्याकाळी एखादी दोरी पडली असली, तर दोरीवर सर्पाचा भ्रम होतो की नाही? आणि तो मनुष्य दुसऱ्याला सांगणार की नाही, ‘हा इथं सर्प आहे, तुम्ही पुढे जाऊ नका’. याचा अर्थ त्याला ज्ञान झालं नाही का? झालं, पण ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? भ्रमज्ञान आहे. त्याला काही पुरुष, कितीही एखादा मोठा शास्त्रज्ञ असला, सगळ्या जागतिक कीर्तीचा, तरी त्याला रज्जूवर (दोरीवर) सर्पाचा भ्रम होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ भ्रमज्ञान आहे. आणि मग भ्रमज्ञान हे यथार्थ आहे का? ‘यथार्थ’ (यथा म्हणजे ज्याप्रमाणे, अर्थ म्हणजे वस्तू आहे) तसं त्याचं ज्ञान आहे का? ते आहे रज्जू आणि म्हणतो सर्प; हे ज्ञान कोणतं आहे? भ्रमज्ञान आहे.

(०४:५०)
तसंच पुरुषाला कधी कधी ‘प्रमाद’ होतो. प्रमादाने एखादी गोष्ट तो सांगतो. उदाहरणार्थ, की प्रमाद म्हणजे काय? त्याचे दोन प्रकारचं चिंतन केलेलं आहे शास्त्रामध्ये. तर एक चिंतन असं केलं की, एखाद्या पुरुषाला असावधानतेमुळे म्हणजे विसर पडतो. विसर पडतो एखाद्या गोष्टीचा, त्याला माहित असतं अगोदर, पण विसर पडतो आणि त्यावेळेला ती जी गोष्ट करू नये, अशा प्रकारच्या गोष्टीचं तो प्रतिपादन करतो. एखाद्याला ज्या गोष्टीचं प्रतिपादन करायला पाहिजे, त्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु करताना प्रमादानं (चुकून) होतं. आपण म्हणतो ना, ‘चुकून बोलून गेलो’. चुकून बोलून गेलो याचा अर्थ मला माहित होतं, परंतु मी वेगळ्या प्रकारचं बोललो. त्याला म्हणतात प्रमाद.

(०५:२९)
दुसरी गोष्ट अशी, एखाद्या गोष्टीतलं अहितकारकता किंवा हितकारकता त्याला माहित आहे. माहित असूनही असावधानतेमुळे त्याच्याकडून ती गोष्ट घडणं, याला म्हणतात प्रमाद. असा एक त्याचा अर्थ. उदाहरणार्थ, दही खाल्लं किंवा काल मी बोरं खाल्ली, मला खोकला येतो आणि मी बोरं खाल्ली. बोरं खाल्ल्यावर खोकला वाढणार हे मला माहित नाही का? माहित असूनही मी बोरं खाल्ली, हा कोणता दोष आहे? ‘प्रमाद’ नावाचा दोष आहे. हा पुरुषाच्या बुद्धीमध्ये असू शकतो. मग अशा वेळेला जर प्रमादाने मी तुम्हाला सांगितलं की, ‘बोरं ही खोकल्याला चांगली असतात’, असं जर सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रामाण्य दिलं, तर त्याच्यामध्ये अहित आहे की नाही? कारण का? बोलणारा जो आहे, तो प्रमाद दोषाने युक्त आहे.

(०६:०७)
नंतर ‘करणापाटव’ नावाचा दोष आहे. करण म्हणजे इंद्रिय किंवा ज्ञानाचे साधन असणारी इंद्रियं. उदाहरणार्थ, आपला डोळा आहे. त्या डोळ्याने आपल्याला एखादा पदार्थ किंवा रूपाचं ज्ञान होतं. पण डोळ्यामध्ये जर पडदा वगैरे, काजबिंदू, मोतीबिंदू असा काही दोष असेल, तर एक किंवा काही लोकांना एकच पदार्थ दोन दिसतात. असं जर असेल आणि त्या माणसाने सांगितलं (ज्याच्या डोळ्यात दोष आहे), ‘इथे एक जण दिसतो’, आणि तो म्हणतो की ‘हे दोघं जण आहेत’. तर हा दोष कोणता आहे? त्याच्या ठिकाणी ‘करण’ म्हणजे ज्ञानाची साधनं जी इंद्रियं, त्या इंद्रियांच्या ठिकाणी विकलता, वैगुण्य किंवा दोष निर्माण झाल्यामुळे, मनुष्याला कधी कधी त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान होत नाही. मग त्यावेळेला कोणता दोष म्हणतात? ‘करणापाटव’ नावाचा दोष होतो.

(०६:४२)
स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एका डॉक्टरकडे एक मनुष्य गेला. तर त्यांनी विचारलं, ‘तू कशासाठी आला?’ तर त्यांनी सांगितलं की, ‘असं आहे की मला एका माणसाचे दोन माणसं दिसतात, म्हणून मी आलो.’ ते डॉक्टर म्हणले, ‘मग तुला जर एका माणसाची दोन माणसं दिसतात, तर तुम्ही चौघं जण इथं कशासाठी आले?’ त्यांना चार दिसत होते! याचं कारण काय? त्यांच्या डोळ्यामध्ये तसा दोष होता. अशा माणसाने प्रतिपादन केलेलं जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान यथार्थ नसतं. म्हणून त्याला करणापाटव नावाचा दोष म्हणतात.

(०७:५५)
किंवा दुसरं असतं, की आपल्याला सर्व अनुभव असला, चांगलं असलं तरी सुद्धा सांगायचं नाही… (फसवणूक). पण हे झालं कशामुळे? त्याच्या ठिकाणी ‘विप्रलिप्सा’ (Vipralipsa) – म्हणजे दुसऱ्याची वंचना किंवा फसवणूक करण्याची वृत्ती. दुसऱ्याला फसवायचं असेल आणि त्याने सांगितलेलं म्हणणं आता प्रामाणिक आहे का? नाही. त्याचं कारण त्याच्या ठिकाणी ‘विप्रलिप्सा’ नावाचा दोष आहे.

(०८:२५)
स्वामी महाराज सांगायचे की, गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला माहिती आहे, खेड्यातले जे गणपतीचे मंदिर असतात, त्याला कोणीच वाली नसतो. कधीतरी कोणतो गुरव येऊन तेल लावून जातो. मुलं खेळत होती. खेळताना एका गणपतीची नाभी मोठी होती, तर त्याच्यामध्ये एकाने बोट घातलं. त्याच्यामध्ये विंचू होता. त्या विंचवाने त्याला ठणका दिला. दिल्याबरोबर त्याने हात झटकला. (दुसऱ्याने विचारलं) ‘काय होतं?’ (तो म्हणाला) ‘काही नाही, गणपतीच्या बेंबीतून कसा गार वारा येतो!’ असं सांगितलं. दुसऱ्याने हात घातला, त्याला पण होणार की नाही? याचं कारण काय? ‘विप्रलिप्सा’ नावाचा दोष आहे.

३. वेदाचा अर्थ आणि स्मृती-पुराणांचे कार्य

(०९:०५)
तर वेद असा आहे (की यात हे दोष नाहीत). खरा ‘वेद’ शब्दाचा अर्थ आहे – ‘विद् लाभे, विद् ज्ञाने, विद् सत्तायाम्, विद् विचारे’ असे चार अर्थ केलेले आहेत. तर याचा अर्थ, आपल्याला आत्मलाभ किंवा सच्चिदानंद स्वरूप, आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार असं सांगणारा जो आहे, तो वेद आहे. किंवा ज्याला सत्य-मिथ्या यांचा विवेक करून सांगणारा जो ग्रंथ आहे, त्याला वेद म्हणतात. वेद शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’, तर ज्ञान हे नित्य आहे. ज्ञान नित्य आहे, तर वेद सुद्धा काय आहे? नित्य आहे. अशा प्रकारचं त्या वेदाचं अनादित्व आहे.

(१०:२८)
हा जो वेद आहे, त्या वेदाचं जे ज्ञान आहे, त्या वेदाला पुन्हा अधिकार पाहिजे. त्याच्यामध्ये स्त्री-शूद्राधिकांना अधिकार सांगितलेला नाही, वेदाच्या मंत्राचे उच्चारण करायला. (पण) वेदाचं मनोगत काय? सर्वांचं कल्याण व्हावं हे आहे ना? तर असं असल्यामुळे, ज्या लोकांना वेदाचा अधिकार नाही, त्यांच्यासाठी याच्या पुढे ‘स्मृती ग्रंथ’ निर्माण झाले. उदाहरणार्थ मनुस्मृती. म्हणजे वेदाचं तत्त्वज्ञान, पण वेदाचे मंत्र जसेच्या तसे न सांगता, त्या मंत्राचा जो आशय, ते रहस्य प्रतिपादन केले.

(११:०४)
मग तुम्हाला तीन गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये – एक आचाराचा प्रांत आहे, एक विचाराचा प्रांत आहे आणि एक भावनेचा प्रांत आहे. आपण जर आपल्या जीवनाचा विचार केला, तर आपल्या क्रिया, आपले कर्म, आपला आचार कसा आहे, याच्यावर आपलं जीवन आहे. तसंच माणसाच्या हृदयात भावना कशी आहे? आपण म्हणतो, ‘हा माणूस आहे ना, याची भावना दुष्ट आहे’, ‘याची भावना शुद्ध आहे’. म्हणजे अंतःकरणात शुद्ध भावना असली पाहिजे.

(११:४०)
वेद सांगतो की ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’. वेद सांगतो की तुमची माता ही साक्षात देवता आहे, पिता देवता आहे. याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. वेदाने सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या क्रिया झाल्या पाहिजेत. वेदाने भावना करायला सांगितली, त्यांनी सर्व सांगितलं – शालिग्राम मूर्ती घ्यावी आणि शालिग्राम, आपल्या शालिग्रामाची शिला घ्यावी, त्याच्यावर चतुर्भुज मूर्तीची आपण भावना करावी आणि त्याचं पूजन करावं. हा कोणता प्रांत झाला? भावनेचा प्रांत झाला. आणि विचार सुद्धा कसा करायचा? वेदाने सांगितल्याप्रमाणेच विचाराची दिशा ठेवायची. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः’. ब्रह्म सत्य वेद सांगतो, जीव आणि ब्रह्म एक आहे असं सांगतो, आणि हे दिसणारं जगत हे सर्व मिथ्या आहे, असा वेदाचा विचार आहे.

(१३:३०)
परंतु काही लोकांना तेही चांगले आकलन झाले नाही, म्हणून पुढे पुराण निर्माण झाली. पुराणामध्ये आपल्याला कथा सांगतात, अनेक प्रकारच्या आख्यायिका सांगतात आणि आख्यायिकाच्या रूपाने तत्त्वाचं निवेदन करतात. जसं रामचंद्र प्रभूंचं, सीतामाईचं आपल्याला चरित्र सांगितलं. रामचंद्र प्रभू हे कसे मर्यादापुरुषोत्तम होते, सीतामाईने कशा पातिव्रत्याचं जतन केलं, हे वेदाचे सिद्धांत आहेत ना? या ठिकाणी पातिव्रत्याचं जतन करणं, मर्यादेचं पालन करणं, हे वेदाचं सांगणं हेच त्या पुराणांनी सांगितलं. पण कथेच्या रूपाने आपल्या अंतःकरणात संस्कार झाला.

(१४:०७)
पुढे जाऊन हे संत वाङ्मय निर्माण झाले. त्याच्यामध्ये संतांनी सुद्धा हेच सांगितलं ना? की काय, ‘सकळ तीर्थांचे धुरे। जे हे का मातापितरे। तया सेवेशी शरीरे। लोण…’ अशाच प्रकारचं सांगितलं. ‘देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवम्। ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते।।’ असं (गीतेत) सांगितलं. म्हणजे रामायण आहे, महाभारत आहे, आपलं संत वाङ्मय आहे. या पुढे या सगळ्यांच्या द्वारा आपल्याला याच गोष्टींचे प्रतिपादन केलं.

४. संत वाङ्मय आणि वेदांताची एकवाक्यता

(१५:४७)
तसंच हा वेदांताचं जे आहे, तेही उपनिषदांपासून तर संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी एकाच तत्त्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून तर तुकाराम महाराज आत्मविश्वासपूर्वक म्हणतात की, ‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाचि साधिला।। विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम गावे।।’ सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुकाचि निर्धार. काय निर्धार आहे? विठोबासी शरण जावे. ‘अठरा पुराणे तिही सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।’ या ठिकाणी जे श्री विठ्ठल नाम दिलेलं आहे, ते आपल्या परमात्मवाचक अशा प्रकारचं नाव आहे. त्याला जीवाने शरणागत जावं, म्हणजे त्याचा अभेद निश्चय करावा.

(१६:३०)
तसेच या ठिकाणी निश्चलदासजी सुद्धा आपल्या सर्वांना हे जे वेद वाङ्मयाचं संपूर्ण मंथन करून किंवा वेदांताचं जे काही सारभूत असणारं रहस्य, ज्याला शंकराचार्य म्हणतात – ‘श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः’। कोट्यवधी ग्रंथांनी जे सांगितलं, ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो, असं शंकराचार्य म्हणतात. आणि काय सांगतात? की ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः’.

(१७:४५)
म्हणून जर एखाद्या पुरुषाला बोध व्हायचा असेल, तर हा ग्रंथ (‘विचार सागर’) त्याला परिपूर्ण बोध करून देण्याला, आत्मबोध करून देण्याला समर्थ आहे. अनेक लोक आहेत की गेल्या दीडशे वर्षांमध्ये, या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः या ग्रंथाचे पाठ सांगितले, त्यांचे शिष्य-प्रशिष्यांनी, पितांबर दासांनी पण त्याच्यावर चिंतन केलं, आणि कितीतरी लोक जीवनामध्ये कृतकृत्यतेला प्राप्त झाले.

(१८:२०)
त्यासाठी स्वामी महाराज एक विनोदाने उदाहरण सांगायचे. की एक मुलीचं लग्न झालं आणि ती आपल्या माहेरी आली. दोन वर्षानंतर तिच्या कडेवर एका बाईने मूल पाहिलं आणि तिला विचारलं की ‘हे मूल कोणाचं?’ तर तिने सांगितलं की ‘हे मूल माझं आहे’. ती बाई म्हणे, “शक्यच नाही, हे तुझं मूल असणं शक्यच नाही. तुझ्या लग्नाला फक्त दोन वर्ष झाली, तुला मूल असणं शक्यच नाही. कारण माझ्या लग्नाला २० वर्ष होऊनही मला मूल झालं नाही, तुला होणं कसं शक्य आहे?”

(१९:४५)
तसं या ठिकाणी, जरी कोणी वेद-वेदांताचा अध्ययन केलेला असलं भरपूर, आणि त्याला अधिकार नसेल, तर बोध होत नाही. आणि ज्याला व्हायचं, त्याला केवळ ‘विचार सागर’ सुद्धा पूर्णपरा आहे. ज्याला व्हायचं नाही, त्याला सगळं… तिकडे ॲरिस्टॉटल, कांट, अनेक तत्त्वज्ञ परदेशातले, एवढ्यांचं जरी केलं, तरी ‘तनुमुखे काय मुखे, शास्त्रविद्या कवी करोती… पद्यमन लग’ त्याचा काय उपयोग?

५. निरंतर चिंतन आणि साधना

(२०:२४)
म्हणून या ठिकाणी या ग्रंथावर अत्यंत श्रद्धापूर्वक आणि आपला जो वेळ, आपली जी शक्ती, बुद्धीची, मनाची, इंद्रियांची सगळी एकवटून केलं, तर आताच आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, ‘याचि देही’. याच देहामध्ये, याच देहात नाही, या आळंदीच्या वास्तव्यामध्ये, आणि ह्या वास्तव्यामध्ये नाही, याच वर्षामध्ये आहे की नाही? आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी असंग, निर्विकार, सच्चिदानंद स्वरूप, नित्यबुद्ध, मुक्त स्वभाववान अशा प्रकारचा मी आत्मा आहे. ‘देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल’. मी देह असूच शकत नाही.

(२१:०२)
जर आपण ती बुद्धी कशी… आपण जर तलवार किती दिवस म्यानात ठेवली, बरेच दिवस, तर गंजून जाते की नाही? तिला पाज द्यावी लागते. आपलं भांडं आहे, भांडं किती स्वच्छ घासून ठेवलं, सहा महिन्यांनी त्या गृहिणीला परत ते साफ करावंच लागतं की नाही? धूळ जमा होते. पण जर दररोज साफ केलं, तर दररोज चमकत राहतं.

(२१:३७)
तसं ‘वेदांत वाक्येषु सदा रमन्तः’. ‘भिक्षा मात्र चतुष्टता… अशोकवंता करुणवंता कौपीनवंता खलु भाग्यवंता, वेदांत वाक्येषु सदा रमन्तः’. वेदांताची जी वचनं आहेत, इथं जरी आपल्याला तासभर आपण ऐकत असलो… एवढाच वेळ नाही. आपल्या जीवनामध्ये हे जे सर्व जो वेळ आहे, तर तो सर्वच्या सर्व ‘वेदांत वाक्येषु सदा रमन्तः’. सदा रमन्तः म्हणजे रात्र रमन्तः का दिवसा रमन्तः? कोणतं? रात्रंदिवस तेच. स्वप्न पडलं तरी सुद्धा काय पाहिजे? तेच पाहिजे.

(२२:५१)
आपल्या जवळ देवाने सगळी जी लागणारी साधन संपदा आहे, ती सर्व पूर्णपणाने आपल्याला समर्पण केलेली आहे. ‘नको चिंता करू वस्त्राचिया, पोटाची माऊली आमची पांडुरंग’. निवाऱ्याची सोय धर्मशाळावाले करतातच. आपण तर झाडाखाली राहण्याच्या तयारीने आलेले आहे की नाही? घरदार सोडलं, त्यामुळे आपल्याला अन्नाची चिंता नाही, वस्त्राची नाही, पोटाची नाही. तर आता फक्त काय चिंता आहे आपल्याला? ‘वेदांत वाक्य सदा रमन्तः’.

(२३:२७)
त्यासाठी आपण… त्यांनी लिहिलं उपनिषदामध्ये, ‘आसुप्तेः आमृतेः कालं नयेत् वेदांत चिंतया’. ‘आसुप्तेः’ म्हणजे आपण एकदा झोपेतून जागं झालो, झोपेत जाईपर्यंत. आणि ‘आमृतेः’ (पुन्हा झोपेतून जागं झालं की झोपेत जाईपर्यंत आणि आमृतेः) म्हणजे याचा अर्थ आपल्याला मरण येईपर्यंत. आता जर काय करायचं असेल, तर आपल्याला फक्त हे वेदांताचं चिंतन करायचं.

(२४:०६)
आपली बुद्धी, आपली शक्ती, जी दुसऱ्या ठिकाणी खर्च होती, ती फक्त काय करायची? याच्या ठिकाणी लावायची. एवढं केलं की काहीच अवघड नाही. कबीर महाराजांचा दृष्टांत स्वामी महाराज सांगायचे. ‘यहाँ से उखाडो, वहाँ लगाओ’. असं एक माणूस कबीर महाराजांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की ‘मला भगवंताची प्राप्ती कशाने होईल?’ कबीर महाराजांनी मिरच्याची रोपं घेतली, उपटायचे एक रोप आणि त्या वाफ्यामध्ये लावायचे. संध्याकाळ झाली, त्याने विचारले. त्यांनी काय सांगितलं? ‘काही नाही, तुला कळलं नाही का? अरे आता हे मिरच्याचे रोप लावताना पाहिलं नाही का? तेच तत्त्व आहे परमात्म प्राप्तीचं. ‘यहाँ से उखाडो, वहाँ लगाओ’. जी तुझी शक्ती होती, जी तू संसारामध्ये किंवा विषयांमध्ये खर्च करत होता, तीच आता कशाची करायची? त्याचा विषय काय करायचा? परमात्मा हा विषय करायचा.

(२५:५१)
अशा रीतीने बुद्धी परमात्म्याचा निश्चय करते, मन परमात्म्याचा संकल्प करतं. अशा प्रकारे जर जागृतीत हे जर आपण तीव्रतर भावना केली, तर त्याला ‘कीटकी भ्रंग’ म्हणतात. ती अळी, त्या कीटकीचं चिंतन करता करता तिला पंख पडतात. तसं जर जागृतीत आपण चिंतन केलं, तर ‘जागता जवळी… जेणे ध्यान भावना भाजे, निद्रा लागता किंवा डोळा लागता दुःख तेची स्वप्नी’. स्वप्नामध्ये आपल्याला असंच झालं की जगत प्रतीतीला आलं, पण ते मिथ्या आहे. स्वप्नामध्ये हे सर्व स्वप्न आहे असं जर आपल्याला वाटलं, की आपल्या तत्त्वचिंतनाची परिसमाप्ती झाली.

६. श्रद्धा आणि कृतज्ञता

(२७:०५)
तेव्हा कोणती गोष्ट जर करायची झाली, तर त्या गोष्टी… आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी आदर असतो, तर आपण लगेच त्याने हाक मारल्यावर ‘जी’ म्हणतो. आणि एखाद्या मनुष्याविषयी आपल्याला आदर नाही आणि तो म्हणतो ‘रामराव इकडे या’, काय त्याला लगेच ‘काय? काय नाही, काय थोडसं काम होतं मला, आता वेळ नाही’. कारण का? श्रद्धा नाही. गीता सांगते ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्’. ‘बुद्धिमान लभते ज्ञान’ नाही म्हणत. ज्याच्या अंतःकरणामध्ये हे शास्त्र, वेदांत शास्त्र, ईश्वर आणि गुरु यांच्याविषयी अतीव श्रद्धा आहे, अशा मनुष्याला हे तत्त्वज्ञान होऊ शकतं.

(२७:५२)
म्हणून त्यांनी लिहिलं की काय? ईश्वर, तीन गोष्टी नेहमी वंद्य… ‘यावज्जीवं त्रयो वंद्याः’. जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे, तोपर्यंत तीन गोष्टी वंदनीय आहेत. कोणत्या? की ‘यावज्जीवं वेदांत गुरु ईश्वराः’. आपले श्रीगुरू, वेदांत शास्त्र आणि ईश्वर हे आपल्याला नित्य पूजनीय, वंदनीय आहेत. तुम्ही म्हणाल कशासाठी? गुरु, तर ते म्हणतात की जोपर्यंत तत्त्वज्ञान होत नाही, तोपर्यंत तत्त्वज्ञान होण्यासाठी आहेत. आणि मग नंतर? नंतर जशी म्हातारी पतिव्रता आपल्या पतीचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे हे जरी ज्ञान झालं, तरी सुद्धा कृतज्ञतेचा आक्षेप आपल्यावर येऊ नये म्हणून या तीन गोष्टी वंदनीय आहेत.

(२९:०७)
स्वामी महाराज सांगायचे, साधकाने ‘दीन’ होऊ नये, काय व्हावं? ‘लीन’ असावं. नम्रता धारण करून असावं. आणि यामध्ये बुद्धीपेक्षा काय? ‘श्रद्धावान लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः’. तत्पर असला पाहिजे. तत्पर म्हणजे ते सर्वात श्रेष्ठ. जसं त्या द्रोणाचार्यांनी परीक्षा पाहिली या सगळ्यांची आणि त्यांनी सांगितलं की ‘ह्या पक्षाच्या डोळ्याला तुम्ही बाण वेधायचा’. तर त्या सगळ्यांना विचारलं, ‘काय दिसतं?’ तो म्हणतो ‘वृक्ष दिसतो’. कोणी म्हणतं ‘पोपट दिसतो’. आणि अर्जुनाने काय सांगितलं? ‘फक्त मला त्याच्या डोळ्यातलं बुबुळ दिसतं’. म्हणजे याचा अर्थ मनुष्याला एकाग्रता.

(३१:००)
त्या आपण हे चिंतन करत असताना जितका व्यवहाराचा लोप होईल, आपल्या जितका व्यवहार कमी असेल, तेवढी जी स्थिती आहे, ही आहे ‘अव्यवहारी स्थिती’. व्यवहार कसा? ‘निर्वाह प्रते अन्नच्छादन आश्रमाची स्थान कोपी’. अन्नदानाची आपल्याला सोय आहेच. अन्न निर्वाहा, अन्नद, आश्रमाची स्थान कोपी (कोठेही), चित्तासी नसावे बंधन. त्यांनी सांगितलं, ‘एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये’, किंवा बोलू नये. ‘तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपे’.

(३१:३५)
अशा प्रकारे प्रसन्नच करायचं, तर लोकांना प्रसन्न करून काय करायचं? आपण आपल्याला प्रसन्न करायचं. म्हणजे आपलं अंतःकरण प्रसन्न असलं, तर त्याला सगळं जगच काय आहे? प्रसन्न आहे. तुकोबारायांचा अभंग – ‘सकळ सिद्धींचे कारण, मन करारे प्रसन्न’.

(३२:११)
रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, ते ज्यावेळेला तपस्या करत होते, एका दक्षिणेश्वरला आवळीच्या एका झाडाखाली ते तासंतास एका शिलेवर बसून ध्यान-धारणा करत असत. आणि ज्यावेळेस संध्याकाळ होत जाईल, त्यावेळेस ते संध्याकाळच्या सूर्याकडं तोंड करीत, नेत्रातून अश्रू वाहात, ते म्हणायचे, ‘आजचाही दिवस गेला, आई तू मला भेटली नाहीस. तू मला कधी भेट देशील?’

(३३:२६)
याच्यासाठी हे त्यात्व (त्याग), त्यागाने ह्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. ‘डोई ठायी तुका, नाही पडो देत चुका’. आहे ना? ‘कामामध्ये काम काही, मना राम राम. जाईल श्रम, सुख होईल दुःखाचे’. अजून वेळ गेली नाही. इथं आता आलो, तर आता ‘लढा नाही तर मरा’. आपल्याला माहिती आहे ना, ते शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कोणते? तानाजी मालुसरे. ते वर गेले, सैनिक वरून मुस्लिम सैन्य जास्त आले, मग हे पळायला लागले. मग त्यांनी काय केलं? दोर तोडून टाकला. आता ‘लढा नाही तर मरा’, आहे की नाही? तशीच आपली स्थिती आहे की नाही? ‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर ठाव. पुसिले बुढ, पुशिले ओस, ओसले देह भाव’.

७. एकांताचे महत्त्व आणि न्यूनगंड-पुष्टगंड

(३४:४३)
हा जो सामूहिक परमार्थ, एक वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची साधना पद्धती आहे. ‘एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला’. पण जेव्हा आपल्याला वेळ असतो, तेव्हा जितका आपल्याला एकांत काढता येईल… पण असं जर केलं, तर आपल्याला याच्यामध्ये प्रवेश होतो आणि वेदांत इतकं सूक्ष्म आहे की, त्यांनी लिहिलं ‘दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः’. ज्याला एकच अग्र (म्हणजे एकच टोक) आहे, ज्या बुद्धीला, ज्या मनाला एकच टोक आहे. टोक म्हणजे परमात्मा. परमात्म्याकडे जाणं हे टोक ज्याला आहे आणि ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे, तर ह्या बुद्धीला सूक्ष्मता, एकाग्रता, पावित्र्य येण्यासाठी आपण एकट्यानेच विचार केला पाहिजे.

(३५:५४)
आणि जगद्गुरू तुकाराम महाराज, की ज्यांची पत्नी कर्कशा, स्त्री अन्न-अन्न करून गेली, दुष्काळ… अशी स्थिती आणि ते आनंदाचे लाडू कसे काय खातात? ज्ञानोबाराय कसे काय मांडतात? ‘आनंदाचे आवारू, मांडू जगा’. ‘तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वरू, आनंदाचे आवारू मांडू जगा’. ज्या लोकांनी त्यांना शुद्धिपत्र द्यायला विरोध केला, गावात राहू दिलं नाही, भिक्षा मिळू दिली नाही, आणि ते आनंदाच्या आवारात जगाला मांडायला निघाले. कसे काय? याचं काय चिंतन आहे?

(३७:१०)
याच्यामध्ये ‘न्यूनगंड’ उपयोगाचा नाही. वेदांत चिंतनात दोन गोष्टी स्वामी महाराज सांगायचे – एक आहे ‘पुष्टगंड’ आणि एक आहे ‘न्यूनगंड’.
न्यूनगंड म्हणजे, ‘नाही पण मला काही हे शक्य नाही’. हा विचार. (जसे) काही लोक म्हटले की ‘आम्ही आलो नाही, कारण काय? अहो काहीच कळेना, आठ तास बसून सगळं डोक्यावरूनच जातं’. तर हे जे आहे, याला ‘न्यूनगंड’ म्हणतात. अरे, जर तुम्हाला ऐकून कळत नाही, तर न ऐकून कधी कळेल का? अशी त्याची स्थिती. आपल्याला नंतर इतकं अनुभूत होऊन जातं की, हे विचार सहजच आपल्याला कळतात.

(३८:१९)
जसा न्यूनगंड वाईट आहे, तसा ‘पुष्टगंड’ पण वाईट आहे. थोडासा चार ग्रंथ शिकला, तर लगेच असं करायला लागला की ‘माझ्यासारखा मजविण ज्ञानी कोण आहे?’ असं जर वाटायला लागलं, तर पुष्टगंड आहे. त्याला त्या शब्दज्ञानामध्ये तो रमला आणि वास्तव, जे खरं स्वरूपभूत ज्ञान आहे, त्याच्यापासून तो वंचित झाला. कारण शब्द जे आहेत, शब्द टरफले. माऊली स्वतः म्हणतात, ‘आत बोलाची वाली फे, बोलवा शब्द हे, ते काढून टाकावे लागतात. मग ब्रह्माची अंगा घडी’.

(४०:४८)
म्हणून या ठिकाणी न्यूनगंड जसा घातक आहे, तसा पुष्टगंड सुद्धा. ‘ज्ञान थोडे परी गर्व… अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी’. आणि ‘मजविण ज्ञानी कोण आहे’, असं म्हणत असाल, तर याला कोणता गंड आहे? पुष्टगंड. याच्यात पुष्टगंड नाही, न्यूनगंड नाही, ‘वस्तुनिष्ठ’. वस्तू जशी आहे, तशा प्रकारचं आपल्याला चिंतन करायचं.
तर आता, आपल्या हळूहळू… आज गीता जयंतीचा पर्व आहे, पावन पर्व आहे. इंद्रायणीचा पवित्र तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींचं हे वायुमंडळ आहे. चौऱ्यांशी सिद्धांचा, सिद्ध भेटी मेळा आहे. सिद्धेश्वर महाराज आहेत. सगळं पांडुरंग परमात्म्याचं, समाधीला घेऊन नित्य वास्तव्य आहे. तेव्हा या वायुमंडळामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं भय, चिंता बाळगण्याचं काही कारण नाही. आता योगक्षेम करणारं कोण आहे? सगळा परमात्मा आहे, माऊली आहे. तेव्हा आपण अशा प्रकाराने, ‘उपजला भाव, तुमचे कृपे सिद्धी जावो’, अशी प्रार्थना करायची. आणि आता शक्यतो उद्यापासून आपण ग्रंथाचा, पाठाचा अर्थ आहे, त्याला थोडी थोडी सुरुवात करू.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय!
(समाप्त)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top