दिवस – ३५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्‌‍ | स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ॥३५॥
अगा, स्वधर्मु हा आपुला | जरी कां कठिणु जाहला | तरी हाचि अनुष्ठिला | भला; देखैं ॥२१९॥
येरु आचारु जो परावा | तो देखतां कीर बरवा | परी आचरतेनि आचरावा | आपुलाचि ॥२२०॥
सांगैं, शूद्रघरीं आघवीं | पक्वान्नें आहाति बरवीं | ती द्विजें केंवीं सेवावीं?| दुर्बळु जरी जाहला!॥२२१॥
हें अनुचित कैसेनि कीजे?| अग्राह्य केवीं इच्छिजे?| अथवा इच्छिलेंही पाविजे | विचारीं पां ॥२२२॥
तरी लोकांची धवळारें | देखोनियां, मनोहरें | असती आपुली तणारें | मोडावीं केवीं?॥२२३॥
हें असो; वनिता आपुली | कुरूप जरी जाहली | तऱ्ही भोगितां तेचि भली | जियापरी ॥२२४॥
तेवीं, आवडे तैसा सांकडु | आचरतां जरी दुवाडु | तऱ्ही स्वधर्मुचि सुरवाडु | परत्रींचा ॥२२५॥
हां गा साकर आणि दूध | हें गौल्ये कीर प्रसिद्ध | परी, कृमिदोषी विरुद्ध | घेपे केवीं?॥२२६॥
ऐसेनिही जरी सेविजेल | तरी ते आळुकीचि उरेल | जे, तें परिणामीं पथ्य नव्हेल | धनुर्धरा ॥२२७॥
म्हणौनि, आणिकांसी जे विहित | आणि आपणपेयां अनुचित | तें नाचरावें; जरी हित | विचारिजे ॥२२८॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां | वेचु होईल जीविता | तोहि निका; वर, उभयतां | दिसत असे ॥२२९॥
ऐसें समस्त-सुर-शिरोमणी | बोलिले जेथ शार्ङ्गपाणी | तेथ अर्जुन म्हणे विनवणी | असे देवा ॥२३०॥
हें जें तुम्हीं सांगितलें | तें सकळ कीर म्यां परिसिलें | तरी आतां पुसेन कांहीं आपुलें | अपेक्षित ॥२३१॥
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष:| अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित: ॥३६॥
‌‘तरी देवा, हें ऐसें कैसें?| जे-ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे | मार्गु सांडुनी अनारिसे | चालत देखों ॥२३२॥
सर्वज्ञुही जे होती | हेयोपादेयही जाणती | तेहीं परधर्में व्यभिचरति | कवणें गुणें?॥२३३॥
बीजा आणि भूसा | अंधु निवाडू नेणें जैसा | नावेक देखणाही तैसा | बरळें कां पां?॥२३४॥
जे असता संगु सांडिती | तेचि संसर्गु करितां न धाती!| वनवासीही सेविती | जनपदांतें ॥२३५॥
आपण तरी लपतीं | सर्वस्वें पाप चुकविती | परी बळात्कारें सुइजती | तयाचि माजीं ॥२३६॥
जयाची जीवें घेती विवसी | तेचि जडोनि ठाके जीवेंसीं | चुकवितां, ते गिंवसी | तयातेंचि ॥२३७॥
ऐसा बलात्कारु एकु दिसे | तो कवणाचा एथ आग्रहो असे? | हें बोलावें हृषीकेशें‌’ | पार्थु म्हणे ॥२३८॥
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव:| महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌‍ ॥३७॥
तंव हृदयकमळआरामु | जो योगियांचा निष्कामकामु | तो म्हणतसे पुरुषोत्तमु | सांगेन; आइक ॥२३९॥
तरी हे कामक्रोध पाहीं | जयांतें कृपेची सांठवण नाहीं | हें कृतांताच्या ठायीं | मानिजती ॥२४०॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग | विषयदरीचे वाघ | भजनमार्गीचे मांग | मारक जे ॥२४१॥
हे देहदुर्गींचे धोंड | इंद्रिय ग्रामींचें कोंड | यांचे व्यामोहादिक बंड | जगावरी ॥२४२॥
हे रजोगुण मानसींचे | समूळ आसुरियेचे | धायपण ययांचें | अविद्या केलें ॥२४३॥
हे रजाचे कीर जहाले | परी तमासी पढियंते भले | तेणें निजपद यां दिधलें | प्रमादमोहो ॥२४४॥
हे मृत्युच्या नगरीं | मानिजती निकियापरी | जे, जीविताचें वैरी | म्हणौनियां ॥२४५॥
जयांसि भुकेलिया, आमिषा | हें विश्व न पुरेचि घांसा | कुळवाडीयांचि आशा | चाळीत असे ॥२४६॥
कौतुकें कवळितां मुठीं | जिये चवदा भुवनें थेंकुटी | तिये भ्रांतिही धाकुटी | वाल्हीदुल्ही ॥२४७॥
जें लोकत्रयाचें भातुकें | खेळतांचि खाय कवतिकें | तिच्या दासीपणाचेनि बिकें | तृष्णा जिये ॥२४८॥
हें असो; मोहें मानिजे | यांतें अहंकारे घेपे दीजे | जेणें जग आपुलेनि भोजें | नाचवीत असें ॥२४९॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला | मग अकृत्य तृणकुटा भरिला | तो दंभु रूढविला | जगीं इहीं ॥२५०॥
साध्वी शांति नागविली | मग माया मांगी शृंगारिली | तियेकरवीं विटाळविलीं | साधुवृंदें ॥२५१॥
इहीं विवेकाची त्राय फेडिली | वैराग्याची खाल काढिली | जितया मान मोडिली | उपशमाची ॥२५२॥
इहीं संतोषवन खांडिलें | धैर्यदुर्ग पाडिलें | आनंदरोप सांडिले | उपडूनियां ॥२५३॥
इहीं बोधाची रोपें लुंचिलीं | सुखाची लिपी पुसिली | जिव्हारीं आगी सूदली | तापत्रयाची ॥२५४॥
हे आंगा तंव घडले | जीवींची आथी जडले | परी नातुडती; गिवसिले | ब्रह्मादिकां!॥२५५॥
हे चैतन्याचे शेजारीं | वसती ज्ञानाच्या एका हारीं | म्हणौनि, प्रवर्तले महामारी | सांवरती ना ॥२५६॥
हे जळेंविण बुडविती | आगीवीण जाळिती | न बोलतां कवळिती | प्राणियांतें ॥२५७॥
हे शस्त्रेंविण साधिती | दोरेवीण बांधिती | ज्ञानियासी तरी वधिती | पैज घेऊनि ॥२५८॥
हे चिखलेवीण रोविती | पाशिकेवीण गोंविती | हे कवणाजोगें न होती | आंतौटेपणें ॥२५९॥

भक्तिशास्त्र (भागवतशास्त्र) (५०३ ते ५१५)

त्याच्या दृढ विश्वासासीं । भागवतशास्त्र गुरूपाशी । अभ्यासावें आदरेंसीं । दृढनिश्चयेंसी प्रबोधक ॥३॥
श्रद्धां भागवते शास्त्रेऽनिन्दामन्यत्र चापि हि । मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥२६॥
(अंतर्बाह्य पावित्र्य, सातत्याने धर्माचरण, सहनशीलता, जरुरीपुरते भाषण, वेदाध्ययन, ऋजुवृत्ती. ब्रह्मचर्य, कोणाचाही द्रोह न करणे, सुखदुःखादी द्वंद्वांचे ठिकाणी अचल बुद्धी, सर्व ठिकाणी आपले तसेच ईश्वराचे स्वरूप अभेद दृष्टीने पाहणे, एकांताची आवड, गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमानशून्य वृत्ती, निर्जन ठिकाणच्या वल्कलांचे (झाडाच्या सालींचे) परिसेवन, मिळेल त्यात समाधान, भागवतशास्त्रात संपूर्ण विश्वास, अन्य शास्त्रांची निंदा न करता त्यांविषयी आदर, मन, वाणी आणि कर्म यांचे नियमन, सत्य, त्याचप्रमाणे अंतर्निग्रह (मनोनिग्रह) व बाह्यनिग्रह (इंद्रियदमन) भागवतधर्म शिकवितो.॥ २४-२६ ॥)
सगुण अथवा निर्गुण । जेथ भगवत्स्वरूपवर्णन । कां भगवंत बोलिला आपण । अथवा भगवद्गुणकीर्ति जेथें ॥४॥
तें तें राया शास्त्र जाण । आवडे जैसें जीवुप्राण । विशेषेसी ज्ञानकथन । सप्रेम पूर्ण पढियंतें ॥५॥
गुरुमुखें ज्ञानकथा गोड । तेणें श्रीभागवतीं श्रद्धा दृढ । श्रवणे पुरे जीवाचें कोड । वोसरे चाड विषयांची ॥६॥
जीवीं नाहीं विषयकौतुक । तरी विषय आवश्यक । साधकां होती बाधक । तेणें आत्यंतिक अनुतापु ॥७॥
अनिवार विषयावस्था । त्यागिली न वचे निजसत्ता । तेणें मुमुक्षूच्या चित्ता । अत्यंत व्यथा अनुतापें ॥८॥
नसतां विषयांची अतिप्रीति । स्वतां नव्हे विषयनिवृत्ति । ऐशिया साधकांप्रती । निर्णीत शास्त्रार्थी नेमिला नेमु ॥९॥
नाही विषयांची आसक्ति । ना नव्हे विषयनिवृत्ति । ऐसि जे कां साधकस्थिति । नेमू त्याप्रती शास्त्रे केला ॥५१०॥
जो कां केवळ विषयासक्त । तो कदा न मानी शास्त्रार्थ । कां जो झाला जीवन्मुक्त । तोही शास्त्रार्थ मानूनि न मनी ॥११॥
जैसी मृगजळाची भासे स्थिति । तैसे विषय मुक्तांप्रती । त्या विषयांचिये निवृत्ती । कोणते शास्त्रार्थी मानावा नेमु ॥१२॥
एवं अत्यासक्त अतिविरक्त । त्यांसी नेमु न चले येथ । मुमुक्षूंसीच शास्त्रार्थ । नेमी निश्चित निजनेमें ॥१३॥
तेथ गुरुशिष्यसंवाद । करितां ज्ञानार्थबोध । ते बोधी बाधी विषयबाध । तत्त्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थनेमु ॥१४॥
मनसा-वाचा-कर्मावरोधु । येणें विषयांचा त्रिविध बाधु । त्या तिहींसही त्रिविधु । शास्त्रे अतिशुद्धु नेमिला नेमु ॥१५॥

विषयनिवृत्तीकरिता शास्त्रनेम (५१६ ते ५३७)

(पूर्वश्लोकोत्तरार्धम् —) ‘मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि’ ।
मनासी नेमु उपशमाचा । इंद्रियां नेमु तो दमाचा । सत्यें नेमिली वाचा । तिहींसही तिहींचा निजनेमु ॥१६॥
विषयकाम गज दारुण । अहंमदें उन्मत्त पूर्ण । देहतारुण्ये अतिघूर्ण । तोडी बंधन विधीचें ॥१७॥
रवंदी सुहृद राजा गुरु । सोंडां कवळी स्वर्गशिखरु । नरकनदीमाजी अपारु । अतिदुस्तरु बुड्या देत ॥१८॥
धर्मजळें क्षाळे अवचिता । सवेंचि सलोभ धुळी घाली माथां । घोळसी ब्रह्मादिकां समस्तां । अहंममता गर्जतु ॥१९॥
त्यासी विवेकमहावत जाण । माथां चढों जाणे आपण । शास्त्रविधि-अंकुशे पूर्ण । धरिला आवरून करकरितु ॥५२०॥
त्यासी उपशमाचे संरक्षण । वैराग्ययुक्त ठेवूनि जाण । दमाचे शृंखळी आकळून । सत्याचे स्तंभी पूर्ण विवेकु बांधे ॥२१॥
मनसा-वाचा-कायिक कर्म । येणे विषयबाधा बाधी परम । त्या तिहींसी केला त्रिविध नेम । त्या नेमाचें वर्म ऐक राया ॥२२॥
आतां शमाची ऐशी स्थिती । मनबुद्ध्यादि चित्तवृत्ती । सांडवूनि विषयासक्ती । लावी परमार्थी प्रबोधूनि ॥२३॥
पूर्वे उगवतां गभस्ती । आंधारु सांडी त्रिजगती । तेवीं गुरुवाक्यें शमाची प्राप्ती । विषयनिवृत्ति मानसिक ॥२४॥
बाह्य इंद्रियप्रवृत्ती । ‘दमें’ दमोनि गुरुवाक्यस्थिती । मग शमाची संगति । आणी निवृत्ती इंद्रियकर्मे ॥२५॥
कन्या प्रतिपाळूनि जैसी । दान देतां जांवयासी । त्यागी बापाचे कुळगोत्रासी । दमें इंद्रियें तैशी विषयार्था ॥२६॥
झणी वाचा जाईल विकळ । तिसी ‘सत्याचा’ महामोकळ । देऊनि केली निखळ । अतिअढळ सत्यधूत वाणी ॥२७॥
“सत्यवादिया ब्रह्मादि वंदिती । असत्या होय अधोगती ।” ऐसें व्याख्यान जे करिती । तेही वदती असत्य ॥२८॥
कां रामनामाच्या आवृत्तीं । वाचा धूतली स्मरणोक्तीं । ते असत्यामाजी पुढती । कदा कल्पांती बुडेना ॥२९॥
मंथूनि काढिलें नवनीत । तें पुढती न बुडे ताकांत । तेवीं नामें वाचा निर्धूत । असत्य तेथ स्पर्शेना ॥५३०॥
जेवीं लागलेनि रविकरें । घृतकणिका स्वयें विरे । तेवीं सत्याचेनि निजनिर्धारें । असत्य चमत्कारे समूळ उडे ॥३१॥
चंदनाचिया चौफेरी । काष्ठत्वा मुकती खैर बोरी । तेवीं नामाच्या निजगजरी । वाचेमाझारी निजसत्य प्रगटे ॥३२॥
झालेनि अर्कप्रकाशें । खद्योत हारपती जैसे । तेवीं रामनामसौरसें । लोपे अनायासें असत्य ॥३३॥
अंवसेसी प्रतिपदे कुहु । गेलिया बिंब सांडी राहु । तेव्हां प्रकाशाचा समूहु । प्रगटे बहु जगामाजीं ॥३४॥
तेवीं असत्याचेनि आक्रमें । वाचा प्रकाशे सत्यसंभ्रमें । जेवीं राजाज्ञा अनुक्रमें । प्रजा स्वधर्मे वर्तती ॥३५॥
सत्यापरतें नाहीं तप । सत्यापरता नाहीं जप । सत्ये पाविजे सद्रूप । सत्यें निष्पाप साधक होती ॥३६॥
एवं काया वाचा आणि मनें । शमदमादिसत्यलक्षणें । जो नेमिला त्रिविधविंदानें । त्याचे विषयाचे धरणें तत्काळ उठी ॥३७॥

भक्तीने मोक्षप्राप्ती (५३८ ते ५४३)

ऐसिया स्वार्थालागी जीवीं । भगवच्छास्त्री आवडी करावी । परी आणिकां शास्त्रां न लावी । द्वेषभावी निंदेचे बोट ॥३८॥
एका स्तुती एका निंदा । करितां आदळे अंगी बाधा । यालागी निंदानुवादा । साधक कदा नातळती ॥३९॥
अर्धागींची लक्ष्मी वंदावी । मा चरणींची गंगा काय निंदावी । निजजननी नमस्कारावी । काय येरां द्यावी पांपर ॥५४०॥
तरी भज्य भजावें भजनीं । परी निंदा स्तुति सांडूनि दोनी । जो निजसत्यें होय मौनी । तैं ब्रह्मज्ञानी अधिकारु ॥४१॥
ऐशी न करितां व्युत्पत्ति । न सोशितां हे कष्टस्थिति । भावें करितां भगवद्भक्ति । फुकाची मुक्ति हरिभक्तां ॥४२॥
ते भक्तीची निजस्थिति । राया सांगेन तुजप्रती । सुगमत्वें परमात्मप्राप्ति । हरिभक्त पावती तें ऐक ॥४३॥

भक्तीने ध्यान ठसते (५४४ ते ५५२)

श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरद्भुतकर्मणः । जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिलचेष्टितम् ॥२७॥
मुख्य भक्तीचे कारण । हरीचे जन्म-कर्म-गुण । पूर्ण श्रद्धा करावे श्रवण । हरिकीर्तन स्वानंदें ॥४४॥
हरिकीर्तनाचिया जोडी । सकळ साधनें केली बापुडीं । अद्भुत कर्मे हरीची गाढीं । गातां अतिआवडी उल्हासे ॥४५॥
शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन धरिला करी । निद्रा न मोडितां सकळ नगरी । द्वारकेमाझारी आणिली मथुरा ॥४६॥
निमाला गुरुपुत्र दे आणूनि । मुखें प्राशिला दावाग्नि । गत गर्भ आला घेऊनि । निजजननीतोषार्थ ॥४७॥
अजन्म्या जन्में नेणों किती । अकर्म्याची कर्मे गाती । अगुणाचे गुण वर्णिती । तेणें श्रीपति सुखावे ॥४८॥
जो सुखैकमूर्ति निजस्वभावें । तोही जन्म-कर्म-गुणवैभवें । गातां कीर्तनी अतिसुखावे । स्वानंदगौरवें डुल्लतु ॥४९॥
ऐशी कीर्तनीं गातां कीर्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति । तेथें ठसावे ध्यानस्थिति । ऐक ते नृपती सांगेन ॥५५०॥
मुकुट कुंडलें मेखळा । कांसे कसिला सोनसळा । आपाद रुळे वनमाळा । घनसांवळा घवघवित ॥५१॥
ऐशी मूर्ती सुरेख सगुण । कां निरसून रूप नाम गुण । ध्यानी ठसावे निजनिर्गुण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५२॥

५४०.उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्त शुद्ध, बुद्धि ठायीं स्थीर ॥१॥
न घालावी धांव मनाचिये ओढी । वचनीं आवडी संतांचिये ॥ध्रु॥
अंतरी या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥३॥
५४१.जीवन्मुक्त ज्ञानी जरी झाले पावन। त्यजावा दुर्जन संग तिही ॥१॥
बहुत अन्न, विष मोहरीच्या मानें । अवघेचि तेणें विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणे आपुले स्वहित । तैसी करा नीत विचारूनि ॥३॥
५४२.द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ। तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनियां हेंचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसे ॥ध्रु॥
तुका म्हणे हेंचि करूनि जतन । आलियाही दान याचकासी ॥३॥
५४३.द्रव्याचिया मागें कळिकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचे मूळ, घालूनियां मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु॥
आजिच्या प्रसंगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥३॥
प्रारब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचे हे पिसे वायांविण ॥४॥
तुका म्हणे घेईं, राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥५॥
५४४.रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा! । कृपेच्या सागरा पांडुरंगा! ॥ध्रु॥
रांधू नेणें, तया पुढील आइतें। केलें तें सोइतें वायां जाय ॥३॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळां । पावे अवकळा म्हणऊनि ॥४॥
५४५.दु:खाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसी ॥१॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु॥
भोगें कळों येती मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥३॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥४॥
५४६.सदैव तुम्हां अवघे आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानी कीर्ति । डोळे मूर्ति देखावया ॥ध्रु॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकी होती पांगुळ ॥३॥
घरा आगी लावूनि जागा । न पळे तो गा वांचेना ॥४॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥५॥
५४७.ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणऊनि फावलें तें घ्यावें । नाम गावे आवडी ॥ध्रु॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवें पुढे क्रियमाण ॥३॥
तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे सूकराचें ॥४॥
५४८.सर्वविशी माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडूं एक? ॥१॥
संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणतां ‘माझें’ कोणी ॥ध्रु॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें, आदर बंध वाटे ॥३॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥४॥
तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥५॥
५४९.आणीक कांहीं या उत्तराचें काज। नाहीं आतां मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावना स्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु॥
गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें? ॥३॥
तरी भले आतां न करावा संग । दु:खाचे प्रसंग तोडावया ॥४॥
तुका म्हणे गुण गाईं या देवाचे । घेईं माझे वाचे हेचि धणी ॥५॥
५५०.आपुला विचार करीन जीवाशीं । काय या जनाशी चाड मज? ॥१॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दु:ख वाटे ॥ध्रु॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरी निजो सुखें ॥३॥
माझी कोण वोज झाला हा शेवट । देखोनिया वाट आणिकां लागे ॥४॥
तुका म्हणे भाकूं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥५॥
५५१.ध्याईं अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें? ॥१॥
विधिनिषेध ऊर फोडी । जंव नाहीं अनुभव गोडी ॥ध्रु॥
वाढे तळमळ उभयतां । नाहीं देखिलें अनुभवितां॥३॥
आपुलाल्या मतें पिसें । परि ते आहे जैसे तैसें ॥४॥
साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥५॥
तुका म्हणे वादें । वायांगेलीं ब्रह्मवृंदें ॥६॥
५५२.कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकली बापुडी । दंभ विषयांचे सांकडीं ॥ध्रु॥
भूस उपणूनि केले काय? । हारपले दोन्ही ठाय ॥३॥
तुका म्हणे लागे हातां । काय? मथिले घुसळितां ॥४॥
५५३.संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारे जाणावें हे? ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेतां नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे? ॥ध्रु॥
करितों कवित्व बोबड्या उत्तरीं । झणीं मजवरी कोप धरा ॥३॥
काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलों नेणें ॥४॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥५॥
५५४.चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥१॥
साखरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥
तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होते । तरी कां निंदितें जन मज ॥३॥
५५५.तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेंचि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥ध्रु॥
भावे हे कदान्न खासी त्याचें घरीं । अभक्ताच्या परी नावडती ॥३॥
नवजासी जेथे दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसी ब्रीदें तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥
५५६.तरी कां नेणते होते मागें ऋषी? । तिहीं या जनासी दुराविलें ॥१॥
वोळगती जया अष्टमहासिद्धि । ते या जनबुद्धि नातळती ॥ध्रु॥
कंद मुळे पाला धातूच्या पोषणा । खाती, वास रानांतरी केला ॥३॥
लावूनियां नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले मौन्यरूप ॥४॥
तुका म्हणे ऐसें करी माझ्या चित्ता । दुरावी अनंता, जन दुरी ॥५॥
५५७.कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा? ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । याति-शुद्ध एक ठाव नाहीं ॥ध्रु॥
कलियुगी बहू कुशळ हे जन । छळितील, गुण तुझे गातां ॥३॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥
तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हे मरण भले दोन्ही ॥५॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top