दिवस – ३३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥२५॥
देखें, फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मी भरू होआवा तैसा । निराशाही ॥१६९॥
जे, पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणौनिर्या ॥१७०॥
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांर्पति ॥१७१॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥२६॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी? । म्हणौनि बाळकां जैसी नेदावी । धनुर्धरा ॥१७२॥
तैशी कर्मी जया अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी; खेळतां । आदिकरुनी ॥१७३॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्म्यही दावावी । आचरोनी ॥१७४॥
तया लोकसंग्रहालागी । वर्ततां कर्मसंगी । तो कर्म-बंधु अंगी । वाजैल ना ॥१७५॥
जैसी बहुरुपियांची रावो राणी । स्त्री-पुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥१७६॥
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥२७॥
देखें, पुढीलांचे वोझें । जरी आपुला माथां घेइजे । तरी, सांगें, कां न दाटिजे? । धनुर्धरा ॥१७७॥
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें, मूर्ख, मतिभ्रमें । “मी कर्ता’ म्हणे ॥१७८॥
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥१७९॥
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित । ते अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥१८०॥
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥२८॥
जें, तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात, पाहीं । निपजत असे ॥१८१॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्मे वोलांडुनि । साक्षीभूत होऊनी । वर्तती देहीं ॥१८२॥
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपेना ॥१८३॥
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥२९॥
एथ कर्मी तोचि लिंपे । जो गुण संभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥१८४॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म, बलात्कारें । आपादी जो ॥१८५॥
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥३०॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि; मज अर्पावी । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥१८६॥
आणि हें कर्म, मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥१८७॥
तुवां शरीरनाम नोहावें । कामनाजात सांडावें । मग, अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥१८८॥
आतां, कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥१८९॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी । इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥१९०॥
आतां, पार्था, निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलो नये ॥१९१॥

तप (४०० ते ४०२)

शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्ध-भोगानुरूप । हृदयीं वाहणे कृष्णस्वरूप । तो शुद्ध साक्षेप तपाचा ॥४००॥
जेवीं धूरसूनि दिठी । शूर रणामाजी उठी । तेवीं ईश्वर धरोनि पोटीं । वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध ॥१॥
हेचि तपाचें निजस्वरूप । याचि नांव शुद्ध ‘तप’ । यावरतें न चढे रूप । व्यर्थ वाग्जल्प कां करावे ॥२॥

तितिक्षा (द्वंद्वसहिष्णुता) (४०३ ते ४१४)

द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा । या नांव म्हणिजे ‘तितिक्षा’ । तेही आणावया लक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥३॥
सुखदुःख उभय भोग । दोंमाजी अखंड आपुलें अंग । जेवीं चित्रींची वाघीण आणि वाघ । दोहींमाजी साङ्ग निजत्वें भिंती ॥४॥
जेवीं दावाग्नी का उन्हाळे । आकाश जैसें न पोळे । असोनि त्यांचेनि मेळे । त्यां वेगळे अलिप्त ॥५॥
शीतळ जळ कां हींव पडे । पृथ्वी निजक्षमा न कांकुडे । तेवीं निजस्वरूपसुरवाडें । द्वंद्वा नातुडे निजसाधु ॥६॥
शरीर जरी हिंवें कांपे । तेणें देह कांपे साधु न कांपे । शरीर अतिउष्णे तापे । परी साधु न तापे देहतापामाजीं ॥७॥
सुख देखोनि दिठी । ज्या गोडिया घाली मिठी । दुःखही त्याचि आवडी घोंटी । ‘द्वंद्वसहिष्णुता’ मोठी या नांव राया ॥८॥
गोफणगुंडा सन्मुख । लागतां अवश्य उठे दुःख । तोच सुवर्णाचा जाहलिया देख । दुःख लोपोनि सुख अनिवार वाढे ॥९॥
सुखदुःखप्रकाशक । निजवस्तु असे एक । त्या एकात्मता देख । द्वंद्वे साधक सुखें साहती ॥४१०॥
तेवी द्वंद्वाचे जाणपण । जाणवीत असे जें ज्ञान । तें जाणितल्या आपण । द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्वे होती ॥११॥
रसउसी कठिणपण । त्यामाजी गोडी अखंड पूर्ण । तेवीं द्वंद्वामाजीं वस्तु चिद्धन । अखंडदंडायमान स्वयें देखे ॥१२॥
ऐशी हे अखंडता । जंव न ये साधकाचे हाता । तंव द्वंद्वाची सहनता । नव्हे नृपनाथा निश्चयेंसीं ॥१३॥
या नांव ‘द्वंद्वसहन’ । निजनिश्चयें जाण पूर्ण । आतां मौनाचे लक्षण । सावधान अवधारीं ॥१४॥

मौन (४१५ ते ४२७)

वाग्वादु करावा जनीं । तैं दृढ व्हावें देहाभिमानी । सांडविला तो सद्गुरूंनीं । निःशेष धोऊनी शब्देंसीं ॥१५॥
सद्गुरुवचन पडतां कानीं । स्तुति निंदा गिळोनि दोन्ही । बोल बोलणें निरसुनी । हृदयभुवनीं परिपक्कलें ॥१६॥
तेव्हां ज्याचे बोलावे अवगुण । तेथें दिसे हृदयस्थ आपण । यालागीं बोलतां पैशुन्य । पडे मौन गुरुवाक्यें ॥१७॥
गुण देखोनियां स्तवन । करितां पडे दृढ मौन । मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्यां वानितां पूर्ण मूर्खत्व माझें ॥१८॥
निजात्मा निःशेष नसे । ऐसा रिता ठाव न दिसे । तेथें जें जें कांहीं दिसे । तें आत्मप्रकाशें सदोदित ॥१९॥
ऐशी सद्गुरूंनी दाखविली युक्ती । ती विश्वासें स्थिरावली चित्तीं । यालागी निंदा आणि स्तुती । वाचेप्रती बोलेना ॥४२०॥
संवाद करावा निजस्वार्थी । तंव सद्गुरूच्या वचनोक्तीं । खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती । त्यावरी स्थिती चढेना ॥२१॥
एवं स्तुति निंदा वाग्वाद । करितां खुंटला संवाद । महामौने अतिशुद्ध । परमानंद साधकां ॥२२॥
ऐसें साधावया दृढ मौन । सद्गुरु शिकवी वेदाध्ययन । उपनिषदर्थ विवंचून । पढवी संपूर्ण अर्थावबोधे ॥२३॥
अथवा अतिशयें दृढ मौन । श्रीरामकृष्णनामस्मरण । अखंड नामें गर्जतां पूर्ण । वेदार्थ जाण तिष्ठती पुढें ॥२४॥
नित्य रामनाम गर्जे वाणी । त्या तीर्थंे येती लोटांगणीं । सुरवर लागती चरणीं । यम पायवणी स्वयें वंदी ॥२५॥
रामनामाचें जें स्मरण । या नांव गा ‘महामौन’ । वेदें नाम स्तविलें पूर्ण । शुद्ध अध्ययन हरिनाम ॥२६॥
वेदु अथवा नामस्मरण । या नांव गा ‘स्वाध्यायो’ जाण । आतां आर्जवाचे लक्षण । ऐकें संपूर्ण महाराजा ॥२७॥

आर्जव (४२८ ते ४३३)

आतां आर्जव तें ऐसें । सर्वा जीवां जीवन जैसें । कां तंतु जैसा निजविलासें । अविरोधे असे पटामाजीं ॥२८॥
साखरेचे इंद्रावण । केलिया न वचे गोडपण । तैसें विषमांही जीवां जाण । आर्जवें पूर्ण रंजवी स्वभावें ॥२९॥
वक्र चंद्राची चंद्रिका । परी अमृत वक्र नव्हे देखा । तैसें देखोनि विषमां लोकां । मनोवृत्ति देखा पालटेना ॥४३०॥
निपराद न देखे कोणासी । जिवलग सोयरा सर्वांशीं । वोळखी जीवमात्रांशीं । जैशी तैशी जुनाट ॥३१॥
न्यहा संतप्ता आधार देत । वरूनि घणघाय घेत । सांडस घायातळीं सूत । तें आघवेंचि आप्त लोहत्वें लोहा ॥३२॥
यापरी जयासी आप्त सर्व । ऐसा जो कां निजस्वभाव । तया नांव गा ‘आर्जव’ । अतिअपूर्व गुरुदीक्षा ॥३३॥

ब्रह्मचर्य (४३४ ते ४४९)

असुर सुर नर ऋषीश्वर । मदनें केले निजकिंकर । कंदर्पाचा मार थोर । अतिदुर्धर अनंगु ॥३४॥
अंतरी कामाचे दृढ ठाणे । वरीवरी दांत चावूनि साहणें । त्याचे मनचि निष्काम न म्हणे । चाळवणे लौकिकु ॥३५॥
तैसी नव्हे सद्गुरूची युक्ती । कामाची पालटे कामनावृत्ती । अभंग ब्रह्मचर्यस्थिती । शिष्यांप्रती उपदेशी ॥३६॥
कंदर्पराणिवे स्त्रीपुरुष । तेथें गुरुदीक्षा अलोलिक । मिथ्या स्त्रीपुरुष मायिक । विषयसुख भ्रम मात्र ॥३७॥
‘आनंदाचे उपस्थ एकायतन’ । हे काय मिथ्या वचन । ते अर्थी पूर्ण वेदज्ञ । वेदविवंचन दाविती ऐसें ॥३८॥
पुसतां साखरेची गोडी कैशी । तो स्वादु न ये सांगावयासी । तेथें चाखों देती अणुमात्रेशीं । तेचि गोडपण राशी जाणती जाण ॥३९॥
तेवीं परमानंदसुखप्राप्ती । उपस्थद्वारा नर चाखिती । आनंद एकायतनस्थिती । बोलिली उपस्थीं या हेतु वेदें ॥४४०॥
त्या उपस्थसुखाची नित्यस्थिती । संभोगेंवीण जे वाढविती । तेथ मिथ्या स्त्रीपुरुषव्यक्ती । सहजें होती सज्ञान ॥४१॥
चाखिली गोडी तेचि साखर । परमानंद मैथुनमात्र । मानूनियां मैथुनपर । जाहले पामर विषयांध ॥४२॥
उपस्थीं परमानंदगोडी । यालागीं स्त्रीकामाची अतिवोढी । सदा सोसिजे महामूढीं । ताडातोडी जीविताच्या ॥४३॥
साखरेचें केलें नारियेळ । तेथ त्वचा गर्भ साखरचि केवळ । तेवीं विषयद्वारा सुखकल्लोळ । उठती सकळ परमानंदें ॥४४॥
नाना पक्वान्नपरवडी । गुळाच्या गोडीने ते चवी गाढी । तेवीं विषयाची जे जे आवडी । ते ते गोडी निजानंदें ॥४५॥
हे नेणोनि मूळींची निजगोडी । सोशिती विषयांच्या अतिवोढी । बाप सद्गुरुकृपा गाढी । विषयांची आवडी एकत्वा आणी ॥४६॥
यालागी विषयांची आस्था । न चढे सच्छिष्याचे माथां । स्त्रीभोगाची आसक्तता । मिथ्या तत्त्वतां गुरूवाक्यनिष्ठा ॥४७॥
हा आत्मा हे आत्मी पाहीं । ऐसें मिथुन मुळी नाहीं । तें निजमूळ पाडितां ठायीं । ब्रह्मचर्य पाहीं अभंग ॥४८॥
या नांव गा निज नैष्ठिक्य । ‘ब्रह्मचर्य’ अतिसुटंक । सद्गुरूंनी बोधिलें निष्टंक । अलोलिक अभंग ॥४९॥

५०४.उद्धाराचा संदेह नाहीं । याच्या कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु॥
बुडतां जळीं जळतां आगीं । ते प्रसंगी राखावें ॥३॥
तुका म्हणे आम्हांसाठीं । कृपा पोटी वागवी ॥४॥
५०५.काय ते विरक्ति न कळेचि आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळी आनंदें या ॥ध्रु॥
शांति क्षमा दया ते मी काय जाणे । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥३॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंदें या जनामाजी असों ॥४॥
कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरी बुडोनियां ॥५॥
तुका म्हणे मज असे हा भरंवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥६॥
५०६.जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमि पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥३॥
सहज तया जना छंद । वाचे गोविंद गोविंद ॥४॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठ सोहळा ॥५॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें रानें ॥६॥
५०७.माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥
पढियें देहभाव, पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥३॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥४॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनि ॥५॥
५०८.सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक तें वर्म नेणें कांहीं ॥१॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥ध्रु॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥
५०९.उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवेचि अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि नेणवेचि थोरी विठोबाची ॥ध्रु॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते शिण रितें माप ॥३॥
५१०.आधारावांचुनी । काय सांगशील कहाणी? ॥१॥
ठावा नाहीं पंढरीराव । तोवरी अवघेचि वाव ॥ध्रु॥
मानिताहे कोण । तुझें कोरडे ब्रह्मज्ञान ॥३॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥४॥
५११.अनाथाची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु॥
अनाथाच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥३॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥४॥
५१२.येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणीं व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत नलगे मग ॥ध्रु॥
वाहोनियां भार कुंथसील ओझें । नव्हे तेंचि माझें, थीता त्याग ॥३॥
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज? । संतीं केशीराज साधियेला ॥४॥
५१३.हीच त्यांची पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु॥
हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥३॥
तुका म्हणे दिवसरातीं । हेचि खाती अन्न ते ॥४॥
५१४.दीप न देखे अंधारा । आतां हेंचि करा जतन ॥१॥
‘नारायण नारायण’ । गांठीं धन बळकट ॥ध्रु॥
चिंतामणीपाशी चिंता । तत्त्वतां ही न येल ॥३॥
तुका म्हणे उभयलोकी । हेचि निकी सामग्री ॥४॥
५१५.धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी । झालों पोटीं शीतळ ॥ध्रु॥
भवनदीचा झाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥३॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि? ॥४॥
५१६.दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायीं ॥ध्रु॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥३॥
कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥४॥
५१७.खरे नानवट निक्षेपीचे जुनें । काढिले ठेवणे समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तो येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु॥
कुलालाच्या हातें घटाच्या उत्पत्ति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥३॥
तुका म्हणे जीवन ते नारायणीं । प्रभा ते किरणी प्रकाशाची ॥४॥
५१८.गंगेचिया अंतेविण काय चाड? । आपुलें तें कोड तृषेपाशी ॥१॥
विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु॥
कारण ते असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी येर कोण? ॥३॥
बाळाचे सोइतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥४॥
गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि वेगळा नाहीं आतां ॥५॥
तुका म्हणे अवघे झाले एकमय । परलोकींची काय चाड आतां? ॥६॥
५१९.स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयी पडिभर अतिशय ॥१॥
आतां सोडवणें धांवा नारायणा! । मज हे वासना अनावर ॥ध्रु॥
येऊनियां आड ठाके लोकलाज । तों हे दिसे काज अंतरलें ॥३॥
तुका म्हणे आम्हां जेथे जेथें गोवा । तेथें तुम्ही देवा सांभाळावें ॥४॥
५२०.पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥
होतों चुकलों मारग । लाहो केला लागवेग ॥ध्रु॥
इंद्रि-यांचे संदी । होतो सांपडलों बंदी ॥३॥
तुका म्हणे बरे झालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥४॥
५२१.बरे झालें आलीं ज्याची त्याच्या घरा । चुकला पान्हेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केलें दु:खी त्याचिया सांभाळे । आतां तोंड काळें तेणें लोभे ॥ध्रु॥
त्याचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळही लाग घ्यावा लागे ॥३॥
नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी शीण पावलों तो ॥४॥
वेगळाल्या खोडी केली तडातोडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥५॥
निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥६॥
५२२.न करावी आतां पोटासाठी चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥
दृष्टी ते घालावी परमार्था-ठायीं । क्षुल्लका उपायीं शीण झाला ॥ध्रु॥
येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेंचों मिथ्या ॥३॥
खंडणेंचि नव्हे उद्वेग वेरझारी । बापुडे संसारी सदा असों ॥४॥
शेवटा पाववी, नावेचें बैसणे । भुजाबळे कोणें कष्टी व्हावें? ॥५॥
तुका म्हणे आतां सकळांचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥६॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top