दिवस – १४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥६॥

येर्‍हवीं, माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विवरूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्ही जाण!॥५२॥ पैं, वीरू जयांसी ऐकिजे । आणि या बोलींच प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥५३॥ आतां, “ऐसियांतें वधावें’ । कीं, “अव्हेरूनियां निघावें’ । या दोहींमाजी बरवें । ते नेणों आम्ही ॥५४॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥७॥

आम्हां काय उचित? । तें पाहतां; न स्फुरे एथ । जे, मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥५५॥ तिमिरावरुद्ध जेंसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग, पासींच असतां, न दिसे । वस्तुजात ॥५६॥ देवा, तैसें मज जाहलें । जें, मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां, काय हित आपुलें । तेंही नेणें!॥५७॥ तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें, आम्हां सांगावें । जे, सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥५८॥ तू गुरु, बंधु, पिता । तूं आमुचि इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥५९॥ जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरूं । कीं, सरितांतें सागरू । त्यागी केवीं?॥६०॥ नातरी, अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेंनि जिये? । ऐकें, कृष्णा ॥६१॥ तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा, तूंिंच एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥६२॥ तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें, झडकरी, पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥६३॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् । अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥८॥

हें सकळ कुळ देखूनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥६४॥ एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा॥६५॥ जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं । तरी न विरुढती; शिंपिलीं । आवडे तैसीं ॥६६॥ नातरी, आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥६७॥ तैसे, राज्य-भोग-समृद्धि । उज्जीवन नोहे इये बुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥६८॥ ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥६९॥ कीं, मज, पाहतां उर्मी नोहे! । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥७०॥ सवर्म हृदय-कल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला; म्हणोनि लहरी । भांजेचिना? ॥७१॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी । तो धांवया श्रीहरि गारुडी । पातला कीं!॥७२॥ तैसिया पांडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥७३॥ म्हणोनि, तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला; हा हेतू । जाणोनियां ॥७४॥ मग, देखा, तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥७५॥ तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥७६॥ म्हणोनि, सहजें सुनीळु । कृपामृतें सजलु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥७७॥ तेथ सु-दर्शनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥७८॥ आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥७९॥ ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे, देखा । निवृत्तिदासु ॥८०॥


अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः । संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ॥३०॥

म्हणों तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व ॥२५०॥ स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ जगा । ते गंगाही निजपापभंगा । तुमचे चरणसंगा वांछीत ॥५१॥ तुमची दर्शनसंग-चिद्‌गंगा । अत्यंत दाटुगी माजी जगा । दर्शनमात्रे ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैंचें ॥५२॥ तेथे कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु । तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥५३॥ ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टिउत्संगी वाढवा सकळ । आजि झालो मी अतिनिर्मळ । तुम्हीं दीनदयाळ मीनलेति ॥५४॥ ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्ये लाधलों हे संगती । सत्संगाची निजख्याती । सांगतां श्रुति मौनावल्या ॥५५॥ ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखें ब्रह्मत्व ये ब्रह्मा । त्या सत्संगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥५६॥ सत्संग म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण । सत्संगाचें महिमान । साधकां संपूर्ण सद्रूप करी ॥५७॥ निधि सांपडलिया साङ्ग । अत्यंत वाढे विषयभोग । तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषये चांग सुखदाता ॥५८॥ इंद्रियांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु । ऐसा करिती निजबोधु । अगाध साधुनिजमहिमा ॥५९॥ निमिषार्ध होतां सत्संग । तेणें संगें होय भवभंग । यालागीं सत्संगाचे भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥२६॥ संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तुष्टती संत स्वयमेवो । संतसन्निधिमात्रे पहावो । संसार वावो स्वयें होय ॥६१॥ नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वे बाधी । त्या संसाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्संग ॥६२॥ दीपाचिये संगप्राप्ती । निःशेष कापुरत्वाची शांती । तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धे ॥६३॥ ते तुमची सत्संगती । भाग्ये पावलों अवचितीं । “आत्यंतिक क्षेम’ कैशा रीतीं । प्राणी पावती तें सांगा ॥६४॥ आत्यंतिक क्षेमाचें वर्म । जरी म्हणाल भागवतधर्म । त्या धर्माचा अनुक्रम । साङ्ग सुगम सांगा जी ॥६५॥

धर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् । यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥३१॥

परिसावया भागवतधर्मी । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही । तरी कृपा करूनि तुम्हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥६६॥ नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रीती । तेणें तुष्टोनियां श्रीपती । दे सेवकां हाती आपणिया ॥६७॥ ‘अजन्मा’ या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती । तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥६८॥ एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण । त्यासी तुष्टोनियां नारायण । निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥६९॥ भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकार जरी नसेल येथ । तरी मी अनन्य शरणागत । आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥२७०॥ भूतदयेचे निडारलेपण । तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण । तुम्ही दयानिधि संपूर्ण । दीनोद्धारण तुमचेनी ॥७१॥ जेथ तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण । सर्वाधिकार संपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥७२॥ तंव तुमचे कृपेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें । ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तुम्हांतें मी आलों ॥७३॥ कायसी ज्ञातेपणाची लाज । येथे तुमचे कृपें माझें काज । ऐसें विदेहें प्राथूनि द्विज-। चरणरज वंदिलें ॥७४॥

भागवतधर्मनिरूपण-प्रस्ताव (२७५ ते २७९)

ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण । तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरूपण वसुदेवा ॥७५॥

नारद उवाच- एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः । प्रतिपूज्याब्रुवन्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥३२॥

जो जगाची स्थिति गति जाणता । जो हरिहरांचा पढियंता । जो निजात्मज्ञानें पुरता । तो झाला बोलता नारदु ॥७६॥ नारद म्हणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा । तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानुभावां उलथला ॥७७॥ संतोषोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा म्हणती । ऋत्विजही सादर परमार्थी । सदस्य श्रवणार्थी अतितत्पर ॥७८॥ ऐसें देऊनि अनुमोदन । बोलते जाहले नवही जण । तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥७९॥

विदेहाचे प्रश्न (२८० ते २८३)

भागवतधर्म, भगवद्भक्त । माया कैसी असे नांदत । तिचा तरणोपाव येथ । केवीं पावत अज्ञानी ॥२८०॥ येथ कैसें असे परब्रह्म । कासया नांव म्हणिजे कर्म । अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कैशी ॥८१॥ कोणे युगी कैसा धर्म । सांगावा जी उत्तमोत्तम । ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पुसेल ॥८२॥ ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण । उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥८३॥

देहबुद्धी (अहंता) (२८४ ते २९२)

कविरुवाच – मन्येऽकुतश्चिद्भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् । उद्विग्नबुद्धेरसदात्मभावाद्विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥३३॥

रायें पुशिलें ‘आत्यंतिक क्षेम’ । तदर्थी कवि ज्ञाता परम । तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥८४॥ ऐक राया नवलपरी । आपुला संकल्प आपणा वैरी । देहबुद्धी वाढवूनि शरीरीं । अतिदृढ करी भवभया ॥८५॥ जयापाशी देहबुद्धी । त्यासी सुख नाहीं त्रिशुद्धी । ते बुडाले द्वंद्वसंधीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥८६॥ जें देहबुद्धीपाशीं । सकळ दुःखांचिया राशी । महाभयाची भूतें चौंपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥८७॥ देहबुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा । संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥८८॥ देहबुद्धीमाजीं सुख । अणुमात्र नाहीं देख । सुख मानिती ते महामूर्ख । दुःखजनक देहबुद्धी ॥८९॥ दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुःख पतंगासी । तरी आलिंगू धांवे त्यासी । तेवीं विषयांसी देहबुद्धी ॥२९०॥ ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी । तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥९१॥ एवढा अनिवार संताप । देहबुद्धीपाशी महापाप । जाणोनि धरी जो अनुताप । विषयी अल्प गुंतेना ॥९२॥

विषय (२९३ ते २९७)

धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी । येणें भये विषय वोसंडी । इंद्रियांतें कोंडी अतिनेमें ॥९३॥ इंद्रिये कोंडितां न कोंडती । विषय सांडितां न सांडती । पुढतपुढती बाधूं येती । यालागी हरिभक्ती द्योतिली वेदें ॥९४॥ इंद्रिये कोंडावी न लगती । सहजें राहे विषयासक्ती । एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या ॥९५॥ योगी इंद्रिये कोंडिती । ती भक्त लाविती भगवद्भक्तीं । योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंतीं ॥९६॥ योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती । भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥९७॥


२०१.सेवितो हा रस वांटितो आणिकां । घ्या रे, होऊं नका रानभरी ॥१॥ विटेवरी ज्याची पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धि । जरी राहे बुद्धि याचे पायीं ॥३॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥४॥
२०२.ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शनें तुटे भवबंधु । जे कां सच्चिदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्ष-सिद्धि तीर्थवंदु रे ॥ध्रु॥ भाव सर्व  कारण मूळ बंदु । सदा समबुद्धि, नास्तिक्य भेदु । भूतकृपा, मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे ॥२॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी । लघुत्व सर्वभावें अंगीकारी । सांडी मांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥३॥ अर्थकाम चाड नाहीं चित्ता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते  समाधानीं, जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥४॥ मनीं दृढ धरी विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधु दर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥५॥
२०३.भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवूनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल ने घे जगजेठी । भावा एकासाठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु॥ सुखें करावा संसार । न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥३॥ भुक्ति मुक्तीची चिंता । दैन्य नाहीं दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥४॥
२०४.जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो   ‘आपुले’ ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ध्रु॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचे चित्त ॥३॥ ज्यासी आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥४॥ दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगूं किती? । तोचि भगवंताची मूर्ती  ॥६॥
२०५.याजसाठी भक्ति । जगी रूढवावया ख्याति ॥१॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे? बोलावया सहजें ॥ध्रु॥ गौरवावयासाठीं  । स्वामिसेवेची कसोटी   ॥३॥ तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकी, खरा ॥४॥
२०६.अमंगळ वाणी । नये आइकों ते कानीं ॥१॥ जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोग व्यथा ॥ध्रु॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥३॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥४॥
२०७.कैसा शिंदळीचा। नव्हे? ऐसी ज्याची वाचा ॥१॥ वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु॥ कैसा निरयगांवा। जाऊन पवे विसांवा? ॥३॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड?॥४॥
२०८.गर्भाचे धारण । तिने वागविला शिण ॥१॥ व्याली कुऱ्हाडीचा दांडा । वर न घलीच तोंडा ॥ध्रु॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥३॥ तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥४॥
२०९.पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीति ॥१॥ विधिपुरतें कारण । बहू वारावें वचन ॥ध्रु॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची वेडी ॥३॥ तुका म्हणे दुरीं । राखता, हे तेचि बरी ॥४॥
२१०.देव आड आला । तो मी भोगितों उगला । अवघा निवारिला । शीण शुभ अशुभाचा ॥१॥ जीव-शिवाचे भातुकें। केलें क्रीडाया कौतुकें । कैंची येथे लोकें। हा आभास अनित्य॥ध्रु॥ विष्णुमय खरें जग । येथे लागतसे लाग। वांटिले विभाग । वर्णधर्म, हा खेळ ॥३॥ अवघी एकाचीच वीण । तेथें कैंचें भिन्नाभिन्न? । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥४॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायांपाशी वास । निकट, नव्हे निराळा ॥५॥
२११.आचरणा ठाव । नाहीं अंगी स्वतां भाव ॥१॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु॥ श्वानाचिया परी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥३॥ तुका म्हणे ऐसा । सटवेचिना पांचा दिसां ॥४॥
२१२.ध्यानीं योगीराज बैसले कपाटीं  । लागे पाठोवाटी तयांचिया ॥१॥ ताहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभावें ॥ध्रु॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे? त्यां दुसरें हरीविण ॥३॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥४॥ तुका म्हणे विष अमृतासमान । कृपा नारायण करितां होय ॥५॥

ग्रंथ

आनंद-रस-रत्नाकर

Original price was: ₹170.Current price is: ₹140.

आनंद-रस-रत्नाकर (३६५ प्रवचने – दररोज एक प्रवचन  )

Category:

1 thought on “दिवस – १४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top