अनुक्रमणिका
नामा म्हणे केशीराजा । केला नेम चालवी माझा ॥ – अशी श्रीपंढरीधीश परामात्म्याला प्रार्थना करून दृढ संकल्पपूर्वक आपण आपल्या नित्यनियमाला प्रारंभ करूया.
॥ श्री ज्ञानेश्वरी ॥
अध्याय १ ला ओवी क्र. १-२५
ॐ नमो जी आद्यां । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्यां । आत्मरूपा ॥१॥ देवा, तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारीजो जी ॥२॥ हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥ स्मृती तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥ अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥५॥ पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥६॥ देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका । त्याची रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥७॥ नाना प्रमेयांचि परी । निपुणपणें पाहतां कुसरी। दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥८॥ तेथ व्यासादिकांचिया मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥९॥ देखा, षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥१०॥ तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥ एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥ मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥ देखा, विवेक तंव सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥ तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥ मज अवगमलिया, दोनी-। मीमांसा, श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी-। अली सेविती ॥१६॥ प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इभ-। मस्तकावरी ॥१७॥ उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥१८॥ अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥ हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज॥२०॥ आतां अभिनववाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥ मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपुरु । म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी २२ जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी २३ कां चिंतामणी जालिया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी, पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे २४ म्हणौनि, जाणतेनों गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे । जैसें, मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥२५॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय – १, ओवी क्र. १ ते ५६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
ग्रंथारंभीचे नमन (१)
ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभवभावना । न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया! ॥१॥ ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभवभावना । न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया! ॥१॥
श्रीगणेशनमन (२ ते १६)
नमन श्रीएकदंता । एकपणे तूंचि आतां । एकी दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥२॥ तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा । यालागी सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥३॥ तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु । यालागीं ‘विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥४॥ हरुष तें वदन गणराजा । चाऱ्ही पुरुषार्थ त्याचि चाऱ्ही भुजा । प्रकाशिया प्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥५॥ पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं । निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥६॥ एकेचि काळी सकळ सृष्टी । आपुलेपणे देखत उठी । तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥७॥ सुखाचें पेललें दोंद । नाभी आवर्तला आनंद । बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥ ८॥ शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर । सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभती ॥९॥ प्रकृतिपुरुष चरण दोनी । तळी घालिसी वोजावुनी । तयांवरी सहजासनीं । पूर्णपणी मिरवसी ॥१०॥ तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥११॥ भावें भक्त जो आवडे । त्याचे उगविसी भवसांकडें । वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥१२॥ साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख । देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥१३॥ सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान । यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥१४॥ पाहतां नरु ना कुंजरु । व्यक्ताव्यक्तासी परु । ऐसा जाणोनि निर्विकारु । नमनादरु ग्रंथार्थी ॥१५॥ ऐशिया जी गणनाथा । मीपणे कैंचा नमिता । अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥१६॥
सरस्वतीनमन (१७ ते ३४)
आतां नमूं सरस्वती । जे सारासारविवेकमूर्ती । चेतनारूपें इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ॥१७॥ जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक । जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभ ॥१८॥ ते शिवांगी शक्ति उठी । जैसी डोळ्यांमाजी दिठी । किंवा सुरसत्वें दावी पुष्टी । फळपणे पोटीं फळाच्या ॥१९॥ जैसा साखरेअंगी स्वादु । की सुमनामाजीं मकरंदु । तैसा शिवशक्तिसंबंधु । अनादिसिद्धु अतर्क्य ॥२०॥ ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजी वाडी । म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥२१॥ सारासार निवडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी । बैसली सहजासनीं । अगम्यपणी अगोचरु ॥२२॥ ते परमहंसी आरूढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ । जवळी असतां न देखती मूढ । अभाग्य दृढ अतिमंद ॥२३॥ तिचे निर्धारितां रूप । अरूपाचे विश्वरूप । ते आपुलेपणे अमूप । कथा अनुरूप बोलवी ॥२४॥ हा बोलु भला झाला । म्हणोनि बोलेंचि स्तविला । तैसा स्तुतिभावो उपजला । बोलीं बोला गौरवी ॥२५॥ ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी । राहोनि सबाह्यअभ्यंतरीं । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥२६॥ ते सदा संतुष्ट सहज । म्हणोनि निरूपणा चढलें भोज । परी वक्तेपणाचा फुंज । मीपणे मज येवोंच नेदी ॥२७॥ वाग्देवतेची स्तुती । वाचाचि जाहली वदती । तेथें द्वैताचिये संपत्ती । उमस चित्तीं उमसेना ॥२८॥ तिणें बोल बोलणें मोडिलें । समूळ मौनातें तोडिलें । त्यावरी निरूपण घडिलें । न बोलणे बोलें बोलवी ॥२९ ॥ तिसी सेवकपणे दुसरा । होऊनि निघे नमस्कारा । तंव मीपणेंसी परा । निजनिर्धारा पारुषे ॥३०॥ जेथे मीपणाचा अभावो । तेथें तूंपणा कैंचा ठावो । याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरूपणीं ॥३१॥ जैशा सागरावरी सागरीं । चालती लहरींचिया लहरी । तैसे शब्द स्वरूपाकारी । स्वरूपावरी शोभती ॥ ३२ ॥ जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा । तैसें निरूपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसें देखा रसवृत्ति ॥३३॥ तेथे मीपणेशी सरस्वती । बैसविलें एका ताटें रसवृत्ती । तेणें अभिन्नशेष देऊनि तृप्ती । ते हे उद्गार येती कथेचे ॥३४॥
संत नमन (३५ ते ५६)
आतां वंदू ते सज्जन । जे कां आनंदचिद्धन । वर्षताती स्वानंदजीवन । संतप्त जन निववावया ॥ ३५ ॥ ते चैतन्याचे अळंकार । की ब्रह्मविद्येचे शृंगार । की ईश्वराचे मनोहर । निजमंदिर निवासा ॥ ३६॥ ते अधिष्ठाना अधिवासु । की सुखासही सोल्हासु । विश्रांतीसी विश्वासु । निजरहिवासु करावया ॥ ३७॥ की ते भूतदयार्णव । की माहेरा आली कणव । ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानंदा ॥ ३८॥ ना ते डोळ्यांतील दृष्टी । की तिचीही देखणी पुष्टी । की संतुष्टीसी तुष्टी । चरणांगुष्ठीं जयांचे ॥ ३९ ॥ ते पाहती जयांकडे । त्यांचे उगवे भवसांकडें । परब्रह्म डोळियांपुढें । निजनिवाडें उल्हासे ॥ ४० ॥ तेथें साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलास । एक धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥४१॥ ते जगामाजी सदा असती । जीवमात्रातें दिसती । परी विकल्पेंचि ठकिजती । नाही म्हणती नास्तिक्यें ॥४२॥ मातियेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला । म्हणौनि विश्वासेंवीण नाडला । जगु ठकला विकल्पें ॥४३॥ एकाएकी विश्वासतां । तरी वाणी नाहीं निजसत्ता । त्यांचे चरणीं भावार्थता । ठेवितां माथा विश्वासें ॥४४॥ ते नमस्कारितां आवश्यक । करून ठाकती एक । परी एकपणे सेवक । त्यांचाचि देख स्वयें होआवें ॥४५॥ त्यांचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी । जे भजती अनन्य आवडीं । ते जाणती गाढी निजचवी ॥४६॥ ते प्रकृतीसी पर । प्रकृतिरूपी ते अविकार । आकार-विकार-व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥४७॥ ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेपण न दाविती । स्वरूपफुंजविस्मृती । गिळूनि वर्तती निजांगें ॥४९॥ प्रेमा अंगींचि जिराला । विस्मयो येवोंचि विसरला । प्रपंचुपरमार्थंु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥५०॥ स्मरण विस्मरणेशी गेलें । देह देहींच हारपलें । आंतुबाहेरपण गेलें । गेलें ठेलें स्मरेना ॥ ५१ ॥ स्वप्नजागृती जागतां गेली । सुषुप्ति साक्षित्वेंसी बुडाली । उन्मनीही वेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥ ५२ ॥ दृश्य द्रष्टेनशी गेलें । दर्शन एकलेपणे निमालें । तें निमणेपणही विरालें । विरवितें नेलें विरणेनिशीं ॥ ५३॥ ज्ञान अज्ञानाते घेऊनि गेलें । तंव ज्ञातेपणही बुडालें । विज्ञान अंगी घडलें । परी नवें जडलें हें न मनी ॥ ५४॥ यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावें सावधान । द्यावें मज अवधान । हे विज्ञापन बाळत्वें ॥ ५५ ॥ सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान । तैसे संत सदा सावधान । द्यावें अवधान हे बालत्व माझें ॥५६॥ ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती । आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ॥५६॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १ ते १४
- समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणिक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा! ॥ध्रु॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित्त झणी जडों देसी ॥३॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥४॥
- नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल ‘रामकृष्ण’ ॥ध्रु॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥३॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥४॥
- सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥ जेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥३॥ तुका म्हणे तया ठाया । वोल छाया कृपेची ॥४॥
- आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥
- अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु॥ आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळे ॥३॥ तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥४॥
- पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥ जेथें जेथें देखें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु॥ भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥३॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाड आहे ॥४॥
- सुखें वोळंबा दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥ आवडीचा मारिला वेडा । ‘होय होय’ कैसा म्हणे भिडा ॥ध्रु॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥३॥ दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं, पडे सुपत्ती ॥४॥ नीज नये खाली घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥५॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥६॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥७॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । सात दिवस गेली, साडेदहा शेर ॥८॥ हाड गळोनि आलें मांस । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें? ॥९॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥१०॥
- पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥ वंदूं चरणरज सेऊ उष्टावळी । पूर्व-कर्मा होळी करूनिया॥ध्रु॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥३॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥४॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ२६॥५॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥६॥
- जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु॥ परें परतें मज न लगे सांगावें । हें तों बरें देवें शिकविलें ॥३॥ दुसऱ्यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥४॥ येथें कांहीं कोणीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥५॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥६॥
- देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं ॥ध्रु॥ अवघियांपुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥३॥ इच्छादानी येथें वोळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥४॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥५॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारी सांगातें निरुपम ॥६॥
- अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजीती॥१॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु॥ विष तांब्या वाटी । भरली, लावूं नये होटीं ॥३॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा, सोंग वाव ॥४॥
- हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना? ॥१॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठीं ॥ध्रु॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥३॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥४॥
- धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥ मज सोडवीं दातारा! । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु॥ करिसी अंगी-कार । तरी काय माझा भार? ॥३॥ जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा! ॥४॥
- सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥ध्रु॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥ तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥




All is well
छान उपक्रम आहे या निम्मित पारायण होते
हा उपक्रम खरच खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरि.
श्रद्धा माऊली चव्हाण
mauli chavan
राम कृष्ण हरी
maulihavan408@gmail.com