अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी
अध्याय – १. ओवी क्र. ५० ते ८४
आतां, भारत-कमळ-परागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥५०॥ ना तरी, शब्दब्रह्माब्धि । मथियला व्यास-बुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥५१॥ मग, ज्ञानाग्नि-संपर्कें । कडसिले विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ॥५२॥ जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोऽहं-भावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥५३॥ जें आकर्णिजे भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । तें भीष्म-पर्वीं संगती । म्हणितली कथा ॥५४॥ जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥५५॥ जैसें, शारदीचिये चंद्रकळे-। माजि, अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळे । चकोरतलगें ॥५६॥ तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनियां ॥५७॥ हें शब्देवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ॥५८॥ जैसें भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी ‘परी’ आहे सेविती । ग्रंथीं इये ॥५९॥ कां, आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणें ॥६०॥ ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंत:करणें । -आथिला; तोचि जाणें । मानूं इये ॥६१॥ ‘अहो, अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें’ ॥६२॥ हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू, सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥६३॥ जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥६४॥ तैसा, तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी; उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायीं? ॥६५॥ परी अपराधु तो आणिक आहे । जे, मी गीतार्थु कवळूं पाहें । तें ‘अवधारा’ विनवूं लाहें । म्हणौनियां ॥६६॥ हें अनावर; न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येऱ्हवीं, भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी?॥६७॥ कीं, टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥६८॥ आइका, आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥६९॥ ह्या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥७०॥ तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी, जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य-नूतन देखिजे । गीतातत्त्व ॥७१॥ हा वेदार्थसागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥७२॥ ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ, अल्प मी मतिमंद! । काई होय?॥७३॥ हें अपार, कैसेनि कवळावें? । महातेज कवणें धवळावें?। गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं? ॥७४॥ परी, एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी; सधरु । जे, सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥७५॥ येऱ्हवीं तरी, मी मूर्खु । जरी जाहला अविवेकु । तऱ्ही, संतकृपा-दीपकु । सोज्वळु असे ॥७६॥ लोहाचे कनक होये । हें सामर्थ्य परिसींचि आहे । कीं, मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥७७॥ जरी प्रगटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति! । नवल कायी?॥७८॥ कां जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे? । म्हणऊनि, मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥७९॥ तरी, न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावे; हें तुमतें । विनवितु असे ॥८०॥ आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसें चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥८१॥ तैसा मी अनुगृहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ॥८२॥ तंव, श्रीगुरु म्हणती “राहीं । हे तुज बोलावे नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरीं वेगां” ॥८३॥ या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे, ‘परियेसा, मना अवकाशु । देऊनियां’ ॥८४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय – १, ओवी क्र. १०० ते १४३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
एकनाथी भागवत–प्रस्तावना (१०० ते ११५)
या वचनार्था संतोषला । म्हणे भला रे भला भला । निजभाविकु तूंचि संचला । प्रगट केला गुह्यार्थु ॥१००॥ हे स्तुति की निरूपण । ग्रंथपाठ की ब्रह्मज्ञान । साहित्य की समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥१॥ तुझा बोलुचि एकएकु । सोलीव विवेकाचा विवेकु । तो संतोषासी संतोखु । आत्यंतिकु उपजवी ॥२॥ तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे । मुमुक्षुसारंगांची पालिंगे । रुंजी निजांगें करितील ॥३॥ ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक । श्रवणमात्रेचि देख । निजात्मसुख पावती ॥४॥ येणें वचनामृततुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें । अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥५॥ की निर्जीवा जीव आला । ना तरी सिद्धा सिद्धिलाभु जाला । की निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥६॥ तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें । तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थु ॥७॥ श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं । की वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥८॥ की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता । की धर्मे श्वानु सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥९॥ तैसे माझेनि नांवें । ग्रंथ होती सुहावे । आज्ञाप्रतापगौरवे । गुरुवैभवें सार्थकु ॥११०॥ घटित एका आणि एकादशें । राशि नक्षत्र एकचि असे । त्या एकामाजीं पूर्ण दिसे । तैं दशदशांशे चढे अधिक ॥११॥ मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे । तरी एका एकपणचि सहजें । आले निजवोजें ग्रंथार्थे ॥ १२॥ तेथें देखणेंचि करूनि देखणें । अवघेचि निर्धारूनि मनें । त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणे सार्थक ॥१३॥ पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदयाआंतु । एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥१४॥ म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका । ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वें ॥१५॥
टीकाकार व पूर्वकवी यांस नमन (११६ ते १२२)
आतां वंदू महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी । जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥१६॥ तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती । हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्ती न्यावया ॥१७॥ वंदू आचार्य शंकरू । जो ग्रंथार्थविवेकचतुरू । सारूनि कर्मठतेचा विचारू । प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥१८॥ आतां वंदू श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधर । जयाची टीका पाहतां अपार । अर्थ साचार पैं असे ॥ १९ ॥ पैं इतरही टीकाकार । काव्यकर्ते विवेकचतुर । त्यांचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥ १२० ॥ वंदू प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर । नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा ॥२१॥ जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां । तयांचे चरणीं माथा । निजात्मता निजभावें ॥२२॥
संस्कृत व प्राकृत (१२३ ते १३०)
संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृती काय उणीवी । नवीं जुनी म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥ २३ ॥ कपिलेचे म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर । वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥२४॥ जें पाविजे संस्कृत अर्थे । तेंचि लाभे प्राकृतें । तरी न मनावया येथें । विषमचि ते कायी ॥२५॥ कां निरंजनी बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो । तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥२६॥ कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात । तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥२७॥ देशभाषावैभवें । प्रपंचपदार्थी पालटली नांवें । परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटु ॥ २८ ॥ संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली । असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥२९॥ आतां संस्कृता किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा । ते पावनचि तत्त्वता । सत्य सर्वथा मानली॥१३०॥
पूर्वजनमन (१३१ ते १३६)
वंदूं ‘भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता । ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥३१॥ जेणे बाळपणी आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु । जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥ ३२ ॥ जयाची पदबंधप्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति । कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां राती देखिला ॥३३॥ तया भानुदासाचा ‘चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी । तया ‘सूर्य’ नाम ठेवूनी । निजी निज होऊनि भानुदास ठेला ॥३४॥ तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी । म्हणौनि रखुमाई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥ ३५॥ हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा । धन्य निजभाग्याची लीला । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥ ३६॥
वैष्णवकुलनमन (१३७ ते १३८)
ते वैष्णवकुळी कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक । उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥ ३७॥ ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थी अवधानशीळ । म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थी ॥ ३८॥
गोत्रपूर्वजनमन (१३९ ते १४०)
उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा । जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥ ३९ ॥ जो उपनिषद्विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की । जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनि ॥१४०॥
भूतमात्रास नमन (१४१)
नमन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरु जाहला सखा । म्हणौनि ग्रंथारंभु देखा । आला नेटका संमता ॥४१॥
दत्तात्रेयनमन (१४२ ते १४३)
आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या । तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥ ४२ ॥ तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थे प्रकाशितु । मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥ ४३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. २९ ते ४७
- आहे तें सकळ कृष्णासि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गिंवसीत पांचजणें॥ध्रु॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥३॥ तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥४॥
- महारासि शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ।।३।। ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो ते याती ॥४॥
- तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु॥ नाडिलें लोकां, टाकिला गोहो । बोडिलें डोकें सांडिला मोहो ॥३॥ शेजारणीच्या गेली रागें । कुतऱ्यांनी घर भरिलें मागें ॥४॥ पिसारागें भाजिलें घर । नागवली तें नेणे फार ॥५॥ तुका म्हणे वाच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥६॥
- मज दास करी त्याचा । संतदासाच्या दासाचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी! ॥ध्रु॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥३॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥४॥
- सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥३॥ नेणे शब्दपर । तुका म्हणे परउपकार ॥४॥
- जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय करकरा ॥ध्रु॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं, तें स्मशान गृह जाणां ॥३॥ जये कुळीं नाहीं एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदी ताफा ॥४॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥५॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नवजाय हरीचिया ॥६॥
- आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुढें भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वायां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु॥ अक्षई साचार । केलें सायासांनी घर । एरंडासी हार । दुजा भार न साहती ॥३॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तीं करी । कोण गुरें वासरें? ॥४॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥५॥ तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥६॥
- पराविया नारी माउली समान । मानिलिया धन काय वेचे? ॥१॥ न करितां परनिंदा परद्रव्य अभिलास । काय तुमचें यास वेचे सांगा? ॥ध्रु॥ बैसलिये ठायी म्हणता ‘रामराम’ । काय होय श्रम ऐसें सांगा? ॥३॥ संतांचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा? ॥४॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेंचे यास ऐसें सांगा? ॥५॥ तुका म्हणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥६॥
- शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु॥ सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥
- चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥ बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगों काय ॥ध्रु॥ मनाच्या तळमळें । चंदनेंही अंग पोळे ॥३॥ तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥४॥
- परिमळ म्हणून चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद। यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
- माया तेंचि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥१॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगण तळीं हारपती ॥ध्रु॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणा-साठीं? । आणिक ते आटी विचाराची ॥३॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥४॥
- दुर्जनासी करी साहे । तोही लाहे दंड हे ॥१॥ शिंदळीचा कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु॥ येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥३॥ तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥४॥
- वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें॥३॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदर । लाघव हे चार शिंदळीचे ॥४॥
- पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥१॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु॥ तींच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धन वित्तें ॥३॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥४॥
- आशाबद्ध जन । काय जाणे नारायण? ॥१॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥३॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥४॥
- ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हेही बोल तेही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु॥ गव्हांचिया होती परी । फकेवरी खाऊं नये ॥३॥ तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥४॥
- करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे? ॥१॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥३॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥४॥
- नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥ देवधर्म सांदीं पडिले सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु॥ रात्रंदिवस न पुरे कुटुंबीं समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥३॥ तुका म्हणे आत्महत्यारे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




Khup chhan
Very good