अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – १. ओवी क्र. १०८ ते १३०
अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: । नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युद्धविशारदा:॥९॥
समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती, । धाताही नेणें ॥८॥ जे शस्त्रविद्या-पारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥९॥ हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगी । परी, सर्व-प्राणे मजचिलागीं । आरायिले असती ॥११०॥ पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व-या, तैसें । सुभटांसी ॥११॥ आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुले जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥१२॥ झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती । हे बहु असो; क्षात्रनीति । एथोनियां ॥१३॥ ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते । आतां, काय गणूं यांतें? । अपार हे ॥१४॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्। पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्॥१०॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥१५॥ आतां याचेनि बळें गवसलें । हे दुर्ग जैसे पन्नासिलें । येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥१६॥ आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं?। मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ॥१७॥ ना तरी, प्रळयवह्नी महावातु । या दोघां जैसा सांघातु । तैसा हा गंगा-सुतु । सेनापति ॥१८॥ आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें । परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥१९॥ वरी भीमसेनु बेथुु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनिया, मातु । सांडिली तेणें ॥१२०॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता:। भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि॥११॥
मग, पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥२१॥ जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आ-रणी । वरगण कवणकवणी । महारथीया ॥२२॥ ‘तेणें तिया आवरिजे। भीष्मातळीं राहिजे’ । द्रोणातें म्हणे ‘पाहिजे । तुम्ही सकळ’ ॥२३॥ हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥२४॥
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह:। सिंहनादं विनद्योच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्॥१२॥
या राजाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥२५॥ तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्याआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥२६॥ तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥२७॥ ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जहालें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥२८॥ घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ॥२९॥ तेणें महाघोष-गजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥१३०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय – १, ओवी क्र. १८७ ते २३७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
कृष्णमहिमा (१८७ ते १९६)
बहुती अवतारी अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो । देवां न कळे अभिप्रावो । अगम्य पहा हो हरिलीला ॥ ८७॥ उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा । बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥ ८८॥ मायेसि दाविलें विश्वरूप । गोवळां दाविलें वैकुंठदीप । परी गोवळेपणाचें रूप । नेदीच अल्प पालटों ॥ ८९ ॥ बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्ये जगादेखतां करी । परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥१९० ॥ ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी । पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥ ९१ ॥ अधर्मे वाढविला धर्म । अकर्मे तारिलें कर्म । अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥ ९२ ॥ तेणें संगेंचि सोडिला संगु । भोगे वाढविला योगु । त्यागेंवीण केला त्यागु । अति अव्यंगु निर्दोष ॥ ९३ ॥ कर्मठां होआवया बोधु । कर्मजाड्याचे तोडिले भेदु । भोगामाजीं मोक्षपदु । दाविलें विशदु प्रकट करूनि ॥९४॥भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केली एके पंक्ती । काय वानूं याची ख्याति । खाऊनि माति विश्वरूप दावी ॥ ९५॥ त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा । परी निजबोधाचा खरा । या अवतारी पुरा पवाडा केला ॥ ९६॥
एकादशस्कंध-तात्पर्य (१९७ ते २०१)
एकादशाच्या तात्पर्यार्थी । संक्षेपें विस्तरे मुक्ति । बोललीसे आद्यंती । परमात्मस्थिति निजबोधे ॥ ९७॥ तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादूनि निमि-जायंती । सांगितली कथासंगती । ‘संक्षेपस्थिति’ या नाम ॥९८॥ तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति । स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ‘सविस्तर’ ॥ ९९ ॥ दशमी ‘निरोध’ लक्षण । मागां केलें निरूपण । जेथे धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥२००॥ ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति । सदा आक्रंदत होती । जिच्या साह्यालागीं श्रीपति । पूर्णब्रह्मस्थिति अवतरला ॥१॥
कौरवकुलनिर्दळण (२०२ ते २१९)
दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व । वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥२॥
श्रीबादरायणिरुवाच – कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः । भुवोऽवतारयद्भारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥१॥
अर्थ – शुकाचार्य म्हणाले – हे परीक्षित राजा, यादवांस बरोबर घेऊन श्रीकृष्णाने बलरामासह प्रथमतः अनेक राक्षसांचा संहार केला ; नंतर कौरवपांडवांमध्येच भांडण उपस्थित करून आणि यादवांमध्ये यादवी माजवून (दहा वीर शिवायकरून कौरवपांडवांचा व यादवांचा) सर्वस्वी संहार केला आणि या पृथ्वीचा भार नाहीसा केला. ॥१॥
पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण । निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्ण केलें ॥३॥ जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि । सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥४॥ उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर । मारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥५॥
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्नैर्दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् ।कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् हत्वा नृपान्निरहरत्क्षितिभारमीशः ॥२॥
अर्थ – दुष्ट द्यूत, अपमानात्मक तिरस्कार, (द्रौपदीचे) केशकर्षण इत्यादी अनेक प्रकारांनी दुर्योधनादी भाऊबंदांनी प्रकुपित केलेल्या पांडवांना निमित्त करून, एकत्र जमलेल्या राजांना एकमेकांचे हस्ते मारवून श्रीकृष्णपरमात्मा पृथ्वीचा भार नाहीसा करता झाला. ॥२॥
दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार । ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचे सूत्र उपजवी कृष्ण ॥६॥ येणे श्रीकृष्णसंकल्पोद्देशे । हों सरले कपटफांसे । तेणें कपटें बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥७॥ जगी द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें । धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥८॥ बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्नी । ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजी ॥९॥ दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढली कचकच । तें कर्म त्याचे त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥२१०॥ वनी कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी । सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्यूची पदवी मस्तका आली ॥११॥ अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो । द्रौपदीवस्त्रहरण पाहा हो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥१२॥ अग्निदाने गरदानें । धनदारा अपहारणे । घाला घालूनि मारणे । शस्त्रपाणी होणे वधार्थ ॥१३॥ अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण । हेंचि निमित्तासि कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥१४ ॥ पतिव्रतेचे वस्त्रहरण । तेणें तत्काळ पावे मरण । हेचि कलहाचे कारण । कुळनिर्दळण येणें कर्मे ॥१५॥ ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी । यालागीं पांडवांचिये बुद्धी । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपु॥१६॥भूभारहरणचरित्र । सखे-स्वजन-सुहृद-स्वगोत्र । शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजी विचित्र उपजवी कलहो ॥१७॥ धराभार हरावया गोविंदु । कळवळियाचे सखे बंधु । करविला तेथ गोत्रवधु । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥१८॥
भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं यद्यादवं कुलमहो ह्यविषह्यमास्ते ॥३॥
अर्थ – यद्यपि आपुल्या बाहुबलाने संरक्षिलेल्या यादवांकडून पृथ्वीला भारभूत होणाऱ्या क्षत्रियांचा संहार करविला होता, तथापि अचिन्त्यस्वरूप श्रीकृष्णाला वाटले की, जोपर्यंत हे दुर्दीत यादव पृथ्वीवर आहेत, तोपर्यंत वस्तुतः पृथ्वीचा भार नाहीसा झालाच नाही. ॥३॥
ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार । मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥१९॥
यादवकुलनिर्दळण (२२० ते २३७)
पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार । तऱ्ही उतरला धराभार । हे शारंगधर न मनीचि ॥२२०॥ यादव करून अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ । परि यादव झाले अतिप्रबळ । हे न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥२१॥ नव्हतां यादवांचे निदान । नुतरे धराभार संपूर्ण । ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥२२॥ अग्नि कर्पूर खाऊनि वाढे । कापुरांती अग्निही उडे । तैसें यादवांचे अतिगाढे । आलें रोकडे निदान ॥२३॥ केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी । तैशी यादवकुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥२४॥ फळ परिपाकें परिमळी । ते घेऊन जाय माळी । तैशी स्वकुळफळे वनमाळी । न्यावया तत्काळी स्वयें इच्छी ॥२५॥ अनंतबाहुप्रतापें । यादव वाढले श्रीकृष्णकृपें । तोचि निधनाचेनि संकल्पें । काळरूपें क्षोभला ॥२६॥ अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ । ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥२७॥
नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत्कथंचिन्मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।अन्तःकलिं यदुकुलस्य विधाय वेणुस्तम्बस्य वह्निमिव शान्तमुपैमि धाम ॥ ४॥
उत्कर्षाच्या संपन्नतेने व माझ्या आश्रयाने सदैव उच्छृखल झालेल्या या यादवकुलाचा इतर कोणत्याही उपायाने पराजय होणे शक्य नाही. कळकीच्या बेटात घर्षणाने उत्पन्न होणाऱ्या वन्हीप्रमाणे यदुकुलातच कलह उत्पन्न करून मी उपशम पावेन (नंतर निजधामाला जाईन). ॥ ४ ॥
मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा । श्रियोन्नत अतिगर्व महिमा । मुख्य अकर्मा निजहेतु ॥२८॥ हे मद्बळे अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ । यांसि अप्रतिमल्ल दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥२९ ॥ हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य-राक्षसां कां दानवां । शेखी निर्दाळावया यादवां । मागुते मज तेव्हां पडेल येणें ॥२३०॥ तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधू काळगांठीं । ऐसा विचार जगजेठी । निश्चयें पोटीं दृढ केला ॥३१॥ यदुवंश-वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं । तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥३२॥ ते मुळी पेटली श्रीकृष्णसंकल्पे । धडाडली ब्रह्मशापें । ते स्वजनविरोधरूपें । काळाग्निकोपें नाशील ॥३३॥ ऐसें यादवकुळनिर्दळण । करूनियां स्वयें श्रीकृष्ण । निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करू इच्छी ॥३४॥
एवं व्यवसितो राजन्सत्यसंकल्प ईश्वरः । शापव्याजेन विप्राणां संजऱ्हे स्वकुलं विभुः ॥५॥
अर्थ – याप्रमाणे निश्चय करून सत्यसंकल्प व सर्वशक्तिमान ईश्वराने ब्राह्मणांच्या शापाच्या मिषाने आपल्या सर्व कुलाचा नाश केला. ॥ ५ ॥
यापरी आपुलें कुळ । नासूं आदरिलें तत्काळ । हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥ ३५॥ हेचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें । ब्रह्मशापाचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥३६॥ इतकें हें जै सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य । मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥ ३७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ४७ ते ६२
- कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति! । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु॥ तिनें पाचारिलें ‘इल बा’ म्हणोन । येरु पळे आण झाली आतां ॥३॥ तुका म्हणे येरा येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे शीण सुखापोटीं ॥४॥
- बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा! ॥ध्रु॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥३॥ तुका म्हणे देवा! । तया दुरी मज ठेवा ॥४॥
- तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥१॥ कां रे शिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु॥ मान दंभ पोटासाठीं । केली अक्षरांची आटी ॥३॥ तप करूनि तीर्थाटण । वाढविला अभिमान ॥४॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥५॥ तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म ॥६॥
- संसाराच्या तापें तापलों मी देवा! । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे! ॥ध्रु॥ बहुतां जन्मींचा झालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥३॥ वेढियेलों चोरीं अंत-र्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥४॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दीस झालों कासाविस ॥५॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥६॥
- ‘भक्तॠणी देव’ बोलती पुराणें । निर्धार वचनें साच खरीं ॥१॥ मागें काय जाणों आइकिली वार्ता । कबिरा सातें जातां घड्या वांटी ॥ध्रु॥ माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासी त्याग तेणें ॥३॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटियेलें द्विजांहातीं ॥४॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । येकोबाचें ॠण फेडियलें ॥५॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥६॥ तुका म्हणे ऐसा नाहीं ज्या निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥७॥
- भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगींच अधर्म ॥ध्रु॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥३॥ तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटीं ॥४॥
- भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी३० अंगीं । देखों नेदी जगीं फांसे जैसे ॥ध्रु॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥३॥ खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तयासाठीं ॥४॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परि तू कृपावंत पांडुरंगा! ॥५॥
- गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥ मग नये तैसी सत्ता । गेली, मागील आणितां ॥ध्रु॥ भंगलिया चित्ता। न ये काशानें सांधितां ॥३॥ तुका म्हणे धीर। भंगलिया पाठीं कीर ॥४॥
- युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥ ‘कलियुगामाजी करावें कीर्तन’ । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु॥ न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड॥३॥ तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥४॥
- कंठीं कृष्णमणी । नाहीं, अशुभ ते वाणी ॥१॥ हो का नर अथवा नारी । रांड तयें नांवें खरी॥ध्रु॥ नाहीं हातीं दान-। शूरपणाचें कांकण ॥३॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥४॥ तुका म्हणे ताळा । नाहीं, त्याची अवकळा ॥५॥
- माया ‘ब्रह्म’ ऐसें म्हणती धर्मठक। आपणा-सरिसे लोक नागविले ॥१॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥३॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥४॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांझट बोलणीं वारा त्याचीं॥५॥ तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायण भेट तयां ॥६॥
- मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥ जाणोनि कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु॥ संचित सांगातीं बोळवण सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥३॥ तुका म्हणे शेखी स्मशान ते वरी । संबंध गोवरी आगीसवें ॥४॥
- गौळीयांची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं? ॥१॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु॥ काय उपास पडिले होते? । कण्या भोंवते विदुराच्या ॥३॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥४॥
- आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥३॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा, काय फार शिकवावें? ॥४॥
- भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा? ॥१॥ शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु॥ देवाविण भक्ता । कोण देते निष्कामता? ॥३॥ तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥४॥
- विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी ‘माता’ ॥१॥ ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥३॥ तुका म्हणे आलें। रूपा अव्यक्त चांगलें ॥४॥
- काय दिनकरा । कोंबड्यानें केला खरा? ॥१॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार, माझे माथां देवा॥ध्रु॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी? ॥३॥ तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥४॥
- जेवितांही धरी । नाक हागतिये परी ॥१॥ ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ध्रु॥ सांडावें मांडावें । काय, ऐसें नाहीं ठावें ॥३॥ तुका म्हणे करी । ताक दुधा एकीसरी ॥४॥
- हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥ कळों आलें खट्याळसें । शिवों नये, लिंपों दोषें ॥ध्रु॥ फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥३॥ तुका म्हणे त्यागें-। विण चुकीजेना भोगें ॥४॥
- व्याल्याविण करी शोभन तांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसी ॥ध्रु॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥३॥ तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥४॥
- जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा? । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥३॥ तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणिक उपाय दुःखमूळ ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




शुभ प्रभात माऊली ,जय जय रामकृष्णहरि माऊली,
काकड्याचे अभंग सुद्धा पाठविण्यात यावे ही आपल्या चरणी करबध्द प्रार्थंना ….
🙏🙏 हो माऊली
श्री विठ्ठल ज्ञानोबाराय तुकोबाराय शांतीब्रह्म नाथबाबा
राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली