अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – १. ओवी क्र. १३१ ते १५०
तत: शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा:। सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्॥१३॥
उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखातें । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥३१॥ भेरी, निशाण, मांदळ । शंख, काहळा, भोंगळ । आणि भयासुर रण-कोल्हाळ । सुभटांचे ॥३२॥ आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥३३॥ तेथ भेडांची कवण मातु! । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥३४॥ एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥३५॥ ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि, ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती ‘प्रळयकाळु । वोढवला आजी’ ॥३६॥
तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ। माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतु:॥१४॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जय:। पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदर:॥१५॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर:। नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ॥१६॥
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी?॥३७॥ हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचे । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चाऱ्ही ॥३८॥ कीं, पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥३९॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा, जाण । तया रथाचे गुण । काय वर्णू?॥१४०॥ ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शार्ङ्गधरु । अर्जुनेसी ॥४१॥ देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्ताचें । जें, सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥४२॥ पाइकु पाठीसीं घातला । आपण पुढा राहिला । तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥४३॥ परी तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गहिरु । जैसा, उदैला, लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥४४॥ तैसें, तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि, नेणों केउते । गेले तेथ ॥४५॥ तैसाचि देखे, येरे । निनादें अति गहिरे । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥४६॥ ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पहात असे ॥४७॥ तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥४८॥ तो महाप्रलय-जलधरु । जैसा घडघडिला गहिंरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥४९॥ नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥१५०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय – १, ओवी क्र. २३८ ते २८८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
कृष्णमहिमा (२३८ ते २७६)
लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन । जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥ ३८॥
स्वमूर्त्या लोकलावण्यनिर्मुक्त्या लोचनं नृणाम् ।
गीर्भिस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तानीक्षतां क्रियाः ॥ ६॥
जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळी कामिनीरमण । मोक्षाचें तारूं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥३९॥ जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम । ज्याचें त्रिलोकी दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥२४० ॥ श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढे । लक्ष्मी भुलोनि झाली वेडे । मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥४१॥ ज्याचें त्रैलोक्यपावन नाम । जो करी असुरांतें भस्म । तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥४२॥ त्रिलोकींचे बरवेपण । भुलोनि कृष्णापाशी आलें जाण । ना कृष्णलेशे बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥ ४३॥ जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा । ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥४४॥ जो हरिखाचा सोलींव हरिख । की सुख सुखावतें परमसुख । ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥४५॥ तो अमूर्त मूर्तिधारण । की सकललोकलावण्य । शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्य संपूर्ण साजिरा ॥४६॥ घृत थिजले की विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें । तेवीं अमूर्त मूर्ती मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥४७॥ तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे । पहाणे पाहातेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥४८॥ दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुलें शेजार । होवोनियां परात्पर । सुखावे साचार श्रीकृष्णरूपीं ॥४९॥ श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी । जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥५०॥ नवल तेथींचे गोडपण । अमृतही फिकें केले जाण । यापरी रसना आपण । हरिरसी संपूर्ण सुखावे ॥५१॥ लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुचि होय वावो ।सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहा वो आन नावडे ॥५२॥ वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता आणि घ्राण । कृष्णमकरंदें जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥५३॥ जयाचेनि अंगस्पर्शे । देह-देही-देहपण नासे । अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसे देहबुद्धि ॥५४॥ कठिणाचें कठिणपण गेलें । मृदूचें मृदुपणही नेलें । कृष्णस्पर्शे ऐसें केलें । स्पर्शाचें ठेले स्पर्शत्व ॥५५॥ तयाचेनि पठणे वाचा । ठावो वाच्यवाचकांचा । नेतिशब्दे पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥५६॥ बोलु बोलणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें । कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्याने नेलें वाचिक ॥५७ ॥ चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये । मग निश्चितपणे पाहे । कृष्णचरणी राहे निवांत ॥ ५८॥ चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण । चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥ ५९॥ नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म । मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥२६०॥ पहातां पाउलांचा माग । तुटती कर्माकर्माचे लाग । कर्माचे मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥६१॥ गाईमागिल कृष्णपाउलें । पाहतां, कर्म कर्तेनिसीं गेलें । अकर्म म्हणणे नाही उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥६२ ॥ जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें । वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणे पावणे परब्रह्म ॥ ६३ ॥
आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ । तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥७॥
जगातील इतर लावण्याला लाजविणाऱ्या आपल्या सर्वांगसुंदर मूर्तीने सर्व जनांचे नेत्र आकर्षित करून, आपण केलेल्या सुंदर उपदेशाने भक्तांची अंतःकरणे कायम रिझवून, जेथे जेथे त्याचा संचार झाला तेथे तेथे उमटलेली पदचिन्हे पाहून भक्तांच्या इतर क्रिया थांबावयास लावून, सहज लीलेने मुमुक्षूने तम तरून जावे अशी दिव्य व परम आदरणीय कीर्ती मागे ठेवून, श्रीकृष्ण-परमात्मा वैकुंठास निघून गेला. ॥ ६-७ ॥
यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती । जेणे जड जीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥ ६४॥ स्वधामा गेलिया चक्रधरु । मागां तरावया संसारु । कृष्णकीर्ति सुगम तारूं । ठेवून श्रीधरु स्वये गेला ॥ ६५ ॥ नवल त्या तारुवाची स्थिती । बुडवू नेणे कल्पांतीं । श्रवणें तरले नेणों किती । पुढेही तरती श्रद्धाळू ॥६६॥ श्रीकृष्णकीर्तीचें तारूं । घालितां आटे भवसागरु । तेथें कोरड्या पाउलीं उतारू । श्रवणार्थी नरु स्वयें लाहे ॥ ६७ ॥ जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य । कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥ ६८॥ आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लागती चारी मुक्ति । त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिवृ(र्वृ)त्ति हरिनामें ॥६९॥ श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें । भीतरील तम एकसरें । निघे बाहरें गजबजोनि ॥ २७० ॥ तंव कृष्णकीर्तिकथागजरी । तमासि ठावो नुरेचि बाहेरी । धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारी परमानंदु ॥७१॥ कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे । कीर्ति कीर्तिमंताऐसें । दे अनायासें निजसुख ॥७२ ॥ जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणे पुरे । जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥७३॥ ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी । ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थी ॥७४॥ ज्यासि दिधलिया खेव । खेवाची पुरे हांव । ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥ ७५॥ तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु । स्वपदासि शार्ङ्गधरु । अतिसत्वर निघाला ॥ ७६॥
यादवकुलनिर्दळण (२७७ ते २८८)
राजोवाच – ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम् । विप्रशापः कथमभूद् वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥ ८॥
राजा म्हणाला – ब्राह्मणांना मानणारे, दानधर्म करणारे, नित्य वृद्धांची सेवा करणारे, श्रीकृष्णाच्या चिंतनात नित्य रत असणारे अशा यादवांना विप्रशाप कसा झाला ? ॥ ८ ॥
आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं । त्यांसि शापु घडे कैशिया रीतीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥७७॥ यादव दाने अतिउदार । राजे होऊनि परम पवित्र । ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥ ७८ ॥ यादव सदा कृष्णयोगेंसीं । नित्य साधु यादवांपासीं । तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ ७९ ॥ दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी । तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसी । शापु यादवांसी घडे कैसा ॥२८०॥
यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम । कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥९॥
हे मुनिश्रेष्ठ शुकमहाराज, यादवांना जो शाप झाला त्या शापाचे कारण व त्याचे स्वरूप आणि एकमताने वागणाऱ्या यादवांमध्ये हा परस्परकलह कसा झाला ते सर्व, कृपा करून मला सांगा. ॥ ९ ॥
शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु । कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरूपु सांगावा ॥ ८१ ॥ यादव समस्त सखे बंधु । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदु । एकात्मता स्वगोत्रसंबंधु । त्यामाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥८२॥ ‘आत्मा वै पुत्रनामासि’ । हे श्रुति प्रमाण सर्वांसी । तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥८३॥ कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण । यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥ ८४ ॥ सृष्टि स्रजी पाळी संहारी । हें कृष्ण संकल्पमात्रे करी । तो यदुकुळनिधन निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥ ८५ ॥
श्रीशुक उवाच – बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेशं कर्माचरन्भुवि सुमंगलमाप्तकामः । आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥१०॥
कर्माणि पुण्यनिवहानि सुमंगलानि गायज्जगत्कलिमलापहराणि कृत्वा । कालात्मना निवसता यदुदेवगेहे पिण्डारकं समगमन्मुनयो निसृष्टाः ॥११॥
श्रीशुकाचार्य उत्तरले- -सकल सौंदर्याचे अधिष्ठान असे शरीर धारण करणारा, मंगलकर्मकारी पण स्वतः कृतार्थ, संसारामध्ये अनासक्तीने राहून लोकांस कर्म कसे करावे हे स्वोदाहरणाने शिकविणारा, उदारकीर्ती, असा हा भगवान श्रीकृष्ण, अवतारकृत्य पूर्ण न झाल्यामुळे स्वकुलनाशाला प्रवृत्त झाला. ॥ १० ॥
पुण्यप्राप्ती करून देणारी, अत्यंत शुभावह, संकीर्तन करणाऱ्या लोकांचे सर्व दोष निरसन करणारी अशी कर्मे यदुनाथाच्या घरी (द्वारकेत) ज्याने केली त्या कालस्वरूप भगवंताच्या आज्ञेने मुनिगण पिंडारकाला गेले. ॥ ११ ॥
रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु । तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥८६॥ स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा । यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥ ८७॥ केव्हां होईल कुलक्षयो । हेंचि मनी धरी देवो । तो देवाचाचि भावो । शापासि पहा वो दृढ मूळ ॥ ८८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ८४ ते ९७
- मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥ हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥३॥ आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥४॥
- थोडें आहे थोडें आहे । चित्त साह्य झालिया ॥१॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥३॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥४॥
- आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥१॥ मनुष्यदेह ऐसा निध । साधिल ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले॥ध्रु॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलिकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥३॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातलीया मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥४॥
- न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥ या नांव अद्वैत खरें ब्रह्मज्ञान । अनुभवा-वांचून बडबड ते ॥ध्रु॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाही न ये वरी मन ॥३॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥४॥
- पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु॥ आहेति सकळ । तीर्थें, काळें देतीं फळ ॥३॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हें वैकुंठ ॥४॥
- तीर्थीं धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु॥ तीर्थीं भाव फळे । येथें अनाड तें वळे ॥३॥ तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥४॥
- घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करीतो ॥१॥ भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥३॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४॥
- देखोनि पुराणिकाची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥३॥ बोलों नयें मुखावाटां । म्हणे ‘होतां ब्यांचा तोटा’ ॥४॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥५॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥६॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥७॥ तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें॥८॥
- दुर्जनाची गंधी विष्ठेचिये परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ आइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैसी ॥३॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळल्यावरी धांवे श्वान ॥४॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥५॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥६॥
- अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मनी जो ॥ध्रु॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥३॥
- शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु॥ संतांसी जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥३॥ तुका म्हणे पोटीं । भाव अाणीक जया ओंठीं ॥४॥
- चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥२॥ तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥३॥
- मांडवाच्या दारा-। पुढें आणिला म्हातारा ॥१॥ म्हणे ‘नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचें तोंड’ ॥२॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे? ॥३॥ तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥४॥
- कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥ त्याचा होय भूमी भार । नेणें जातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥ध्रु॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं । पापी तयाहुनी । नाहीं आणिक दुसरा ॥३॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतिताचे द्वारेशीं ॥४॥ कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । शीण थोर पावेल ॥५॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनि । गेलीं, म्हणती ‘मी माझें’ ॥६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




शुभ सायःकाळ माऊली,जय जय रामकृष्णहरि माऊली,