दिवस – ७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ:। धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित:॥१७॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते । सौभद्रश्चमहाबाहु: शङ्खान्दध्मु: पृथक्‌‍पृथक्‌‍॥१८॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌‍। नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌‍॥१९॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशिपति देख । महाबाहु ॥५१॥ तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥५२॥ विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ॥५३॥ तेणें महाघोषनिर्घातें । शेष-कूर्म, अवचितें । गजबजोनि; भूभारातें । सांडूं पाहती ॥५४॥ तेथ तिन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी॥५५॥ पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥५६॥ ‌‘सृष्टि गेली रे गेली‌’ । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटली। सत्यलोकीं ॥५७॥ दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकी ॥५८॥ तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे ‌‘झणें होय पां अंतु‌’ । मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ॥५९॥ म्हणौनि विश्व सांवरलें । एऱ्हवीं युगान्त होतें वोडवलें । जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥१६०॥ तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥६१॥ जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥६२॥ तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती । एकमेकांतें म्हणती । ‌‘सावध रे सावध‌’ ॥६३॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌‍ कपिध्वज:। प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव:॥२०॥

तेथ बळें, प्रौढी, पुरतें । महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥६४॥ मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडी क्षोभलें । लोकत्रय ॥६५॥ तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥६६॥ ते देखिलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥६७॥ तव संग्रामी सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । मग, लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ॥६८॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत॥२१॥

ते वेळी अर्जुन म्हणतसे ‌‘देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां‌’ ॥६९॥

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌‍। कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌‍ रणसमुद्यमे॥२२॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता:। धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव:॥२३॥

जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन; अशेख । झुंजते जे ॥१७०॥ येथ आले असती आघवें । परी, कवणेंसीं म्यां झुंजावें । हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥७१॥ बहुतकरूनि कौरव । हे आतुर, दु:स्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं ॥७२॥ ‌‘झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती‌’ । हें सांगोनि; रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥७३॥


कृष्णस्वरूपवर्णन (२८९ ते २९६)

जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति । शुक सांगे परीक्षितीप्रति । स्वानंदस्थिति उल्हासे ॥ ८९॥ सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु । लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु निजांगें ॥२९०॥ नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगी गुंतल्या जनदिठी । कृष्णस्वरूपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥९१॥ जैशी गुळी माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णरूपासी । सर्वांगी वेढोनि चौपासीं । अहर्निशी नोसंडिती ॥९२॥ नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा । यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥ ९३॥ ‍तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी ।अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥९४॥ ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी । यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥९५॥ कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासि विषयधर्म । तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥९६॥
कृष्णमहिमा (२९७ ते ३१०)
कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम । स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम का भोगी ॥९७॥ चहूं आश्रमा प्रकाशकु । त्रिलोकी कृष्ण गृहस्थ एकु । तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥ ९८॥ कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्ककल्लोळ । त्याची सर्व कर्मे पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणे कथनें ॥९९॥ कृष्णकर्मांचें करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन । ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥ ३०० ॥ श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागी आचरे कर्म । ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥१॥ श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम । सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥२॥ तेणें अवाप्तसकळकामें । ऐशी आचरला अगाध कर्मे । मानव तारावया मनोधर्मे । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥३॥ कैसें कर्म सुमंगळु । कानी पडतांचि अळुमाळु । नासोनियां कर्ममळु । जाती तत्काळु श्रवणादरें ॥४॥ श्रवणे उपजे सद्भावो । सद्भावें प्रकटे देवो । तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥५॥ श्रीकृष्णकीर्तीचे स्मरण । कां करिती श्रवणपठण । मागें उद्धरले बहुसाल जन । पुढे भविष्यमाण उद्धरती ॥६॥ जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी । येऱ्हवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासी अतिनिद्रा ॥७॥ जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार । कृष्णे सुगमोपाव केला थोर । दीनोद्धार हरिकीर्तनें ॥८॥ कृष्णकीर्तने गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी । उतरल्या तीर्थांचिया उटी । नामासाठी निजमोक्षु ॥९॥ ऐसा निजकीर्तिउदारु । पूर्णब्रह्म सारंगधरु । लीलाविग्रही सर्वेश्वरु । पूर्णावतारु यदुवंशीं ॥३१० ॥
यादवकुलनिर्दळण (३११ ते ३१९)
उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ । यादव उरले अतिअद्भुत । तेही समस्त निर्दळावे ॥ ११ ॥ ये अवतारी हृषीकेशी । म्हणे हेच कृत्य उरलें आम्हांसी । निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥१२॥ तो यादवांमाजी माधव । कालात्मा देवाधिदेव । जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥१३॥ नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारूनि आपण । करूं सांगे शीघ्र गमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥१४॥ ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले । हे यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णे ॥१५॥ भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाहीं अनर्थासी । जाणे हे स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥१६॥ जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो । हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥१७॥ जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं । हे जाणोनियां श्रीहरी । द्वारकेबाहेरी ऋषि घाली ॥१८॥ ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांतें लाघवी हृषीकेशी । तीर्थमिषे समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥१९॥
श्रीकृष्णाने पिंडारकास धाडले ते मुनी (३२० ते ३३६)
पिंडारका मुनिगण । श्रीकृष्ण धाडिले कोण कोण । ज्यांचे करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥३२०॥
विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरंगिराः । कश्यपो वामदेवोऽत्रिर्वसिष्ठो नारदादयः ॥ १२ ॥
विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारदादी मुनी (द्वारकेतून निघून पिंडारकास जमले). ॥ १२ ॥
जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन । ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥ २१ ॥ जे गायत्रीमंत्रासाठीं । करूं शके प्रतिसृष्टी । जो विश्वामित्र महाहटी । तोही उठाउठी निघाला ॥ २२॥ जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमी वसे असित । ज्याचेनि नामें द्वंद्वे पळत । तोही त्वरित निघाला ॥ २३॥ जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णी बैसोन आपण । पूर्ण केलें वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥ २४ ॥ जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी । तोही द्वारकेबाहेरी । त्वरेकरूनि निघाला ॥२५॥ भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण । मिरवी श्रीवत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥२६॥ अंगिरा स्वये सद्‌बुद्धि सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटीं । जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥ २७ ॥ कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं । यालागी हे काश्यपी सृष्टी । तोही कश्यपु उठी निजगमनीं ॥२८॥ मुक्तांमाजी श्रेष्ठ भावो । वेदी वाखाणिला वामदेवो । तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥२९॥ अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं । श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥ ३३०॥ तो स्वयें अत्रि ऋषीश्वर । श्रीकृष्णआज्ञातत्पर । पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥३१॥ जो श्रीरामाचा सद्गुरु । ब्रह्मज्ञाने अतिउदारु । ज्याचे शाटीचा प्रताप थोरु । जिंकिला दिनकरु तपस्तेजें ॥३२॥ ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी । निघाला द्वारकेहुनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥ ३३ ॥ आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु । ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकीर्तनीं ॥ ३४॥ ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु । ब्रह्मानंदें नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥ ३५॥ इत्यादि हे मुनिवरु । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरु । शिष्यसमुदायें सहपरिवारु । मीनले अपारु पिंडारकीं ॥ ३६॥
यादवकुलनिर्दळण (३३७ ते ३९६)
एवं पिंडारकी ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव । मीनले कृष्णवैभव । अतिअपूर्व वर्णिती ॥ ३७॥ बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळी । कुमरी ऋषीश्वरांसि रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥३८॥ निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण । जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥ ३९ ॥ ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडें । महादेवाचे लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥ ३४० ॥ तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर । हे एकएकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥४१॥ धरातळी ब्रह्म ब्राह्मण । त्यांचे वचन परम प्रमाण । हे सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वयें दावी ॥४२॥
क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः । उपसंगृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥ १३ ॥
यदुनंदन समस्त । क्रीडाकंदुक झेलित । एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥४३॥ ऐसे नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमार । अंगीं श्रीमद अपार । औद्धत्ये थोर उन्मत्त ॥ ४४ ॥ अतीत-अनागत-ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त । ज्यांचे वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकू आम्ही ॥४५॥ अघडते येऊनि पडे । तैं यांचे वचन कैसें घडे । म्हणोनि ऋषीश्वरांपुढे । मांडिलें कुडे यदुकुमरीं ॥ ४६॥


  1. कन्या गौ करी कथेचा विकरा । ‘चांडाळ तो खरा’ तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण। यातिशीं  कारण नाहीं देवा! ॥ध्रु॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥
  2. हरिहरां भेद । नाहीं, करूं नये वाद ॥१॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु॥ भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥३॥ उजवें वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥४॥
  3. वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं  सत्य करावें ॥ध्रु॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥३॥ वरासनीं  पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें  । सोनियाचीं, परी नीच ॥४॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥५॥ सेवका स्वामीसाठीं  मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत यदर्थी ॥६॥
  4. घरी रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकां-पासी थोरपण  ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकवूनि ॥२॥ तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हों ॥३॥
  5. जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥ध्रु॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥२॥ फांकू नका रुजू झालियावांचून । सांगा जी कोण धरती धन्या? ॥३॥ आजी मायबाप करा तडामोडी । उद्यां कोण घडी राहेना हो ॥४॥ तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखेर ते साली झाडा देती ॥५॥
  6. येऊ द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घांस ॥ध्रु॥ जो यावें तो हातचि रिता नाहीं  । कधीं तरी कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥ तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदारा भोंवतीं फिरा ॥३॥
  7. देती घेती परज गेली । घर खाली करोनियां ॥१॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी॥ध्रु॥ अवघियांचे अवघे नेलें । कांहीं ठेविलें नाहीं मागें ॥३॥ सोंगें संपादूनि दाविला भाव। गेला, आधीं माव वरि होती ॥४॥ घराकडे पाहूं नयेसेंचि झालें । अमानत केलें दिवाणांत॥५॥ आतां तुका कोणा न लगेचि हातीं । झाली ते निश्चिंती बोलों नये ॥६॥
  8. शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥ उठाउठीं  करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु॥ त्वरा झाली गरुडा टाकि-यले मागें । द्रौपदीच्या लागे नारायणें ॥३॥ तुका म्हणे करी बहुत तांतडी । प्रेमाची आवडी लोभा पूर ॥४॥
  9. बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥ वाट दावी तया न लगे रुसावें  । अतित्याई  जीवें नाश पावे ॥ध्रु॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं  । पोंभाळितां  वरी आंत चरे ॥३॥ तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजीं ॥४॥
  10. माकडे मुठीसी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणें हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय? । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु॥ शुकें नळिकेशी गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥३॥ तुका म्हणे एक ऐसे पशु जीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥४॥
  11. हरि तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥ध्रु॥ घेऊनि हरिश्चंद्राचे वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । ‘पुत्र पत्नी’ ‘जीव’ । डोंबाघरीं  वोपविलीं  ॥२॥ नळदमयंतीचा वियोग । विघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणेंही बोलतीं ॥३॥ राजा शिबी चक्रवर्ती  । कृपाळु दयाळु भूतीं  । तुळविलें  अंतीं । तुळे मांस तयाचें ॥४॥ कर्ण भिडतां  समरांगणीं । बाणी व्यापियेला रणीं  । मागसी पाडोनि । तेथें दांत तयाचे ॥५॥ बळी सर्वस्वें  उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळी घातला ॥६॥ श्रियाळाच्या घरीं । धरणें  मांडिलें  मुरारी । मारविले करीं । त्याचे बाळ त्या हातीं ॥७॥ तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं रे पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥८॥
  12. बाळ बापा म्हणे ‘काका’ । तरि कां निपराध पारिखा? ॥१॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु॥ साखरेसी म्हणतां ‘धोंडा’ । तरि का तोंडा न रुचे? ॥३॥ तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥४॥

5 thoughts on “दिवस – ७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

  1. श्री विठ्ठल ज्ञानोबाराय एकनाथ बाबा तुकोबाराय

  2. श्री विठ्ठल ज्ञानोबाराय एकनाथ बाबा तुकोबाराय
    राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि

  3. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम

  4. Keshav Dnyanoba bade

    राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top