दिवस – १०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीति: स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिन: ॥३६॥

जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तूं; हातींचा । दूरी होसी ॥२८॥ कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडतीं अशेखें । तये वेळी तूं, कवणें? कें । देखावासी?॥२९॥ जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला, देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहें ॥२३०॥ का, सकर्दम सरोवरु । अवलोकूनि, चकोरु । न सेवितु; अव्हेरु । करूनि, निघे ॥३१॥ तयापरी, तूं देवा । मज झकवूं, न येसीं मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥३२॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌‍ स्वबान्धवान्‌‍ । स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ॥३७॥

म्हणोनि, मी हें न करी । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ! बहुतीं परी । दिसतसे ॥३३॥ तुजसीं अंतराय होईल । मग, सांगे, आमुचें काय उरेल?। तेणें दु:खें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥३४॥ म्हणौनि, ‌‘कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती‌’ । अर्जुन म्हणे ॥३५॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: । कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌‍ ॥३८॥
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम्‌‍ । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥३९॥

हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले । तऱ्ही आम्हां हित आपुलें । जाणावें लागे ॥३६॥ हें ऐसें कैसें करावें? । जे आपुले आपण मारावे? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट?॥३७॥ हां जी, मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला अवचिता । तो, तंव चुकविता । लाभु आथी ॥३८॥ असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ, कवणु, देवा । लाभु सांगे? ॥३९॥ कां, समोर अग्नि देखोनि । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळू शके ॥२४०॥ तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजो असती पहात । हें जाणतांहीं; केवीं एथ । प्रवर्तावें?॥४१॥ ऐसें, पार्थु तिये अवसरीं । म्हणे ‌‘देवा, अवधारीं । या कल्मषाची थोरीं । सांगेन तुज‌’ ॥४२॥

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना:। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥

जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्ही एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥४३॥ तैसा, गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥४४॥ म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥४५॥


भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च । सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥५॥

देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं । अतिवृष्टी का अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥५४॥ त्या देवांपरीस साधु अधिक । हे साचचि मज मानलें देख । देवचरितें उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥५५॥ त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसखा । तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमा लोकां कदा न कळेचि ॥५६॥ दिधल्या सुखासी मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं । ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशीं निश्चितीं नारदा ॥५७॥ तुझिये महिमेपासीं । मुदल देवो न ये तुकासी । तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेसी नारदा ॥५८॥ देवाचा अवतार होये । दासां सुख, दैत्यां भये । तेथही ऐसें विषम आहे । हे न समाये तुजमाजीं ॥५९॥ तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं । रावण तुज नेऊनि एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥६॥ देव रावणे घातले बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी । शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥६१॥ जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं । आणि कृष्णाचे सभेमाझारी । आप्तत्वें थोरी मैं तुझी ॥६२॥ नाम घेवों नेदी देवाचें । हे बिरुद हिरण्यकशिपूचें । त्यासी कीर्तन तुझे रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥६३॥ लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी । ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेसी सांगेन ॥६४॥

भजन्ति ये यथा देवान्‌ देवा अपि तथैव तान् । छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥६॥

जे जैसे देव यागी यजिजती । तैसतैसी फळे देव देती । न भजत्यांतें विघ्ने सूचिती । ऐसी गती देवांची॥६५॥ जैसजैसा पुरुष वेठे । तैसतैसी छाया नटे । तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥६६॥ जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे । निजकर्मे देवही तैसे । कर्मवशे प्रसन्न ॥६७॥ सूर्यअस्तमानी छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे । एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासें जाणसी ॥६८॥ इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥६९॥ त्याचे जीवें सर्वस्वे भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥७०॥ तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी । तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥७१॥ तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान । ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥७२॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥७३॥ केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥७४॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी । ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७५॥ वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचे पाप । शेखी सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥७६॥ तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येऱ्हवीं हातीं न धरी आनातें ॥७७॥ ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञाने अतिउदारु । तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥७८॥

भागवतधर्मनिरूपणास्तव वसुदेवाची नारदास विनंती (७९ ते १०२)

ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव । याञ्छ्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते विश्वतो भयात् ॥७॥

आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्ये आली फळासी । मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥७९॥ कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घाली ठसा । मज तुझा पूर्ण भरंवसा । सोडवी भवपाशापासूनि ॥८०॥ तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जऱ्ही मज जाली तत्त्वतां । तन्ही भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥८१॥ ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणे निरसे कर्माकर्म । श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२॥ भवभय अतिदारुण । त्या भयाचे माया निजकारण । तिचे समूळ होय निर्दळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥८३॥ मज नाहीं अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण । तेविषयींची हे विनवण । सावधान अवधारीं ॥८४॥

अहं किल पुराऽनन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् । अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥८॥

मज अधिकार नाहीं पूर्ण । हे मीही जाणतों आपण । मागें म्यां केलें भगवद्भजन । तें तूं कथन अवधारीं ॥८५॥ म्यां पूर्वी आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वांयां । प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥८६॥ मज देव तुष्टला प्रसन्नपणें । ‘मागसी तें देईन’ म्हणे । तेथे मायेनें ठकिलें मजकारणे । ‘माझा पुत्र होणे’ मी मागें ॥८७॥ तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान । तोचि वंदी माझे चरण । म्हणे ‘बाळक पूर्ण मी तुझें’ ॥८८॥ यापरी श्रीकृष्णापासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी । कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसी मी जाणे ॥८९॥ श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं । तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसी उद्धरीं ॥९॥ जे मायेनें ठकिलों वाडेकोडें । ते माया समूळ झडे । ऐसें सांगिजे रोकडें । बहु बोलोनि पुढे काय काज? ॥९१॥

यथा विचित्रव्यसनाद्भवद्भिर्विश्वतोभयात् । मुच्येमह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥९॥

मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु । त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारूं मुनिराया! ॥९२॥ याचे सकळ जळ क्षार । माजी सावजें अनिवार । एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तीं ॥९३॥ लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा । आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥९४॥ अहं-कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु । मी-माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धरु गर्जत ॥९५॥ नाना वासनांचा वळसा । पाहें पां भंवताहे कैसा । येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥९६॥ क्रोधाचे प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें । असूया तिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥९७॥ कामपर्वताची शिखरें । विषमें भासती अपारें । आशेइच्छेची वरी थोरें । झाडें विषयांकुरे वाढलीं ॥९८॥ संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण । ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरी जाण तळपती ॥९९॥ एवढाही हा भवसागरु । शोषिता तूं अगस्ती साचारु । तुझेनि भवाब्धिपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥१००॥ याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा । अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥१॥ पायीं उतरून भवसागरु । साक्षात् पावें परपारु । ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥२॥

भागवतधर्मनिरूपण—प्रस्ताव (१०३ ते १०९)

ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चित्तीं । तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥३॥


१४१.‘दया’ तिचे नांव भूतांचे पाळण । आणिक निर्दळण कंटकांचे ॥१॥ धर्मनीतीचा हा ऐकावा वेव्हार। निवडिलें सार असार तें ॥ध्रु॥ ‘पाप’ त्याचें नांव न विचारितां नीत। भलतेंचि उन्मत्त करी सदा ॥३॥ तुका म्हणे धर्म रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥४॥
१४२.करावें गोमटें। बाळा, माते तें उमटे॥१॥ आपुलिया जीवाहुनी । असे वाल्हें तें जननी॥ध्रु॥ वियोग तो तिस । त्याच्या उपचारें, विष॥३॥ तुका म्हणे पाय । डोळा सुखावे त्या न्यायें ॥४॥
१४३.कन्या सासुऱ्यासी जाये । मागें परतोनि पाहे ॥१॥ तैसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा! ॥ध्रु॥ चुकलिया माय । बाळ हुरूहुरू पाहे ॥३॥ जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥४॥
१४४.हातीं होन दाविति बेणा। करिती लेकींची धारणा॥१॥ ऐसे धर्म झाले कलीं । पुण्य रंक, पाप बळी ॥ध्रु॥ सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥३॥ टिळे लपविती पातडी। लेती विजार कातडी॥४॥ बैसोनियां तक्तां। अन्योविण पिडिती लोकां ॥५॥ मुदबख लिहिणें। तेल तुप साबण केणें॥६॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥७॥ राजा प्रजा पीडी । क्षेत्रीं दुश्चितासी तोडी॥८॥ वैश्य शूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥९॥ अवघे बाह्य रंग । आंत हिरवें, वरी सोंग ॥१०॥ तुका म्हणे देवा! । काय निद्रा केली? धांवा! ॥११॥
१४५.साळंकृत कन्यादान। पृथ्वीदानाच्या समान ॥१॥ परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोग पुढां ॥ध्रु॥ आचरतां कर्म। भरे पोट, राहे धर्म ॥३॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहे ॥४॥ अन्न मान धन । हे तो प्रारब्धा आधीन ॥५॥ तुका म्हणे सोसें । दुःख आतां, पुढें नासें ॥६॥
१४६.दिवट्या वाद्य लावूनि खाणें। करूनि मंडण दिली हातीं ॥१॥ नवरा नेईल नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥२॥ गौरविली विहीण व्याही । घडिले कांही ठेवूं नका ॥३॥ करूं द्यावें व्हावें बरें । ठायींचें, कां रे न कळेचि? ॥४॥ वऱ्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटी कांतेली ॥५॥ तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री॥६॥
१४७.ब्रह्महत्या, मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुण्याचे ॥ध्रु॥ नरमांस खादली भाडी। हाका हाडी म्हणोनी ॥३॥ अवघे पाप केले तेणें । जेणें सोनें अभिळासिलें ॥४॥ उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥५॥ तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां? ॥६॥
१४८.याचा कोणी करी पक्ष । तोही त्याशी समतुल्य ॥१॥ फुकासाठीं पावे दु:खाचा विभाग । पूर्वजाशीं लाग निरयदंडीं ॥ध्रु॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासी ॥३॥ तुका म्हणे त्याचे अन्न । मद्यपानाचे समान ॥४॥
१४९.कपट कांहीं एक । नेणें भुलवावयाचे लोक ॥१॥ तुमचे करितों कीर्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु॥ दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥३॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥४॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति॥५॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥६॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाणखूण ॥७॥ नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥८॥ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदीं ॥९॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥१०॥ नाहीं हालवीत माळ । भोवते मेळवूनि गबाळ ॥११॥ आगमीचें नेणें । कुडे स्तंभन मोहन उच्चाटण ॥१२॥ नोहे त्यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१३॥
१५०.रडोनिया मान । कोण मागतां भूषण? ॥१॥ देवें दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु॥ लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥३॥ तुका म्हणे धीराविण कैसा होतो हिरा? ॥४॥
१५१.पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां, गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतो ते धर्म नीतीचा संकेत। सावधान, हित व्हावे तरी ॥ध्रु॥ संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा। जीवनींच वळसा सांपडला ॥३॥ तुका म्हणे एकाएकी वरासन । दुजें तेथें भिन्न अशोभ तें ॥४॥
१५२.जेणें मुखें स्तवी । तेंचि निंदेपाठीं लावी ॥१॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें, खाय माती ॥ध्रु॥ गुदद्वारावाटें । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥३॥ विंचु लाभेविण । तुका म्हणे वाहे शीण ॥४॥
१५३.अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥ विटे न लगता क्षण । मोल जाय वायांविण ॥ध्रु॥ सर्पाचिया परी । विषे भरला कल्हारी ॥३॥ तुका म्हणे देवा! । मज झणीं ऐसे दावा ॥४॥
१५४.आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एकावांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या ‘देव’ आणिकांसी ॥ध्रु॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन॥३॥ तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघींच पापें घडतील ॥४॥
१५५.तान्हेल्याची धणी । फिटे, गंगा नव्हे उणी ॥१॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे, कृपानिधी! ॥ध्रु॥ तूं तो उदाराचा राणा । माझी अल्पचि वासना ॥३॥ कृपादृष्टी पाहे । तुका म्हणे होईं साहे ॥४॥
१५६.संतांचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवाशिरीं ॥ध्रु॥ अतीतासी गाळी। देवा नैवेद्यासी पोळी ॥३॥ तुका म्हणे देवा । ताडण, भेदकाची सेवा ॥४॥

3 thoughts on “दिवस – १०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top