दिवस – १२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अध्याय दुसरा

संजय उवाच

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥

मग संजयो म्हणे रायातें । “आइके, तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥१॥ तें कुळ देखोन समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणे परी?॥२॥ जैसें लवण जळें झळंबळें । नातरी, अभ्र वाते हाले । तैसें, सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥३॥ म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला! । जैसा कर्दमीं रुतला । राजहंस ॥४॥ तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखानि, श्रीशार्ङ्गधरु । काय बोले ॥५॥

श्रीभगवानुवाच

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२॥

म्हणे, “अर्जुना, आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं? । तूं कवण? हें कायी । करीत आहासी?॥६॥ तुज, सांगे, काय जाहलें? । कवण उणें आलें? । करिता, काय ठेलें? । खेदु कायिसा?॥७॥ तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कही न सांडिसी । तुझेनि नामें, अपयशीं । दिशा लंघिजे! ॥८॥ तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजी रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिही लोकीं ॥९॥ तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवात-कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥१०॥ पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें! । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥११॥ तो तूं, कीं, आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख, रुदनातें । करितु आहासी!॥१२॥ विचारीं तूं अर्जुनु! । कीं, कारुण्ये किजसी दीनु! । सांग पां, अंधकारें भानु । ग्रासिला आथी?॥१३॥ नातरी, पवनु मेघासी बिहे? । कीं, अमृतासी मरण आहे? । पाहें पां, इंधनचि गिळोनि जाये । पावकातें?॥१४॥ कीं, लवणेंचि जळ विरे? । संसर्गे काळकूट मरे? । सांग पां, ‘महा’फणी, दर्दुरें । गिळिजे कायी?॥१५॥ सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला? । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥१६॥ म्हणौनि, अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना! । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥१७॥ सांडी हें मूर्खपण । उठी; घे धनुष्य-बाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें?॥१८॥ हां गा, तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां? । सांगें, “झुंजावेळे सदयता । उचित कायी?॥१९॥ हे असतांये कीर्तिसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशू” । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥२०॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥३॥

म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरी । हें शोच्यता अव्हेरी । पांडुकुमरा ॥२१॥ तुज नव्हे हे उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी तरी हित । विचारीं पां ॥२२॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज? ॥२३॥ तूं आधींचि काय नेणसी? । कीं हे गोत्रज नोळखिसी? । वायांिंच काय करिसी । अतिशो आतां?॥२४॥ आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज? । हें परस्परें तुम्हा व्याज । सदाचि आथी! ॥२५॥ तरी, आतां काय जाहलें? । कायि स्नेह उपनलें । हे नेणिजे; परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥२६॥ मोहो धरिलिया ऐसें होईल । जे-असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेसी ॥२७॥ हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ॥२८॥ एसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि; पांडुसुतु । काय बोले ॥२९॥


स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् । उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥१८॥

तेणे दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें ।नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥४९॥ अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र । अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥१५०॥ ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी । स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥५१॥ जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती । भरते केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥५२॥ तो तेणेंचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण । परी जाहले जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥५३॥ संनिहितप्रसूतिकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं । ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळी अतिसत्राणें ॥५४॥ धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं । देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळी दयाळुत्वें ॥५५॥ मृगी न येचि परतोन । मातृहीन हे अतिदीन । भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥५६॥ स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण । आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥५७॥ आसनीं भोजनी शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं । मृग न देखतां नयनीं । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥५८॥ ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेसीं । त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ॥५९॥ यालागीं साचचि जाण । ममतेपाशी असे मरण । जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥६०॥ भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे? । ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥६१॥ देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान । तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥६२॥ कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु । यालागी जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥६३॥ मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला । जो कृष्णस्मरणे निमाला । तो कृष्णुचि जाला देहांती ॥६४॥ अंतकाळी जे मती । तेचि प्राणियांसि जाण गती । यालागीं श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥६५॥ परी मृगदेही जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण । पूर्वी केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥६६॥ मागुता तिसरे जन्में पाहें । तो ‘जडभरत’ नाम लाहे । तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥६७॥ बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी । निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥६८॥ ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं । त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥६९॥

तेषां नव नवद्वीपपतयोऽस्य समन्ततः । कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥१९॥

नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती । एक्यायशी जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ॥१७०॥ उरले जे नव जण । सकळ भाग्याचे भूषण । ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥७१॥

नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः । श्रमणा वातरशना आत्मविद्याविशारदाः ॥२०॥

ऋषभकुळी कुळदीप । स्नेहसूत्रवीण देदीप्य । नवही जण स्वयें सद्रूप । सायुज्यस्वरूपप्रकाशक ॥७२॥ आत्माभ्यासी परिश्रम । करून निरसिलें कर्माकर्म । यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥७३॥ शाब्दबोधे सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत । शिष्यप्रबोधी समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥७४॥ तें ब्रह्मविद्येचे चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब । ते विद्येचे पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥७५॥ दशदिशा एकूचि दोरा । भरूनि पांघरुणे मुनीश्वरा ।वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरूप ॥७६॥ आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिहीं । ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरूण ॥७७॥ प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं । तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥७८॥ ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभावें । त्यांची सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥७९॥ ज्यांचें नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता । संसार नुधवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥१८०॥ त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती । ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चिती भाविकां ॥८१॥

कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥२१॥

कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख । आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥८२॥ एवं नवही नांवें जाण । यांचे करितां नामस्मरण । सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥८३॥ त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती । ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥८४॥

एते वै भगवद्रूपं विश्वं सदसदात्मकम् । आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥२२॥

ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्रूपं अवघे एक । संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥८५॥ त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा । संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥८६॥ जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें ।तंव भगवद्रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखें ॥८७॥ हेही देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें । होणें न होणे येणे जाणे । ही गिळूनि लक्षणे विचरती मही ॥८८॥

अव्याहतेष्टगतयः सुरसिद्धसाध्यगन्धर्वयक्षनरकिन्नरनागलोकान् । मुक्ताश्चरन्ति मुनिचारणभूतनाथविद्याधरद्विजगवां भुवनानि कामम् ॥२३॥

वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें । एवं श्लोकोक्त चवदा भुवनें । स्वइच्छा विचरणे कामनारहित ॥८९॥ त्यांसी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खुंटेना त्यांची गती । इच्छामात्रें गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥१९०॥

त एकदा निमेः सत्रमुपजग्मुर्यदृच्छया । वितायमानमृषिभिरजनाभेर्महात्मनः ॥२४॥

जेथे मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥९१॥ मही विचरतां वितंड । पातले ‘अजनाभ’ खंड । तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥९२॥ याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका । आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥९३॥ स्रुक्-स्रुवा-त्रिसंधानें । विस्तारूनि परिस्तरणें । अखंड वसुधारा दंडाप्रमाणे । ऋषिमंडणे होम करिती ॥९४॥ होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण । येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥९५॥

तान्दृष्ट्वा सूर्यसंकाशान्महाभागवतान्नृप । यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥२५॥

अमित सूर्यांचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्ठीं । तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥९६॥ त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा । जिहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥९७॥ ते भगवद्भाववैभव । भगवंताचें निजगौरव । भक्तीचे भाग जे नव । ते हे जाण सर्व मूर्तिमंत ॥९८॥ नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवनिधींचें निजसार । नवरत्नांचेही निजभांडार । ते हे साकार नवही जण ॥९९॥ की ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण । नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥२००॥ आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी । ते हे भागवती देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥१॥ येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती । साउमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥२॥ सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण । मस्तकी वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥३॥


१७१.करवितां व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्ध बुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जीवें राखे? ॥ध्रु॥ आपुलें देऊनि आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनियां ॥३॥ देऊनियां वेंच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥४॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥५॥
१७२.इनामाची भरली पेंठ । वाहाती दाट मारग ॥१॥ अवघेचि येती वाण। अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु॥ अडचणी केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥३॥ तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥४॥
१७३.वेदाचें गव्हर न कळे पाठकां। अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एकसरें भवसिंधु ॥ध्रु॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥३॥ तुका म्हणे विधिनिषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥४॥
१७४.विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसानीं अंतीं ॥ध्रु॥ बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥३॥ तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥४॥
१७५.येथींचिया अलंकारें । काय खरें पूजन? ॥१॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांठा ते ठायीं ॥ध्रु॥ येथींचिया नाशिवंतें । काय रितें चाळवूं? ॥३॥ तुका म्हणे वैष्णवजन । माझे गण समुदाय ॥४॥
१७६.उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥ बोलविले बोलें बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥३॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥४॥
१७७.बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडुनी ॥१॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंके तें ॥ध्रु॥ दुजें ऐसें कोण बळी? । जें या जाळी अग्नीसी ॥३॥ तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥४॥
१७८.बरें देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभें असतो मेलों ॥१॥ भलें केलें देवराया! । नाचे तुका लागें पायां ॥ध्रु॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥३॥ सेवा चुकतों संतांची । हेंचि नागवण फुकाची ॥४॥ गर्व होता ताठा । जातो यमपंथें वाटा ॥५॥ तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥६॥
१७९.दाता नारायण । स्वयें भोगितां आपण ॥१॥ आतां काय उरलें, वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें, खेळे ॥३॥ तुका म्हणे नाद । झाला अवघा गोविंद ॥४॥
१८०.कृपा करूनि देवा! । मज साच ते दाखवा ॥१॥ तुम्ही दयावंत कैसे? । कीर्ति जगामाजीं वसे ॥ध्रु॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥३॥ तुका म्हणे देवा! । माझा करावा कुढावा ॥४॥
१८१.ठायींची ओळखी । येईल टाकूं टाका सुखी ॥१॥ तुमचें जाईल इमान । माझें कपाळीं पतन ॥ध्रु॥ ठेविला तो ठेवा । अभिळाषें बुडवावा ॥३॥ मनीं न विचारा? । तुका म्हणे हे दातारा! ॥४॥
१८२.तुझें वर्म ठावें। माझ्या पाडियेलें भावें॥१॥ रूप, कासवीचे परी। धरूनि राहिलों अंतरीं ॥ध्रु॥ नेदी होऊ तुटी। मेळवीन दृष्टादृष्टी ॥३॥ तुका म्हणे देवा! । चिंतन हे तुझी सेवा ॥४॥
१८३.गहूं एक जाती। परि त्या पाधाणी नासिती ॥१॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय, थोडें फार ॥ध्रु॥ कमाईचें सार । जाती दाविती प्रकार ॥३॥ तुका म्हणे मोल । गुणा, मिथ्या फिके बोल ॥४॥
१८४.पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठीं ॥ध्रु॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥३॥ तुका म्हणे पापें । जाती, संतांचिया जपें ॥४॥
१८५.देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांठा आपुलाला ॥ध्रु॥ दाखविलें परि नाहीं वरिजिता । आला तोचि चित्ता भाग वरी ॥३॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळ बीजपात्र ॥४॥
१८६.शोधिसील मूळें। त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तंट ॥ध्रु॥ लौकिका बाहेरीं । घाली, रोखी जया धरी ॥३॥ तुका म्हणे गुण । तुझा लागलिया, शून्य ॥४॥
१८७.वैद्य वांचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा? ॥१॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु॥ अंगीं दैवत संचरे । मग तेथें काय उरे? ॥३॥ नवसें कन्या पुत्र होती । तरि कां करणें लागें पती? ॥४॥ जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥५॥

ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top