
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. ८१ ते १०२
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. २९८ ते २४५
- भक्ती-अर्पणभक्ती (२९८ ते ३०२)
- भक्ती व संसारभय (३०३ ते ३०८)
- भागवतधर्माचा (भक्तीचा) महिमा (३०९ ते ३१७)
- भागवतमहिमा (३१८ ते ३२९)
- भक्ती-विधिनिषेध (३३० ते ३४५)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. २१२ ते २२५
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. ८१ ते १०२
संजय उवाच
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप । न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥९॥
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे, “राया, तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले’ ॥८१॥ आइके, सखेदु बोले श्रीकृष्णाते । “आतां नाळवावें तुम्ही मातें । मी सर्वथा न झुंजे एथें । भरवसेनी’ ॥८२॥ ऐसें एकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखूनि तयातें ॥८३॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥१०॥
मग, आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायि आदरिलें येणें? । अर्जुन सर्वथा कांहीं नेणे! । काय कीजे?॥८४॥ हा उमजे आतां कवणेपरी! । कैसेनि धीरु स्वीकारी? । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥८५॥ नातरि, असाध्य देखोनि व्याधि । अमृतसम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानाची ॥८६॥ तैसे, विचारितु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥८७॥ तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥८८॥ कीं, औषधाचिया कडवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे; परी गुणीं । प्रगट होय ॥८९॥ तैसीं, वरिवरि पाहतां उदासें । आंत तरि अति-सुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥९०॥
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥११॥
मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें । जे-तुवां एथ आदरिलें । माझारीचि!॥९१॥ तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न सांडिसी । आणि शिकवूं म्हणों, तरी बोलसी । बहुसाल नीति ॥९२॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझें शहाणपण, तैसें । दिसतसें ॥९३॥ तूं आपणांतें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पाहसी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥९४॥ तरी, सांग पां, अर्जुना । तुजपासूिन स्थिति या त्रिभुवना? । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी?॥९५॥ एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांिंच काय बोलती । जगामाजी? ॥९६॥ हो कां, सांप्रत ऐसें जाहलें? । जे-हे जन्ममृत्यु तुवां सृजिले? । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी?॥९७॥ तूं भ्रमलेपणें अहंनकृती । यांसी घातु न धरिसी चित्तीं । तरी, सांगें, कायि हे होती । चिरंतन?॥९८॥ कीं, तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति, झणें चित्ता । येवो देसी ॥९९॥ अनादिसिद्ध हें आघवें । होत, जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें? । सांगें मज ॥१००॥ परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि, तूंिंच नीति सांगसी । आम्हांप्रति!॥१०१॥ देखें, विवेकी जे होती । ते दोहीतेही न शोचिती । जे, होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥१०२॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥१२॥
अर्जुना, सांगेन, आइक । एथ आम्ही, तुम्ही देख । आणि हे भूपति अशेष । आदिकरुनी ॥१०३॥ नित्यता ऐसेचि असोनी । नातरी, निश्चित क्षया जाऊनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥१०४॥ हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं, तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥१०५॥ जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण? कें जन्मलें? । म्हणों ये तेथ?॥१०६॥ तेंचि वायुचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी, आतां, काय निमालें? । विचारीं पां ॥१०७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. २९८ ते २४५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
भक्ती-अर्पणभक्ती (२९८ ते ३०२)
हे नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागी येथें देख । ‘कायेन वाचा’ हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥९८॥ दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण । हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें ‘भजन’ या नांव ॥९९॥ अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लावाव्या भगवद्भक्ती । ऐक राया तुजप्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥३००॥ ‘मनें’ करावें हरीचें ध्यान । ‘श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण । ‘जिव्हेनें’ करावें नामस्मरण । हरिकीर्तन अहर्निशीं ॥१॥ ‘करी’ करावें हरिपूजन । ‘चरणीं’ देवालयगमन । ‘घाणी’ तुलसीआमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पूजिले ॥२॥
भक्ती व संसारभय (३०३ ते ३०८)
नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थे अभ्यंतरीं । हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दुरी भवभय पळे ॥३॥ वाढतेनि सद्भावें जाण । चढतेनि प्रेमें पूर्ण । अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥४॥ सकल भयांमाजी थोर । भवभय अतिदुर्धर । तेंही हरिभक्तीसमोर । बापुडे किंकर केवीं राहे ॥५॥ करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण । तेथें भवभयाचे तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥६॥ जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती । परम निर्भय भगवद्भक्ती । आमुच्या मतीं निजनिश्चयो ॥७॥ कृतनिश्चयो आमुचा जाण । येथे साक्षी वेद-शास्त्र-पुराण । सर्वात्मना भगवद्भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥८॥
भागवतधर्माचा (भक्तीचा) महिमा (३०९ ते ३१७)
असो वेद शास्त्र पुराण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण । मी सर्वथा भक्तिआधीन । भक्तिप्रधान भगवद्वाक्य ॥९॥ उभवूनियां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया । ‘भक्त्याहमेकया ग्राह्यः’ । बोलिला लवलाह्यां श्रीकृष्ण ॥३१०॥
ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये । अञ्जः पुंसामविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥३४॥
न करितां वेदशास्त्रव्युत्पत्ती । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती । सुगम जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥११॥ न करितां वेदशास्त्रपठण । जड मूढ म्हणाल तरले कोण । उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परीक्षितीचें ॥१२॥ अंबरीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण । ‘अहं भक्तपराधीनः’ । स्वमुखें नारायण बोलिला ॥१३॥ वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्भक्तीं । अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जांबवती भक्तीस्तव वरिली ॥१४॥ जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ । तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥१५॥ शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृष्णप्रीती । गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥१६॥ न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । अबळें तरावया निश्चितीं । भगवंतें निजभक्ति प्रगट केली ॥१७॥
भागवतमहिमा (३१८ ते ३२९)
तें हें राया भागवत जाण । मुख्यत्वें भक्तिप्रधान । भावें करितां भगवद्भजन । अज्ञान जन उद्धरती ॥१८॥ हे भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे । भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण केली ॥१९॥ भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें । त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥३२०॥ स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनियां ये नावे । एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥२१॥ जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें । स्वबोधाचेनि पाणीढाळे । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥२२॥ वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूंकडे । विषयांचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे काढिती कांठा ॥२३॥ संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा । वेंचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥२४॥ तेथ गुरुवचन साचोकारें । सांभाळीत उणेपुरें । भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥२५॥ तंव एकाएकी एकसरी । काढिली परात्परतीरीं । तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारी खुंटली ॥२६॥ येथ धरिला पुरे भावो । तैं बुडणेंचि होय वावो । मग ठाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥२७॥ येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें । सुखोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥२८॥ भागवतधर्माचिये स्थिती । बाळी भोळी भवाब्धि तरती । सुखोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थी विशद सांगे ॥२९॥
भक्ती-विधिनिषेध (३३० ते ३४५)
यानास्थाय नरो राजन्न प्रमाद्येत कर्हिचित् । धावन्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥३५॥
जो श्रुतिस्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा । त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥३३०॥ सद्भावेंसी सप्रेम । आचरितां भागवतधर्म । बाधू न शके कर्माकर्म । भावें पुरुषोत्तम संतुष्ट सदा ॥३१॥ श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे । तेही हरिभजनीं धांवतां भावबळें । पडे ना आडखुळे सप्रेमयोगें ॥३२॥ प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन । प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥३३॥ माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झांकूनि धांवे । ते धांवेसवें झेंपावे । अति सद्भावें निजमाता ॥३४॥ तैसा सप्रेम जो भजे भक्तु । त्या भजनासवें भगवंतु । भुलला चाले स्वानंदयुक्तु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥३५॥ ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म । कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजीं ॥३६॥ ऐसा भागवतधर्मे गोविंदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु । तेथें केवीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु कदा न बाधी ॥३७॥ जेवीं का स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा । तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधू न शके ॥३८॥ ज्यासी भगवद्भजनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु । देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सुखावे ॥३९॥ भागवतधर्मे राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुषोत्तम । सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥३४०॥ कर्म करूं पावे प्रमादु । तंव प्रमादी प्रगटे गोविंदु । यालागी विधिनिषेधु । न शकती बाधूं हरिभक्तां ॥४१॥ अजामिळा कर्मबाध । यमपाशी बांधितां सुबद्ध । तेथें प्रगटोनि गोविंद । केला अतिशुद्ध नाममात्रे ॥४२॥ स्वधर्म-कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करूनी । जो पहुडे भजनसुखासनीं । तो पडे तैं दंडणी स्वधर्म-कर्मा ॥४३॥ भजनप्रतापसत्तालक्षणे । स्वधर्मकर्मा ऐसें दंडणें । वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणे कर्माची ॥४४॥ एवं भागवतधर्मे जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचे रंक । तें राहों न शके त्यांसन्मुख । मा केवीं बाधक हों शकेल ॥४५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. २१२ ते २२५
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





