दिवस – २२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥

परी, एकचि कुडे करिती । जे-स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥२५०॥ जैसा कर्पुराचा राशी कीजे । मग अग्नि लाउनि दीजे । कां, मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥५१॥ दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा, नासिती धर्मु, निपजला । हेतुकपणें ॥५२॥ सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे? । परी, नेणती ते, काय कीजे? । अप्राप्त देखें ॥५३॥ जैसी रांधवणी रससोय निकी- । करूनियां, मोलें विकी । तैसा, भोगासाठीं, अविवेकी । धाडिती धर्मु! ॥५४॥ म्हणोनि, हे पार्था । दुर्बुद्धि, देख, सर्वथा । तया वेद-वाद-रतां । मनीं वसे ॥५५॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥

त्रिहीं गुणीं आवृत । हे वेद जाणें निभ्रांत । म्हणौनि, उपनिषदादि समस्त । सात्त्विक तें ॥५६॥ येर रज-तमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्ग-सूचक । धनुर्धरा ॥५७॥ म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगो देसी! ॥५८॥ तूं गुणत्रयातें अव्हेरी । मी, माझें, हें न करी । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ॥५९॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥

जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्ही, आपण हित आपुलें । तेचि घेपें ॥२६०॥ जैसा, प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेहि काय चालिजती? । सांगें मज ॥६१॥ कां, उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असे महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तिचिजोगें ॥६२॥ तैंसें, ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥६३॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥

म्हणोनि, आइकें पार्था । याचि परी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥६४॥ आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जें-न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥६५॥ परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मु संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥६६॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥

तूं योगयुक्त होऊनि । फळाचा संगु टाकुनी । मग, अर्जुना, चित्त देऊनी । करीं कर्म ॥६७॥ परी, आदरिलें कर्म, दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥६८॥ कीं, निमित्तें कोणें एकें । तें सिद्धि न वचतांचि ठाके । तरी तेथियेनि अपरितोषें । क्षोभावें ना ॥६९॥ आचरतां सिद्धि गेलें । तरी काजाची कीर आलें! । परी, ठेलियाही “सगुण जाहलें” । ऐसेंचि मानी ॥२७०॥ देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी, परिपूर्ण सहजें । जाहालें, जाणें ॥७१॥ देखें संतासंतीं कर्मीं । हें जें सरिसेपण मनोधर्मी । तेचि योगस्थिति, उत्तमीं । प्रशंसिजे ॥७२॥


मध्यम भक्त (६५० ते ६५२)

ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च । प्रेममैत्रीकृपोपेक्षा यः करोति स मध्यमः ॥४६॥

ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद्भक्त मानी मध्यम । अज्ञान ते मानी अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥६५०॥ ईश्वरीं ‘प्रेम’ पवित्र । भक्तांसी ‘मैत्री’ मात्र । अज्ञानी तो कृपापात्र । ‘उपेक्षा’ निरंतर द्वेषियांची ॥५१॥ हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रीतीं । आतां ‘प्राकृत’ भक्तांची स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥५२॥

प्राकृत भक्त (६५३ ते ६५५)

अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते । न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥४७॥

पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो । भक्त-संत सज्जनांसी पहा वो । अणुमात्र देहो लवों नेदी ॥५३॥ ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण । त्यांसी स्वप्नीही नाही सन्मान । यापरी भजन प्राकृताचें ॥५४॥ ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मुख्य ‘प्राकृतु’ । प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चितु देवाचा ॥५५॥

विषयी अनासक्त-उत्तम भक्त (६५६ ते ६६३)

यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयुक्त । परी उत्तमांची लक्षणे अद्भुत । ती सांगावया चित्त उदित माझें ॥५६॥

गृहीत्वापीन्द्रियैरर्थान्यो न द्वेष्टि न हृष्यति । विष्णोर्मायामिदं पश्यन्‌ स वै भागवतोत्तमः ॥४८॥

इंद्रियें विषयांतें सेविती । परी सुखदुःख नुमटे चित्तीं । विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चिती उत्तम भक्त ॥५७॥ मृगजळी जेणे केलें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण । तेवीं भोगी ज्यांसी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ॥५८॥ ‘उत्तम भक्त विषय सेविती’ । हा बोलु रूढला प्राकृतांप्रती । त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥५९॥ स्वप्नींचे केळे रायभोगें । जागा होऊनि खावों मागे । तेणें हातु माखे ना तोंडी लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥६६०॥ येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण । येथ प्रारब्ध बळी पूर्ण । तें अवश्य जाण भोगवी ॥६१॥ परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नुमटे कथा । यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥६२॥ यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं । याहूनि अगाध स्थिती । सांगेन तुजप्रती ते ऐक ॥६३॥

संसारभ्रमनिरास-उत्तम भक्त (६६४ ते ६७२)

देहेन्द्रियप्राणमनोधियां यो जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रै: । संसारधर्मैरविमुह्यमानः स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥४९॥

देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण । हेंचि बंधाचें पंचायतन । क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥६४॥ या पांचां स्थानी अपार श्रम । या नांव म्हणिजे ‘संसारधर्म’ । निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥६५॥ क्षुधा लागलिया दारुण । अन्नआकांक्षं पीडे प्राण । भक्तां क्षुधेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥६६॥ भावें करितां भगवद्भक्ती । क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती । एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चिती डंडळतीना ॥६७॥ मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं । आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणी असेना ॥६८॥ मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती । ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥६९॥ देहबुद्धीमाजी जाणा । नानापरी उठती तृष्णा । ते बुद्धि निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपूर्णा विनटली स्वयें ॥६७०॥ जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण । तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपूर्ण पूर्णामाजीं ॥७१॥ यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद्भक्त । इंद्रियक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥७२॥

इंद्रियक्लेशनिर्मुक्ती (६७३ ते ६७९)

मुख्य कष्टाचे अधिष्ठान । इंद्रियकर्मी राया जाण । ते इंद्रियकर्मी ब्रह्मस्फुरण । हरिभक्तां पूर्ण हरिभजनें ॥७३॥ दृष्टीने घेऊं जातां ‘दर्शन’ । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण । श्रवणीं ‘शब्द’ घेतां जाण । शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तु ॥७४॥ घ्राणी घेतां नाना ‘वासु’ । वासावबोधे प्रगटे परेशु । रसना सेवी जो जो रसु’ । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥७५॥ देही लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृदु-कठिण । तेथें ‘स्पर्श’ज्ञाने जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें ॥७६॥ आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती । घेणे देणे गमनस्थिती । इंद्रियां गती आत्मारामें ॥७७॥ ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टी होय निजसुख प्रगट । तेणें इंद्रियां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥७८॥ जेणे इंद्रियां कष्ट होती । तेणेंचि इंद्रियां सुखप्राप्ती । हे भगवद्भजनी निजयुक्ती । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥७९॥

अहंतानिर्मुक्ती (६८० ते ६९१)

जन्म आणि मरण । हे देहाचे माथां जाण । भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरूप जाहले ॥६८०॥ यालागीं देहाची अहंता । कदा नुपजे भगवद्भक्तां । ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥८१॥ देह धरिल्या पंचानने । भक्त न डंडळी जीवें प्राणे । वंध्यापुत्र सुळी देणें । देहाचे मरणे तेवीं देखे ॥८२॥ छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चिंतीना जीवीं । तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी सद्भावी लोभ भक्तां ॥८३॥ देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नुमटे चित्तीं । जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥८४॥ जननीजठरी देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला । रवि थिल्लरी प्रतिबिंबला । थिल्लर मी जाहला कदा न म्हणे ॥८५॥ सायंप्रातः सूर्य प्रकाशे । अभ्रीं गंधर्वनगर आभासे । देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां केलें ऐसें स्फुरेना ॥८६॥ भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचे स्मरण । यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पूर्ण पूर्णत्वें उरे ॥८७॥ थिल्लरा समूळ नाशु झाला । तरी रवि न म्हणे मी निमाला । तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद्रूपें संचला हरिस्मरणें ॥८८॥ आधी काय सर्प मारावा । मग दोरातें दोरु करावा । तो न पालटतां निजगौरवा । दोरूचि अघवा दोररूपें ॥८९॥ तेवी हरिभक्तां देहाचा अभावो । मा काळ कवणा घालील घावो । आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हां ॥६९०॥ इत्यादि संसारदेहधर्म । ज्यासी स्पर्शो न शके कर्माकर्म । मोहे नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥९१॥

निष्कामता-उत्तम भक्त (६९२ ते ६९९)

राया आणिकही एक खूण । तुज मी सांगेन संपूर्ण । ज्याचा काम होय नारायण । तें भक्तलक्षण अवधारीं ॥९२॥

न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः । वासुदेवैकनिलयः स वै भागवतोत्तमः ॥५०॥

हृदयीं चिंतितां आत्माराम । तद्रूप जाहला हृदयींचा काम । त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे ॥९३॥ तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडकल्या हरिसुखासी । एवं वासना जडल्या हरिरूपाशीं । हरि आश्रयों त्यांसी दृढ जाहला ॥९४॥ तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु । वासनेचा निजसंभ्रमु । पुरुषोत्तमु स्वयें होये ॥९५॥ जगी हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम । चाळितां वासना-अनुक्रम । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥९६॥ ग्रासोग्रासी रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । भक्त भोगी मुक्तपण । या रीती जाण विदेहा ॥९७॥ ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजी श्रेष्ठ । त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥९८॥ उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्तांची विचरणस्थिती । ते सांगितली राया तुजप्रती । यथानिगुती ती श्लोकीं ॥९९॥


३०७.गातों, भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥ परि तूं पतितपावन । करीं साच हे वचन ॥ध्रु॥ मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥३॥ तुका म्हणे दावीं वेष । तैसा अंतरीं नाहीं लेश॥४॥
३०८.द्रव्य असतां धर्म न करी । नागवला राजद्वारीं ॥१॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां? ॥ध्रु॥ कथाकाळी निद्रा लागे । कामी श्वानापरी जागे ॥३॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासींचे घेऊनि निजे ॥४॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनि हीन ॥५॥
३०९.मुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ॥१॥ ऐशियाची करितां सेवा । काय सुख होय जीवा? ॥ध्रु॥ पोटासाठी संत । झाले कलींत बहुत ॥३॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणीं ॥४॥
३१०.एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ॥१॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें वोस पाडिलें ॥ध्रु॥ अनुतापें स्नानविधि । यज्ञ सिद्धि देहहोम ॥३॥ जीवशिवा होता चुका । तेथें तुका विनटला ॥४॥
३११.त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमुचे त्या काई असेल ओझें? ॥ध्रु॥ पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चारा कोण घाली? ॥२॥ पक्षी अजगर न करी संचित। तयासी अनंत प्रतिपाळी॥३॥ तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥४॥
३१२.करा नारायणा! । माझ्या दु:खाची खंडणा ॥१॥ वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु॥ पाळोनियां लळा। आतां पाववावें फळा ॥३॥ तुका म्हणे दीन । त्याचा हरतिया शीण ॥४॥
३१३.दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामसंकीर्तनें ॥१॥ हें कां करूं आदरिलें । खोटे वचन आपुलें ॥ध्रु॥ तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥३॥ तुका म्हणे सेवा । कळिकाळा जिंकी देवा! ॥४॥
३१४.मी तो दीनाहूनि दीन । माझा तुज अभिमान ॥१॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु॥ दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावें आपुल्या नांवा ॥३॥ तुका म्हणे आतां । भले नव्हे मोकलितां ॥४॥
३१५.नाहीं दुकाळलों अन्ना। परि या मान जनार्दना ॥१॥ देव केला सकळसाक्षी । काळी आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु॥ भोगी भोगविता । बाळासवें तोचि पिता ॥३॥ कर्म अकर्म जळालें । प्रौढ तुका तें उरलें ॥४॥
३१६.काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत रहावें कोण्या बळें? ॥१॥ कोपला पाटील गांवींचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज? ॥ध्रु॥ आतां ‘येणें चवी सांडिली’ म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥३॥ भले लोकीं याची सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥४॥ तुका म्हणे यांचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥५॥
३१७.संत मागे पाणी नेदी एक चूळी। दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥१॥ संतांसी देखोनि होय पाठीमोरा। दासीचिया पोरा चुंबन देतो ॥२॥ संतांसी देखोनि करितो टवाळ्या। भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥३॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका। जातो यमलोका भोगावया ॥४॥
३१८.आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥ गातो तेंचि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ध्रु॥ झाले लोभाचे मांजर। पोट भरी दारोदार ॥३॥ वायां गेलें तें भजन । उभ-यतां लोभी मन ॥४॥ बहिरे मुके एके ठायीं । तैसें झालें तया दोहीं ॥५॥ माप आणि गोणी । तुका म्हणे रिती दोन्हीं ॥६॥
३१९.विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥ विठ्ठला रे तूं उदाराचा रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळ सिद्धि ॥ध्रु॥ विठ्ठला रे तुझें नाम बहू गोड । विठ्ठला तूं कोड पुरविसी ॥३॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागले ध्यान मनीं ॥४॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥५॥ विठ्ठला रे शोक करितसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥६॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top