
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. २७३ ते२९३
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. ७०० ते ७६१
- निरहंकारता-उत्तम भक्त (७०० ते ७२१)
- देव भक्ताचे रक्षण करतो (७२२ ते ७२७)
- अद्वैतभक्ती-उत्तमभक्ती (७२८ ते ७४२)
- निरपेक्षता–उत्तम भक्त (७४३ ते ७६१)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ३२० ते ३३६
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. २७३ ते२९३
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय । बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥
अर्जुना, समत्व चित्ताचें । तेचि सार जाणें योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥७३॥ तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें, पार्था । दिसे हा अरुता । कर्मयोगु ॥७४॥ परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें, कर्म-शेष सहजें । योगस्थिति ॥७५॥ म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनें करी अव्हेरु । फळहेतूचा ॥७६॥ जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभय-बंधी सांडिलें । पापपुण्यां ॥७७॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥७८॥ मग, निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥७९॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥२८०॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥८१॥ तेथ आणीक कांहीं जाणावें । कां, माघिलातें स्मरावें । हें, अर्जुना, आघवें । पारुषेल ॥८२॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥
इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं॥८३॥ समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥८४॥
अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥
तेथ अर्जुन म्हणे “देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन; आतां सांगावा । कृपानिधी’ ॥८५॥ मग अच्युत म्हणे “सुखें । जें किरीटी, तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि’ ॥८६॥ या बोला पार्थें । म्हणितलें “सांग’ पां श्रीकृष्णातें । “काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें? । वोळखों केवीं?॥८७॥ आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥८८॥ तों कवणें स्थिती असे? । कैसेनि रूपें विलसे? । देवा, सांगावें हें ऐसें! । लक्ष्मीपती’ ॥८९॥ तंव, परब्रह्म-अवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो, काय तेथ, श्रीनारायणु । बोलतु असे ॥२९०॥
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥
म्हणे “अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करितु असे ॥९१॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु । परी विषयामाजी पतितु । जेणें संगें कीजे ॥९२॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञ होये । पुरुष, जाणें’ ॥९३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ७०० ते ७६१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
निरहंकारता-उत्तम भक्त (७०० ते ७२१)
उत्तम भक्त कोणे लिंगेसीं । आवडते जाहले भगवंतासी । तें लक्षण सांगावयासी । अतिउल्हासी हरि बोले ॥७००॥
न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः । सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे वै स हरेः प्रियः ॥५१॥
प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन । पालटे अभिमानाचे चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥७०१॥ ‘अहं देह’ हे समूळ मिथ्या । ‘अहं नारायण’ हे सत्य तत्त्वतां । ऐशी भावना दृढ भावितां । ते भावनाआंतौता अभिमान विरे ॥२॥ अभिमान हरिचरणी लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान । तेंचि निरहंतेचे लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥३॥ निरहंकाराची लक्षणे । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे । सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोने श्वान हों नेणे तदाकारे असतां ॥४॥ तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो । कर्मक्रियेचा निर्वाहो । ‘अहंकर्ता’ स्वयमेवो मानीना ॥५॥ तो कर्म करी परी न म्हणे ‘मी कर्ता’ । जेवीं गगनीं असोनि सविता । अग्नि उपजवी सूर्यकांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥६॥ सूर्ये सूर्यकांती अग्निसंग । तेणें होतु याग का दाघ । तें बाधूं न शके सूर्याचे अंग । तेवीं हा चांग करूनि अकर्ता ॥७॥ अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्मे चुंबक न मैळे । तेवीं हा कर्मे करूनि सकळे । अनहंकृतिबळें अकर्ता ॥८॥ देहींची कर्मे अदृष्टे होती । मी कर्ता म्हणतां ती बाधती । भक्तां सर्व कर्मी अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥९॥ एवं देहींची कर्मे निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता । कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥७१०॥ जरी जाहला उत्तम वर्ण । तरी तो न म्हणे ‘मी ब्राह्मण’ । स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । ‘मी लोहीवा पूर्ण’ स्फटिक न म्हणे ॥११॥ ज्यासी नाहीं देहाभिमान । तो हातीं न धरी देहाचा वर्ण । तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥१२॥ अंगी बाणला संन्यासु । परी तो न म्हणे ‘मी परमहंसु’ । जेवीं नटाअंगीं राजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥१३॥ तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा । तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥१४॥ जाति उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक । जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥१५॥ तेवीं जन्म-कर्म-वर्णाश्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती । चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥१६॥ आशंका॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष सांडिती । त्यांत असोनि नाहीं अहंकृती । ते हे उपपत्ति बोलिलों राया ॥१७॥ तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती । जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी॥१८॥ ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती । वाढवितां वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥१९॥ ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती । सोडूं नेणे गा कल्पांतीं । सज्ञान ठकिजेती निजाभिमानें ॥७२०॥ येथे भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्भक्तीं । ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥२१॥
देव भक्ताचे रक्षण करतो (७२२ ते ७२७)
समूळ देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे । ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥२२॥ ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें । त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥२३॥ तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें तेउता ठाये । भक्त जेउती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥२४॥ त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढे मागें । त्यासभोवता सर्वांगें । भक्तीचेनि पांगें भुलला चाले ॥२५॥ निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें । जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥२६॥ एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं । जरी हा मजसी आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासी मग करावी ॥२७॥
अद्वैतभक्ती-उत्तमभक्ती (७२८ ते ७४२)
कोणासी पाहों कृपादृष्टी । कोणापें सांगों निजगोष्टी । कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥२८॥ या काकुळतीं श्रीअनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु । मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥२९॥ एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं । हेंचि निरूपण वेदांतीं । ‘अद्वैतभक्ति’ या नांव ॥७३०॥ त्यांसी चहूं भुजी आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता । मग रिघोनियां आंतोता । परमार्थता आलिंगी ॥३१॥ ऐसें खेवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं । मग आपण त्याआंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥३२॥ नवल आवडीचा निर्वाहो । झणीं यासी लागे काळाचा घावो । यालागी निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥३३॥ ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजी उत्तमोत्तम । यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥३४॥ ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समूळ नुरे वार्ता । हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥३५॥
न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा । सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥५२॥
अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें । ज्यांसी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥३६॥ यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं । तेथ माझें तुझें हें कांहीं । तें निमाले पाहीं जेथींच्या तेथें ॥३७॥ जेवीं अग्नीशी जें जें टेंके । तें तें अग्नीचि होऊनि ठाके । तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरूप होये ॥३८॥ निजवित्त आणिकापाशी देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता । न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥३९॥ डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां । येथे कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥७४०॥ आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं । यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥४१॥ ऐशिया निजसमशांतीं । भगवद्भक्त क्रीडा करिती । यालागी उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चिती पावले ॥४२॥
निरपेक्षता–उत्तम भक्त (७४३ ते ७६१)
हरिभक्तांची ‘निरपेक्षता’ । ऐक सांगेन नृपनाथा । उत्तम भक्तांची सांगतां कथा । अतिउल्हासता हरीसी ॥४३॥ निरपेक्ष तो मुख्य ‘भक्त’ । निरपेक्ष तो अति ‘विरक्त’ । निरपेक्ष तो ‘नित्यमुक्त’ । सत्य भगवंत निरपेक्षी ॥४४॥
त्रिभुवनविभवहेतवेऽप्यकुण्ठस्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् । न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥५३॥
सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणी ठेविली चित्तवृत्ती । निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीती निजनिष्ठा ॥४५॥ तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरूं प्रार्थिती । तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी॥४६॥ क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता । एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥४७॥ हरिचरणीं अपरोक्षस्थिती । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती । त्यापुढे त्रिभुवनविभवसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥४८॥ सकळ जगाचा स्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां । त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणी ज्याचे ॥४९॥ त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥७५०॥ त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं । अहर्निशी हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥५१॥ सहसा न पवे हरिचरण । यालागी ब्रह्मा साभिमान । तेणें अभिमानेंचि जाण । नेली चोरून गोपाल-वत्सें ॥५२॥ तेथें न कष्टतां आपण । न मोडतां कृष्णपण । गोपाल-वत्से जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥५३॥ अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण । तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥५४॥ कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं । तोही निजराज्य सांडोनी । महाश्मशानी हरिचरण चिंती ॥५५॥ कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं । हरिचरण हृदयामाझारी । शिव निरंतरी चिंतीत ॥५६॥ एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार । तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥५७॥ हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती । भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निबलोण ॥५८॥ हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी । तें त्रैलोक्य-वैभवाच्या कोडी । करी कुरवंडी निजभक्त भावें ॥५९॥ एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाही येथे । यालागी चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदीं ॥७६०॥ निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण । ते वैष्णवांमाजी अग्रगण । राया ते जाण – ‘उत्तम भक्त’ ॥६१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ३२० ते ३३६
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





