दिवस – २६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥६५॥

देखें, अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाही समस्तां । संसारदुःखां ॥३८॥ जैसा अमृताचा निर्झरू । प्रसवे जयाचा जठरू । तया क्षुधातृषेचा अडदरू । कहींचि नाहीं ॥३९॥ तैसें, हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैंचें? कें आहे? । तेथ अपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥३४०॥ जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूषु । योगयुक्तु ॥४१॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६॥

ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । तो आकळिला जाण, गुणीं । विषयादिकीं ॥४२॥ तया, स्थिरबुद्धि, पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे!॥४३॥ निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि, देखें, मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय?॥४४॥ जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥४५॥ देखें, अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडो शके ॥४६॥ म्हणौनि, अयुक्तपण मनाचें । तेचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥४७॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥६७॥

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषय-सिंधु ॥४८॥ जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही; मागौता । अपावो पावे ॥४९॥ तैसें, प्राप्तेंहि पुरुषें । इंद्रियें लाळिली जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण, दुःखें । सांसारिकें ॥३५०॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥

म्हणौनि, आपुलीं आपणोयां । जरी इंद्रियें येती आया । तरी अधिक, कांहीं धनंजया । सार्थक असे?॥५१॥ देखें, कूर्म जियापरी । उवाइला; अवयव पसरी । नातरी, इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥५२॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा, जाण, स्थिती । पातली असे ॥५३॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥

आता, आणीक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना, तुज सांगेन । परिस पां ॥५४॥ देखें, भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेइलें । तेथ निद्रितु जो ॥५५॥ तोचि तो निरुपाधि । अर्जुना, तो स्थिरबुद्धि । तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर॥५६॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं, समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् । तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे, स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७०॥

पार्था, आणीकही परी । तो जाणों येईल; अवधारीं । जैसी अक्षोभता सागरी । अखंडित ॥५७॥ जर्‍ही सरितावोध समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तर्‍ही अधिक नोहे; ईषत्- । मर्यादा न संडी ॥५८॥ नातरी, ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता । परी न्यून नव्हे; पार्था । समुद्रु जैसा ॥५९॥ तैसा, प्राप्ती ऋद्धिसिद्धि । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी । आणि, न पवतां; न बाधी । अधृति तयातें ॥३६०॥ सांगें, सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय वातीवरी? । कां, न लविजे, तरी अंधारी । कोंडेल तो?॥६१॥ देखें, ऋद्धि-सिद्धि तयापरी । आली-गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥६२॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें “पाबळें!’ म्हणे । तो केवी रंजे पालिवणें । भिल्लांचेनि?॥६३॥ जो अमृताते ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥६४॥ पार्था, नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं । तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती?॥६५॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥

ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञ भला । वोळख तूं ॥६६॥ तो अहंकाराते दवडूनी । सकळ कामु सांडोनी । विचरे विश्व होऊनी । विश्वाचिमाजी ॥६७॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥७२॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्य-योगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥

हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभविती निष्काम । ते पातले परब्रह्म । अनायासें ॥६८॥ जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीचि व्याकुळता । आड ठाकों न सके चित्ता । प्रज्ञा जया ॥६९॥ तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत, अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥३७०॥ ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें । “आतां आमुचियाचि काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥७१॥ जें, कर्मजात आघवें । एथ निराकरिलें देवें । तरी, पारुषलें म्यां झुंझावें । म्हणौनियां’ ॥७२॥ ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरू उवाइला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ॥७३॥ तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु । कीं, विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥७४॥ जो आपण सर्वज्ञनाथु । निरु पिता होईल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥३७५॥

॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥

अन्तरिक्ष उवाच
एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज । ससर्जोच्चावचान्याद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धये ॥३॥

अंतरिक्ष म्हणाले – (मायेचे स्वरूप सांगणे शक्य नसल्याने मायाकार्य सांगतात.) हे आजानुबाहो. सर्वांचे उपादान कारण असा जो परमात्मा त्याने, आपल्या उपासकाला आत्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून, प्रथमच पंचमहाभूतेव त्यांपासून लहानमोठी शरीरे निर्माण केली. ॥३॥

अंतरिक्ष म्हणे राया । तुवां पुशिली हरीची माया । तो प्रश्नचि गेला वायां । बोलणें न ये आया बोलक्याचे ॥३२॥ वंध्यापुत्राचा जन्मकाल । रायें आणविला तत्काल । राशिनक्षत्र-जाति-कुल । सांगों जातां विकल वाचा होय ॥३३॥ मृगजळाची पव्हे बरवी । गंधर्वनगरी घालावी । वारा वळूनि सूत्रस्वभावीं । वाती लावावी खद्योततेजें ॥३४॥ निजच्छायेचें शिर फोडा । आकाशाची त्वचा काढा । शिंपी आंधारु खरवडा । बागुलाचा रांडवडा निजशस्त्रे कीजे ॥३५॥ वांझेचे सुने पुत्र झाला । तेथ भीष्मस्त्रियेसी पान्हा आला । तेणें पयःपानें तो मातला । घरभंगु केला दिगंबराचा ॥३६॥ जाती लहान दळावा वारा । अश्वशृंगें आकाश चिरा । नपुंसकाची नातोंडे घरा । सूर्योदयीं अंधारा लपों आलीं ॥३७॥ गुंजेचे निजतेजें दिवी । हनुमंतलग्नी लावावी । या सोहळियालागी विकावी । वोसगांवीं निजच्छाया ॥३८॥ आकाशाची सुमनें । सुवासें की वासहीनें । हे विवंचिती जे देखणे । ते मायेचे सांगणे सांगोत सुखें ॥३९॥ एवं मायेचें जें बोलणें । तें सांगतांचि लाजिरवाणे । नुपजत्याचे श्राद्ध करणें । तैशी सांगणे महामाया ॥४०॥ ‘माया’ म्हणवी येणे भावें । जे मी कदा विद्यमान नव्हें । यालागी ‘अविद्या’ येणें नांवें । वेदानुभवें गर्जती शास्त्रे ॥४१॥ भ्रम तो मायेचें निजमूळ । भ्रांति हेचि फूल सोज्ज्वळ । भुली तें इचे साजुक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥४२॥ हे नसतेनि रूपें रूपा आली । सत्यासत्ये गरोदर जाहली । तेथें असत्याची पिलीं । स्वयें व्याली असंख्य ॥४३॥ वासनाविषयगुणीं । गुंफिली मिरवे वेणी । मीपणाच्या तरुणपणीं । मदनमोहिनी चमके ॥४४॥ मृगजळींच्या मुक्ताफळीं । मस्तकी बाणली जाळी । गगनाच्या चांपेकळी । मिरवे वेल्हाळी अतिसौंदर्ये ॥४५॥ रज्जुसर्पमाथ्याचा मणी । काढूनि लेइली ते लेणीं । शुक्तिकारजत-पैंजणीं । चाले रुणझुणी खळखळत ॥४६॥ शशविषाणपादुका । लेऊनि ते चाले देखा । तिसी तो ‘अहंकारु’ सखा । अतिनेटका ज्येष्ठपुत्र ॥४७॥ कुळविस्तारालागी पाहीं । ‘ममता’ व्याली ठायी ठायीं । ‘मोहो’ उपजवूनि देहीं । घरजांवयी त्या केला ॥४८॥ अहंमोहममतायोगें । जग विस्तारले अंगें । स्थूळ सबळ प्रयोगें । ममता निजअंगें वाढवी ॥४९॥ संकल्पविकल्पांची कांकणे । बाणोनि ‘मन’ दिधलें आंदणें । घालोनि त्रिगुणाचे ठाणे । माया पूर्णपणे थोरावे ॥५०॥ ऐशी मिथ्या मूळमाया । वाढली दिसे राया । ते कैसेनि ये आया । सांगावया अनिरूप्य ॥५१॥ ‘संत’ म्हणों तरी ते नासे । ‘असंत’ म्हणों तरी आभासे । आधी असे पाठी नासे । ऐसीही नसे निजांगें ॥५२॥ जैसे मृगजळाचें ज्ञान । दिसे तरी तें मिथ्या पूर्ण । तैसें आभासे भवभान । ते माया जाण नृपनाथा ॥५३॥ श्रुतिशास्त्रां मायामाग । पुसतां आरोगिती मूग । मायेसी साचाचे अंग । पाहतां चांग दिसेना ॥५४॥ मृगजळाची महानदी । कोण गिरिवर उद्बोधी । हे सांगावया नाकळे बुद्धी । तेवीं मायासिद्धी अनिर्वाच्य ॥५५॥ आरसां काय प्रतिबिंब असे । जो पाहे तोचि आभासे । तेवीं आपुलेनि संकल्पवशे । माया उल्हासे नसतीचि ॥५६॥ रज्जुसर्प जीत धरिला । त्याचे कौतुक पाहों चला । ऐसे बोलती जे बोला । ते मायेचा सोहळा सांगोत सुखें ॥५७॥ उडवों जातां आपुली छाया । सर्वथा न उडवे ज्याची तया । तेवीं तरतां दुस्तर माया । जाण राया निश्चितीं ॥५८॥ अग्निसंकल्पु सूर्यी नसे । शेखीं सूर्यकांतीही न दिसे । तळी धरिलेनि कापुसें । अग्नि प्रकाशे तद्योगें ॥५९॥ तेवीं शुद्ध ब्रह्मीं संकल्पु नाहीं । शेखी न दिसे केवळ देहीं । माझारी वासनेच्या ठायीं । देहाभिमानें पाहीं संसारु भासे ॥६॥ जागृतिदेहाचा विसरु पडे । सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे । तेणें मिथ्या प्रपंच वाढे । स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने ॥६१॥ सुषुप्ती देहाचा असंभवो । तेथ नाहीं भवभावो । जन्ममरण तेंही वावो । संसारसंभवो देहाभिमानें ॥६२॥ तेवीं आत्मत्वाचा विसरू । तेणें मी देह हा अहंकारू । तेणें अहंकारें संसारू । अतिदुस्तरू थोरावे ॥६३॥ जेवीं मृगजळी मिथ्या मासे । तेवीं ब्रह्मीं प्रपंचु नसे । तो निरसावया कैसें । साधनपिसें पिशाचा ॥६४॥ दोनीच अक्षरे ‘माया’ । जंव गेलों सांगावया । तंव श्लोकार्थ दुरी ठेला राया । वाढला वायां ग्रंथु सैरा ॥६५॥ माया पाहों जातां हर्षे । सज्ञानही झाले पिसे । नांवारूपांचिये भडसें । कल्पनावशे माया वाढे ॥६६॥ मायेचें मुख्य लक्षण । राया तुज मी सांगेन खूण । आपली कल्पना संपूर्ण । ते माया जाण नृपवर्या ॥६७॥ निजहृदयींची निजआशा । तेचि माया गा मुख्य क्षितीशा । जो सर्वथा नित्य निराशा । तो पूज्य जगदीशा पूर्णत्वें ॥६८॥ आतां कांही एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगों उपलक्षणीं । सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणी विभागे ॥६९॥ जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसतां त्याच्या ठायीं दिसे । जेव्हां कां निजकिरणवशे । अग्नि प्रकाशे सूर्यकांतीं ॥७०॥ तेवीं शुद्धस्वरूपी पाहीं । संकल्पमात्र कांहीं नाहीं । नसतचि दिसे ते ठायीं । ते जाण विदेही ‘मूळमाया’ ॥७१॥ स्वरूप निर्विकल्प पूर्ण । तेथ ‘मी’ म्हणावया म्हणते कोण । ऐसेही ठायीं स्फुरे मीपण । ते मुख्यत्वे जाण ‘मूळमाया’॥७२॥

सृष्टीची उत्पत्ती (७३ ते ८५)

तया मीपणाच्या पोटीं । म्हणे मजचि म्यां पहावें दिठीं । मजसी म्यां सांगाव्या गोठी । अत्यादरें भेटी माझी मज होआवी ॥७३॥ मज माझी अतिप्रीती । माझी मज होआवी रती । माझ्याचि म्यां घेऊनि युक्ती । मज माझी प्राप्ति मद्‌बोधे व्हावी ॥७४॥ म्हणे मज मियां आलिंगावें । मज मियांचि संभोगावें । मज मियांचि संयोगावें । नियोगावें स्वामिसेवकत्वें सर्वदा ॥७५॥ ऐकें आजानुबाहो नृपनाथा । ऐसें आठवलें भगवंता । तो आठवो जाला स्रजिता । महाभूतां भौतिकां ॥७६॥ चारी वर्ण चारी खाणी । चारी युगें चारी वाणी । चारी पुरुषार्थ चहूं लक्षणीं । मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा ॥७७॥ उभारूनि तिन्ही गुण । आठवो रची त्रिभुवन । तेणे मांडूनि त्रिपुटीविंदान । कर्मही संपूर्ण त्रिधा केलें ॥७८॥ एवं एकपणी बहुपण । रूपा आणी मूळींची आठवण । परी बहुपणी एकपण । अखंडत्वें पूर्ण ते कदा न भंगे ॥७९॥ जीं जीं कुंभार भांडी करी । आकाश सहजेंचि त्यांभीतरीं । तेवीं महाभूतें भौतिकाकारी । समन्वयें हरि सर्वदा सर्वी ॥८०॥ राया जाण येचि अर्थी । बोलिलें उपनिषदांप्रती । ‘एकाकी न रमते’ या श्रुती । द्वैताची स्फूर्ति भगवंती स्फुरली ॥८१॥ किंबहुना एकपणे समस्ते । रूपा आली महाभूतें । तीचि ‘हरीची माया’ येथें । जाण निश्चितें नृपनाथा॥८२॥ भूत-भौतिक स्फुरे जे स्फूर्ती । ते प्रकाशुं न शके माया स्वशक्तीं । मायाप्रकाशकु चिन्मूर्ती । अखंडत्वे भूताकृतीं प्रवेशला भासे ॥८३॥ मुख्य मायेचें निजलक्षण । प्रकाशी परमात्मा चिद्धन । तोचि भूतीं भूतात्मा आपण । प्रवेशलेपण नसोनि दावी ॥८४॥


३७५.याजसाठी वनांतरा । जातो, सांडूनिया घरा ॥१॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ध्रु॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥३॥ तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊ नेदीं भ्रम ॥४॥
३७६.बुडतां आवरी । मज भवाचे सागरीं ॥१॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु॥ आहे ते सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी? ॥३॥ तुका म्हणे दोषी । मी तो पातकाची राशी ॥४॥
३७७.अक्षई ते झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥ पाया पडिला खोले ठायीं। तेथे पुढे चाली नाहीं ॥ध्रु॥ होतें विखुरलें । ताळा जमे, झडती आलें ॥३॥ तुका म्हणे बोली । पुढें कुंठितचि झाली ॥४॥
३७८.न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥ ज्याने लौकिक हा केला । तो हा निवारिता भला ॥ध्रु॥ माझे इच्छे काय । होणार ते एके ठाय ॥३॥ सुखा आणि दु:खा । म्हणे वेगळा मी तुका ॥४॥
३७९.तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥ जप-तपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु॥ करुणा वचनें । म्यां भाकावीं तुम्हां, दीनें ॥३॥ तुका म्हणे घेईं । माझें थोडे फार ठायीं ॥४॥
३८०.लावूनि काहाळा। सुखें करितों सोहळा ॥१॥ सादावीत गेलों जना । भय नाहीं, सत्य जाणा ॥ध्रु॥ गातां नाचतां विनोदें। टाळघागरियांच्या छंदें ॥३॥ तुका म्हणे भेव । नाहीं, पुढे येतो देव ॥४॥
३८१.मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरले मन ॥ध्रु॥ देखिजेना नास । घालूं कोणावरी कास? ॥३॥ तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥४॥
३८२.ओनाम्याच्या काळें । खडे मांडविले बाळें ॥१॥ तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु॥ रज्जु सर्प होता । तोवरीच न कळतां ॥३॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥४॥
३८३.आतां पुढें धरी । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडे ॥ध्रु॥ ‘विठ्ठल विठ्ठल’ । ऐसे सांडोनियां बोल ॥३॥ तुका म्हणे ‘आण । तुज स्वामीची’ हे जाण ॥४॥
३८४.काय नव्हे करितां तुज । आतां राखे माझी लाज ॥१॥ मी तों अपराधाची रासी । शिखा अंगुष्ठ तो पाशीं ॥ध्रु॥ त्राहे त्राहे त्राहे । मज कृपादृष्टि पाहे ॥३॥ तुका म्हणे देवा! । सत्य घ्यावी आतां सेवा ॥४॥
३८५.वंदीन मी भूतें। आतां अवघींच समस्तें ॥१॥ तुमची करीन भावना । पदोपदी नारायणा! ॥ध्रु॥ गाळू-नियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥३॥ तुका म्हणे मग । नव्हे दुजियाचा संग ॥४॥
३८६.पूज्या पूज्यमान। कथे उभे हरिजन ॥१॥ ज्याची कीर्ति वाखाणिती । तेथें ओतली ते मूर्ति ॥ध्रु॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥३॥ गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥४॥ शोक मोह चिंता । यांची नेणती ते वार्ता ॥५॥ तुका म्हणे सखे । विठोबाचि ते सारिखे ॥६॥
३८७.भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥ धांवे जातीपाशी जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु॥ हिरा हिरकणी । काढी आंतूनि आइरणीं ॥३॥ तुका म्हणे केलें । मन शुद्ध हे चांगलें ॥४॥
३८८.वरि वरि बोला रस । कथी ज्ञाना, माजीं फोस ॥१॥ ऐसे लटिके जे ठक । तयां इह ना परलोक ॥ध्रु॥ परिसे एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥३॥ तुका म्हणे हाडें । कुतऱ्या लाविले झगडे ॥४॥
३८९.हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा! ॥१॥ अवघीं तुझींच हीं पदें। नमस्कारीन अभेदें ॥ध्रु॥ न वर्जित दिशा । जाय तेथेंचि सरिसा ॥३॥ नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषी ॥४॥
३९०.आपुलें तो कांहीं । येथे सांगिजेसें नाहीं ॥१॥ परि हे वाणी वायचळे । छंद करविते, बरळे ॥ध्रु॥ पंच-भूतांचा हा मेळा । देह, सत्यत्वे निराळा ॥३॥ तुका म्हणे भुली । इच्या उफराट्या चाली ॥४॥
३९१.विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठी वाचा ॥१॥ कटी कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु॥ न पाहे शिदोरी। जाती कुळ न विचारी ॥३॥ तुका म्हणे भेटी । हाक देतां उठाउठी ॥४॥
३९२.कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योग क्षेम चिंता ॥ध्रु॥ भुलों नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥३॥ तुका म्हणे जीवें । अनुसरल्या एक भावें ॥४॥
३९३.नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकावांचुनी ॥१॥ रूप आवडे आम्हांसी । तैसा जोडी हृषीकेशी! ॥ध्रु॥ आम्ही भावें बळिवंत । तुज घालू हृदयांत ॥३॥ तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥४॥
३९४.मन गुंतलें लूलया। जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥ मागे परतवी तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु॥ येऊनियां घाली घाला । नेणों! काय होईल तुला? ॥३॥ तुका म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥४॥
३९५.घेईं घेईं माझे वाचे। गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु॥ तुम्ही आइकारे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥ मना, तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥४॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥५॥
३९६.धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टि न्याहाळितां ॥१॥ बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु॥ सकळ मंगळाचे सार। मुख सिद्धीचे भांडार ॥३॥ तुका म्हणे सुखा । अंत पार नाही लेखा ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top