दिवस – २. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥

ते नमस्कारोनि आता
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥


कां, तीर्थे जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं । ना तरी, अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥ तैसा, पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥२७॥ आतां, अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं, अभिनव उद्यान । विवेकतरुचें ॥२८॥ ना तरी, सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना, नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥ कीं, परमधाम प्रगट । सर्व विद्यांचें मूळपीठ । शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥३०॥ ना तरी, सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार। लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥३१॥ ना,ना, कथारूपें भारती । प्रगटली असे त्रिजगतीं। आविष्करोनि महामतीं । व्यासांचिये ॥३२॥ म्हणौनि हा काव्या रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥३३॥ तेवींचि, आइका, आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥३४॥ एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥३५॥ माधुर्यी मधुरता । शृंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ॥३६॥ एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥३७॥ आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणपणाचे बिक । बहुवस एथ ॥३८॥ भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें । तैसें व्यासमति कवळीलें । मिरवे विश्व ॥३९॥ कां, सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें। अर्थजात ॥४०॥ ना तरी, नगरांतरी वसिजे । तरी नागरचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥४१॥ कीं, प्रथम-वयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगना-अंगीं ॥४२॥ नातरी, उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिला-पासोनि अ-पाडें । जियापरी ॥४३॥ ना,ना, घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां, साधारण । मग, अलंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥४४॥ तैसें, व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें । तें जाणोनि-काय आश्रयिलें । इतिहासीं?॥४५॥ ना, ना, पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥४६॥ म्हणौनि, महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । ‌‘व्यासोच्छिष्ट जगत्रयम्‌‍‌’ ॥४७॥ ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृप-नाथा । जनमेजया ॥४८॥ जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक, निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥४९॥


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥

एकनाथी भागवत-रचनाप्रसंग (५७ ते ६८)
तंव संतसज्जनीं एक वेळां । थोर करूनियां सोहळा । आज्ञापिलें वेळोवेळां । ग्रंथ करविला प्राकृत ॥ ५७॥ एकांती आणि लोकांतीं । थोर साक्षेप केला संतीं । तरी सांगा जी मजप्रती । कोण ग्रंथीं प्रवर्तो ॥ ५८॥ पुराणी श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत । तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥ ५९॥ आम्हांसी पाहिजे ज्ञानकथा । वरी तुजसारिखा रसाळ वक्ता । तरी स्तुति सांडूनि आतां । निरूपण तत्त्वतां चालवीं ॥६॥ तुज संतस्तवनीं उत्सावो । हा तंव कळला भावो । तरी कथेचा लवलाहो । निजनिर्वाहो उपपादीं ॥ ६१॥ या संतांचे कृपावचनें । एकाएकी आनंदलों मनें । तेणें वाक्यपसायदानें । स्वानंदघनें उल्हासे ॥६२॥ जैसा मेघांचेनि गर्जनें । मयूर उपमों पाहे गगनें । नाना नवेनि जीवनें । जेवीं चातक मनें उल्हासे ॥६३॥ कां देखोनि चंद्रकर । डोलों लागे चकोर । तैसें संतवदनींचे उत्तर । आले थोर सुखावित ॥६४॥ थोर सुखाचा केलों स्वामी । तुमचें पुरतें कराल तुम्ही । तरी वायांचि कां मीपणे मी । मनोधर्मी वळंगेजों ॥६५॥ परी समर्थांची आज्ञा । दासां न करवे अवज्ञा । तरी सांगितली जे संज्ञा । ते करीन आज्ञा स्वामींची ॥६६॥ परी तुम्ही एक करावें । अखंड अवधान मज द्यावें । तेणें दिठिवेनि आघवें । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥ ६७॥ अगा तुझिया मनामाजीं मन । शब्दी ठेविलेंसे अनुसंधान यालागी निजनिरूपण । चालवी जाण सवेगें ॥ ६८॥ ।
कुलदेवता एकवीरेला नमन (६९ ते ७८)
आतां वंदू कुळदेवता । जे एकाएकी एकनाथा । ते एकीवांचून सर्वथा । आणिक कथा करूं नेदी ॥ ६९ ॥ एक रूप दाविलें मनीं । तंव एकचि दिसे जनीं वनीं । एकचि कानीं वदनीं । एकपणी ‘एकवीरा’ ॥७० ॥ ते शिवशक्तिरूपें दोनी । नेऊन मिरवे एकपणीं । एकपणे जाली गुर्विणी । प्रसवे एकपणी एकवीरा ॥७१॥ ते एकरूपें एकवीरा । प्रसवली बोध-फरशधरा । जयाचा कां दरारा । महावीरां अभिमानियां ॥ ७२ ॥ तेणें उपजोनि निवटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया । म्हणोनि तो जाहला विजया । लवलाह्यां दिग्मंडळीं ॥७३॥ जो वासनासहस्रबाहो । छेदिला सहस्रार्जुन-अहंभावो । स्वराज्य करूनियां पहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ॥७४॥ तेणें मारूनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आम्हां जाहली । परी स्वनांवें ख्याति केली । एकात्मताबोली एकनाथा ॥७५॥ ते जैंपासोनि निवटिली । तैंपासोनि प्रकृति पालटली । रागत्यागें शांत झाली । निजामाउली जगदंबा ॥७६ ॥ तया वोसंगा घेऊन । थोर दिधलें आश्वासन । विषमसंकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ॥ ७७॥ ते जय जय जगदंबा । ‘उदो’ म्हणे ग्रंथारंभा । मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥७८॥
सद्गुरुजनार्दननमन (७९ ते ९९)
आतां वंदू जनार्दनु । जो भवगजपंचाननु । जनीं विजनी समानु । सदा संपूर्ण समत्वें ॥ ७९ ॥ ज्याचेनि कृपापांगें । देहीं न देखती देहांगें । संसार टवाळ वेगें । केलें वाउगें भवस्वप्न ॥ ८० ॥ जयाचेनि कृपाकटाक्षे । अलक्ष्य लक्ष्येवीण लक्षे । साक्षी विसरली साझें । निजपक्षे गुरुत्वें ॥८१ ॥ तेणें जीवेंवीण जीवविलें । मृत्यूवीण मरणचि मारिलें । दृष्टि घेऊनि दाखविलें । देखणे केले सर्वांग ॥ ८२॥ देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें । नेलेपणही हारपलें । उरी उरलें उर्वरित ॥८३॥ अभावो भावेशी गेला । संदेह निःसंदेहेंशी निमाला । विस्मयो विस्मयीं बुडाला । वेडावला स्वानंदु ॥८४॥ तेथ आवडीं होय भक्तु । तंव देवोचि भक्तपणाआंतु । मग भज्यभजनांचा अंतु । दावी उप्रांतु स्वलीला ॥ ८५ नमन नमनेंशी नेलें । नमितें नेणों काय जाहलें । नम्यचि अंगीं घडलें । घडलें मोडलें मोडूनि ॥८६॥ दृश्य द्रष्टा जाण । दोहींस एकचि मरण । दर्शनही जाहलें क्षीण । देखणेपण गिळूनि ॥८७॥ आतां देवोचि आघवा । तेथें भक्तु न ये भक्तभावा । तंव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनि ॥ ८८ ॥ देवो देवपणे दाटला । भक्तु भक्तपणे आटला । दोहींचाही अंतु आला । अभेद जाहला अनंतु ॥ ८९॥ अत्यागु त्यागेशी विराला । अभोगु भोगेशी उडाला । अयोगु योगेशी बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥९॥ ऐशियाहीवरी अधिक सोसू । सायुज्यामाजीं होतसे दासू । तेथील सुखाचा सौरसु । अति अविनाशु अगोचरू ॥ ९१ ॥ शिवें शिवूचि यजिजे । हे ऐशिये अवस्थेसि साजे । एहवीं बोलचि बोलिजे । परि न पविजे निजभजन ॥ ९२॥ ये अभिन्न सुखसेवेआंतु । नारद आनंदें नाचत गातु । शुकसनकादिक समस्तु । जाले निजभक्तु येणेचि सुखें ॥ ९३ ॥ सागरीं भरे भरतें । तें भरतें भरे तरियांतें । तैसें देवेंचि देवपणे येथें । केलें मातें निजभक्त ॥९४॥ सागर सरिता जीवन एक । परी मिळणी भजन दिसे अधिक । तैसें एकपणेंचि देख । भजनसुख उल्हासे ॥ ९५॥ वाम सव्य दोनी भाग । परी दों नामी एकचि अंग । तैसा देवभक्तविभाग । देवपणी साङ्ग आभासे ॥९६॥ तेवीं आपुलेपणाचेनि मानें । भक्त केलों जनार्दनें । परी कायावाचामनें । वर्तविजे तेणें सर्वार्थी ॥ ९७॥ तो मुखाचें जाला निजमुख । दृष्टीते प्रकटे सन्मुख । तोचि विवेकेंकरून देख । करवी लेख ग्रंथार्थी ॥ ९८॥ परी नवल त्याचे लाघव । अभंगी घातलें माझें नांव । शेखीं नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच ॥९९ ॥


  1. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥ विठो माउलिये हाचि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥३॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥४॥
  2. राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु॥ मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें  सकळही ॥३॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥ सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
  3. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी! ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु॥ कटीं  पितांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥३॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तेंचि रूप ॥४॥ झुरोनि पांझरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥५॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥६॥
  4. गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरविया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥ध्रु॥ मुकुट माथां कोटि सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥३॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं  वेल्हाळ रखुमादेवी ॥४॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥५॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग  ॥६॥
  5. ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥३॥ बैसलिये ठायीं लागलें  भरतें  । त्रिपुटीवरतें  भेदी ऐसें ॥४॥ हारि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥५॥ तुका म्हणे बहु लाठे हें भोजन । नाहीं रिता कोण रहात राहों ॥६॥
  6. दुजें  खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणा बाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥ इतुलें जाणावया जाणा । कोड तरी मनें  मना । पारधीच्या खुणा । जाणतेणेचि साधाव्या ॥ध्रु॥ देह आधीं काय खरा । देहसंबंध पसारा । बुजगावणें  चोरा । रक्षणसें भासतें ॥३॥ तुका करी जागा । नको वासपूं वाउगा । आहेसि तूं अंगा । अंगीं  डोळे उघडी ॥४॥
  7. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म  । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म  सर्वेश्वर पूजनाचें ॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
  8. आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी! ॥ध्रु॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥३॥ तुमचें तुम्हांपाशी । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥४॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥५॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥६॥
  9. निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा दोहींपासुनी ॥ध्रु॥ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें तें बरें ॥३॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुकयाचें ॥४॥
  10. जन विजन झालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥ पाहें तिकडे मायबाप । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता झाला ॥३॥ ठाव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥४॥
  11. हिरा ठेवितां ऐरणीं  । वांचे मारितां जो घणीं ॥१॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु॥ मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥३॥ तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥४॥
  12. आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । जाली१ बोलायाची सीमा ॥ध्रु॥ तीर्थें पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥३॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥४॥
  13. माझिया मीपणा । झाला यावरी उगाणा ॥१॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें  अंग ॥ध्रु॥ टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥३॥ यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥४॥
  14. सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा । निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं  जनें। तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा? । मंडित सकळा भूषणांसी । हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥३॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची । तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची? ॥४॥

8 thoughts on “दिवस – २. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

  1. विद्याधर मुरलीधर दहिफळे

    गुरुवर्य डॉ बाबांच्या चरनी 🌿☘️🌼🌻🌸 विनम्र वंदन 🙏🙏 रामकृष्णहरि रामकृष्णहरिमाऊली 🙏

  2. धन्यवाद हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल
    राम कृष्ण हरि

  3. राम कृष्ण हरी
    पूज्य बाबांचे चरणी दंडवत प्रणाम.

  4. विनोद साळुंके

    राम कृष्ण हरी 🙏 खुपचं सुंदर आणि नियम बद्ध असुन सोपा व सर्वांना जमेल असा नित्यनेम करून दिल्याबद्दल धन्यवाद.राम कृष्ण हरी.

  5. Keshav Dnyanoba bade

    राम कृष्ण हरी… एकाच वेळी आपण आम्हाला अशा तीन महान ग्रंथाचे पारायण
    करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात
    आहे. आम्ही फार भाग्यवान आहोत.
    धन्यवाद…

    राम कृष्ण हरी .

  6. Savita bhujang nagre

    ह्या संकल्पा मुळे आमची नित्यनेमाने ह्या सर्व ग्रंथाचे पठण होत आहे
    धन्यवाद 🙏🙏
    आणि बाबांना दंडवत प्रणाम🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top