अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी
अध्याय – १. ओवी क्र. ८५ ते १०७
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:। मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥१॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे, ‘संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची’ ॥८५॥ जें धर्मालय म्हणिजे । तेथ पाण्डव आणि माझे । गेले असती; व्याजें । जुंझाचेनि ॥८६॥ तरी, तिही येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥८७॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्॥२॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता॥३॥
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥८८॥ तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसें उसळलें काळकूट । धरी कवण?॥८९॥ नातरी, वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला । सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥९०॥ तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परिकर । अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥९१॥ तें देखोनिया दुर्योधनें । अव्हेरिलें, कवणें मानें?। जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥९२॥ मग, द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे ‘हा देखिला?। कैसा दळभारू उचलला । पांडवांचा?॥९३॥ गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह भंवते । रचिले आथी, बुद्धिमंतें । द्रुपद-कुमरें॥९४॥ जो का तुम्ही शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥९५॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि। युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ:॥४॥
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥९६॥ जे बळें प्रौढी, पौरुषें, । भीमार्जुनासारिखे । ते सांगेन; कौतुकें । प्रसंगेची ॥९७॥ एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥९८॥
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान्। पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गव:॥५॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्। सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा:॥६॥
चेकितान धृष्टकेतु । काशीराज विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥९९॥ हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखें ॥१००॥ हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । ‘देखें द्रोणा’ ॥१॥ आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे; परी अपार । मीनले असती!॥२॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य सञ्ज्ञार्थं तान्ब्रवीमि ते॥७॥
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय:। अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च॥८॥
आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥३॥ उद्देशें एकदोनी । जायिजती बोलोनी। तुम्ही आदिकरूनी । मुख्य जेे जे ॥४॥ हा भीष्म गंगानंदनु । जों प्रतापतेजस्वी भानु । रिपु-गज-पंचाननु । कर्णवीरु ॥५॥ या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्यु न पुरे-। एकलाचि?॥६॥ एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा आडदरु सदां वाहे । कृतांत मनीं ॥७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय – १, ओवी क्र. १४४ ते १८६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
भागवतपुराण (१४४ ते १५८)
तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृद्गत । त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥४४॥ तें हें ज्ञान कल्पादी । ‘चतुःश्लोक’ पदबंधीं । उपदेशिला सद्बुद्धी । निजात्मबोधी विधाता ॥ ४५ ॥ नवल तयाचा सद्भावो । शब्दमात्रे झाला अनुभवो । बाप सद्गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥४६॥ तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गे आला शुद्धु । तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्ध भावार्थी ॥४७॥ तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला । पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधे ॥४८॥ तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु । तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥४९॥ तो आला सरस्वतीतीरा । तंव देखिलें व्यासऋषीश्वरा । जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजी पडिला ॥१५०॥ वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण । परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥ ५१ ॥ तो संशयसमुद्राआंतु । पडोनि होता बुडतु । तेथें पावला ब्रह्मसुतु । ‘नाभी’ म्हणतु कृपाळू ॥ ५२ ॥ तेणे एकांती नेऊनि देख । व्यासासि केले एकमुख । मग दाविले चाऱ्ही श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥५३॥ ते सूर्यातें न दाखवुनी । गगनातेंही चोरूनी । कानातें परते सारूनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥ ५४ ॥ तें नारदाचे वचन । करीत संशयाचे दहन । तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥५५॥ मग श्रीव्यासें आपण । भागवत दशलक्षण । शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधे पूर्ण सार्थक ॥५६॥ तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला । मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥ ५७ ॥ तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना । मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥५८॥
परीक्षिती (१५९ ते १६५)
पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारु । तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकार पैं याचा ॥ ५९॥ कृष्णु असतां धर्म जियाला । पाठी कलिभेणें तो पळाला । परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्ये अधिक ॥१६०॥ अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग । तो अधिकाररत्न उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला ॥६१॥ गर्भीच असतां ज्याच्या भेणें । स्पर्शू न शके शस्त्र द्रौण्य । त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ? ॥ ६२ ॥ जेणे रक्षिलें गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं । यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिति नावाची ॥ ६३ ॥ तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती । ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥६४॥ अंगी वैराग्यविवेकु । ब्रह्मालागीं त्यक्तोदकु । तया देखोनि श्रीशुकु । आत्यंतिकु सुखावला ॥६५॥
ब्राह्मण (१६६ ते १७०)
बाप कोपु ब्राह्मणाचा । शापे अधिकार ब्रह्मज्ञानाचा । तयांच्या चरणी कायावाचा । निजभावाचा नमस्कार ॥६६॥ ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरु । हे मीच काय फार करूं । परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारु मिरवितु ॥ ६७॥ म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु । यालागीं वेदरूपें नारायणु । उदरा येऊनु वाढला ॥ ६८ ॥ म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हे ब्रह्मींचे निजावेव । येथे न भजती ते मंददैव । अति निर्दैव अभाग्य ॥ ६९ ॥ ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकु केला देवो । प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो । प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रें ॥१७० ॥
एकनाथी भागवत-नमने व संतांचा संतोष (१७१ ते १७९)
तंव संत म्हणती काय पहावें । जें स्तवनी रचिसी भावें । तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥७१॥ गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती । तैशीच संतस्तवनी स्तुती । ऐक्यवृत्ती वदलासी ॥ ७२ ॥ पाठी कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा । ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥७३॥ जो सद्भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं । सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥ ७४ ॥ तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण । हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥ ७५ ॥ चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें । पुढील कथानिरूपणातें । करीं निश्चितें आरोहण ॥७६॥ विसरलो होतो हा भावो । परी भला दिधला आठवो । याचिलागीं सद्भावो । तुमचे चरणी पहा हो ठेविला ॥ ७७॥ उणे देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें । सज्जनांमाजी सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥७८॥ ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका । आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥७९॥
एकनाथी भागवत-ग्रंथप्रस्ताव (१८० ते १८६)
याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो । तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥१८०॥ तरी नैमिषारण्याआंतु । शौनकादिकांप्रति मातु । सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥ ८१ ॥ मागे दहावे स्कंधी जाण । कथा जाली नव-लक्षण । आतां मोक्षाचे उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥ ८२ ॥ जो चिदाकाशींचा पूर्णचंद्र । जो योगज्ञाननरेंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥ ८३ ॥ तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी । तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥ ८४ ॥ अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था । तिहीं पाव देऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥८५॥ भीतरी नेऊनियां कान । कानीं द्यावें निजमन । अवधाना करूनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥८६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ४७ ते ६२
- नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥ देवधर्म सांदीं पडिले सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु॥ रात्रंदिवस न पुरे कुटुंबीं समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥३॥ तुका म्हणे आत्महत्यारे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥४॥
- स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोटें श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु॥ अपूज्य लिंग तेथें अतित नेघे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥३॥ तुका म्हणे नाहीं ठावी तीथ मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥४॥
- एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु॥ हरिहरासी नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणों ॥४॥
- आहाकटा त्याचे करिती पितर । ‘वंशीं दुराचार पुत्र झाला’ ॥१॥ गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु॥ परपीडें परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचें ॥३॥ न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहावे दोष सकळही ॥४॥ परउपकार पुण्य त्या वावडें। विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥५॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥६॥
- श्वान शीघ्र कोपी । आपणा घातकर पापी ॥१॥ नाहीं भीड आणिक धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु॥ माणसांसि भुंके । विजातीनें घ्यावे थुंके ॥३॥ तुका म्हणे चित्त । मळिण, करा तें फजित ॥४॥
- देखोनि हरखली अंड । ‘पुत्र झाला’ म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली?॥ध्रु॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें । बोले निष्ठुर उत्तरें । पापदृष्टि मळिण चित्त ॥३॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषिद्ध तो ॥४॥
- नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा! ॥१॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा! ॥ध्रु॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥
- ‘माझी पाठ करा कवी’ । उट लावी दारोदार ॥१॥ तंव तया पारखी शिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥३॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदीं न सरती ॥४॥
- उपाधीच्या नांवें घेतला शिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु॥ कांहीं नाहीं देवें करूनि ठेविलें? । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥३॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥४॥
- योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥३॥ तुका म्हणे उचित जाणां । उगीं शिणा काशाला? ॥४॥
- न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥ तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥३॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥४॥
- बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु॥ विषयांचे चर्वणीं । केली आयुष्याची गाळणी ॥३॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥४॥
- दानें कांपे हात । नावडे तेविशीं मात ॥१॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ॥ध्रु॥ नवजाती पाय । तीर्था, म्हणे ‘वेचूं काय?’ ॥३॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥४॥
- वळितें जें गाई । त्यासी फार लागे काई?॥१॥ निवे भावाचे उत्तरीं । भलते एके धणीवरी ॥ध्रु॥ न लगती प्रकार । कांहीं, मानाचा आदर ॥३॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥४॥
- मैत्र केला महाबळी । कामा नये अंतकाळीं ॥१॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम । नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ध्रु॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥ कामा नये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥ तंववरि तुमचे बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥ तुका म्हणे बापा! । चुकवीं चौऱ्याशींच्या खेपा ॥६॥
- सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥१॥ धरीं धरीं आठवण । मानीं संतांचें वचन ॥ध्रु॥ नेलें रात्रीनें तें अर्ध । बाळपण जरा व्याध ॥३॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा! ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




शुभ दुपार माऊली,जय जय रामकृष्णहरि माऊली,
वरील प्रमाणे अभंगाची सूरुवात, पहिल्या अभंगापासून न होता मधातूनच सूरुवात झाली यामागील प्रयोजन आम्हास कळेल काय….!
वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनियम पारायण आहे याच्यामध्ये क्रमाने अर्थात क्रमशः दररोज तिन्ही ग्रंथांचे पारायण करावयाचे आहे सुरुवातीपासून आपल्याला जर नित्य नियम करावयाचा असेल तर पुढील लिंक चा वापर करा व दररोज नित्य नियम करा.
https://vedantsatsangsamiti.com/varkari-prasthantrayi-nityanem-parayan-anukramanika/
सुंदरते ध्यान उभे विटेवरी करा कटेवरी ठेवा तुळशीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर याची जाणवकर कुंडली तळपती कौस्तुभ आणि विराजिता तुका म्हणे माझे