
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: अध्याय – १. ओवी क्र. १७४ ते २०६
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥२४॥
आइका, अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला । दोन्ही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥७४॥
भीष्मद्रोणप्रमुखत: सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान्कुरूनिति ॥२५॥
तत्रापश्यत्स्थितान् पार्थ: पितॄनथ पितामहान् । आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि। तान्समीक्ष्य स कौन्तेय: सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥२७॥
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥७५॥ तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥७६॥ मग, देवा म्हणे ‘देख, देख । हे गोत्र, गुरु अशेख!’। तंव कृष्णा-मनीं नावेक । विस्मो जाहला ॥७७॥ तो आपणपेयां आपण म्हणे । ‘एथ, कायी कवण जाणे!’ । हें मनीं धरिलें येणें?। परि कांहीं आश्चर्य असे ॥७८॥ ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु । परि, उगा असे, निवांतु । तिये वेळीं ॥७९॥ तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु, बंधु, मातुळ । देखता जाहला ॥१८०॥ इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥८१॥ सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर, पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥८२॥ जयां उपकार होते केले । कीं, आपदीं जे रक्षिले । हे असो; वडील धाकुले । आदिकरूनि ॥८३॥ ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उद्यत जालें असे कळीं । हें अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥८४॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
तेथ मनीं गजबज जाहली । आणि अपैसी कृपा उपजली। तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥८५॥ जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥८६॥ नविये आवडीचेनि भरें । कामुक निज-वनिता विसरे । मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥८७॥ कीं, तपोबळें ऋद्धी । पातलिया, भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना ॥८८॥ तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जे, अंत:करण दिधलें । कारुण्यासी ॥८९॥ देखा, मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय । तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥१९०॥ म्हणौनि, असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥९१॥ तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥९२॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्॥२८॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति। वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते॥२९॥
गाण्डीवं स्त्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन:॥३०॥
तो म्हणे अवधारी, देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ! ॥९३॥ हे संग्रामीं उद्यत । जहाले असती; कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय?॥९४॥ येणें नांवेचि, नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन, बुद्धी, ठायीं । स्थिर नोहे ॥९५॥ देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥९६॥ सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥९७॥ तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि; हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥९८॥ जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह! नवल ॥९९॥ जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवात-कवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन, मोहें कवळिला । क्षणामाजीं! ॥२००॥ जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि, कळिकेमाजी सांपडे । कोवळिये ॥१॥ तेथ उत्तीर्ण होईल प्राणें! । परि तें कमळदळ चिरूं नेणें । तैसे कठिण; कोवळेपणे । स्नेह देखा ॥२॥ हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणौनि भुलविला; ऐकें राया । संजयो म्हणे ॥३॥ अवधारी, मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥४॥ कैसी, नेणों, सदयता । उपनली तेथें चित्ता । मग म्हणे ‘कृष्णा, आतां । नसिजे एथ’ ॥५॥ माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जें, वधावे हे सकळ । येणें नांवें ॥६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: अध्याय – १, ओवी क्र. ३४७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् । एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्न्यसितेक्षणा ॥ १४ ॥
पहिलेच श्रीमदें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट । सांबास देऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥४७॥ तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु । प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥४८॥ नयनीं सोगयाचें काजळ५ । व्यंकट कटाक्षु अतिचपल । सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥४९॥ वस्त्रे बांधोनियां उदर । नावेक केलें थोर । तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥ ३५० ॥ हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी । विसांवा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदी देखिली ॥५१॥ ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि । इतर ऋषींजवळी येऊनि । लोटांगणें घालिती ॥५२॥ पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त । यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥५३॥ छळाचेनि मिषे जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा । अत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्ही आलों ॥५४॥ ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत । कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥ ५५ ॥ स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर । आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥५६॥
प्रष्टुं विलज्जती साक्षात्प्रब्रूतामोघदर्शनाः । प्रसोष्यन्ती पुत्रकामा किंस्वित्संजनयिष्यति ॥ १५ ॥
बालिश क्रीडांमध्ये निमग्न असलेल्या यादवकुमारांनी, श्रीकृष्णाच्या जांबवतीपुत्र सांबाला गरोदर स्त्रीचे सोंग दिले आणि त्या ऋषिवर्यांकडे जाऊन व खोट्या नम्रपणाने त्यांच्या पाया पडून त्यांनी प्रश्न केला की, ‘हे मुनिश्रेष्ठहो, ही हरिणाक्षी स्त्री गरोदर आहे आणि पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे, परंतु स्वभावतः ही फार लाजरी आहे म्हणून ती आपणांस प्रत्यक्ष विचारू शकत नाही. आपले ज्ञान अचूक असल्यामुळे तिच्या वतीने आम्ही विचारीत आहो की, हिच्या उदरी कोण जन्माला येईल ?’ ॥ १३-१४-१५॥
स्वयें येऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं । यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥ ५७ ॥ तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचे उत्तर । शिरी वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥ ५८ ॥ यालागीं हे गर्भवती । सादरे असे पुसती । पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥ ५९॥ ऐसे कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे । तैशींच फलें भावगर्भे । छळणलोभे पावती ॥३६० ॥ कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढे । मुनि म्हणे यादवांचे गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥६१ ॥ मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक । तेवीं ब्राह्मणछळणे देख । आवश्यक कुळनाश ॥ ६२ ॥ शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्भावें करावें नमन । मारुं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥ ६३ ॥ त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण । विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥ ६४ ॥ अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळी ब्रह्म ब्राह्मण । त्याचें करूं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक॥६५॥
एवं प्रलब्धा मुनयस्तानूचुः कुपिता नृप । जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥ १६॥
हे राजा ! (यादवकुमारांच्या) कपटामुळे राग येऊन ते मुनी म्हणाले, ‘हे मूर्खनो ! यादवकुलाचा नाश करणारे मुसळ हिला होईल.’ ॥१६॥
ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां । निधनाचा भरला वारा । तेणे ते ऋषीश्वरां छळू गेले ॥६६॥ कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर । मग तिंहीं काय वाग्वज्र । अतिअनिवार सोडिलें ॥६७॥ अरे हे प्रसवेल जें बाळ । तें होईल सकळकुळा काळ । निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्ये ॥ ६८ ॥
तच्छ्रुत्वा तेऽतिसंत्रस्ता विमुच्य सहसोदरम् । साम्बस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं कुलनाशनम् ॥ १७॥
तो भयंकर शाप ऐकून भीतीने अत्यंत त्रस्त झालेल्या कुमारांनी लागलीच सांबाच्या पोटावरील वस्त्रघड्या काढल्या, तेव्हा त्यांत त्यांना खरोखरच एक पोलादी मुसळ दिसले. ॥ १७॥
ऐकूनि शापाचे उत्तर । भयभीत झाले कुमर । सोडूनि सांबाचे उदर । अतिसत्वर पाहती ॥६९॥ तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ । मग भयभीत विव्हळ । एकाएकी सकळ दचकोनि ठेले ॥ ३७० ॥ नासावें यादवकुळ । ऐसा श्रीकृष्णसंकल्प सबळ । तोचि झाला लोहाचे मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥ ७१॥ जें जें ब्राह्मणाचे वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥७२॥ देखोनि ऋषीश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप । यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥७३॥
किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः । इति विह्वलिता गेहानादाय मुसलं ययुः ॥१८॥
आम्ही मंदभाग्य करंटे । ऋषीश्वर कोपविले शठें । निजघाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥७४ ॥
आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरू कोपविले शठे । निजघाता झालो पैठे । कुलक्षयो कपटे । जोडिला आम्ही ॥७४॥ काय म्हणती नगरजन । कां छळू गेले हे ब्राह्मण । चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥ ७५ ॥
तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः । राज्ञ आवेदयांचक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥ १९ ॥
सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न । यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथ नाहीं ॥ ७६ ॥ सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ । शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥ ७७ ॥
श्रुत्वाऽमोघं विप्रशापं दृष्ट्वा च मुसलं नृप । विस्मिता भयसंत्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥२०॥
‘आम्ही अभाग्यांनी हा काय वेडेपणा केला ? घरी परत गेल्यावर आम्हांस वडील माणसे काय म्हणतील ?’ असे विवळत ते कुमार मुसळ घेऊन द्वारकेत आले. म्लानवदन यदुकुमारांनी सर्व सभाजनांसमक्ष उग्रसेन राजाला हकिगत सांगून मुसळ समोर ठेवले. तो अटळ शाप ऐकून व प्रत्यक्ष मुसळ पाहून द्वारकावासी जनांना विस्मय वाटला आणि त्यांची मने भीतीने गांगरून गेली. ॥ १८-१९-२०॥
ऐकूनि द्विजांचा परम कोपु । यादवां सुटला भयकंपु । मिथ्या नव्हे ब्रह्मशापु । भयें संतापु सर्वांसी ॥ ७८ ॥ प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ । नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥ ७९ ॥ ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती । वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमती तिंही केला ॥३८०॥
तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः । समुद्रसलिले प्रास्यल्लोहं चास्यावशेषितम् ॥२१॥
उग्रसेन राजाने त्या मुसळाचे पीठ करवून ते पीठ व शेष-मध्य-भाग समुद्रात सोडला. ॥ २१ ॥
आहुक राजा उग्रसेन । तेणे लावूनि लोहघण । मुसळ करोनियां चूर्ण । समुद्री जाण घालविलें ॥८१॥ त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्री तत्काळ झुगारिला ॥८२॥
कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः । उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥२२॥
तो मध्य-भाग एका माशाने गिळला आणि सूक्ष्म पीठ समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर आणून टाकले ; त्या पिठापासून अणकुचीदार गवत (लोहाळे) उगवले. ॥ २२ ॥
मत्स्यो गृहीतो मत्स्यघ्नैर्जालेनान्यैः सहार्णवे । तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥ २३॥
समुद्रावरील धीवरांनी जाळे टाकून मासे धरले त्यात तो मासाही होता. त्याच्या पोटातील त्या लोहापासून एका पारध्याने बाणाचा फाळ बनविला. ॥ २३ ॥
समुद्रलाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ । प्रभासी लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारूपें ॥८३॥ लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं । अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥८४॥ तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं ।देखोनि हरिखला तो भारी । हे आंतुडे करीं तो सभाग्य ॥८५॥ मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचे अचूक संधान । अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥८६॥
भगवान् ज्ञातसर्वार्थ ईश्वरोऽपि तदन्यथा । कर्तुं नैच्छद्विप्रशापं कालरूप्यन्वमोदत ॥ २४॥
सर्वज्ञ अशा कालरूपी श्रीकृष्णपरमात्म्याने झालेल्या घटनेस मान्यताच दिली कारण सामर्थ्य असूनही तो विप्रशाप फिरवावा असे त्याला वाटेना. ॥२४॥
कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञ श्रीकृष्णें । परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥ ८७॥ म्हणाल हे नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी । जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥८८॥ पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत । ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥ ८९ ॥ निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी । श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥३९०॥ निजकुळक्षयो जऱ्ही आला । तऱ्ही अन्यथा न करी ब्राह्मणबोला । ब्राह्मणे पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकु ॥९१॥ तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण । हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागीं पूर्ण ब्रह्मण्यदेवो ॥ ९२ ॥ श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मण । अन्यथा न करी ब्राह्मणवचन । यालागीं ‘ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥ ९३ ॥ ब्राह्मणरूप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी । कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥९४ ॥ ऐकोनि ब्राह्मणांचा शापु । न धरी मोहाचा खटाटोपु । म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पु । कुलक्षयानुरुपु संतोषे ॥ ९५॥ यापरी श्रीगोविंदु । काळरूपी मानी आनंदु । कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥ ९६॥
दुसऱ्या अध्यायाचा प्रस्ताव (३९७ ते ३९९)
पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा । अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥९७॥ जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद होईल सुहावा ।जनक आणि आर्षभदेवां । प्रश्नोत्तरी जीवा स्वानंदु दाटे ॥९८॥ हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमार्थु । एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधे ॥ ३९९ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे प्रथमोध्यायः॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकार-टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ११० १२७
- चाल केलासी मोकळा । बोल ‘विठ्ठल’ वेळोवेळां ॥१॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळी वसे ॥ध्रु॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां नलगे घडी ॥३॥ केलीं मागें नको पाहों । तुज जमान आम्ही आहो ॥४॥ करीं तुजसी करवती । आणीक नामें घेऊ किती! ॥५॥ तुका म्हणे काळा । रीघ नाहीं, निघती ज्वाळा ॥६॥
- चित्तीं नाहीं तें जवळी असोनि काय? । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥ध्रु॥ तुका म्हणे अवघे फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥
- काय काशी करिती गंगा? । भीतरीं चांगा नाहीं तों ॥१॥ अाधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासी॥ध्रु॥ काय टिळे करिती माळा? । भाव खळा नाहीं त्या ॥३॥ तुका म्हणे प्रेमेविण । अवघा शीण बोले भुंके ॥४॥
- शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंबे ॥१॥ दुष्टबुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥२॥ तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥
- अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसार ॥१॥ न देखती गर्भवास । कधी दास विष्णुचे ॥ध्रु॥ विसं-बेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥३॥ त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तो रक्षिता झालिया॥४॥
- आतां केशीराजा हेचि विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु॥ काळाचे खंडण घडावें चिंतन । तन मन धन विन्मुखता ॥३॥ कफवातपित्त देह अवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥४॥ सावध तों माझी इंद्रियें सकळ । दिली एक वेळ हाक आधीं ॥५॥ तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी ॥६॥
- ‘चित्त’ तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नांवें भेद, सत्ता जीवाची ते ॥ध्रु॥ रवीचिये अंगीं प्रकाश सकळां । वचनें निराळा भेद दिला ॥३॥ तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगी निवडावें? ॥४॥
- बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीवु जगाचे ॥१॥ हेचि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस काशाची ॥३॥ तुका म्हणे पायापाशीं । येईन ऐसी वासना ॥४॥
- धाकुट्याच्या मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शहाणिया ॥१॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तो तो थोर अंतराय ॥ध्रु॥ दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥३॥ तुका म्हणे अंगापासूनि निराळे । निवडिले बळें रडतें स्तनी ॥४॥
- उपदेश तो भलत्या हातीं । झाला, चित्तीं धरावा ॥१॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सार नारळी ॥ध्रु॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥३॥ तुका म्हणे रत्न सार । परि उपकार चिंधीचे ॥४॥
- देवाचे म्हणोनि देवीं अनादर। हे मोठे आश्चर्य वाटतसे ॥१॥ आतां येरा जना म्हणावें तें काईं?। जया भार डोईं संसाराचा ॥ध्रु॥ त्यजूनि संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥३॥ तुका म्हणे आळस करूनियां साहे । बळें कैसे पाहे वायां जाती ॥४॥
- संतांचे गुणदोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥२॥ तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी, तो चांडाळ दु:ख पावे ॥३॥
- चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकी जाती ऐसा ॥ध्रु॥ माकडाच्या गळां रत्न, कुळांगना। सांडूनिया सुना बिदी धुंडी॥३॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥४॥
- सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदी ॥१॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हाती काळाच्या सकळ ॥ध्रु॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥३॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा! ॥४॥
- सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥ आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु॥ अंगाचे भोवंडी । भोय झाडें फिरती धोंडी ॥३॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥४॥
- न देखोनि कांहीं । म्यां पाहिलें सकळही ॥१॥ झालों अवघियांपरी । ‘मी’ हे ‘माझें’ ठेलें दूरी ॥ध्रु॥ न घेतां घेतलें । हात पाय उसंतिले ॥३॥ खादलें न खातां । रसना रस झाली घेतां ॥४॥ न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥५॥ नाइकिलें कानीं । तुका म्हणे आले मनीं ॥६॥
- शरणागत झालो । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याचीच वाट । पाहों, नाहीं खटपट ॥ध्रु॥ नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥३॥ तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥४॥
- काखे कडासन आड पडे। खडबड खड-बड हुसकलें ॥१॥ दाद करा दाद करा । फजितखोरा लाज नाहीं ॥२॥ अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरेना ॥३॥ हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥४॥ दोहीं ठायीं फजित झाले । पारणे केले अवकळा ॥५॥ तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणें ॥६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




शुभ प्रभात माऊली,जय जय रामकृष्णहरि माऊली,
हरी जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम
Very good ajenda,everyone would like to follow..