दिवस – ९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥

या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिकां कां न वधावें? । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥७॥ म्हणोनि जळो हें झुंज! । प्रत्यया न ये मज । येणें काय काज । महापापें?॥८॥ देवा, बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां । वरी, कांहीं चुकवितां; । लाभु आथी ॥९॥

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा॥३२॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा: सुखानि च। त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥३३॥

तया विजयवृती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हे पावोनियां ॥२१०॥ या सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे! । पार्थु म्हणे ॥११॥ तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल । वरी, जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥१२॥ परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हें, स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥१३॥ तरी आम्हीं कां जन्मावें?। कवणालागीं जियावें । जरी वडिलां यां चिंतावें । अहित, मनें ॥१४॥ पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ?। जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें?॥१५॥ हें मनींचि केविं धरिजे?। आपण वज्राचेंया होईजे?। वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥१६॥ आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥१७॥ आम्ही, दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि, सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥१८॥ तेचि हे समस्त!। परी कैसें कर्म विपरीत! । जे, जाहले असती उद्यत । झुंजावया ॥१९॥ अंतौरिया, कुमरें । सांडोनिया भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥२२०॥ ऐसियांते कैसेनि मारूं?। कवणावरी शस्त्र धरूं? । निजहृदया करूं । घात केवी?॥२१॥

आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा:। मातुला: श्वशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा॥३४॥

हें नेणसी तूं कवण?। परी पैल भीष्म द्रोण!। जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥२२॥ एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥२३॥ अवधारी, अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि, दोष आथी वाचे । बोलतांचि ॥२४॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो: किं नु महीकृते॥३५॥

हे वरी भलते करितु । आतांचि येथें मारितु । परि, आपण मनें घातु । न चिंतावा!॥२५॥ त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥२६॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे? । सांगे, मुख केवीं पाहिजे । तुझें, कृष्णा? ॥२७॥


जनार्दन नमन (१ ते १३)

जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वे सुहावा । विश्वी विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥१॥ ते विश्वीं जो विश्ववासी । ‘त्यातें विश्वासी’ म्हणसी । तेणें विश्वासे प्रसन्न होसी । तैं पायांपाशी प्रवेशु ॥२॥ त्या चरणारविंदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गांठी । एकसरे तुझ्या पोटीं । उठाउठी प्रवेशलों ॥३॥ यालागीं तूं निजात्ममाये । या हेतू जंव पाहों जायें । तंव बापपण तुजमाजी आहे । अभिनव काये सांगावें? ॥४॥ येथ मातापिता दोनी । वेगळी असती जनीं । ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥५॥ आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा । परी नित्य नवा सोहळा । संभ्रम आगळा निजबोधाचा ॥६॥ शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चंडांशु । ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥७॥ यापरी मज निजबाळा । लेणी लेवविशी स्वलीळा । आणि लेइलेपणाचा सोहळा । पाहाशी वेळोवेळां कृपादृष्टीं॥८॥ बाळका लेवविजे लेणें । तयाचें सुख तें काय जाणे । तो सोहळा मातेने भोगणें । तेवीं जनार्दने भोगिजे सुख ॥९॥ आपुल्या चिद्‌रत्नांच्या गांठी। आवडी घालिशी माझ्या कंठीं । यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥१०॥ समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु । एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥११॥ बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें । तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥१२॥ तेणें नवल केलें येथ । मूर्खाहाती श्रीभागवत । शेखी बोलविलें प्राकृत । एकादशार्थ देशभाषा ॥१३॥

दुसऱ्या अध्यायाचा प्रस्ताव (१४ ते २०)

परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो । पुढे कथाकथनी ठावो । कांहीं अभिप्रावो दिसेना ॥१४॥ आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृष्णनिधन । यालागीं राजा मौन । ठेला धरून निवांत ॥१५॥ जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलता जाहला शुकदेवो । तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥१६॥ हा एकादश अलोकिक । श्लोकाहून श्लोक अधिक । पदोपदी मुक्तिसुख । लगटलें देख निजसाधकां ॥१७॥ ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान । मुक्तिसुखी आवडी गहन । अवधानें कान सर्वांग केले ॥१८॥ ऐसें देखोन परीक्षिती । शुक सुखावे अत्यंत चित्तीं । तो म्हणे अवधानमूर्ती  । ऐक निश्चितीं गुह्य ज्ञान ॥१९॥ द्वितीयाध्यायीं निरूपण । नारद-वसुदेवसंवाद जाण । निमिजायंतांचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥२०॥

शुक (२१, २२)

श्रीशुक उवाच – गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरूद्वह । अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥१॥

शुकाचार्य म्हणाले हे कुरुश्रेष्ठा, भगवंताच्या बाहुबलाने सुरक्षित अशा द्वारकेमध्ये, कृष्णोपासनेत रंगलेले नारदऋषी वरचेवर राहात असत. ॥१॥

जो मुक्तांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी । योगी वंदिती मुकुटस्थानीं । जो भक्तमंडणी अतिश्रेष्ठ ॥२१॥ जो ब्रह्मरसाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । श्रोता नरेंद्र कुरुवंशींचा ॥२२॥

नारद (२३ ते २८)

तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु । आणि माझाही परमगुरु । नारद महामुनीश्वरू । त्यासी अतिआदरु श्रीकृष्णभजनीं ॥२३॥ द्वारकेहूनि स्वयें श्रीकृष्ण । पिंडारका पाठवी मुनिगण । तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुनः पुनः येतु ॥२४॥ हो कां जे द्वारकेआंत । न रिघे भय काळकृत । जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ । असे नांदत निजसामर्थ्ये ॥२५॥ दक्षशापु नारदासी पाहीं । मुहूर्त राहों नये एके ठायीं । तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु ॥२६॥ ज्याची गाइजे कीर्तनी कीर्ती । तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती । तेथे शापबाधेची न चले प्राप्ती । यालागी नित्यवस्ती नारदासि तेथें ॥२७॥ नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृष्णमूर्तीचे ध्यान । श्रीकृष्ण-देहो चैतन्यघन । यालागी श्रीकृष्णभजन नारदा पढियें ॥२८॥

अभक्तांची गती (२९ ते ३५)

यापरी कृष्णभजन । मुक्तांसी पढियें पूर्ण । त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरूपण शुक सांगे ॥२९॥

को नु राजन्निन्द्रियवान्मुकुन्दचरणाम्बुजम् । न भजेत्सर्वतोमृत्युरुपास्यममरोत्तमैः ॥२॥

सर्व जग चोहोकडून नाशाच्या भयाने भरले असताना, असा कोणता विचारी जीव, हे राजन्, ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवसुद्धा ज्याची उपासना अहर्निश करतात अशा अभय देणाऱ्या श्रीकृष्णपदकमलाची उपासना करणार नाही?॥२॥

ऐकें बापा नृपवर्या  । येऊनि उत्तमा देहा या । जो न भजे श्रीकृष्णराया । तो गिळिला माया अतिदुःखें ॥३०॥ ज्या भगवंतालागुनी । माथा धरूनि पायवणी । सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानी निजवस्ती ॥३१॥ पोटा आला चतुरानन । इतरांचा पाडु तो कोण? । देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥३२॥ त्यजूनि परमात्मा पूर्ण । नाना साधनें शिणती जन । त्यासी सर्वथा दृढबंधन । न चुके जाण अनिवार ॥३३॥ सांडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवांचे करितां भजन । ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचे मरण कोण वारी? ॥३४॥ असोनि इंद्रियपाटव पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण । त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥३५॥

नारद (३६ ते ४२)

तो नारद महामुनीश्वरु । मुक्त होऊनि भजनतत्परु । द्वारके वसे निरंतरु । श्रीकृष्णी थोरु । अतिप्रीति तया ॥३६॥

तमेकदा तु देवर्षिं वसुदेवो गृहागतम् । अर्चितं सुखमासीनमभिवाद्येदमब्रवीत् ॥३॥

एकदा नारदऋषी वसुदेवगृही आले असता त्यांस सुखासनावर बसवून, पूजा झाल्यानंतर वसुदेवाने त्यांस नमस्कार केला व तो म्हणाला ॥३॥

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वी  सर्वत्र गोविंदु । सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदु सदोदित ॥३७॥ जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा । ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥३८॥ तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा । आला वसुदेवाचिया राउळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥३९॥ केलें साष्टांग नमन । बैसों घातले वरासन । ब्रह्मसद्भावें पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिलें ॥४०॥ नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरूनि जाण । हेमपात्री चरणक्षाळण । मधुपर्कविधिपूर्ण पूजा केली ॥४१॥ पूजा करोनि सावधानीं । वसुदेव बैसोनी सुखासनीं । हृदयीं अत्यंत सुखावोनी । काय आल्हादोनी बोलत ॥४२॥

वसुदेवकृत नारदस्तुती (४३ ते ७८)

वसुदेव उवाच – भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् । कृपणानां यथा पित्रोरुत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥४॥

वसुदेव म्हणाले, हे ऋषिवर्य, आपले भ्रमण सर्व जीवांच्या कल्याणार्थ असते. आईबाप जशी मुलांच्या कल्याणाची काळजी अंतःकरणपूर्वक घेतात तशीच भगवज्ज्ञानाचा अखंड बोध करणारे संत दीनांची काळजी घेऊन त्यांचे कल्याणार्थ झटत असतात. ॥४॥

स्वलीला कृपा केली तुम्हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी। तुमचेनि आगमनें आम्ही । कृतकृत्य स्वामी सन्निधिमात्रें ॥४३॥ चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं । त्यासी मातेच्या आगमनीं  । संतोष मनीं निर्भर ॥४४॥ त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखदाती भूतमात्रां । स्वलीला तुम्ही मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥४५॥ मातेच्या आगमनी निजबाळा । दृष्टिउत्संगी नित्य नवा सोहळा । तुमची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसुख ॥४६॥ माता सुख दे तें नश्वर । तुमच्या आगमनी अनश्वर । नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥४७॥ तुम्ही भागवतधर्ममार्गगामी । तेंचि तुमची भेटी लाहों आम्ही । स्वयें पुण्यकोटी निष्कामी । प्रयागसंगमीं केलिया ॥४८॥ नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप । तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरूप ठसावे ॥४९॥ तुझेनि भक्तीसी महिमा अमूप । तुझेनि वाढला भक्तिप्रताप । तुझेनि भक्ति भगवद्रूप । तूं चित्स्वरूप निजनिष्ठा ॥५०॥ तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । की भक्तिमार्गीचा मार्गद्रष्टा । नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥५१॥ मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवां व्यासासी उपदेशून । प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥५२॥ नारदा तूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण । तेचिविषयी निरूपण । वसुदेव आपण निरूपी ॥५३॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


१२८.कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥ भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुकेना ॥ध्रु॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥३॥ तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासी ॥४॥
१२९.तारतिम वरि तोंडाच पुरतें । अंतरा हें येतें अंतरींचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकी सत्य ऐसें ॥ध्रु॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोह चाळवणीं मारावया ॥३॥ तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदराचें पुढें सोंग दावी ॥४॥
१३०.ब्रह्मनिष्ठ काडी । जरी जीवा नांवें मोडी ॥१॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु॥ सांगितलें कानीं । रूप आपुले वाखाणी ॥३॥ भूतांच्या मत्सरें । ब्रह्मज्ञान नेलें चोरें ॥४॥ शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥५॥ निंदास्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥६॥
१३१.इहलोकींंचा हा देह । देव इच्छिताती पाहें ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ध्रु॥ आयुष्याच्या साधनें । ‘सच्चिदानंद’ पदवी घेणें ॥३॥ तुका म्हणे पावटणी । करूं स्वर्गाची, निशाणी ॥४॥
१३२.पंडित वाचक जरी झाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें । क्षीर तुपा साखरे झालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥१॥ जाणोनियां लाभ घेईं हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा! । जाणिवेचें मूळ उपडोनि खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥ध्रु॥ नाना परिमळ द्रव्य उपचार । अंगीं उटी सार चंदनाची । जेविलियाविण शून्य ते शृंगार। तैसी गोडी हरिकथेविण ॥३॥ ज्याकारणें वेद-श्रुति हीं पुराणें । तेंचि विठ्ठलनाणें तिष्ठे कथें । तुका म्हणे येर दगडाची पेवें । खळखळीचें अवघें मूळ तेथें ॥४॥
१३३.आणिकांच्या कांपिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥१॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरीं भोगावया ॥ध्रु॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासी ॥३॥ तुका म्हणे नाचती पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥४॥
१३४.गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चरा-चरीं त्याग केला? ॥१॥ गायत्री स्वमुखें भक्षितसे मळ । मिळाल्या वोहोळ गंगा ओघ ॥२॥ कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहतां दोष ॥३॥ शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसी ॥४॥ गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहा पां विचार पिंगळेचा ॥५॥ वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे? ॥६॥ न व्हावीं ती कर्में झाली नरनारी । अनुतापें हरि स्मरतां मुक्त ॥७॥ तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासी ॥८॥
१३५.सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वानालागी॥१॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सूकराला चोजविली॥२॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खूण काय जाणे? ॥३॥ तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥४॥
१३६.ऐसा हा लौकिक कदा राखवेना। पतित-पावना देवराया! ॥ध्रु॥ संसार करितां म्हणती ‘हा दोषी’। टाकितां ‘आळसी पोटपोसा’॥२॥ आचार करितां म्हणती ‘हा पसारा’। न करितां नरा निंदिताती ॥३॥ संतसंग करितां म्हणती ‘हा उपदेशी’ । येरा ‘अभाग्यासी ज्ञान नाहीं’ ॥४॥ धन नाहीं त्यासी ‘ठायींचा करंटा’। समर्थासि ‘ताठा करिताती’ ॥५॥ बहु बोलों जातां म्हणती ‘हा वाचाळ’। न बोलतां सकळ म्हणती ‘गर्वी’ ॥६॥ भेटिसि नवजातां म्हणती ‘हा निष्ठुर’। येतां जातां ‘घर बुडविलें’॥७॥ लग्न करूं जातां म्हणती ‘हा मातला’। न करिता झाला ‘नपुंसक’॥८॥ निपुत्रिका म्हणती ‘पहा हो चांडाळ’ । ‘पातकाचें मूळ पोरवडा’ ॥९॥ लोक जैसा ओक धरितां धरवेना । अभक्ता जिरेना संतसंग ॥१०॥ तुका म्हणे आतां आइका वचन । त्यजूनियां जन भक्ति करा ॥११॥
१३७.धर्म रक्षावयासाठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥ वाचा बोलों वेदनीति । करूं संतीं केलें तें ॥ध्रु॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥३॥ तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥४॥
१३८.चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्ही कंठी सांठविला ॥१॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारी रिद्धिसिद्धि ॥ध्रु॥ असुर जयानें घातले तोडरीं । आम्हांसि तो जोडी कर दोन्ही ॥३॥ रूप रेखा नाहीं जयासी आकार । आम्हीं तो साकार भक्तिं केला ॥४॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥५॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । झालों हे निराळीं ठेवूनि आशा ॥६॥
१३९.केला मातीचा पशुपति। परि मातीसी काय महती? । शिवपूजा शिवासि पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संत पदवी नको आम्हांस ॥ध्रु॥ केला पाषाणाचा विष्णु । परि पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥३॥ केली कास्याची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेपणें ॥४॥ ब्रह्मानंद पूर्णा माजीं । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा तेणेंचि घेणें । आम्हां पाषाणरूप राहणें ॥५॥
१४०.ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥ येरा मान विधी पाळणापुरते । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु॥ सर्वभावें झालों वैष्णवांचा दास । करीन त्यांची आस उच्छिष्टाची ॥३॥ तुका म्हणे जैसे आवडती हरिदास । तैसी नाहीं आस आणिकांची ॥४॥
(मासिक पारायण पहिला विसांवा)

2 thoughts on “दिवस – ९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

  1. केशव ज्ञानोबा बडे

    राम कृष्ण हरी
    डॉ. बाबा यांनी आपणा सर्वांच्या भल्यासाठी
    मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

    डॉ. बाबा आपणास कोटी कोटी धन्य‌वाद.

  2. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो खुप आनंद झाला असेच नित्य नेम प्रकाशित करा धन्यवाद समितीचे खुप आभार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top