
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – १. ओवी क्र. २२८ – २४५
निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीति: स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिन: ॥३६॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तूं; हातींचा । दूरी होसी ॥२८॥ कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडतीं अशेखें । तये वेळी तूं, कवणें? कें । देखावासी?॥२९॥ जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला, देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहें ॥२३०॥ का, सकर्दम सरोवरु । अवलोकूनि, चकोरु । न सेवितु; अव्हेरु । करूनि, निघे ॥३१॥ तयापरी, तूं देवा । मज झकवूं, न येसीं मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥३२॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् । स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ॥३७॥
म्हणोनि, मी हें न करी । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ! बहुतीं परी । दिसतसे ॥३३॥ तुजसीं अंतराय होईल । मग, सांगे, आमुचें काय उरेल?। तेणें दु:खें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥३४॥ म्हणौनि, ‘कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती’ । अर्जुन म्हणे ॥३५॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: । कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥३८॥
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥३९॥
हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले । तऱ्ही आम्हां हित आपुलें । जाणावें लागे ॥३६॥ हें ऐसें कैसें करावें? । जे आपुले आपण मारावे? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट?॥३७॥ हां जी, मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला अवचिता । तो, तंव चुकविता । लाभु आथी ॥३८॥ असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ, कवणु, देवा । लाभु सांगे? ॥३९॥ कां, समोर अग्नि देखोनि । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळू शके ॥२४०॥ तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजो असती पहात । हें जाणतांहीं; केवीं एथ । प्रवर्तावें?॥४१॥ ऐसें, पार्थु तिये अवसरीं । म्हणे ‘देवा, अवधारीं । या कल्मषाची थोरीं । सांगेन तुज’ ॥४२॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना:। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्ही एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥४३॥ तैसा, गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥४४॥ म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥४५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ५४ ते १०३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च । सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥५॥
देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं । अतिवृष्टी का अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥५४॥ त्या देवांपरीस साधु अधिक । हे साचचि मज मानलें देख । देवचरितें उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥५५॥ त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसखा । तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमा लोकां कदा न कळेचि ॥५६॥ दिधल्या सुखासी मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं । ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशीं निश्चितीं नारदा ॥५७॥ तुझिये महिमेपासीं । मुदल देवो न ये तुकासी । तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेसी नारदा ॥५८॥ देवाचा अवतार होये । दासां सुख, दैत्यां भये । तेथही ऐसें विषम आहे । हे न समाये तुजमाजीं ॥५९॥ तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं । रावण तुज नेऊनि एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥६॥ देव रावणे घातले बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी । शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥६१॥ जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं । आणि कृष्णाचे सभेमाझारी । आप्तत्वें थोरी मैं तुझी ॥६२॥ नाम घेवों नेदी देवाचें । हे बिरुद हिरण्यकशिपूचें । त्यासी कीर्तन तुझे रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥६३॥ लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी । ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेसी सांगेन ॥६४॥
भजन्ति ये यथा देवान् देवा अपि तथैव तान् । छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥६॥
जे जैसे देव यागी यजिजती । तैसतैसी फळे देव देती । न भजत्यांतें विघ्ने सूचिती । ऐसी गती देवांची॥६५॥ जैसजैसा पुरुष वेठे । तैसतैसी छाया नटे । तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥६६॥ जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे । निजकर्मे देवही तैसे । कर्मवशे प्रसन्न ॥६७॥ सूर्यअस्तमानी छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे । एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासें जाणसी ॥६८॥ इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥६९॥ त्याचे जीवें सर्वस्वे भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥७०॥ तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी । तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥७१॥ तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान । ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥७२॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥७३॥ केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥७४॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी । ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७५॥ वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचे पाप । शेखी सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥७६॥ तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येऱ्हवीं हातीं न धरी आनातें ॥७७॥ ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञाने अतिउदारु । तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥७८॥
भागवतधर्मनिरूपणास्तव वसुदेवाची नारदास विनंती (७९ ते १०२)
ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव । याञ्छ्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते विश्वतो भयात् ॥७॥
आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्ये आली फळासी । मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥७९॥ कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घाली ठसा । मज तुझा पूर्ण भरंवसा । सोडवी भवपाशापासूनि ॥८०॥ तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जऱ्ही मज जाली तत्त्वतां । तन्ही भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥८१॥ ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणे निरसे कर्माकर्म । श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२॥ भवभय अतिदारुण । त्या भयाचे माया निजकारण । तिचे समूळ होय निर्दळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥८३॥ मज नाहीं अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण । तेविषयींची हे विनवण । सावधान अवधारीं ॥८४॥
अहं किल पुराऽनन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् । अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥८॥
मज अधिकार नाहीं पूर्ण । हे मीही जाणतों आपण । मागें म्यां केलें भगवद्भजन । तें तूं कथन अवधारीं ॥८५॥ म्यां पूर्वी आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वांयां । प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥८६॥ मज देव तुष्टला प्रसन्नपणें । ‘मागसी तें देईन’ म्हणे । तेथे मायेनें ठकिलें मजकारणे । ‘माझा पुत्र होणे’ मी मागें ॥८७॥ तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान । तोचि वंदी माझे चरण । म्हणे ‘बाळक पूर्ण मी तुझें’ ॥८८॥ यापरी श्रीकृष्णापासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी । कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसी मी जाणे ॥८९॥ श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं । तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसी उद्धरीं ॥९॥ जे मायेनें ठकिलों वाडेकोडें । ते माया समूळ झडे । ऐसें सांगिजे रोकडें । बहु बोलोनि पुढे काय काज? ॥९१॥
यथा विचित्रव्यसनाद्भवद्भिर्विश्वतोभयात् । मुच्येमह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥९॥
मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु । त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारूं मुनिराया! ॥९२॥ याचे सकळ जळ क्षार । माजी सावजें अनिवार । एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तीं ॥९३॥ लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा । आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥९४॥ अहं-कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु । मी-माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धरु गर्जत ॥९५॥ नाना वासनांचा वळसा । पाहें पां भंवताहे कैसा । येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥९६॥ क्रोधाचे प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें । असूया तिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥९७॥ कामपर्वताची शिखरें । विषमें भासती अपारें । आशेइच्छेची वरी थोरें । झाडें विषयांकुरे वाढलीं ॥९८॥ संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण । ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरी जाण तळपती ॥९९॥ एवढाही हा भवसागरु । शोषिता तूं अगस्ती साचारु । तुझेनि भवाब्धिपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥१००॥ याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा । अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥१॥ पायीं उतरून भवसागरु । साक्षात् पावें परपारु । ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥२॥
भागवतधर्मनिरूपण—प्रस्ताव (१०३ ते १०९)
ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चित्तीं । तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १४१ ते १५६
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




राम, कृष्ण, हरी 🙏🙏
राम, कृष्ण, हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏