दिवस – ११. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्कर: ॥४१॥

एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥४६॥ असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । तरी उजूचि; कां आडळिजे । जयापरी ॥४७॥ तैसा, कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनि?॥४८॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥४९॥ उत्तम अधमीं संचरती । ऐसें वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जाति-धर्म ॥२५०॥ जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥५१॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ॥४२॥

मग, कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथी ॥५२॥ देखें, वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥५३॥ जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे । तेथ, कवणा तिळोदकें । कवण अर्पी?॥५४॥ तरी पितर काय करिती! । कैसेनि स्वर्गीं वसती?। म्हणौनि, तेही येती । कुळापासीं ॥५५॥ जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ आघवें । आप्लविजे ॥५६॥

दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसङ्करकारकै:। उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता:॥४३॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन। नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌‍ । यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ॥४५॥

देवा, अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे-संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥५७॥ जैसा, घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला । तो, आणिकांहीं, प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥५८॥ तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥५९॥ तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे ‌‘तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥२६०॥ पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं‌’ । अर्जुन म्हणे ॥६१॥ देवा, हें विविध, कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे?। अवधारीं पां ॥६२॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं, तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही; दोख । अव्हेरू ना?॥६३॥ जे-हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां; काय थेंकुलें । घडलें आम्हां? ॥६४॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌‍ ॥४६॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे-शस्त्रे सांडूनि साहावे । बाण यांचे ॥६५॥ तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी, येणें कल्मषें । चाड नाहीं ॥६६॥ ऐसें देखूनी सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे ‌‘राज्य तें केवळ । निरयभोगु‌’ ॥६७॥

सञ्जय उवाच

एवमुक्त्वार्जुन: सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌‍ । विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस:॥४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ॥१॥

ऐसें तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे, अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥६८॥ मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥६९॥ जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां, रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥२७०॥ नातरी, महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु; भ्रमें । मग; आकळुनि कामें । दीनु कीजे ॥७१॥ तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दु:खे जर्जरु । दिसे; जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥७२॥ मग धनुष्य-बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसे, ऐके राया, वर्तलें । संजयो म्हणे ॥७३॥ आतां यापरी, तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥७४॥ ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥२७५॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोध्याय:॥१॥

॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥


श्रीशुक उवाच- राजन्नेवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता । प्रीतस्तमाह देवर्षिर्हरेः संस्मारितो गुणैः ॥१०॥

सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण । नारदु वोळला चैतन्यघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥४॥ श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा । ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे ‘वसुदेवा धन्य वाणी’ ॥५॥ परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण । ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥६॥ रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं । आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगी डुल्लतु ॥७॥ सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता । तैं तो जाणावा अवघा रिता- । कथासारामृता चवी नेणे ॥८॥ ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण । मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥९॥

नारद उवाच – सम्यगेतद्‌ व्यवसितं भवता सात्वतर्षभ । यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥११॥

भागवतधर्म-महिमा (११० ते ११७)

नारद म्हणे सात्वतश्रेष्ठा । वसुदेवा परमार्थनिष्ठा । धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥११०॥ ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हे विश्व अवघेचि उद्धरे । हे विचारिलें तुवां बरें । निजनिधीरें श्रीकृष्णजनका ॥११॥ तुझेनि प्रश्नोत्तरे जाण । साधक निस्तरती संपूर्ण । साधकांचे नवल कोण? । महापापी पावन येणें होती ॥१२॥

श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वाऽनुमोदितः । सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥१२॥

भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें । एक तरती पठणें । एक निस्तरती ध्याने संसारपाश ॥१३॥ एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें । सद्भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्मे ॥१४॥ हे नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा । अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भागवतधर्मी ॥१५॥ हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचे निर्दळी कर्म । अधर्म्याचे निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥१६॥ जेथ रिघाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म । निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥१७॥

नारदकृत वसुदेवस्तुती (११८ ते १२३)

ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर । निजभाग्ये तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा! ॥१८॥ तुझें वाणूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण । जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वंद्य ॥१९॥ तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझिया घरांत । तुझियाऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥१२०॥ वसुदेवा तुझिया नामतां । ‘वासुदेव’ म्हणती अनंता । तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥२१॥

त्वया परमकल्याणः पुण्यश्रवणकीर्तनः । स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥१३॥

ज्याचेनि श्रवणे वाढे पुण्य । ज्याचेनि नामें झडे भवबंधन । तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥२२॥ तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण । मज तुझा हा उपकार पूर्ण । परम कल्याण वसुदेवा ॥२३॥

(नारदाचे) स्मरण-विस्मरण (१२४ ते १२८)

आशंका ॥ऐकोनि नारदाचे वचन । झणे विकल्प धरील मन । ‘यासी पूर्वी होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्ने’ ॥२४॥ ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । तें जाणावे निजात्मघाती । तेही अर्थीची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥२५॥ अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो घृतावदानें अति प्रकाशे । तेवीं सप्रेम प्रश्नवशे । सुख उल्लासे मुक्तांचें ॥२६॥ सप्रेम भावार्थे मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा । तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥२७॥ यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्मे निवती संपूर्ण । तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥२८॥

(जीर्ण) भागवतधर्माचा इतिहास (१२९ ते २१४)

जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ । सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥२९॥

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥१४॥

येच अर्थी विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण । ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥१३०॥ ‘आर्षभ कोण’ म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी । जन्म जयांचा सुकुळीं । नवांमाजी जाहली ब्रह्मनिष्ठा ॥३१॥

प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायंभुवस्य यः । तस्याग्नीध्रस्ततो नाभिF©$षभस्तत्सुतः स्मृतः ॥१५॥

स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ‘प्रियव्रतु’ । त्याचा ‘आग्नीध्र’ विख्यातु । ‘नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशी ॥३२॥ त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ‘ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु । मोक्षधर्माचा प्रकाशु । जगी सावकाशु विस्तारिला ॥३३॥

तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्मविवक्षया । अवतीर्णं सुतशतं तस्यासीद्वेदपारगम् ॥१६॥

ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु । प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥३४॥ त्याचे पंचमस्कंधी चरित्र । सांगितलें सविस्तर । त्यासी जाहले शत पुत्र । वेदशास्त्रसंपन्न ॥३५॥ त्यांहीमाजी ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र । ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥३६॥

तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः । विख्यातं वर्षमेतद्यन्नाम्ना भारतमद्भुतम् ॥१७॥

जो ज्येष्ठपुत्र ‘भरत’ जाण । तो नारायणपरायण । अद्यापि ‘भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥३७॥ जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा । असतांही राज्यधर्मी जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥३८॥ जेवीं मार्गी चालतां । पाउलें वक्रेही टाकितां । दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिकाचि ॥३९॥ तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां । यथोचित कर्म आचरतां । निजी निजात्मता पालटेना ॥१४॥ या नांव बोलिजे ‘अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांतीं । जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥४१॥ ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण । आईक त्याचेही व्याख्यान । विशद करून सांगेन ॥४२॥ नरांचा समुदाय गहन । त्यासी ‘नार’ म्हणती जाण । त्याचे ‘अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ‘नारायण’ आत्मयासी ॥४३॥ त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण । निवटूनियां आपुलें अहंपण । तद्रूपें जाण राहिला ॥४४॥ ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ‘भरत’ । ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥४५॥ तो भरतु राहिला ये भूमिकेसी । म्हणौनि ‘भारतवर्ष’ म्हणती यासी । सकळ कर्मारंभी करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताती ॥४६॥ ऐसा आत्माराम जऱ्ही झाला । तऱ्ही विषयसंग नव्हे भला । यालागी त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आइकें॥४७॥ नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्याते म्हणती ‘भरतखंड’ । आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥४८॥


१५७.करणें तें देवा । हेंचि एक पावे सेवा ॥१॥ अवघें घडे येणें सांग। भक्त देवाचें तें अंग॥ध्रु॥ हेंचि एक वर्म । काय बोलिलो तो धर्म ॥३॥ तुका म्हणे खरें । खरें, त्रिवाचा उत्तरें ॥४॥
१५८.मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥ध्रु॥ परनारीचें जया घडेल गमन । दावी तो वदन जननीरत ॥२॥ उपदेशावरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥३॥ तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥४॥
१५९.आणिकाच्या घातें। ज्यांची निवतील चित्तें ॥१॥ तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी॥ध्रु॥ जो कान पसरोनि । ऐके, वदे दुष्ट वाणी ॥३॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥४॥
१६०.केली सीताशुद्धि । मूळ रामायणा आधीं ॥१॥ ऐसा प्रतापी गहन। सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु॥ जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा॥३॥ राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥४॥ जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥५॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥६॥
१६१.काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥१॥ तया माझे दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥ध्रु॥ शरीर वज्राऐसें । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥३॥ रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥४॥
१६२.हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥ करोनि उड्डाण । केलें लंकेचें शोधन॥३॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥४॥
१६३.शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा! ॥ध्रु॥ शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥३॥ तुका म्हणे रुद्रा! । अंजनीचिया कुमरा ॥४॥
१६४.धिग जिणें तो बाईले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥ धिग जिणें ज्याचें लोभावरी मन । अतीत पूजन घडेचि ना ॥२॥ धिग जिणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥३॥ धिग जिणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागी साधुपणा ॥४॥ तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥५॥
१६५.अरे हे देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥ मग कैंचें हरिचें नाम । निजलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दु:ख थोर साधिलें ॥ध्रु॥ विषयसुखाचा लंपट। दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥३॥ आणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥४॥ तुका म्हणे ऐसें । मना लावीं रामपिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥५॥
१६६.अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे? ॥१॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपु-लाल्या मती पाखांडिया ॥ध्रु॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥३॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥४॥
१६७.एक तटस्थ मानसीं । एक सहजचि आळसी ॥१॥ दोन्हीं दिसती सारखीं । वर्म जाणे तो पारखी॥ध्रु॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसूनि घेती झोंप ॥३॥ एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठीं जोग ॥४॥ एका भक्ति पोटासाठीं । एका देवासवें गांठी॥५॥ वर्म, पोटी एका । फळे दोन सांगें तुका ॥६॥
१६८.काय कळे बाळा? । बाप सदैव, दुबळा॥१॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥३॥ तुका म्हणे भावें । माझें मज समजावें ॥४॥
१६९.भजन घाली भोगावरी। अकर्तव्य मनीं धरी ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनि वर्ते मन ॥ध्रु॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवीं आस ॥३॥ हें ना तैसें झालें । तुका म्हणे वायां गेलें ॥४॥
१७०.एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥ ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु॥ अशुद्ध विटाळशीचें खळ । विडा भक्षितां तांबूल । सांपडे सबळ। काळा हातीं न सुटे ॥३॥ सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥ आपण न वजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महामेरु ॥५॥ तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ॥६॥

2 thoughts on “दिवस – ११. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

  1. केशव ज्ञानोबा बडे

    राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.

  2. नंदकिशोर अमृतराव इंगळे, अकोला

    शुभ सायःकाळ माऊली,जय जय रामकृष्णहरि माऊली,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top