
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. १ ते २९
अध्याय दुसरा
संजय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥
मग संजयो म्हणे रायातें । “आइके, तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥१॥ तें कुळ देखोन समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणे परी?॥२॥ जैसें लवण जळें झळंबळें । नातरी, अभ्र वाते हाले । तैसें, सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥३॥ म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला! । जैसा कर्दमीं रुतला । राजहंस ॥४॥ तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखानि, श्रीशार्ङ्गधरु । काय बोले ॥५॥
श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२॥
म्हणे, “अर्जुना, आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं? । तूं कवण? हें कायी । करीत आहासी?॥६॥ तुज, सांगे, काय जाहलें? । कवण उणें आलें? । करिता, काय ठेलें? । खेदु कायिसा?॥७॥ तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कही न सांडिसी । तुझेनि नामें, अपयशीं । दिशा लंघिजे! ॥८॥ तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजी रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिही लोकीं ॥९॥ तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवात-कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥१०॥ पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें! । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥११॥ तो तूं, कीं, आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख, रुदनातें । करितु आहासी!॥१२॥ विचारीं तूं अर्जुनु! । कीं, कारुण्ये किजसी दीनु! । सांग पां, अंधकारें भानु । ग्रासिला आथी?॥१३॥ नातरी, पवनु मेघासी बिहे? । कीं, अमृतासी मरण आहे? । पाहें पां, इंधनचि गिळोनि जाये । पावकातें?॥१४॥ कीं, लवणेंचि जळ विरे? । संसर्गे काळकूट मरे? । सांग पां, ‘महा’फणी, दर्दुरें । गिळिजे कायी?॥१५॥ सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला? । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥१६॥ म्हणौनि, अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना! । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥१७॥ सांडी हें मूर्खपण । उठी; घे धनुष्य-बाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें?॥१८॥ हां गा, तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां? । सांगें, “झुंजावेळे सदयता । उचित कायी?॥१९॥ हे असतांये कीर्तिसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशू” । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥२०॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥३॥
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरी । हें शोच्यता अव्हेरी । पांडुकुमरा ॥२१॥ तुज नव्हे हे उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी तरी हित । विचारीं पां ॥२२॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज? ॥२३॥ तूं आधींचि काय नेणसी? । कीं हे गोत्रज नोळखिसी? । वायांिंच काय करिसी । अतिशो आतां?॥२४॥ आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज? । हें परस्परें तुम्हा व्याज । सदाचि आथी! ॥२५॥ तरी, आतां काय जाहलें? । कायि स्नेह उपनलें । हे नेणिजे; परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥२६॥ मोहो धरिलिया ऐसें होईल । जे-असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेसी ॥२७॥ हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ॥२८॥ एसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि; पांडुसुतु । काय बोले ॥२९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. १४८ ते २०३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् । उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥१८॥
तेणे दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें ।नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥४९॥ अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र । अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥१५०॥ ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी । स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥५१॥ जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती । भरते केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥५२॥ तो तेणेंचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण । परी जाहले जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥५३॥ संनिहितप्रसूतिकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं । ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळी अतिसत्राणें ॥५४॥ धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं । देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळी दयाळुत्वें ॥५५॥ मृगी न येचि परतोन । मातृहीन हे अतिदीन । भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥५६॥ स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण । आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥५७॥ आसनीं भोजनी शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं । मृग न देखतां नयनीं । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥५८॥ ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेसीं । त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ॥५९॥ यालागीं साचचि जाण । ममतेपाशी असे मरण । जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥६०॥ भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे? । ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥६१॥ देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान । तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥६२॥ कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु । यालागी जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥६३॥ मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला । जो कृष्णस्मरणे निमाला । तो कृष्णुचि जाला देहांती ॥६४॥ अंतकाळी जे मती । तेचि प्राणियांसि जाण गती । यालागीं श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥६५॥ परी मृगदेही जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण । पूर्वी केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥६६॥ मागुता तिसरे जन्में पाहें । तो ‘जडभरत’ नाम लाहे । तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥६७॥ बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी । निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥६८॥ ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं । त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥६९॥
तेषां नव नवद्वीपपतयोऽस्य समन्ततः । कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥१९॥
नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती । एक्यायशी जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ॥१७०॥ उरले जे नव जण । सकळ भाग्याचे भूषण । ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥७१॥
नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः । श्रमणा वातरशना आत्मविद्याविशारदाः ॥२०॥
ऋषभकुळी कुळदीप । स्नेहसूत्रवीण देदीप्य । नवही जण स्वयें सद्रूप । सायुज्यस्वरूपप्रकाशक ॥७२॥ आत्माभ्यासी परिश्रम । करून निरसिलें कर्माकर्म । यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥७३॥ शाब्दबोधे सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत । शिष्यप्रबोधी समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥७४॥ तें ब्रह्मविद्येचे चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब । ते विद्येचे पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥७५॥ दशदिशा एकूचि दोरा । भरूनि पांघरुणे मुनीश्वरा ।वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरूप ॥७६॥ आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिहीं । ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरूण ॥७७॥ प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं । तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥७८॥ ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभावें । त्यांची सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥७९॥ ज्यांचें नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता । संसार नुधवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥१८०॥ त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती । ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चिती भाविकां ॥८१॥
कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥२१॥
कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख । आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥८२॥ एवं नवही नांवें जाण । यांचे करितां नामस्मरण । सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥८३॥ त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती । ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥८४॥
एते वै भगवद्रूपं विश्वं सदसदात्मकम् । आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥२२॥
ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्रूपं अवघे एक । संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥८५॥ त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा । संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥८६॥ जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें ।तंव भगवद्रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखें ॥८७॥ हेही देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें । होणें न होणे येणे जाणे । ही गिळूनि लक्षणे विचरती मही ॥८८॥
अव्याहतेष्टगतयः सुरसिद्धसाध्यगन्धर्वयक्षनरकिन्नरनागलोकान् । मुक्ताश्चरन्ति मुनिचारणभूतनाथविद्याधरद्विजगवां भुवनानि कामम् ॥२३॥
वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें । एवं श्लोकोक्त चवदा भुवनें । स्वइच्छा विचरणे कामनारहित ॥८९॥ त्यांसी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खुंटेना त्यांची गती । इच्छामात्रें गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥१९०॥
त एकदा निमेः सत्रमुपजग्मुर्यदृच्छया । वितायमानमृषिभिरजनाभेर्महात्मनः ॥२४॥
जेथे मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥९१॥ मही विचरतां वितंड । पातले ‘अजनाभ’ खंड । तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥९२॥ याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका । आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥९३॥ स्रुक्-स्रुवा-त्रिसंधानें । विस्तारूनि परिस्तरणें । अखंड वसुधारा दंडाप्रमाणे । ऋषिमंडणे होम करिती ॥९४॥ होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण । येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥९५॥
तान्दृष्ट्वा सूर्यसंकाशान्महाभागवतान्नृप । यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥२५॥
अमित सूर्यांचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्ठीं । तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥९६॥ त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा । जिहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥९७॥ ते भगवद्भाववैभव । भगवंताचें निजगौरव । भक्तीचे भाग जे नव । ते हे जाण सर्व मूर्तिमंत ॥९८॥ नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवनिधींचें निजसार । नवरत्नांचेही निजभांडार । ते हे साकार नवही जण ॥९९॥ की ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण । नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥२००॥ आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी । ते हे भागवती देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥१॥ येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती । साउमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥२॥ सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण । मस्तकी वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १७१ ते १८७
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





