
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. २०१ ते २२५
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. ५५४ ते६०२
- भक्तीने मोक्ष (५५४ ते ५५६)
- भक्तांचा आत्मसाक्षात्कार (५५७ ते ५६७)
- भक्तांचा ब्रह्मानंद (५६८ ते ५७९)
- अद्वैतानुभव-सर्वत्र ब्रह्मभाव (५८० ते ६०२)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ३७८ ते २९१
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. २०१ ते २२५
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥३४॥
म्हणौनि, स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश ते न वचेल । कल्पांतवरी ॥१॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां, केवी निघावें । एथोनियां?॥२॥ तूं निर्मत्सर, सदयता । येथूनि निघसील कीर माघौता । परी, ते गती समस्तां । न मनेल ययां ॥३॥ हे चहूँकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था, न सुटिजेल । कृपाळूपणें ॥४॥ ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥५॥
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥३५॥
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥६॥ तरी तुझें तें अर्जुना । या वैरिर्यां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना? । सांगें मज ॥७॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥३६॥
हे म्हणती “गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला’ । हा, सांगै, बोलु उरला । निका कायी?॥८॥ लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥९॥ ते तुज अनायासें । अनकळित जोडली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥२१०॥ तैसी कीर्ति निःसीम । तुझ्या ठायी निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥११॥ दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥१२॥ ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट । जया देखि जगीं सुभट । वांठ जाहली ॥१३॥ तें पौरुष तुझें अद्भुत । ऐकोनियां; हे समस्त । जाहले आथी विरक्त । जीवितेसीं ॥१४॥ जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेष । धाकु तुझा ॥१५॥ जैसें पर्वत वज्रातें । नातरी, सर्प गरुडातें । तैसें, अर्जुना, हे तूतें । मानिती सदा ॥१६॥ तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥१७॥ आणि हे, पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । ऐकतां तुज ॥१८॥ मग तें वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंझावें? । हे जिंतले, तरी भोगावें । महीतळ ॥१९॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥३७॥
नातरि, रणीं एथ । झुंजतां, वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥२२०॥ म्हणौनि ये गोष्टी । विचारू न करी; किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥२१॥ देखें, स्वधर्मु हा आचरतां । दोषु-नाशे असता । तुज भ्रांति हे कवण, चित्ता । पातकाची?॥२२॥ सांगें, प्लवेंचि काय बुडिजे? । कां, मार्गी जातां आडळिजे? । परी, विपायें, चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥२३॥ अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मि दोषु पाविजे । हेतुकपणें ॥२४॥ म्हणौनिंया पार्था । हेतू सांडोनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥२५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ५५४ ते६०२
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
भक्तीने मोक्ष (५५४ ते ५५६)
जन्म-नाम-कर्मे श्रीधर- । श्रवणें उद्धरती पामर । यालागी हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥५४॥ ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग । त्यजूनि अहंममतापांग । विचरती निःसंग हरिकीर्तनें ॥५५॥ करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति । भक्त विसरे देहस्फूर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥५६॥
भक्तांचा आत्मसाक्षात्कार (५५७ ते ५६७)
एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः । हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादवन्नृत्यति लोकबाह्यः ॥४० ॥
हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं । स्वप्नीही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥५७॥ ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहलें ज्याचें व्रत । तंव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्भुत हरिनामकीर्ती ॥५८॥ आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी । नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरी हरि प्रगटे ॥५९॥ चुकल्या मायपूतां संकटीं । एकाकी बहुकाळें जाहली भेटी । तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥५६०॥ तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी । आत्म-साक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥६१॥ परमात्मयासी आलिंगन । तेणे अनिवार स्फुंदन । रोमांचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥६२॥ सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें । चुकलों भेटलों हे ऐसें । देखोनि आपुलें पिसें हांसोंचि लागे ॥६३॥ मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपूर्णत्वें अनादि रचलों । तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हांसोंचि लागे ॥६४॥ पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पूर्ण । तोच दोरातें वोळखोन । आपणियां आपण स्वयें हांसे ॥६५॥ तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समूळ वावो । तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहा वो म्हणूनि हांसे ॥६६॥ बाप गुरुवाक्य निजनिर्वाहो । देही असतां विदेहभावो । माझे चारी देह झाले वावो । येणें अनुभवें पहा वो गर्जो लागे ॥६७॥
भक्तांचा ब्रह्मानंद (५६८ ते ५७९)
म्हणे धन्य धन्य भगवद्भक्ती । जिणें मिथ्या केल्या चारी मुक्ती । मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥६८॥ धन्य भगवंताचें नाम । नामें केलों नित्य निष्काम । समूळ मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥६९॥ आतां दुजें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं । मीच मी तो एकाकी । येणें वाक्ये अलोलिकी हाक फोडी ॥५७०॥ दुर्धर भवबंध ज्याचेनि । निःशेष गेला हारपोनी । त्या सद्गुरूच्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोलिक ॥७१॥ म्हणे संसार झाला वावो । जन्ममरणांचा अभावो । कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥७२॥ ऐशा हाकांवरी हाका । फोडूं लागे अलोलिका । सवेंचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देखा डुल्लतु । । ७३॥ परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां । तेवीं निजानुभवें हरि गातां । धणी सर्वथा पुरेना ॥७४॥ त्याचे गाणे ऐकतां । सुखरूप होय सज्ञान श्रोता । मुमुक्षां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥७५॥ गातां पदोपदी निजसुख । कोंदाटे अधिकाधिक । वोसंडतां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥७६॥ सारूनि दुजेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज । अहंभावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥७७॥ जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये । जेणे ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला? ॥७८॥ यालागीं तो लोकबाह्यता । स्वयें नाचे ब्रह्मउन्मादता । लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पंडितां सहजा न कळे ॥७९॥
अद्वैतानुभव-सर्वत्र ब्रह्मभाव (५८० ते ६०२)
त्याचिया निजबोधाची कथा । ऐक सांगेन नृपनाथा । एक भगवंतावांचून सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥५८०॥
खं वायुमग्निं सलिलं महीं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् । सरित्समुद्रांश्च हरेः शरीरं यत्किञ्च भूतं प्रणमेदनन्यः ॥४१॥
ब्रह्मउन्मादपरमानंदें । जंव जंव पाहे स्वानंदबोधे । तंव तंव चराचर पूर्णानंदें । देखे स्वानंदकंदें दुमदुमित ॥८१॥ पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरूप स्वयंभ । भूतां महाभूतांचे डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥८२॥ जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा केळीचा कळा । स्वयें विकासे फळां दळां । तेवीं वस्तु हे पांचाला भूतभौतिकात्मक ॥८॥ जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृह-अंगमेळे । चितारिली अश्वगजदळें । ती भासती सोज्ज्वळे आंतुलेनि दीपें ॥८४॥ तेवीं सोमसूर्यादि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रे जे लखलखिती । जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥८५॥ युक्ती मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पुष्पाकार । तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्राकार नानात्वें भासे ॥८६॥ पृथ्वी गंधरूपें स्वये असे । तो गंधु कस्तूर्यादिकी भासे । तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकी दिसे अतिप्रगट ॥८७॥ यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भगवत्तत्त्व । सत्त्वें सत्त्ववंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरूपें ॥८८॥ पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतुःसमुद्र नांव लाहे । तैसें देवाचेंचि अंग पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥८९॥ पूर्वपश्चिमादि योग । दशदिशांचे दिग्विभाग । तेही देवाचेंचि अंग । तद्रूप श्रीरंग स्वयें भासे ॥५९०॥ तृण दूर्वा दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम । अनोळखा हे अतिविषम । निजांगी सर्व सम हरिरूप पाहतां ॥९१॥ जैशा आपुल्या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया । परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥९२॥ तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हे हरीचें अंग । अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥९३॥ म्हणे दूर्वा-द्रुम-वन-वल्ली । हेचि अनंत कोटी रोमावळी । हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरूपत्वें ॥९४॥ जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया । त्याही वटरूपें संचलिया । वटत्वा मुकलिया म्हणों नये ॥९५॥ तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारूप अनेग । तेही चैतन्यघन चांग । चिद्रूपं साङ्ग सदा वाहती ॥९६॥ हो कां चंद्रबिंबी अमृत जैसें । बिंबी बिंबरूप होऊनि असे । तेवीं भगवंती संसारु भासे । भजनविश्वासें भगवद्रूप ॥९७॥ ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जंव चांग । तंव अवघे उघडे जग । देवोचि साङ्ग स्वयें झाला ॥९८॥ यालागी सर्व भूतांचे ठायीं । अनन्यशरण कैसा पाहीं । लवण जैसें सागरापायीं । ठायी ठायीं जडानि ठाके ॥९९॥ तेथ मुंगीही देखोनि जाण । हरिरूपी वंदी आपण । मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगण भगवद्रूपें ॥६००॥ गो-खर-चांडाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन । ते भगवद्रूप देखोनि पूर्ण । घाली लोटांगण अनन्यभावें ॥१॥ हरिरूपें देखे पाषाण । भगवद्रूपें वंदी तृण । जंगमस्थावरादिकां शरण । घाली लोटांगण चिदैक्यभावें ॥२॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ३७८ ते २९१
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





