दिवस – २१. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥

सुखी संतोषा न यावें । दुःखी विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥२६॥ एथ विजयपण होईल । कीं, सर्वथा देह जाईल । हें, आधींचि, कांहीं पुढिल । चिंतावे ना ॥२७॥ आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे; तें निवांता । साहोन जावें ॥२८॥ ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंझावें । निभ्रांत, तुवां ॥२९॥

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥३९॥

हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली, तुज येथ । आतां, बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥२३०॥ जया बुद्धियुक्ता । जाहलिया, पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥३१॥ जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥३२॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥४०॥

तैसें, ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥३३॥ कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥३४॥ तिया परी, जे सुबुद्धि । आपु जालिया निरवधि । हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥३५॥ जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥३६॥ अर्जुना, तें पुण्यवशें । जरी अल्पचि, हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषहि नाशे । संसारभय ॥३७॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥४१॥

जैसी दीपकाळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥३८॥ पार्था, बहुती परी । हे अपेक्षिजे विचार-शूरीं । जे, दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥३९॥ आणिकांसारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां, अमृताचा लेशु । दैवगुणें ॥२४०॥ तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥४१॥ तैसी ईश्वरावांचुनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥४२॥ येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥४३॥ म्हणौनि, तया, पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥४४॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी, कर्मफळीं आसक्ती । धरूनिया ॥४५॥ म्हणती “संसारी जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥४६॥ येथ हें वांचूनि कांहीं । आणीक सर्वथा सुखचि नाहीं’ । ऐसें, अर्जुना, बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥४७॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥४३॥

देखें, कामना अभिभूत । होउनि; कर्मे आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥४८॥ क्रिया-विशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥४९॥


भक्तीने भगवत्प्राप्ती (६०३ ते ६१७)

करितां हरिनामस्मरणकीर्ती । एकाएकी एवढी प्राप्ती । झाली म्हणसी कैशा रीतीं । ऐकें नृपती तो भावो ॥३॥ करितां पूजाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन । सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण । ‘पूर्ण प्राप्ति’ जाण त्यातेंचि वरी ॥४॥

भक्तिः परेशानुभवो विरक्तिरन्यत्र चैष त्रिक एककालः । प्रपद्यमानस्य यथाऽश्नतः स्युस्तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥४२॥

आइकें विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद्भक्ती । तीपाशी विषयविरक्ती । ये धांवती गोवत्सन्यायें ॥५॥ हे असो जेवीं जावळी फळें । हों नेणें येरयेरां वेगळे । तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणे बळें बलिष्ठ होती ॥६॥ जेथ भक्ति आणि विरक्ती । नांदों लागती सहजस्थिती । तेथेंचि पूर्णप्राप्ती । दासीच्या स्थिती सर्वदा राबे ॥७॥ यापरी भगवद्भक्ती । पूर्ण दाटुगी त्रिजगतीं । भक्तांघरी नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥८॥ भक्ति विरक्ति अनुभवप्राप्ती । तिन्ही एके काळें होती । ऐक राया तेही स्थिती । विशदोक्ती सांगेन ॥९॥ जैसी कीजे भगवद्भक्ती । तैसीच होय विषयविरक्ती । तदनुसारें अनुभवस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥६१०॥ जेवीं का भुकेलियापाशीं । ताट वाढिले षड्रसीं । तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी । जेवीं ग्रासोग्रासी स्वयेंचि पावे ॥११॥ जितुका जितुका घेइजे ग्रास । तितुका तितुका क्षुधेचा नाश । तितुकाचि पुष्टिविन्यास । सुखोल्हास तितुकाचि ॥१२॥ पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी । जेवीं एके काळे येती तिनी । भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद्भजनीं भक्त्यादि त्रिकु ॥१३॥ सद्भावें करितां भगवद्भक्ती । भक्ति-विरक्ति-भगवत्प्राप्ती । तिनी एके काळें होती । ऐशिया युक्ती जाणिजे राया ॥१४॥ ‘भक्ति’ म्हणजे सर्व भूतीं । सप्रेम भजनयुक्ती । ‘प्राप्ति’ म्हणिजे अपरोक्षस्थिती । भगवत्स्फूर्ती अनिवार ॥१५॥ ‘विरक्ति’ म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो । समूळ जेथें होय वावो । विरक्तिनिर्वाहो या नांव राया ॥१६॥ यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपुटी । ऐक्यभावें सद्भक्तां उठी । हरिभजनदिठी एकेचि काळीं ॥१७॥

भक्तिनिरूपण-उपसंहार (६१८ ते ६२४)

यालागी राया निजहितार्थी । आदरें करावी हरिभक्ती । तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥१८॥

इत्यच्युताघ्रिं भजतोऽनुवृत्त्या भक्तिर्विरक्तिर्भगवत्प्रबोधः । भवन्ति वै भागवतस्य राजंस्ततः परां शान्तिमुपैति साक्षात् ॥४३॥

यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभूतीं करिती । ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥१९॥ राया हरिभक्तिदिव्यांजन । तें लेऊनि भक्त सज्जन । साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें । । ६२०॥ करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती । तेणे होये असतांची निवृत्ती । भक्तां ‘पूर्णप्राप्ति’ परमानंदें ॥२१॥ यालागीं धन्य भगवद्भक्त । इंद्रियीं वर्ततां विषयी विरक्त । देही असोनि देहातीत । नित्यमुक्त हरिभजनें ॥२२॥ भावें करितां भगवद्भक्ती । भक्त मुक्तीही न वांछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ॥२३॥ हा भागवतांचा निजमहिमा । अनुपम नाहीं उपमा । भावे भजोनि पुरुषोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥२४॥

भक्तलक्षणनिरूपण (६२५ ते ६३४)

अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती । ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्ये चित्तीं चमत्कारला ॥२५॥ म्हणे धन्य धन्य भगवद्भजन । हरिखें कवीस लोटांगण । घालितां चालिलें स्फुंदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले ॥२६॥ आनंदस्वेदें कांपत । नावेक राहिला तटस्थ । सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणी महंत न पुसतां जाती ॥२७॥ ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती । बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्तीं सुखावला ॥२८॥ तेणें संतोषे डोलत । म्हणे – ‘पूर्णप्राप्त’ भगवद्भक्त । जगीं कैसे कैसे विचरत । ती चिन्हें समस्त पुसों पाहों ॥२९॥

राजोवाच – अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् । यथा चरति यद्ब्रूते यैर्लिङ्गैर्भगवत्प्रियः ॥४४॥

भक्तां ‘पूर्णप्राप्ति’ सुगम । ऐकतां राजा निवाला परम । तो भक्तचिन्हानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥६३०॥ विदेह म्हणे स्वामी । पूर्ण प्राप्ति आकळोनी । ते भक्त कैसे वर्तती जनीं । ती लक्षणे श्रवणीं लेववा मज ३१॥ भक्तलक्षणभूषण । तेणें मंडित करा श्रवण । सावध ऐकतां संपूर्ण । होइजे आपण भगवत्प्रिय ॥३२॥ त्यांचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम । हृदयीं धरोनि पुरुषोत्तम । त्यांचे बोलतें वर्म तें कैसें ॥३३॥ कोणेपरी कैशा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती । ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समूळ मजप्रती सांगिजे स्वामी ॥३४॥

भक्तलक्षणे (६३५ ते ६३९)

विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मुनीश्वरीं । कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥३५॥

हरिरुवाच – सर्व भूतेषु यः पश्येद्भगवद्भावमात्मनः । भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ॥४५॥

हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती । एक दिगंबरत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजाचारें ॥३६॥ एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती । एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥३७॥ एक गर्जती हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्मे । एक भूतदयाळू दानधर्मे । एक भजननेमें राहती ॥३८॥ ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती । त्यांमाजी मुख्य संकलितीं । राया तुजप्रती सांगेन ॥३९॥

उत्तमभक्तलक्षणनिरूपण—प्रस्ताव (६४० ते ६४९)

पूर्णप्राप्तीचा मुख्य ठावो । सर्वां भूती भगवद्भावो । हाचि पूर्णभक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥६४०॥ सर्व भूती मी भगवंत । सर्व भूतें मजआंत । भूतीं भूतात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥४१॥ ऐसे जें पूर्णत्वाचे मीपण । तेणें वाढे आत्माभिमान । सहजें निजनिरभिमान । तें शुद्ध लक्षण ऐक राया ॥४२॥ शुद्ध भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण । तेंही मानूनियां गौण । भावना पूर्ण त्यांची ऐसी ॥४३॥ सर्वां भूती भगवंत । भूतें भगवंती वर्तत । भूतीं भूतात्मा तोचि समस्त । मी म्हणणे तेथ मीपणा न ये ॥४४॥ सर्व भूती भगवंत पाहीं । भूतें भगवंताचे ठायीं । हे अवघे देखे जो स्वदेहीं । स्वस्वरूप पाहीं स्वयें होय ॥४५॥ तो भक्तांमाजी अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजी वरिष्ठ । त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥४६॥ तो योगियांमाजी अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी । तो सिद्धांमाजी मुगुटमणी । हे चक्रपाणी बोलिला ॥४७॥ जैशा घृताचिया कणिका । घृतेंसी नव्हती आणिका । तेवीं भूतें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥४८॥ हे ‘उत्तम’ भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सुनिश्चितीं । आतां मध्यम’ भक्त कैसे भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥४९॥


२९२.मोहोऱ्याच्या संगें । सूत नव्हे आगीजोगें ॥१॥ नाही तरी त्याचे भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु॥ स्वामी-चिया अंगें। रूप नव्हे कोणा जोगें ॥३॥ तुका म्हणे खोडी। देवमणी नेदिती दडी?॥४॥
२९३.मजसवे नको चेष्टा। नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥ बैस सांडूनि दिमाख। जाय काळे करी मुख ॥ध्रु॥ येथें न सरे चार। हीण आणीक व्यापार ॥३॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥४॥
२९४.भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥ धन्य धन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं? ॥ध्रु॥ बहुत बराडी । देवावरी ते आवडी ॥३॥ तुका म्हणे हे रोकडे । लाभ, अधिकारी चोखडे ॥४॥
२९५.गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्पें ॥१॥ कठिण योगाहूनि क्षेम । वोकलिया होतो श्रम ॥ध्रु॥ पावले मरे शिवेपाशीं । क्लेश उतरती क्लेशीं ॥३॥ तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालीया रणीं ॥४॥
२९६.न संडी अवगुण। वर्में मानीतसे शिण ॥१॥ भोग देतां करिती काई? । फुटतां यमदंडे डोई ॥ध्रु॥ पापपुण्या झाडा । देतां, तेथें मोठी पीडा ॥३॥ तुका म्हणे बोला । माझ्या, शिणती विठ्ठला ॥४॥
२९७.पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु॥ आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥३॥ तुका म्हणे धणी । सीमा राहिली होउनी ॥४॥
२९८.दुर्बळ हे अवघे जन । नारायणीं विन्मुख ॥१॥ सांडोनियां हात जाती । पात्र होती दंडासी ॥ध्रु॥ शिदोरी तें पापपुण्य । सवें शिण भिकेचा ॥३॥ तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहो लटिक्याचा ॥४॥
२९९.वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु॥ काळा नाहीं वाव । पराश्रमा कोठें ठाव? ॥३॥ तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥४॥
३००.झाड कल्पतरु । न करी याचकी अव्हेरु ॥१॥ तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु॥ परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥३॥ गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारूनियां हाका ॥४॥
३०१.वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु॥ संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥३॥ तुका म्हणे काळ । अवघा गोविंदी सुकाळ ॥४॥

(मासिक पारायण दुसरा विसांवा)

३०२.येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ धरी देवाचा अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥ध्रु॥ नाहीं पहावे लागत । एकाएकींच तें रितें ॥३॥ तुका म्हणे जन । तयामध्यें एवढे भिन्न॥४॥
३०३.करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु॥ शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो कां भलते याति ॥३॥ तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥४॥
३०४.ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा? ॥१॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु॥ असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥३॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठलीं गौरवी ॥४॥
३०५.देवें जीव धाला । संसार तो कडू झाला॥१॥ तेचि येताती ढेकर । आनंदाचे हरिहर! ॥ध्रु॥ वेधी आणि-कांस । ऐसा जया अंगी कस ॥३॥ तुका म्हणे भूक । येणे न लगे आणीक ॥४॥
३०६.नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥ उत्तमा उत्तम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु॥ नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हाकोळी ॥३॥ तुका म्हणे वर्णूं काय । तारक विठोबाचे पाय ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – २१. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top