
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३. ओवी क्र. ३२ ते ६३
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥३॥
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना, हा ध्वनितु । अभिप्रावो ॥३२॥ जे, बुद्धियोगु सांगतां । सांख्य मतसंस्था । प्रकटली स्वभावता । प्रसंगे आम्ही ॥३३॥ तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी, आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥३४॥ अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥३५॥ एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ वोळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥३६॥ एकु कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण- । होउनियां; निर्वाण । पावती, वेळे ॥३७॥ हे मार्ग तरी दोनी । परी एकवटती निदानीं । जैसी सिद्ध-साध्य-भोजनीं । तृप्ति एक ॥३८॥ कां, पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां । मग, सिंधुमिळणी, ऐक्यता । पावती शेखीं ॥३९॥ तैसीं दोनीही मतें । सूचिती एका कारणातें । परी, उपास्ति ते योग्यते- । आधीन असे ॥४०॥ देखें, उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगें, नरू केवीं तैसा । पावे वेगा?॥४१॥ तो हळू हळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥४२॥ तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानाते । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥४३॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावतें होती ॥४४॥
न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥४॥
वांचोनि, कर्मारंभ उचित । न करितां, सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥४५॥ कीं, प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हे, अर्जुना, वायां बोलिजे । मूर्खपणें ॥४६॥ सांगें, पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ, नावेतें त्यजावें । घडे केवीं?॥४७॥ नातरी, तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे? । कीं, सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें?॥४८॥ जंव निरार्तता नाही । तंव व्यापारू असे; पाही । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठे सहजें ॥४९॥ म्हणौनि आइकें, पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया, उचित कर्म, सर्वथा- । त्याज्य नोहे ॥५०॥ आणि आपुलालिए चाडे । आपादिलें हें मांडे । कीं, त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे?॥५१॥ हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोन पाहिजे । परी, त्यजितां कर्म, न त्यजे । निभ्रांत मानी!॥५२॥
नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥५॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव, सांडी-मांडी, हें अज्ञान । जे, चेष्टा ते गुणाधीन । अपैसी असे ॥५३॥ देखें, विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी, स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे?॥५४॥ सांगें, श्रवणीं ऐकावें ठेलें? । कीं नेत्रींचें तेज गेलें? । हें नासारंध्र बुझालें? । परिमळु नेघे? ॥५५॥ नातरी, प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती? । कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया?॥५६॥ हे स्वप्नावबोधु ठेले । कीं, चरण चालो विसरलें? । हें असो; काय निमालें । जन्म-मृत्यु?॥५७॥ हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी? । म्हणौनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिवंता ॥५८॥ कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकळीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥५९॥ देखें, रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चरा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥६०॥ कां, उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥६१॥ तैसें, प्रकृति-आधारें । कर्मेंद्रियविकारें । नैष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥६२॥ म्हणौनि संगु जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाही “करूं’ म्हणती, तयांचा । आग्रहूचि उरे!॥६३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. १५० ते २००
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
सृष्टिप्रलय (१५० ते २००)
धातूपप्लव आसन्ने व्यक्तं द्रव्यगुणात्मकम् । अनादिनिधनः कालो ह्यव्यक्तायापकर्षति ॥८॥
शेवटी पंचमहाभूतांचा नाश होण्याचा काल (ईश-इच्छेने) आला असता अनादी अनंत असा कालरूपी परमात्मा स्थूल व सूक्ष्म व्यक्त असलेल्या जगाला (व्याकृत पदार्थांना) आपल्या अव्यक्त ईशस्वरूपात खेचून नेतो (कार्य कारणात लीन होते). ॥८॥
सूर्योदयेंसी दिवसस्थिती । लोटल्या अवश्य पावे राती । तेवीं झालिया उत्पत्तिस्थिती । प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे ॥१५०॥ एवं पावल्या प्रळयवेळु । खवळे अनादिनिधन काळु । तो महाभूतेंसीं भूगोळु । नाशार्थ प्रबळु प्रताप मांडी ॥५१॥ तेथ जें जें स्थूळाकारें व्यक्त । तें तें करूं लागे अव्यक्त । जेवीं पेरिलें पिकोनि शेत । स्वयें वाळत उष्णकाळीं ॥५२॥ तृणादि नाना बीजे क्षितीं । स्वभावें वार्षिये विरूढती । तेचि शारदीये नानाव्यक्ती । सफळितें होती सुपुष्ट ॥५३॥ तेचि ग्रीष्माच्या अंतीं । फळमूळ मोडानि व्यक्ती । बीजें लीन होती क्षितीं । तैशी काळगती संसारा ॥५४॥ जेवीं वसंताचे ऐलीकडी । वृक्षांसी होय पानझडी । तेवीं ब्रह्मादिकांची परवडी । काळ झोडी निजसत्ता ॥५५॥ जेवीं कां वाळलिया शेत । कृषीवळु मळू लागे समस्त । तेवीं व्यक्ताचें अव्यक्त । काळ त्वरित करूं लागे ॥५६॥ तेच अव्यक्त करिती स्थिती । राया सांगेन तुजप्रती । काळाची क्षोभक शक्ती । प्रळयाचे प्राप्तीपूर्वी पावे ॥५७॥
शतवर्षा ह्यनावृष्टिर्भविष्यत्युल्बणा भुवि । तत्कालोपचितोष्णार्को लोकांस्त्रीन्प्रतपिष्यति ॥९॥
(प्रलयकाल आला असताना) पृथ्वीवर शंभर वर्षे महाभयंकर असे अवर्षण पडेल. त्या काळी अत्यंत उष्णता वाढल्यामुळे सूर्यनारायण आपल्या प्रखर किरणांनी स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांना होरपळून काढील.॥९॥
काळक्षोभाचिये दृष्टि । शतवर्षे अनावृष्टी । तेणें अत्युल्बणे आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांही नुरे ॥५८॥ प्राणिमात्र निमाले देख । वनें वाळूनि जाहली राख । बिंदुमात्र न मिळे उदक । यापरी लोक आटिले काळें ॥९॥ तंव द्वादशादित्यमेळा । मंडळी झाला एकवेळा । तेथींच्या किरणी प्रबळा । त्रैलोक्या सकळा संतप्त केलें ॥१६०॥ येती उष्णाचिया आह्या । होती पर्वतांच्या लाह्या । तेणें धरातळ लवलाह्या । भस्म झालें राया महाउष्णे ॥६१॥
पातालतलमारभ्य संकर्षणमुखानलः । दहन्नूर्ध्वशिखो विष्वग्वर्धते वायुनेरितः॥ १०॥
पाताळातून निघून शेषाच्या मुखातील अग्नीच्या ज्वाळा वायूच्या प्रचंड धक्क्याने ऊर्ध्वमुख होऊन जगाला जाळीत जाळीत चहूकडे पसरतील. ॥१०॥
उष्णे तापलें पृथ्वीतळ । पोळलें शेषफणामंडळ । तैं सहस्रमुखें विषानळ । अग्निकल्लोळ वमिता झाला ॥६२॥ पाताळतळीहूनि देखा । ऊर्ध्वमुख अग्निशिखा । जाळीतचि तिहीं लोकां । उठिला भडका अनिवार ॥६३॥ क्षोभे दिधला फूत्कारा । सहस्रमुखें सुटला वारा । तो साह्य झाला त्या वैश्वानरा । जाळीत दिगंतरा वाढला वणवा ॥६४॥
सांवर्तको मेघगणो वर्षति स्म शतं समाः । धाराभिर्हस्तिहस्ताभिर्लीयते सलिले विराट् ॥११॥
प्रलयकालीन मेघसमूह हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धारांनी शंभर वर्षे वृष्टी करील, त्यावेळी हे सर्व ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाईल. (हीच ईश्वराची माया.) ॥११ ॥
स्वर्ग आणि पाताळतळा । कवळूनि उठिल्या अग्निज्वाळा । तंव प्रळयकर्त्या मेघमाळा । क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥६५॥ म्हणाल तेथ मोठमोठे । वर्षों लागले थेंबुटे । तैसें नव्हे गा कडकडाटें । एकी धार सुटे अनिवार ॥६६॥ इतर पर्जन्याच्या धारा । त्या तैशा नव्हती नृपवरा । ऐक प्रमाणाच्या निर्धारा । तो समयो महावीरा अतिदुस्तर ॥६७॥ जैसी का मदगजाची सोंड । तैशा धारा अतिप्रचंड । शत वर्षेवरी अखंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥६८॥ विजु निजतेजें नभ जाळी । कडकडाटे दे आरोळी । काळाची बैसे दांतखिळी । ऐसा प्रलयकाळी मेघ खवळे ॥६९॥ तेणें उलथलें जळ सैंघ । जेथोनि वर्षत होते मेघ । त्यांतेंही विरवूनि सांग । जळमय चांग त्रैलोक्य झालें ॥१७०॥ अनिवार वर्षतां वेग । जेथें मेघांचेही विरे अंग । या नांव ‘सांवर्तक’ मेघ । अतिअमोघ वर्षावो ॥७१॥ तीर्थ क्षेत्र पवित्रोदक । सरिता समुद्र झाले एक । हारपले चंद्रसूर्यादिक । तिनी लोक बुडाले ॥७२॥ ऐशिया एकार्णवाचे ठायीं । विराट विराला गा पाहीं । साकार उरे ऐसें कांहीं । उरलें नाहीं नृपनाथा ॥७३॥
ततो विराजमुत्सृज्य वैराजः पुरुषो नृप । अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिन्धन इवानलः ॥१२॥
नंतर ब्रह्मांडरूप शरीराला धारण करणारा हा विराट पुरुष विलीन झालेल्या ब्रह्मांडाला सोडून, इंधन नसलेल्या अग्नीप्रमाणे, आपले जे सूक्ष्म अव्यक्तब्रह्मस्वरूप त्यामध्ये स्थिरावेल. ॥१२॥
प्रळयकाळी अतिगहिंसु । अगाध उसळे जळोल्हासु । स्थूळाचा करितां नाशु । विरे निःशेषु विराटु ॥७४॥ विराटाचा वैराज पुरुषु । तो अव्यक्ती करी प्रवेशु । जेवीं इंधननाशें हुताशु । करी रहिवासु निजकारणीं ॥७५॥ जे ब्रह्मलोकनिवासी होती । त्यांसी महाप्रळयाचे अंतीं । ब्रह्म्यासवें सर्वांसी ‘क्रममुक्ती’ । ऐसे स्मृति-श्रुतींचें दृढ वाक्य ॥७६॥ ‘वैराजपुरुष’ नाम वदंती । हिरण्यगर्भातें म्हणती । त्यासी प्रळयी प्रवेशु अव्यक्तीं । तैं इतरांची गति श्रुतिवाक्ये कैसी ॥७७॥ विदेहें पुशिली मायेची स्थिती । ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती । जे न करिती भगवद्भक्ती । त्यां ब्रह्म्यासवें मुक्ती घडों नेदी ॥७८॥ जालिया ब्रह्मसदनप्राप्ती । न करितां भगवद्भक्ती । अतिशयें दुर्लभ मुक्ती । भक्तीपाशी मुक्ती दासी जैसी ॥७९॥ न करितां भगवद्भजन । ब्रह्म्यासीही मुक्ति नव्हे जाण । मा इतरांचा ज्ञानाभिमान । पुसे कोण परमार्थी ॥१८०॥ ज्यासी जेथ पदाभिमान । त्यासी तेंचि दृढ बंधन । यालागीं दुर्लभपण । मोक्षासी जाण तिहीं लोकीं ॥८१॥ सांडोनियां पदाभिमान । अंगें सदाशिवु आपण । नित्य वसवी महाश्मशान । भगवद्भजनी निजनिष्ठा ॥८२॥ यालागी ज्यांसी ब्रह्मलोकपदप्राप्ती । तेथही जे करिती भगवद्भक्ती । त्यांसीच प्रळयाच्या अंतीं । परममुक्ती नृपवर्या ॥८३॥ ब्रह्मलोकी ज्यां नाहीं हरिभक्ती । तेही पावती पुनरावृत्ती । ऐशी मायेची दुर्धर शक्ती । न करितां भक्ती, मुक्ति कैंची ॥८४॥ येचि अर्थी ब्रह्म्याचे वचन । दों श्लोकी बोलिला आपण । ज्ञानाभिमानियां पतन । भक्तां भवबंधन कदा न बाधी ॥८५॥
(ब्रह्मादिकृतगर्भस्तुतिश्लोकौ-)
येऽन्येऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः । आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः॥३२॥
तथा न ते माधव तावकाः क्वचिद्भ्रश्यन्ति मार्गात्त्वयि बद्धसौहृदाः । त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभो ॥३३॥
-(भागवत, द. स्कं. पूर्वार्ध, अ. २)
न करितां भगवद्भक्ती । सज्ञानाही नातुडे मुक्ती । तेचि अर्थीच्या दृष्टांतीं । ब्रह्म्याची उक्ती दाविली येथें ॥८६॥ जन्मामाजीं ब्राह्मणपण । तेही वेद शास्त्रसंपन्न । न करितां भगवद्भजन । अचूक पतन तयांसी ॥८७॥ भक्तां सर्वभूती भगवद्भावो । तेथ विघ्नांसी नाही ठावो । तयां अपावचि होय उपावो । भावार्थी देवो सदा साह्य ॥८८॥ भक्तीवीण मुक्तीचा सोसु । करितां प्रयत्न पडे वोसु । असो हें वैराजपुरुषु । करी प्रवेशु अव्यक्तीं ॥८९॥ अव्यक्ती वैराजाचा प्रवेशु । होतांचि महाभूतविलासु । हों लागे भूतां ऱ्हासु । तो अनुप्रवेशु ऐक राया ॥१९०॥
वायुना हृतगन्धा भूः सलिलत्वाय कल्पते । सलिलं तद्धृतरसं ज्योतिष्ट्वायोपकल्पते ॥१३॥
हृतरूपं तु तमसा वायौ ज्योतिः प्रलीयते । हृतस्पर्शोऽवकाशेन वायुर्नभसि लीयते ॥
(आता पृथ्व्यादी तत्त्वांचा महदहंकारात लय सांगतात.) प्रसिद्ध सांवर्तक वायूने पृथ्वीचा विशिष्ट गंधरस हरण केला असता ती पृथ्वी जलरूप होते. जलातील मुख्य गुणरस हरण झाला असता ते तेजोरूप होते. ॥१३ ॥ह्या तेजाचे तेज (प्रलयकाळाच्या) तमाने नाहीसे केले म्हणजे वायुरूप होते. वायूचा गुण जो स्पर्श तो आकाशाकडून नष्ट झाल्याने तो आकाशात लीन होतो.
प्रळयवायूचा क्षोभक क्रोधु । तेणें पृथ्वीचा हरिला गंधु । तंव तेही विरोनियां प्रसिद्धु । एकवदु जळ जाहलें ॥९१॥ क्षोभला वायु असमसाहस । तो हरी जळाचा जळरस । तेव्हां जळाचा होय ऱ्हास । सावकाश प्रळयमहातेजीं ॥९२॥ त्या तेजाचा निजसंभ्रम । वायुबळे ग्रासीत तम । तेव्हां प्रळयवायु परम । भरोनि व्योम कोंदाटे ॥९३॥ त्या प्रळयवायूचा स्पर्श । चपळतेसी सर्व ग्रास । करूनि ठाके अवकाश । तेव्हां वायूतें आकाश निःशेष ग्रासी ॥९४॥
कालात्मना हृतगुणं नभ आत्मनि लीयते ॥१४॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिः सह वैकारिकैर्नृप । प्रविशन्ति ह्यहंकारं स्वगुणैरहमात्मनि ॥१५॥
आकाशाचा गुण शब्द कालरूपी परमेश्वराने काढून घेतल्यावर त्याचा तामस अहंकाराने लय होतो. ॥१४॥
इंद्रिये आणि मन बुद्धी इंद्रियांच्या देवतांसहराजस व सात्त्विक अहंकारात लीन होतात. तो अहंकार आपल्या सत्त्वादी गुणांसह महत्तत्त्वामध्ये, सूक्ष्म प्रकृतीमध्ये लीन होतो. ॥१५॥
आकाशाचा जो शब्दगुण । तो प्रळयकाळु गिळी संपूर्ण । तंव क्षोभला तामसाभिमान । तो करी प्राशन गगनाचें ॥९५॥ दश इंद्रियांचा गोंदळा । राजसाभिमानी रिघाला । चित्तचतुष्टयाचा मेळा । तोही प्रवेशला सात्त्विकाभिमानीं ॥९६॥ इंद्रियअधिष्ठात्री दैवतें । तीही मिळोनियां समस्ते । प्रवेशलीं सात्त्विकातें । जाण निश्चितें नृपनाथा ॥९७॥ ते तिनी अहंकार त्रिगुणेंसी । प्रवेशती महत्तत्त्वासीं । महत्तत्त्व मिळे मायेसी । जेवीं कन्या संततीसी माहेरा ये ॥९८॥ जेवीं कुकडीची पिलीं । कुकडी पांखांतळी घाली । मग ते स्वयें दिसे एकली । तेवीं माया उरली कल्पांतीं ॥९९॥ एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । त्रिविध भागें दाविली येथ । ते गुणमयी माया निश्चित । मिथ्याभूत आभासे ॥२००॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ४१७ ते ४३६
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







