दिवस – ३०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्लोक १०: सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥१०॥
ओव्या: तूं नित्ययागसहितें । सृजिली भूतें समस्ते । परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणौनि ॥८६॥
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । “देवा काय आश्रयो एथ आम्हां? । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥८७॥
“तुम्हां, वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा; मग अपैसें । पुरती काम ॥८८॥
तुम्हीं व्रतें नियमू न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥८९॥
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रतंत्रविधानें । झणीं करा ॥९०॥
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥९१॥
अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥९२॥
तैसा, स्वधर्मरूपमखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु ।” एसें सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥९३॥
देखा, स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग, प्रजाहो, न संडील । तुमतें कदा ॥९४॥
श्लोक ११: देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥११॥
ओव्या: जें, येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग तें तुम्हा ईप्सितां । अर्थातें देती ॥९५॥
या स्वधर्म-पूजा पूजितां । देवतागुणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥९६॥
तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परे घडेल । प्रीति जेथ ॥९७॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें अपैसें सिद्धि जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ॥९८॥
वाचा-सिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ॥९९॥
जैसें ऋतूपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे, फळभार- । लावण्येसी ॥१००॥
श्लोक १२: इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥१२॥
ओव्या: तैसें, सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥१॥
एसें समस्त-भोग-भरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मकृनिरत । वर्ताल बापा ॥२॥
कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ॥३॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हें संपत्ति दिधली पुरी । तियां स्वधर्म सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥४॥
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥५॥
विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी । संतोष नेदील ज्ञाती । आपुलिये ॥६॥
ऐसा स्वधर्मक्रिया-रहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥७॥
तया मग अपावो थोर आहे । जेणें हें हातीचें सकळ जाये । देखा, प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥८॥
जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां, निदैवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी ॥९॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥११०॥
तैसी, निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका, प्रजाहो, हे फुडें । विरंचि म्हणे ॥११॥
म्हणौनि, स्वधर्मु जो सांडील । तयांतें काळु दंडील । चोरू म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥१२॥
मग, सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं ॥१३॥
तैसी त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे!॥१४॥
एसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे, बापा, रुदतां । कल्पांतीही सर्वथा । प्राणिगणहो ॥१५॥
म्हणौनि, निजवृत्ति हे न सांडावी । इंद्रिये बळामो नेदावी। एसें प्रजांतें शिकवीं । चतुराननु ॥१६॥
जैसे जलचरा जल सांडे । मग तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबो नये ॥१७॥
म्हणौनि, तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढत पुढती । मणिपत असे ॥१८॥

इहलोक व स्वर्ग नश्वर आणि दुःखदायक (२५८ ते २६२)

निजदहोचि नश्वर येथ । त्यासि प्रपंच नव्हे गा शाश्वत । अवघे जगचि काळग्रस्त । इहलोकी समस्त ठकिले विषयीं ॥५८॥ मनुष्यदेहो कर्मभूमी प्राप्त । तो लोक म्हणती -‘कर्मजित’ । हा जैसा नश्वर येथ । तैसाच निश्चित नश्वर स्वर्गु ॥५९॥

एवं लोकं परं विद्यान्नश्वरं कर्मनिर्मितम् । सतुल्यातिशयध्वंसं यथा मण्डलवर्तिनाम् ॥२०॥

याप्रमाणे परलोक हासुद्धा यज्ञयागादा कर्मांनीच प्राप्त होणारा असल्यामुळे नाशवंत समजावा. मांडलिक राजांमध्ये ज्याप्रमाणे स्पर्धा असूयादी असतात; त्याप्रमाणे स्वर्गलोकात आपल्या बरोबरांशी स्पर्धा, श्रेष्ठांशी असूया व कितीही ऐश्वर्य असले तरी शेवटी नाश हे ठरलेलेच आहे. ॥२०॥

मनी धरोनी विषयभोग । इहलोकी करिती याग । पुण्य जोडोनियां साङ्ग । पावती स्वर्ग निजपुण्ययोगें ॥२६०॥ स्वर्गसुखा इंद्र अधिपती । तोही पतनार्थ धाके चित्तीं । विघ्ने सूची तापसांप्रती । स्वर्गस्थिति अपायी ॥६१॥ यापरी निजपुण्ये स्वर्गप्राप्ती । त्या लोकातें ‘पुण्यजित’ म्हणती । तेही पुण्यक्षयें क्षया जाती । तेणें धाके धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ ॥६२॥

स्वर्गीचे दुःख (२६३ ते २६७)

गांठी पुण्य असतां चोख । स्वर्गभोगी असेल सुख । हेही वार्ता समूळ लटिक । स्वर्गीचें दुःख ऐक राया ॥६३॥ समान पुण्यें समपदप्राप्ती । त्यांसी स्पर्धाकलहो करिती । आपणाहूनि ज्यां अधिक स्थिती । त्यांचा द्वेष चित्ती अहर्निशीं ॥६४॥ जैसे राजे मंडळवर्ती । राज्यलोभे कलहो करिती । तैशी स्वर्गस्थां कलहस्थिती । द्वेषे होती अतिदुःखी ॥६५॥ पतनभयें कलह-द्वेष वोढी । क्षयातें पावे पुण्यजोडी । अधोमुख पडती बुडीं । याज्ञिके बापुडी चरफडती ॥६६॥ एवं स्वर्गसुखउल्हासु । मानिती ते केवळ पशु । प्रत्यक्ष तेथ द्वेष नाशु । असमसाहसु नित्य कलहो ॥६७॥

विषय (दुःखदायक) (२६८ ते २७१)

सेविलाचि विषयो नित्य सेविती । परी कदा नव्हे मानसीं तृप्ती । तरी मिथ्या म्हणौनि नेणती । हे मोहक शक्ती मायेची॥६८॥ जैसें वेश्येचें सुख साजणें । वित्त घेऊनि वोसंडणें । तेवीं विषयाचा संगु धरणें । तंव तंव होणे अतिदुःखी ॥६९॥ यालागी उभयभोगउपाया । जे जे प्रवर्तले गा राया । ते ते जाण ठकिले माया । थितें गेलें वायां उत्तम आयुष्य ॥२७०॥ कर्मभूमी नरदेह प्राप्त । हे पूर्ण निजभाग्याचें मथित । देव नरदेह वांछित । ते देव केले व्यर्थ विषयार्थी ॥७१॥

गुरुभक्तीने वैराग्य व मोक्ष (२७२ ते २७४)

एवं विषयाची आसक्ती । माया ठकिले नेणों किती । यालागी विषयाचे विरक्ती । करावी गुरुभक्ती तेंचि सांगों ॥७२॥

तस्माद्‌गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् । शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम् ॥२१॥

म्हणून आपले पारलौकिक श्रेय समजावून घेण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाने वेदशास्त्रामध्ये निपुण, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कारी व तेथे स्थैर्य पावलेला, वैराग्य व शांती यांची केवळ मूर्तीच अशा सद्गुरूस अनन्य भावाने शरण जावे.॥२१॥

जाणोनि विषयांचे नश्वरपण । पावावयालागी ब्रह्म पूर्ण । सद्गुरूसी अनन्यशरण । रिघावें संपूर्ण श्रद्धायुक्त ॥७३॥ सद्गुरुवचनमात्रे माया । तरेन हा निश्चयो राया । येणें सद्भावे लागतो पायां । पावावया निजस्वार्थु ॥७४॥

गुरुलक्षणे (२७५ ते २८४)

‘गुरु’ ऐसें जें म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें । ऐक राया ती लक्षणें । तुज कारणे सांगेन ॥७५॥ एक वेदाध्ययन गुरु । एक व्याख्यानदानी उदारु । एक ज्योतिषज्ञानी गंभीरु । परी ते सद्गुरु न म्हणती ज्ञाते ॥७६॥ एक आगमोक्त मंत्र उपासिती । जप करावा विधानयुक्ती । मग कैं होईल निजप्राप्ती । हे नकळे निश्चितीं गुरुशिष्यां ॥७७॥ एक वायुधारणा लाविती । एक नाना लक्ष्ये दाविती । एक हठयोगें गोंविती । एक बैसविती महामुद्रा ॥७८॥ एक ब्रह्मानुवादें चोखटु । तत्त्वनिरूपणी उद्भटु । वैराग्यबोलिका वरिष्ठु । उपजवी विटु उभयभोगांचा ॥७९॥ कैसें निरूपी शुद्ध ब्रह्म । ऐकोनी सात्विकां येत प्रेम । परी निजहृदयींचा भ्रम । निरसे तें वर्म नेणेचि ॥२८०॥ जेवीं गुळ-उसांचा घाणा । तोंडींचा रसू भरे भाणा । शब्दचोपटें भरोनि वदना । करी परिभ्रमणा करकरितु ॥८१॥ ऐसा जो कां शब्दज्ञानी । उत्तम व्याख्याता ज्ञानगुणीं । तो जन रंजवी निरूपणीं । स्वयें कोरडेपणी करकरितु ॥८२॥ योगक्षेम चाले गोमटा । लौकिकी थोर प्रतिष्ठा । तेथें निजप्राप्तीची उत्कंठा । न वचे वरिष्ठा शिष्यांची ॥८३॥ जेवीं अमृत म्हणतां । चवी न लभे गा सर्वथा । तेवीं शाब्दिक ज्ञानयोग्यता । अनुभववार्ता स्वयें नुपजे ॥८४॥

सद्गुरुलक्षणे (२८५ ते २८८)

जेणें स्वयं चाखिली नाहीं चवी । तो दुजयातें गोडी केवीं लावी । यालागीं जो पूर्णानुभवी । तो तारी सद्भावें सच्छिष्यासी ॥८५॥ एवं गुरुपणाची वदंती । असे बहुपणे नांदती । जो करी अपरोक्षप्राप्ती । त्यातें म्हणती सद्गुरुस्वामी ॥८६॥ ज्याचेनि वाक्यें असंतता । निःशेष मावळे तत्त्वतां । त्यासीचि गा सद्‌गुरुता । वेदशास्त्रार्थी प्रतिपाद्य ॥८७ जे उपदेशिती मंत्रतंत्र । तेही पूज्यत्वें अतिसधर । जेथें नुरे पूज्यपूजकताविचार । तोचि साचार सद्गुरुस्वामी ॥८८॥

गुरू ब्रह्मज्ञानी जेथे बोधेना शिष्याचे चित्त (२८९ ते २९५)

एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान । वस्तु देखोनि विराले मन । मावळलें द्वैताचे भान । पडिलें मौन चहूं वाचां ॥८९॥ इंद्रियें टंवकारिली समस्त । प्राण पांगुळला जेथींचा तेथ । वस्तु देखोनियां परमाद्भुत । पडलें ताटस्थ्य देहभावा ॥२९०॥ ऐसा जो आत्मानुभवी । त्यातें सद्भावें शिष्यु विनवी । तंव तो पुसे ना समजावी । ताटस्थ्यभावीं अबोलणा ॥९१॥ एका अनुभवा आलें ब्रह्म । फिटला बाध्यबाधकतेचा भ्रम । मोडलें द्वैतभावाचें कर्म । जगीं विषम असेना ॥९२॥ परी अचुंबित वर्तणें । अघटमान कर्म करणे । अत्यंत उग्रता मिरवणें । दुर्धरपणे भयानकु ॥९३॥ आपण आपणियामाजीं हंसत । ध्वनितें बोले परमार्थ । तेथें बोधेना शिष्याचे चित्त । पडे दुश्चित्त ते ठायीं ॥९४॥ ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी । त्याची ब्रह्मस्थिती न मने जनीं । मा कोण जाईल भाव धरोनी । बोधालागोनी त्यापाशीं ॥९५॥


४५३.जननी हे जाणे बाळकाचे वर्म । सुख दु:ख धर्म जें जें कांहीं ॥१॥
अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥२॥
शरणागता जेणे घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥३॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणार त्यास पार पावी ॥४॥
तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥५॥
४५४.नका वांटूं मन विधिनिषेधासी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोळों नये । अवघेचि जाय एका घांसें ॥ध्रु॥
जोडी होते परि ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥३॥
तुका म्हणे येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥४॥
४५५.नको होऊं देऊं भावीं अभावना। याचि नांवे जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथे होते अनिवार। जिव्हाळ्या उखर लाभ नाड॥ध्रु॥
उत्तम विभागे कनि-ष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥३॥
तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहे पुढे बरें ॥४॥
४५६.त्याग तंव मज न वजता केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरितां काज झाले मनी ॥ध्रु॥
देह जड झाले ऋणाच्या आभारें। केलें संवसारे कासावीस ॥३॥
तुका म्हणे गेला आळस किळस । अकर्तव्य दोष निवारले ॥४॥
४५७.मढें झांकूनियां करिती पेरणी । कुणबियाची वाणी लवलाहों ॥१॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावले नरदेह ॥ध्रु॥
ओटीच्या परिस मुठीचें तें वाढें । यापरी कैवाडें स्वहिताचें ॥३॥
नाहीं काळ-सत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥४॥
तुका म्हणे पाहे आपुली सूचना । करी तो शहाणा मृत्यू-लोकीं ॥५॥
४५८.राजा चाले तेथें वैभव सांगातें । हे काय लागते सांगावे त्या? ॥१॥
कोणी कोणा येथें न मानिजे फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु॥
शृंगारिलें नाहीं तगों येत वरी । उमटे लौकरी जैसे तैसें ॥३॥
तुका म्हणे घरी वसे नारायण । कृपेंचि ते खूण दिसों येते ॥४॥
४५९.वत्स पळे, धेनु धांवे पाठी लागे । प्रीतीचा तो अंगे आविर्भाव ॥१॥
शिकविले काय येईल कारणा? । सूत्र ओढी मना आणिकाच्या ॥ध्रु॥
सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लातां मागे सारी ॥३॥
तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे हा गे अनुभव ॥४॥
४६०.देवाच्या संबंधे विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥
आहाच हे नव्हे विटायासारिखें । जीव जीवनी देखें सामावले ॥ध्रु॥
आणिकाचे सुखदु:ख उमटे अंतरीं । येथील इतरी तेणें न्यायें ॥३॥
तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती। शोभाचि पुढती विशेषता ॥४॥
४६१.अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । झाले ते ते घडी निरोपिलें ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु॥
कायावाचामनें तोचि निजध्यास । येथे झालों ओस भक्तिभावें ॥३॥
तुका म्हणे करूं येईल धांवणे । तरी नारायणे सांभाळावें ॥४॥
४६२.राहों आतां हेचि ध्यान। डोळां मन लंपट ॥१॥
कोंडकोंडूनि धरीन जीवें। देहभावे पूजीन ॥ध्रु॥
होईल येणे कळसा आलें । स्थिरावले अंतरीं ॥३॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥
(मासिक पारायण तिसरा विसांवा)
४६३.आदि मध्य अंत दाखविले दीपें। हा तों आपणापे यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविलें धन्याचे भांडार । तो तो नव्हे सार येथूनियां ॥ध्रु॥
उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥३॥
तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरी। वचनेंचि करी बैसोनियां ॥४॥
४६४.सांठविला वाण। पैस घातला दुकान ॥१॥
जे ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ध्रु॥
निवडिले साचें । उत्तम मध्यम कनिष्ठाचें ॥३॥
तुका बैसला दुकानीं । दावीं मोला ऐसी वाणी ॥४॥
४६५.अवगुण तो कोणी नाहीं प्रतिष्ठिले । मागे होत आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु॥
‘मद्य’ आणि ‘मधु’ एकरासी नांवें । तरी कां तें खावें आधारे त्या? ॥३॥
तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥४॥
४६६.लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥१॥
उभयतां आवडी लाड । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु॥
मेळवितां अंगें अंग । प्रेमरंग वाढतो ॥३॥
तुका म्हणे जड भारी । अवघे शिरी जननीचे ॥४॥
४६७.भूती भगवंत । हा तो जाणतों संकेत ॥१॥
भारी मोकलितों बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु॥
करावा उपदेश । निवडोनि तरी दोष ॥३॥
तुका म्हणे वाटे । चुकतां, आडरानें कांटे ॥४॥
४६८.आम्हां हे कौतुक जगा द्यावी नीत। करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपे जगाचिया ॥ध्रु॥
अविद्येचा येथे कोठे परिश्रम?। ‘रामकृष्ण’नाम ऐसे बाण ॥३॥
तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥४॥
४६९.दर्पणासी नकटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांचे बाधे । दिसे सुधे विपरीत॥ध्रु॥
अंधळ्यासी काय हिरा । गाराचि तो सारिखा ॥३॥
तुका म्हणे भुंकें सुणे । ठाया नेणें ठाव तो ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top