दिवस – १७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥

देखें, सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारतां । तरी, सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥३३॥ हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम, वर्ण, आकारु । चिन्ह नाहीं ॥३४॥ जो सर्वदा सर्वगतु । जन्म-क्षयातीतु । तया, केलियाहि, घातु । कदा नोहे ॥३५॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥१८॥

आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंझावें । पांडुकुमरा ॥३६॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥

तूं धरूनि देहाभिमानाते । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता-हे मरते । म्हणतु आहासी ॥३७॥ तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी, वधिता तूं नव्हसी । हे वध्य नव्हती ॥३८॥

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥२१॥

जैसें स्वप्नामाजी देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेउनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥३९॥ तैसी हें जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥१४०॥ कां, पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाही नासला । तयासवें ॥४१॥ नातरी, मठीं आकाश जैसें । मठाकृति अवतरलें असे । तो भंगिलिया; आपैसें । स्वरूपचि ॥४२॥ तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाही स्वरूपीं । म्हणौनि तूं हें नारोपी । भ्रांति, बापा ॥४३॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे। तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥४४॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२४॥

हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणौनि, शस्त्राधिकीं छेद । न घडे यया ॥४५॥ हा प्रलयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥४६॥ अर्जुना, हा नित्य । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥४७॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥२५॥

हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे, किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥४८॥ हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥४९॥ हा गुणत्रय-रहितु । अनादि अविकृतु । व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥१५०॥ अर्जुना, ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥५१॥


भक्ती-’ब्रह्माहमस्मि’-अभिमान-अर्पण (३९४ ते ४१७)

ऐसा मनें-कर्मे-वचनें । जो दृढावला भगवद्भजनें । तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणे दृढ धरी ॥९४॥ तरंग समुद्राआंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां । जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥९५॥ माझेनि सस्य पिकती । माझेनि सरिता उसळती । मागुती मजमाजी मिळती । समरसती सिंधुत्वें ॥९६॥ तेवीं मुळींचे पूर्णपण । पावोनि भजे अभिमान । त्याचे भजनाचे लक्षण । सावधान अवधारीं ॥९७॥ म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता । मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥९८॥ सकळ लोकी माझी सत्ता । सकळी सकळांचा नियंता । सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकांचा ॥९९॥ सकळां भूती मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु । जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद्रूप मी ॥४००॥ मी देवांचा आदिदेवो । देवी देवपणा माझाचि भावो । व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरी अक्षरभावो माझेनि अंगें ॥१॥ ईश्वरी जे जे सत्ता । ते ते माझी सामर्थ्यता । भगवंती भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२॥ मी आपरूपी आपु । मी प्रकृतिपुरुषांचा बापु । सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्पु पैं माझा ॥३॥ मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी । निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण॥४॥ मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करी कर्मे । माझेनि योगें पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥५॥ सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग । न होनियां तिन्ही भाग । आनंद निर्व्यंग तोचि मी ॥६॥ माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजी चिदाकाशाचा अवकाश । माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥७॥ अजा अजपणे मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज । माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥८॥ अधिष्ठाना मजमाजी अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु । मी परम पुरुषाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥९॥ असंत माझेनि संत होये । अचित् माझेनि चिदत्व लाहे । निजानंदासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥४१०॥ मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बुद्धीची बुद्धी । मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनि ॥११॥ मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म । ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥१२॥ हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी । मी दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें ॥१३॥ ऐसिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद्भजना । ‘ब्रह्माहमस्मि’ दृढ भावना । आपण आपणा पूर्णत्वें अर्पी ॥१४॥ जीव घालूनि पूर्णत्वाआंतु । जें जें अभिमान कल्पितु । तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥१५॥ ‘ब्रह्माहमस्मि’ नुसधे वचन । ये अहंते नाम भगवद्भजन । मा हा तंव तद्रूप होऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥१६॥ सांडूनि देहबुद्धीचा केरु । भजनें उठिला अहंकारु । तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावूनि पूर्ण निर्धारु पूर्णत्वें वर्ते ॥१७॥

भक्ती-मन-चित्त-अर्पण (४१८ ते ४२२)

म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण । चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेवीण सर्वदा ॥१८॥ ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें । तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानुभवें सहज भजतां ॥१९॥ तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त । या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधे ॥४२०॥ नाथिलें चिंती ते ‘अतिचिंता’ । आथिलें चिंती ते ‘निश्चिंतता’ । आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥२१॥ चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान । तें समाधानही कृष्णार्पण । सहजी संपूर्ण स्वयें होये ॥२२॥

ताटस्थ्य व समाधी (४२३ ते ४३०)

ऐसिया भगवद्भजनविधीं । भजनशील झाली बुद्धी । तैं सकळ कर्मी समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें झाली ॥२३॥ कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं । ते पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशुद्धी विदेहा ॥२४॥ ताटस्थ्या नांव समाधी । म्हणे त्याची ठकली बुद्धी । ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मूर्छा आली ॥२५॥ ताटस्थ्यापासूनि उठिला । तैं तो समाधीस मुकला । तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥२६॥ समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणे ये लाजेसी । सत्य मानी ते शब्दपिशी । शुद्ध स्वरूपासी अनोळख ॥२७॥ येथे प्राचीन अतिसमर्थ । तें मूर्छा आणोनि करी तटस्थ । वांचूनि चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥२८॥ पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु । याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्ध परीक्षा केली ॥२९॥ स्वरूप देखोनि मूर्छित जाहला । तो आपणियां आपण तरला । स्वयें तरूनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकवामदेवीं ॥३०॥

परमसमाधी-बुद्धीचे ब्रह्मार्पण (४३१ ते ४३८)

यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोनी अवस्थांसहित जाण । बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पूर्ण परमसमाधि ॥३१॥ अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धीं । परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो ॥३२॥ सकळ कर्मी समाधी । हे सद्गुरूचि बोधी बुद्धी । तरी युद्धीही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोडे ॥३३॥ बुद्धी आकळलें परब्रह्म । तैं अहैतुक चाले कर्म । हेंचि बुद्धीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥३४॥ स्वरूपी दृष्टी निरवधी । अनवच्छिन्न समानबुद्धी । कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ‘परमसमाधी’ तिये नांव ॥३५॥ निःशेष गेलिया देहबुद्धी । स्वरूपपणे स्फुंज न बाधी । कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ते ‘परमसमाधी’ निर्दुष्ट ॥३६॥ ते स्वरूपी निरवधी । भजनशीळ झाली बुद्धी । ते सकळ कर्मी समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥३७॥ जेथे शमली मनाची आधी । ते जाणावी ‘परमसमाधी’ । समाधी घेणे ते देहबुद्धी । काष्ठ तें त्रिशुद्धी मूर्छितप्राय ॥३८॥

कायिककर्मार्पण (४३९ ते ४५३)

मनासी ठाउके नसे । इंद्रियीं व्यापारु तरी दिसे । कर्म निपजे में ऐसें । तें जाणिजे आपैसे ‘कायिक’ ॥३९॥ श्वासोच्छ्वासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार । तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥४४०॥ तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आली जी जी कर्मे । ती ती आचरोनि निजधर्मे । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥४१॥साकरेचे कारले प्रौढ । तें देठू-कांटेनशी सर्वही गोड । तेवीं इंद्रियकर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणे ब्रह्मीं ॥४२॥ कर्मकलापु आघवा । आचरोनि आणी गौरवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावा स्पर्शेना ॥४३॥ मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥४४॥ देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरूं नेणे । देहस्वभाव लक्षणे । ब्रह्मार्पणे विचरती ॥४५॥ देहधर्माचा नुठे फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा । यालागी सहज भजनामाजिवटा । झाला तो पैंठा अनहंकृती ॥४६॥ त्यापासूनि जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें । यालागी ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥४७॥ परिसाचे कसवटीवऱ्हे । जें जें लागे तें तें साडेपंधरें । तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥४८॥ त्याचा खेळु तेंचि महापूजन । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन । त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥४९॥ तो जेउती वास पाहे । आवडी देवो तेउता राहे । मग पाहे अथवा न पाहे । तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥४५०॥ तयासी चालतां मार्गे । तो मार्गु होइजे श्रीरंगें । तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥५१॥ जे जे कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतुक । या नांव भजन निर्दोख । ‘भागवतधर्म’ देख या नांव ॥५२॥ स्वाभाविक जें वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण । या नांव शुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥५३॥


२३५.कास घालोनि बळकट । झालों कळिकाळा-वरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ या रे या रे लहान थोर । याति भलती नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु॥ कामी गुंतले, रिकामे । जपी तपी येथे जमे। लाविले दमामे। मुक्त आणि मुमुक्षा ॥३॥ एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥४॥
२३६.आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषि । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग। आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवूं ॥ध्रु॥ अर्थ लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मनें । साधनें हें बुडविलीं ॥३॥ पिटूं भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥४॥
२३७.बळियाचे अंकित। आम्ही झालों बळिवंत ॥१॥ लाथाळिला संसार । केला षडऊर्मींचा मार ॥ध्रु॥ जन तन धन । केलें तृणाही समान ॥३।। तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥४॥
२३८.मृत्युलोकी आम्हां आवडती परी । नाहीं, एका हरि-नामेंविण ॥१॥ विटले हे चित्त प्रपंचापासूनि । वमन तें मनी बैसलेसें ॥ध्रु॥ सोनें रूपे आम्हां मृत्तिकेसमान । माणिक पाषाण खडे जैसे ॥३॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हां पुढें ॥४॥
२३९.स्त्रियांचा तो संग नको नारायणा! । काष्ठा या पाषाणा मृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरेना ॥ध्रु॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियांच्या द्वारें । लावण्य तें खरें दु:खमूळ ॥३॥ तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । तरि पडे बाधूं संघष्टणें ॥४॥
२४०.पराविया नारी रखुमाई समान । हें गेलें नेमून ठायीं-चेंचि ॥१॥ जाईं वो तूं माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु॥ न साहावें मज तुझें हे पतन । नको हे वचन दुष्ट वदों ॥३॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार। तरी काय नर थोडे झाले? ॥४॥
२४१.भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हे उणें काय करूं? ॥ध्रु॥ तुका म्हणे माझे जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥३॥
२४२.तुजविण मज कोण वो सोयरें। आणीक दुसरें पांडुरंगा! ॥१॥ लागलीसे आस पाहातुसें वास। रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥ध्रु॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेचि ध्यान ॥३॥
२४३.पढिये ते आम्ही तुजपाशी मागावें । जीवींचे सांगावें हितगुज ॥१॥ पाळशील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूंचि सर्वा ठायीं एक आम्हां ॥३॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥४॥ सर्व-सत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे, देसी मागेन तें ॥५॥ म्हणऊनि पुढे मांडियेली आळी । थिंकोनिया चोळी डोळे तुका ॥६॥
२४४.कोण पर्वकाळ पहासील तीथ? । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥ पाठवीं भातुकें, प्रेरी झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा! ॥ध्रु॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥३॥ काय रडवीसी नेणतिया पोरा । जाणतिया थोराचिया परी॥४॥ काय उभी कर ठेवूनियां कटीं । बुझावी धाकुटीं लडिवाळें॥५॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालोनि, निराळा नव्हे मग ॥६॥
२४५.कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा? ॥१॥ कंठीं प्राण पाहें वचनाची वास । तों दिसे उदास धरिलें ऐसे ॥ध्रु॥ येणें काळें बुंथी घेतलीसे खोळ। कां नये विटाळ होऊ माझा? ॥३॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥४॥
२४६.उचित तें काय जाणावें दुर्बळें? । थोरिवेचे काळे तोंड देवा! ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरी नाहीं ऐसें ॥ध्रु॥ आलिया अतीता शब्दें समाधान । करितां, वचन काय वेंचें? ॥३॥ तुका म्हणे तुम्हां साजे? हे श्रीहरी! । आम्ही निलाजिरी नाहीं ऐसीं ॥४॥
२४७.आम्ही मागों ऐसे नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसी पांडुरंगा! ॥१॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नांवे तुझ्या एका ॥ध्रु॥ ऋद्धि सिद्धि तुझें मुख्य भांडवल । हे तो आम्हां फोल भक्तीपुढे ॥३॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निवांत सुख भोगूं ॥४॥
२४८.न लगे हे मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझें नाहीं मनीं मानसीं हें ॥३॥ तुका म्हणे नको रागेजूं विठ्ठला! । उठी देई मला भेटी आतां ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top