दिवस – १९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥

एक अंतरीं निश्चळ । जे निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥७२॥ एकां गुणानुवादु करितां । उपरति होउन चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥७३॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिलें । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥७४॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजी मिळत । परी, माघौते, न समात । परतले नाहीं ॥७५॥ तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥७६॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया, करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥७७॥ इयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग, काय शोचावें । एथ तुवां?॥७८॥ एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों; न मनें चित्ता । परी किडाळ हें, शोचितां । बहुती परी ॥७९॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥

तूं अझुनी कां न विचारिसी? । काय हें चिंतितु आहासी? । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥१८०॥ या कौरवां भलते जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातले । कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥८१॥ तरी, स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग, तरिजेल काय? पाहें । कृपाळूपणें?॥८२॥ अर्जुना, तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत । तर्‍ही हें अनुचित । संग्राम-समयीं ॥८३॥ अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि, विष होय; सुदलें । नव-ज्वरीं देतां ॥८४॥ तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥८५॥ वायांिंच व्याकुळ कायी? । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥८६॥ जैसें, मार्गेचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां, दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥८७॥ तयापरी, पार्था । स्वधर्मी राहाटतां । सकळ-कामपूर्णता । सहजें होय ॥८८॥ म्हणौनि, यालागी पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित, जाणें ॥८९॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाईं झुंझावें । हें असो; काय सांगावें । प्रत्यक्षावरि?॥१९०॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥३२॥

अर्जुना, झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं, निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥९१॥ हा संग्रामु काय म्हणिये । कीं, स्वर्गूचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला?॥९२॥ नातरी, गुणाचेनि पतिकरें । आर्तिचेनि पडिभरें । हें कीर्तिचि स्वयंवरें । आली तुज ॥९३॥ क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें लाहिजे । जैसें, मार्गी जातां, आडळिजे । चिंतामणीसी ॥९४॥ नातरी, जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥९५॥

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥३३॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणोयां ॥९६॥ पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥९७॥ असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥९८॥ जैसी, भतारेंहीन वनिता । उपहति पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥९९॥ नातरी, रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥२००॥


संसारमिथ्यात्व (५०८ ते ५१३)

अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयो ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा । तत्कर्मसंकल्पविकल्पकं मनो बुधो निरुन्ध्यादभयं ततः स्यात् ॥३८॥

पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे । जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नी निजमानसें जग कल्पी ॥८॥ असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण । करूं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥९॥ हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन । त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेच जाण कल्पित भासे ॥५१०॥ जेवीं धनलोभ्याचे हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य । धनातें आठवितां मन । धनलोभे पूर्ण पिसें होये ॥११॥ मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन । तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होय ॥१२॥ तेवीं व्यामोहाचे पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत । तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥१३॥

मननिरोधन (५१४ ते ५२३)

भवभयाचे कारण । मनःकल्पना मुख्य जाण । त्या मनाचे करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१४॥ हे जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्ये विश्वासयुक्ते । विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥१५॥ तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी । सद्गुरूवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधे ॥१६॥ चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन । तें तें होय ब्रह्मार्पण । सद्गुरवचननिजनिष्ठा ॥१७॥ धरूनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घेइजे अर्थ । तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥१८॥ जो भुईभेणे पळों जाये । तो जेथे पळे तेथें भू ये । मग येणेजाणें स्वयें राहे । ठायी ठाये पांगुळला ॥१९॥ तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म । जें जें करूं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥५२०॥ एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें । निजाधिष्ठानमेळे । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥२१॥ ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैतभ्रम । तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्व्योम कोंदाटे ॥२२॥ ऐमें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये । भक्ते होऊनियां निर्भये । विचरती स्वयें निःशंक ॥२३॥

भक्ती-श्रवण-मनन-भक्ती (५२४ ते ५३६)

हे अगाध निष्ठा तें परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण । यालागी सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥२४॥

शृण्वन् सुभद्राणि रथाङ्गपाणेर्जन्मानि कर्माणि च यानि लोके । गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसङ्गः ॥३९॥

तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण । जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥२५॥ चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणे सादरें ऐके माता । तेणें सारें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥२६॥ हरीची जन्मकर्मे अनंत गुण । म्हणाल त्यांचे नव्हेल श्रवण । लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥२७॥ बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं । तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणी वंदिजे ॥२८॥ त्याची जी जी जन्में अतिअद्भुत । जी जी कर्मे परमार्थयुक्त । स्वमुखें बोलिला भगवंत । ती ती ज्ञानार्थ परिसावीं ॥२९॥ जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण । यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥५३०॥ मोलें घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये । तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥३१॥ तेवीं केलें जें श्रवण । तें मनने परम पावन । तेंचि उपेक्षितां जाण । परिपाकी पूर्ण वांझ होय ॥३२॥ हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं । एकां ये कानींचे ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥३३॥ हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं । सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥३४॥ यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा । ते विकल्प बाधीना कदा । वृत्ति शुद्धा स्वयें होये ॥३५॥ ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण । तेणें हर्षे हरिकीर्तन । करी आपण स्वानंदें ॥३६॥

कीर्तनभक्ती (५३७ ते ५४६)

हरिचरित्रे अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध । कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥३७॥ वानिती अजन्मयाची जन्में । वानिती अकर्मियाची कर्मे । स्मरती अनामियाची नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥३८॥ साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज । कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज निःशंक ॥३९॥ कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास । यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥५४०॥ यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास । कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दाळी दोष नाममात्रे ॥४१॥ कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्भट । हरुषे डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥४२॥ यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान । हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥४३॥ चक्र घेऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी । मज जगी वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रे नाशी ॥४४॥ चक्रे अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गदा । शंखें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥४५॥ जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता । यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥४६॥

नामस्मरणभक्ती (५४७ ते ५५३)

ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन । तिहीं करावें नामस्मरण । ‘राम-कृष्ण-गोविंद ॥४७॥ ‘अच्युत’ नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांती हों नेदी च्युती । त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥४८॥ रामकृष्णादि नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी । त्यांसी तीर्थे येती लोटांगणीं । सुरवर चरणी लागती स्वयें ॥४९॥ बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज । नामापाशी अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥५५०॥ नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें । कळिकाळाचे तोंड कोणीकडे । नामापुढे रिघावया ॥५१॥ जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाही त्रिजगतीं । नामापाशी चारी मुक्ती । जाण निश्चितीं विदेहा ॥५२॥ ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन । सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चित जाण नेमस्त ॥५३॥


२६२.करिसी तें देवा करी माझें सुखें । परि मी त्यासी मुखें न म्हणे ‘संत’ ॥१॥ जया राज्य द्रव्य करणे उपार्जना। वश दंभमाना इच्छे झाले ॥ध्रु॥ जग देव परि निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥३॥ तुका म्हणे भय न धरी मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥४॥
२६३.म्हणविती ऐसे आइकतो संत । न देखिजे होत डोळां कोणी ॥१॥ ऐसियांचा कोण मानितो विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ॥ध्रु॥ पर्जन्याचे काळी वोहोळाचे नद। ओसरतां बुंद न थारेचि ॥३॥ हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरोन । तुका म्हणे घण न भेटे तो ॥४॥
२६४.अतिवादी लावी । एका बोट सोंग दावी ॥१॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु॥ प्रति-पादी वाळी। एका पुजी एका छळी ॥३॥ तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥४॥
२६५.पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयाचे भेद विषयरूप॥१॥ अर्थी परमार्थ कैसा घडों शके? । चित्त लोभी भीके सोंग वायां ॥ध्रु॥ देवाचें चरित्र दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥३॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिलास । दोघां नरकवास सारिखाचि ॥४॥
२६६.भुंकती ती द्यावी भुंकों । आपण नये त्यांचे शिकों ॥१॥ भाविकांनी दुर्जनाचें । कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु॥ होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥३॥ तुका म्हणे त्याचें । पाप नाहीं ताडणाचें ॥४॥
२६७.जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥ नको भोवताले जगीं । पाहों, जवळी राख अंगीं ॥ध्रु॥ कुड्याचे संगती । सदा भोजन पंगती ॥३॥ तुका म्हणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥४॥
२६८.कां रे माझा तुज नये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था! ॥१॥ अगा नारायणा! निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु॥ का हें चित्त नाहीं पावत विश्रांती? । इंद्रियांची गति खुंटेचिना ॥३॥ तुका म्हणे कां हो धरियला कोप? । सरले नेणों पाप पांडुरंगा! ॥४॥
२६९.दीनानाथा तुझीं ब्रीदें चराचर । घेशील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु॥ आपुल्या दासाचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥३॥ चक्र गदा हाती आयुधे अपार । न्यून तेथें पुरे करूं धांवे ॥४॥ तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । करावया पूर्ण अवतार ॥५॥
२७०.वर्णूं महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ ठायींची ही काया ठेविली चरणीं । आतां ओंवाळूनि काय सांडूं? ॥ध्रु॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तोही तुझा ॥३॥ मज माझें कांहीं न दिसे पाहतां । जे तुज अनंता समर्पावें ॥४॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥५॥
२७१.नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हे जन, काय करूं? ॥१॥ देह उपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु॥ नाइकवे स्तुति वाणीतां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥३॥ तुज पावे ऐसी, सांग काही कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥४॥ तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगीतुनी ॥५॥
२७२.फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणां मोल ॥१॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥ तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संत जना सरी सारखिया ॥३॥
२७३.कांहींच मी नव्हे कोणिये गांवींचा । एकटा ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठे येत फिरोनियां । अवघेचि वायांविण बोल ॥ध्रु॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥३॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावे लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥४॥ तुका म्हणे नाम रूप नाहीं आम्हां । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥५॥
२७४.न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडें चित्त दु:खी होतें ॥१॥ काय तुम्ही येथें नसालसें झालें? । आम्हीं न देखिले पाहिजे हे ॥ध्रु॥ परचक्र कोठे हरिदासांच्या वासें? । न देखिजे तद्देशे राहातिया ॥३॥ तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥४॥
२७५.काय म्यां मानावें हरिकथेचें फळ? । तरिजे सकळ जनीं ऐसे ॥१॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥ध्रु॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥३॥ तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां? ॥४॥
२७६.भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दु:ख होतें जनां, न देखवें ॥१॥ आमुची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा, नेणा ऐसी? ॥ध्रु॥ भजनीं विक्षेप तेंची पैं मरण । न वजावा तो क्षण एक वायां ॥३॥ तुका म्हणे नाही आघाताचा वारा । ते स्थळी दातारा, ठाव मागें ॥४॥
२७७.कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचना प्रति पावे? ॥१॥ आतां माझा श्रोता वक्ता तूंचि देवा! । करावी ते सेवा तुझीच म्यां ॥ध्रु॥ कुशळ चतुर येथें न पवती । करितील रिती तर्क मते ॥३॥ तुका म्हणे केणें झालें एकें घरीं । मज आणि हरि तुम्हां गांठी ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top