दिवस – २५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥

म्हणौनि, आइकें, पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥१५॥ तोचि तूं जाण । योग-निष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥१६॥ जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे, सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥१७॥ येर्‍हवीं, बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं । संसारू असे ॥१८॥ जैसा कां विषाचा लेशु- । घेतलियां, होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥१९॥ तैसी विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेष । विवेकजाता ॥३२०॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निःसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥२१॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह; जाणें ॥२२॥ संमोहा जालिया व्यक्ती । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥२३॥ कां, अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा, स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥२४॥ मग, अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजी ॥२५॥ जैसें, जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥२६॥ ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥२७॥ चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैसी । तैसें, पुरुषा बुद्धिनाशी- । होय! देखें ॥२८॥ म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो, प्रौढ जालिया; त्रिभुवना । पुरो शके ॥२९॥ तैसें, विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥३३०॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥

म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥३१॥ पार्था, आणीकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां, विषयीं, बाधक । रमतां; नाहीं!॥३२॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथियेनि?॥३३॥ तैसा इंद्रियार्थु उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥३४॥ तरी विषयांतुही कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं । मग, विषय कवण; कायी? । बाधतील कवणा? ॥३५॥ जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगें आप्लविजे । परिपूर्ण तो ॥३६॥ ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखिळु । तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानी!॥३७॥


॥ श्री: ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नम: । श्रीकृष्णाय नम: ॥

सद्गुरुजनार्दन नमन (१ ते १५)

ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां । तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूंपणा ॥१॥ नवल पायांचे कठिणपण । वज्रे न तुटे लिंगदेह जाण । त्याचेही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥२॥ पायी लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं । पायीं लवणासुरा रवंदळी । अतुर्बळी निर्दाळितां ॥३॥ पाय अतिशयेंसी तिख । काळियासी लागतां देख । त्याचे शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥४॥ पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण । त्याचे तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥५॥ पायांचा धाक सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा । पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥६॥ आवडी पाय चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश । पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवघात ॥७॥ पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें । त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भवें श्मशानीं ॥८॥ ऐसें पायांचे करणे । शिवासी उरों नेदी शिवपणें । मा जीवांसी कैंचें जीवें जिणें । हे मानिते मानणे उरों नेदी ॥९॥ ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणीं ठेला ठावो । तेथेही पायांचा नवलावो । केला एकपणा वावो वंदनमात्रे ॥१०॥ तेथें कवणे कवणासी वानणें । कवणे कवणासी विनविणें । कवणे कवणासी देणे घेणें । मी तूंचे जिणे जीवें गेलें ॥११॥ तेव्हां देव आणि भक्तु । जाहलासी मा तूंचि तूं । तेथे मीपणाची मातु । कोणे कोणांतु मिरवावी ॥१२॥ ऐशिया पदी वाऊनि तत्त्वतां । करवितोसी ग्रंथकथा । तेव्हां माझेनि नांवें कविकर्ता । तूंचि वस्तुतां सद्गुरुराया ॥१३॥ माझें नामरूप आघवें एक । तेंही जनार्दनु झाला देख । ऐसें एकपणाचे कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥१४॥ तेणें कौतुकेंचि आतां । माझेनि नांवें कविकर्ता । होऊनि स्वयें रची ग्रंथा । यथार्थता निजबोधे ॥१५॥

दुसऱ्या अध्यायाचे सिंहावलोकन (१६, १७)

तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं । दुस्तर माया उत्तम-भक्तीं । निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥१६॥ कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया । अत्यादरेंकरोनियां । म्हणे मुनिवर्या अवधारीं ॥१७॥

तिसऱ्या अध्यायाचा प्रस्ताव (१८ ते २२)

राजोवाच- परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीम् । मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः॥१॥

राजा म्हणाला – मोठमोठ्या ज्ञानी लोकांनाही मोह घालणारी, पूर्णब्रह्म परमेश विष्णूची माया जाणण्याची आम्हांस इच्छा आहे. हे महाभाग, कृपा करून तिचे स्वरूप सांगा. ॥१॥

तृतीयाध्यायीं निरूपण । राजा करील चारी प्रश्न । ‘माया’ आणि तिचे ‘तरण’ । ‘ब्रह्म’ ते कोण, कर्म’ तें कैसें ॥१८॥ तेथें प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण । तेचि अर्थीचे निरूपण । मायेचें लक्षण राजा बोले ॥१९॥ सुरांमाजी श्रेष्ठ हृषीकेशी । ब्रह्मादि शिवु वंदिती ज्यासी । त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे मायिकांसी व्यामोही ॥२०॥ कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवु मानिती चित्तें । आम्ही पूर्ण मायेचे नियंते । शेखीं माया तयांतें निजमोहें मोही ॥२१॥ ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नीं । वीर्य द्रवे पार्वती देखोनी । महादेवो महाज्ञानी । देखतांचि मोहिनी निजवीर्य द्रवलें ॥२२॥

मायानिरूपणाची विदेहाची विनंती (२३ ते ३०)

जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीतें श्रुति म्हणती ‘अजया’ । ते हरीची दुर्धर माया । विवंचूनियां मज सांगा ॥२३ ॥ म्हणाल दुर्धर मायेची बाधकता । ते बाधू न शके अनन्य भक्तां । तुवांही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा कां पुसशी ॥२४॥ तेचि अर्थीचें निरूपण । राजा साक्षेपेंसी आपण । मुनींचे ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥२५॥

नानुतृप्ये जुषन्युष्मद्वचो हरिकथामृतम् । संसारतापनिस्तप्तो मर्त्यस्तत्तापभेषजम् ॥२॥

भगवंताच्या गुणानुवादाने भरलेले आपले अमृततुल्य भाषण सेवन करीत असता मला तृप्ती होत नाही. संमारातील त्रिविध तापाने परिपीडित झालेला मर्त्य प्राणी मी, त्या माझा सर्व ताप हरण करणारे ते एक औषधच आहे. ॥२॥

सेवितां तुमचे वचनामृत । पुरे न म्हणे माझें ‘चित्त’ । आस्वादितां शब्दी शब्दार्थ । ‘श्रवण’ क्षुधार्त अधिक जाहले ॥२६॥ अद्भुत कथा अतिसुरस । श्रवणीं श्रवणा अधिक सोस । ‘रसना’ म्हणे हा अतिगोड रस । ‘डोळ्यां’ उल्हास हे अपूर्व रूप ॥२७॥ ‘घ्राण’ म्हणे हा निजगंधु । सुमनी सुमना अतिसुगंधु । ‘वाचा’ म्हणे हा शब्दु । परमानंदु अनुवादे ॥२८॥ नवल निरूपणाचा यावा । ‘भुजां’ स्फुरण ये द्यावया खेवा । आलिंगन जीवींच्या जीवा । निजसद्भावा होतसे ॥२९॥ तुमच्या कथा सुनिश्चितीं । दिव्यौषधि भवरोग छेदिती । त्रिविध तापांची निवृत्ती । जड मूढ प्राकृतीं ऐकतां भावें ॥३०॥

मायानिरूपण (३१ ते ७२)

राजा परमार्थे साकांक्ष । देखोनि सार्थक कथेचे लक्ष । हरीधाकुटा ‘अंतरिक्ष’ । निरूपणीं दक्ष बोलता झाला ॥३१॥


३५४.भवसिंधूचे काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥ तारू भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु॥ मागें उतरिले बहुत । पैल तिरी साधुसंत ॥३॥ तुका म्हणे लाग- वेगें । जाऊं तयाचिया मागे ॥४॥
३५५.नाहीं साजत हा मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥ असें तुमचा रजरेण । संतपायींची वाहाण ॥ध्रु॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करी देखीं ॥३॥ नाहीं शून्याकारी । क्षर ओळखी अक्षरी ॥४॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा तें काई ॥५॥ कांहीं नव्हे तुका । पायां पडेन हे ऐका ॥६॥
३५६.सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥ येणे तुटती बंधनें । उभयलोकी कीर्ति जेणें ॥ध्रु॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥३॥ तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळिकाळा ॥४॥
३५७.सत्य तो आवडे । विकल्पाने भाव उडे ॥१॥ आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु॥ आला भोग अंगा । न लावूं उशीर त्या त्यागा ॥३॥ तुका म्हणे देवा! । अंजन ते तुझी सेवा ॥४॥
३५८.करावें चिंतन । तेंचि बरे न भेटून ॥१॥ बरवा अंगी राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥ध्रु॥ दर्शनाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥३॥ तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥४॥
३५९.जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥ ‘सहज पूजा’ याचि नांवें । गळित अभिमान व्हावें ॥ध्रु॥ अवघे भोगिता गोसावी । आदीं अवसानी जीवीं ॥३॥ तुका म्हणे शिण । न धरितां, नव्हे भिन्न ॥४॥
३६०.नसे तरी मनी नसों । परि वाचे तरी वसों ॥१॥ देह पडों या चिंतनीं । विठ्ठल नामसंकीर्तनीं ॥ध्रु॥ दंभ-स्फीति भलत्या भावें । मज हरिजन म्हणवावें ॥३॥ तुका म्हणे काळांतरी । मज सांभाळील हरि ॥४॥
३६१.नये जरी कांहीं । तरी भलतेंचि वाहीं ॥१॥ म्हणविल्या ‘दास’ । कोणी न धरी वेठीस ॥ध्रु॥ समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥३॥ तुका म्हणे सत्ता । वरी असे त्या बहुतां ॥४॥
३६२.न संडवें अन्न । मज न सेववें वन ॥१॥ म्हणऊनि नारायणा! । कीव भाकितों करुणा ॥ध्रु॥ नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥३॥ तुका म्हणे थोडें । आयुष्य, अवघेचि कोडें ॥४॥
३६३.एकाची उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥ ऐशा देवाच्या विभूति । भिन्न प्रारब्धाची गति ॥ध्रु॥ एकाची वचनें । कडु अत्यंत तीक्ष्णे ॥३॥ प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥४॥
३६४.वचनें हीं नाड। न बोलतें मुकें खोड॥१॥ दोहीं वेगळे तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु॥ अंधार प्रकाशीं । जाय, दिवस पावे निशी ॥३॥ बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥४॥
३६५.विचारावांचून । न पविजे समाधान ॥१॥ देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुधा ॥ध्रु॥ देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥३॥ तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥४॥
३६६.तुटे भवरोग । संचित क्रियमाण भोग ॥१॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु॥ वसों न शके पाप । जाय त्रिविध तो ताप ॥३॥ तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥४॥
३६७.मुसावले अंग । रंगी मेळविला रंग ॥१॥ एकी एक दृढ झालें । मुळा आपुलिया आले ॥ध्रु॥ सागरी थेंबुटा । पडिल्या, निवडे कोण्या वाटा? ॥३॥ तुका म्हणे नवें । नव्हे, जाणावें हे देवें ॥४॥
३६८.अनुतापें दोष । जाय, न लागतां निमिष॥१॥ परि तो राहे विसांवला । आदी अवसानी भला ॥ध्रु॥ हेंचि प्रायश्चित्त। अनुतापी न्हाय चित्त ॥३॥ तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥४॥
३६९.चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ? ॥१॥ तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ध्रु॥ तपें इंद्रियां आघात । क्षण एक वाताहात ॥३॥ मंत्र चळे थोडा । तरी धडचि होय वेडा ॥४॥ व्रत करितां सांग। तरी एक चुकतां भंग॥५॥ धर्मा सत्त्वचि कारण । नाहीं तरी केला शिण ॥६॥ भूतदयेसि आघात । उंचनीच पाहे चित्त ॥७॥ तुका म्हणे दुजें । विधीनिषेधाचे ओझें ॥८॥
३७०.सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥ धांवे चाले मागे मागें । सुखदु:ख साहे अंगें ॥ध्रु॥ याने घ्यावे नाम । तीसी करणे त्याचे काम ॥३॥ तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोवळी ॥४॥
३७१.बैसूं खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥ राम-कृष्णनाममाळा । घालूं ओवूनियां गळां ॥ध्रु॥ विश्वास हा धरूं । नाम बळकट करूं ॥३॥ तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥४॥
३७२.पाठी पोटी देव । कैंचा हरिदासां भेव? ॥१॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकित मन ॥ध्रु॥ येथे कोठे काळ । करील देवापाशी बळ? ॥३॥ तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी? ॥४॥
३७३.मनोमय पूजा । हेचि पढिये केशीराजा ॥१॥ घेतो कल्पनेचे भोग । न मानती बाह्य रंग॥ध्रु॥ अंतरीचे जाणे । आदि वर्तमान खुणे॥३॥ तुका म्हणे कुडें । कोठे सरे त्याच्या पुढे? ॥४॥
३७४.जाणे भक्तीचा जिव्हाळा। तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शाहाणा ॥ध्रु॥ नामरूपी जडले चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥ तुका म्हणे नवविध-। भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top