दिवस – २७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अध्याय तिसरा

अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥१॥

मग, आइका अर्जुनें म्हणितलें । “देवा, तुम्ही जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें । कमलापति ॥१॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचि ना, पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥२॥ तरी, मातें केवीं श्रीहरी । म्हणसी “पार्था संग्रामु करीं” । इये लाजसी ना; महाघोरीं । कर्मीं सुतां ॥३॥ हां गा, कर्म तूं चि अशेष । निराकारिसी निःशेष । तरी मजकरवीं हे हिंसक । कां करविसी?॥४॥ तरी हेंचि विचारी ऋषीकेशा । तूं मानूं नेदसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवीत आहासी!’ ॥५॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥

देवा, तुवां चि ऐसें बोलावें । तरी, आम्हीं नेणती काय करावें? । आतां संपलें म्हणे पां, आघवें । विवेकाचें ॥६॥ हां गा, उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंश तो कैसा? । आतां पुरला आम्हां धिवसा । आत्मबोधाचा ॥७॥ वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये? । सांगै मज ॥८॥ जैसें आंधळें सुइजे आह्वांटा । कां, माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां!॥९॥ मी आधींचि कांहीं नेणें । वरि कवळिलों मोहें येणे । श्रीकृष्णा, विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥१०॥ तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी, अनुसरलिया, काई । ऐसें कीजे?॥११॥ आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोळंगावें । आणि तुवां चि ऐसें करावें? । तरी सरलें म्हणे ॥१२॥ आतां ऐसियापरी बोधिसी । तरी “निकें” आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी? । अर्जुन म्हणे ॥१३॥ तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणीक एक असे जाहलें । जें-थितें; हें डहुळलें । मानस माझें ॥१४॥ तेवीं चि, श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणें मिषें ॥१५॥ नातरी, झकवीतु आहासी मातें । कीं, तत्त्वचि कथिसी ध्वनितें । हें अवगमितां; निरुतें । जाणवेना ॥१६॥ म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मऱ्हाटा, जी ॥१७॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही; निकें परियसे । श्रीकृष्णा, बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥१८॥ देखें, रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥१९॥ तैसें सकळार्थभरित । तत्त्व तरी सांगावें उचित । परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥२०॥ देवा, तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं? । एथ भीड कवणाची धरूं? । तूं माय आमुची ॥२१॥ हां गां, कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे?॥२२॥ जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांझेचें कवण सांकडे? । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना?॥२३॥ देखें, अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहानाचि जरी फुटावें । तरी सायास कां करावे । मागील ते?॥२४॥ तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितो श्रीकमलापति । तो तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥२५॥ तरी आपुलिया स्वेच्छा । कां न मागावासि परेशा? । देवा, सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥२६॥ देखें, सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जहाले । विजयी माझे ॥२७॥ जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥२८॥ जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥२९॥ तैसें देवा, तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधी ॥३०॥ तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें, एक निश्चित । पार्थु म्हणे ॥३१॥


एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः । एकधा दशधाऽऽत्मानं विभजञ्जुषते गुणान् ॥४॥

याप्रमाणे (आपणच उत्पन्न केलेल्या) पंचभूतांच्या साहाय्याने अनंत निरनिराळी भूते निर्माण करून त्यांत परमात्म्याने (अंतर्यामी) प्रवेश केला असून जीवरूपाने व दशेंद्रियरूपाने तो त्या त्या विषयांचा भोग घेत राहिला आहे.॥४॥

ऐशी स्रजिली भूतें महाभूतें । जी जड मूढ अचेते । त्यांसी वर्तावया व्यापारार्थे । विभागी आपणातें तत्प्रवेशीं ॥८५॥

सृष्टीची स्थिती (८६ ते १४९)

पंचधा पंचमहाभूतें । तें कार्यक्षम व्हावया येथें । पंचधा विभागे श्रीअनंतें । प्रवेशिजे तेथें तें ऐक राया ॥८६॥ ‘गंध’ रूपें पैं पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥८७॥ पृथ्वी प्रवेशला भगवंतु । यालागीं ते आवरण जळांतु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥८८॥ धरा धरी धराधर । यालागीं विरवू न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणें वाहे ॥८९॥ ‘स्वाद’ रूपें उदकांतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । द्रवत्वें राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥९०॥ जीवनी प्रवेशे जगज्जीवन । याकारणे आवरण तेंचि जाण । न शोषितां उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरीचें ॥९१॥ तेजाचे ठायीं होऊनि ‘रूप’ । प्रवेशला हरि सद्रूप । यालागी नयनीं तेज अमूप । जठरी देदीप्य जठराग्नि जाहला ॥९२॥ रूपयोगें लवलाहीं । हरि प्रवेशे तेजाच्या ठायीं । तें आवरण-वायूमाजी पाहीं । न मावळे कांहीं यालागीं राया ॥९३॥ वायूमाजी ‘स्पर्श’योगें । प्रवेशु कीजे श्रीरंगें । यालागी प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥९४॥ वायूच्या ठायीं हृषीकेश । स्पर्शरूपें करी प्रवेश । यालागीं वायूचा ग्रास । सर्वथा आकाश करूं न शके ॥९५॥ ‘शब्द’ गुणें हृषीकेश । आकाशी करी प्रवेश । यालागीं भूतांसी अवकाश । सावकाश वर्तावया ॥९६॥ शब्दगुणे गगनीं । प्रवेशला चक्रपाणी । यालागीं तें निजकारणीं । लीन होऊनि जाऊ न शके ॥९७॥ महाभूती निरंतर । स्वाभाविक नित्य वैर । येरांतें ग्रासावया येर । अतितत्पर सर्वदा ॥९८॥ जळ विरवू पाहे पृथ्वीतें । तेज शोषू पाहे जळातें । वायु प्राशूं धांवे तेजातें । आकाश वायूतें गिळू पाहे ॥९९॥ तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्यांतें करोनियां निर्वैर । तेचि येरामाजी येर । उल्हासें थोर नांदवी ॥१००॥ एवं पंचभूतां साकारता । आकारली भूताकारता । तेथें जीवरूपें वर्तविता । जाहला पैं तत्त्वतां प्रकृतियोगें ॥१॥ त्यासी ब्रह्मांडी ‘पुरुष’ हे नांव । पिंडी त्यातें म्हणती ‘जीव’ । हा मायेचा निजस्वभाव । प्रतिबिंबला देव जीवशिवरूपें ॥२॥ शिवीं जे ‘योगमाया’ विख्याती । जीवीं तीतें ‘अविद्या’ म्हणती । हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती । स्वप्नस्थिती संसारू ॥३॥ ज्यातें म्हणती ‘दीर्घस्वप्न’ । तो हा मायावी संसार संपूर्ण । निद्रेमाजी दिसे जें भान । तें जीवाचे स्वप्न अविद्यायोगें ॥४॥ येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न । बोध जाहलिया मिथ्या भवभान । हे अवघे मायेचें विंदान । राया तूं जाण निश्चित ॥५॥ आतां जीवाची विषयावस्था । विषयरसी विषयभोक्ता । एकधा दशधा विभागता । आईक नृपनाथा सांगेन ॥६॥ एकधा भागें अंतःकरण । स्वयें झाला जनार्दन । मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभागें ॥७॥ जीव आपुल्या परिपूर्णता । ‘अहं’ म्हणे निजात्मसत्ता । तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥८॥ अहंकारु वाढवितां देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विषयचिंता । तेचि ‘चित्त’ तत्त्वतां महामाया ॥९॥ देहअहंता अतिचपळ । तीतेंच म्हणती ‘मन’ चंचळ । नाना संकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय-शोक-दुःख ॥११०॥ देहअहंतेचे शहाणपण । तिये नांव गा ‘बुद्धि’ जाण । ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण । आम्हां जन्ममरण अनिवार ॥११॥ एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टयअवस्था । मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥१२॥ अहंकार धरी सोहंपण । तैं चित्तीं प्रगटे चैतन्यघन । तेव्हां मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं ॥१३॥ समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कैंचें मन । बुडे चित्ताचें चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥१४॥ ‘एकधा’ विभाग अंतःकरण । त्याची उणखूण निजलक्षण । राया सांगितलें संपूर्ण । आतां ‘दशधा’ लक्षण तें ऐक ॥१५॥ दशधा इंद्रियें अचेतन । तयांतें चेतविता नारायण । दशधारूपें प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥१६॥ दृष्टीमाजी झाला ‘देखणें’ । दृश्य प्रकाशी दृश्यपणें । ऐसेनि प्रकाशकपणें । दृश्याभरणे दाखवी ॥१७॥ श्रवणी झाला तो ‘ऐकणे’ । शब्द प्रकाशी शब्दलक्षणें । मग अर्थावबोधकपणें । शब्दविंदाने ऐकवी ॥१८॥ रसी ‘रसस्वादु’ नारायण । रसने तोचि रसस्वादन । यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजी ॥१९॥ सुमनीं श्रीहरि ‘सुगंध’ । घ्राणी तोचि जाणे गंधावबोध । यापरी सुमनमकरंद । भोगवी गोविंद निजांगयोगें ॥१२०॥ शीत-उष्ण-मृदु-कठिण । ‘स्पर्श’ प्रकाशिता नारायण । त्वचेमाजीं तोचि स्पर्शज्ञ । यापरी जगजीवन भोगवी स्पर्श ॥२१॥ वाचेचा ‘वाचकु’ कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती । नाना शब्दार्थव्युत्पत्ती । वदवी निश्चितीं वाचाळपणें ॥२२॥ करांच्या ठायीं ‘देती घेती’ । अकर्तेनि कर्तव्यशक्ती । चरणा आचरणें निगुती । ‘गमनस्थिती गोविंदें’ ॥२३॥ उपस्थसुखाची ‘सुखप्राप्ती’ । तेणें सुखें सुखावे श्रीपती । स्त्रीपुरुषमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिप्रीतीं पुरुषोत्तमु ॥२४॥ गुदाचे ठायीं जें का ‘क्षरण’ । तेंही अक्षरें होय जाण । यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देहीं ॥२५॥ यापरी गा देहयोगें । विलासे विषयसंभोगें । भोग्य भोक्ता उभय भागें । प्रकाशूनि अंगें स्वयें भोगी ॥२६॥ जेवीं साळईच्या रुखा । साळईचि बीज देखा । साळईचि शाखोपशाखा । न विकारतां असका वृक्ष होये ॥२७॥ जेवीं कां ऊंस बीजीं पडे । तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे । जरी भिन्न भिन्न कांडे चढे । तरी मागे पुढे रस एकु ॥२८॥ तेवीं विषय आणि करणे । प्रकाशूनि एकपणें । मग विषयरस सेवणें । जीवपणे स्वयें सेवी ॥२९॥

गुणैर्गुणान् स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः । मन्यमान इदं सृष्टमात्मानमिह सज्जते ॥५॥

प्रभूने आत प्रवेश करून प्रकाशित केलेल्या इंद्रियांच्या द्वारे तो जीव अनेक विषयांचा भोग घेतो व उत्पन्न झालेल्या शरीर-मन-इंद्रियादिकांना स्वतःच समजून त्यांमध्ये आसक्त होतो (आपले स्वरूप विसरतो). (हीच ईश्वराची माया होय.) ॥५॥

इंद्रियां आणि विषयांसी । सहजें अंतर्यामी प्रकाशी । जीव सेवूनि त्या विषयांसी । पावे आसक्तीसी अहंभावें ॥१३०॥ म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचे पुरे कोड । तंव इंद्रियांची खवळे चाड । विषय वाड भोगावया ॥३१॥ इंद्रियां विषयांची आसक्ती । देहाभिमाने वाढे वृत्ती । मावळोनि मूळींची स्फूर्ती । मोहममतास्थिती दृढ वाढे ॥३२॥ मग मी म्हणे देहातें । देहसंबंधी जें तें आप्तें । विषयांचिये लोलुपते । उसंतु चित्तें असेना ॥३३॥ प्रकृतिस्वभावें कर्म जाहलें । तें तें म्हणे म्यां केलें । देहअहंतेचें नाथिलें । काविरें चढले अनिवार ॥३४॥ देहअहंता अतिउद्भट । तेथें मोहममता अतिदुर्घट । तेणें जन्ममरणांची वाट । घडघडाट प्रवाहे ॥३५॥

कर्माणि कर्मभिः कुर्वन् सनिमित्तानि देहभृत् । तत्तत्कर्मफलं गृह्णन् भ्रमतीह सुखेतरम् ॥६॥

हा देहधारी जीव कर्मेंद्रियांच्या द्वारा संकल्पयुक्त कर्मे करतो व त्या त्या कर्मानुसार सुखदुःखात्मक फळे भोगून ह्या (विषय, फल व कर्मरूप) संसारात फिरत राहतो. ॥६॥

मनी धरोनि विषयकाम । कर्मेंद्रियीं करितां कर्म । तेथें निपजती धर्माधर्म । बाधक परम पुरुषातें ॥३६॥ कल्पिला फळभोग घडे । त्यासारिखें देह धरणे पडे । देहें देहाची खाणी उघडे । मरणही वाढे तैसेंचि ॥३७॥ फळाशा कर्म अतिदारुण । अमरां आणी अमित मरण । अजन्म्या अंगी जन्म पूर्ण । पुनः पुनः जाण आदळती ॥३८॥ एवं स्वर्ग आणि संसारा । जन्ममरणांच्या येरझारा । नाना योनि अपारा । निजकर्मद्वारा स्वयें भोगी ॥३९॥ डोळे बांधोनि जुंपिला घाणा । तेलियाचा ढोरु जाणा । करकरीतु परिभ्रमणा । अविश्रम जाणा भोंवतसे ॥१४०॥ तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे । भोगू जातां निजकर्मफळे । तंव जन्ममरणांचे सोहळे । भोगी आगळे अनिवार ॥४१॥ उदोअस्तांचेनि प्रमाणे । जैसें सूर्यासी पडे भंवणें । तैशी ही जन्ममरणें । अतिदारुणे स्वयें सोशी ॥४२॥ शिणशिणों जंव जन्म कंठी । सवेंच मरण ये त्यापाठीं । जैसी जावळी फळें एक देठीं । तैशा जन्ममरणकोटी भोगी स्वयें ॥४३॥

इत्थं कर्मगतीर्गच्छन् बह्वभद्रवहाः पुमान् । आभूतसंप्लवात्सर्गप्रलयावश्नुतेऽवशः ॥७॥

ह्याप्रमाणे जीव कर्माच्या आधीन होतो व अनेक दु:खे देणाऱ्या कर्ममूलक योनीस जाऊन जगाचा प्रलय होईपर्यंत जन्म-मृत्यू भोगीत राहतो. ॥७ ॥

होता पूर्णत्वें जो स्वतंत्र । तो झाला कर्मपरतंत्र । नानाकर्मगतिपात्र । दुःखसुखक्षेत्र सदा वाहे ॥४४॥ मानोनि विषयांचे सुख । देखतदेखतां घेतलें विख । त्याचे अगणित असुख । जन्मकोटी दुःख सोशितां न सरे ॥४५॥ दुःखावरी दुःखांचे आवर्त । मोहशोकांचे गर्ती पडत । अतियातनेमाजी बुडत । सदा उकडत काळाग्नी ॥४६॥ ऐसे सोशितां दुःखशोक । पुढे अवचितां एकाएक । महाप्रळयाचा भडका देख । निकट सन्मुख अंगी वाजे ॥४७॥ तेथे मागे न वचे काढिला पावो । पुढे निघावया नाही वावो । निजकर्मे बांधिला पहा वो । प्रळयाचा घावो मस्तकी वाजे ॥४८॥ उत्पत्तिस्थितिप्रकरण । तुज सांगितलें संपूर्ण । आतां प्रळयाचे लक्षण । सावधान अवधारीं ॥४९॥


३९७.जरी मी ‘पतित’ नव्हतों देवा! । तरी तूं ‘पावन’ कैंचा तेव्हां? ॥१॥ म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं ‘पावन’ कृपा-निधी॥ध्रु॥ लोहो महिमान परिसा। नाहीं तरी दगड जैसा ॥३॥ तुका म्हणे याचकभावें। कल्पतरु मान पावे॥४॥
३९८.एक भाव चित्तीं । तरी न लगे कांहीं युक्ति ॥१॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु॥ आठवचि पुरे । सुख अवघे मोहरें ॥३॥ तुका म्हणे मन-। पूजा इच्छी नारायण ॥४॥
३९९.मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥१॥ पाहा विचारूनि देवा! । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु॥ तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥३॥ तुका म्हणे तरी । ऐक्यभावें नुरे उरी ॥४॥
४००.तुज मागणें तें देवा! । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥ आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ध्रु॥ संत-संगती सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥३॥ तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥४॥
४०१.तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥ आणिक नेणे कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा! ॥ध्रु॥ हेंचि माझे गाणे । तुझें नामसंकीर्तन ॥३॥ तुझ्या नामाची भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥४॥
४०२.उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥ तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसाराची तुटी ॥ध्रु॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥३॥ तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥४॥
४०३.क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥ देवा, करावा सांभाळ । वारी माझी तळमळ ॥ध्रु॥ नको माझे ठायीं । गुणदोष घालू कांहीं ॥३॥ अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घाला पोटीं ॥४॥
४०४.नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण? ॥१॥ तैसें चित्त शुद्ध नाहीं । तेथें बोध करील काई? ॥ध्रु॥ वृक्ष न धरी पुष्प फळ । काय करील वसंतकाळ? ॥३॥ वांझा न होती लेकुरें । काय करावें भ्रतारें ? ॥४॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी? ॥५॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार? ॥६॥ तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥७॥
४०५.नवां नवसांची । झालों, तुम्हांसी वाणीची ॥१॥ कोण तुझें नाम घेतें? । देवा! पिंडदान देते? ॥ध्रु॥ कोण होतें मागे पुढे? । दुजें बोलाया रोकडें ॥३॥ तुका म्हणे पांडुरंगा! । कोणा घेतासि वोसंगा? ॥४॥
४०६.एका बीजा केला नास । मग भोगिलें कणीस ॥१॥ कळे सकळां हा भाव । लहान थोरांवरी जीव ॥ध्रु॥ लाभ नाहीं फुकासाठीं । केल्याविण जीवासाटीं ॥३॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥४॥
४०७.आयुष्य गेलें वायांविण । थोर झाली नागवण ॥१॥ आतां धावाधाव करीं । काय पाहतोसि हरी! ॥ध्रु॥ माझें तुझें याचि गति । दिवस गेले, तोंडी माती ॥३॥ मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥४॥ पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥५॥ शरण आलों आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥६॥
४०८.सोसोनि विपत्ती। जोडी दिली तुझे हातीं ॥१॥ त्याचा हाचि उपकार? । अंती आम्हांशी वेव्हार ॥ध्रु॥ नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव? ॥३॥ तुका म्हणे हरी! । तुज ठाव दिला घरीं ॥४॥
४०९.आपुले मागतां । काय नाही आम्हां सत्ता? ॥१॥ परि या लौकिकाकारणें । उरी ठेविलें बोलणे ॥ध्रु॥ येचि आतां घडी। करूं बैसों तेचि फडी ॥३॥ तुका म्हणे करितो तुला । ठाव नाहींसा विठ्ठला! ॥४॥
४१०.असो आतां, किती । तुज यावें काकुलती? ॥१॥ माझें प्रारब्ध हे गाढें । तूं बापुडे तयापुढे ॥ध्रु॥ सोडवीन आतां । ब्रीद तुझें पंढरीनाथा! ॥३॥ तुका म्हणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी ॥४॥
४११.काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥ सर्व साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु॥ योगयागतपें । केली तयाने अमुपें ॥३॥ तुका म्हणे जपा । मंत्र तीअक्षरी सोपा ॥४॥
४१२.हो कां दुराचारी। वाचें नाम जो उच्चारी ॥१॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु॥ नसो भाव चित्तीं । हरीचे गुण गातां गीतीं ॥३॥ करी अनाचार। वाचे हरिनामउच्चार ॥४॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥५॥ म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥६॥
४१३.हाकेसरिसी उडी । घालूनियां, स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण? । माझे विठाईवांचून ॥ध्रु॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥३॥ तुका म्हणे गीतीं गातां । नामें द्यावीं सायुज्यता ॥४॥
४१४.लोह चुंबकाच्या बळें । उभे राहिलें निराळें॥१॥ तैसा तूंचि आम्हां ठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु॥ भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥३॥ तुका म्हणे अधीलपणें । नेली, लांकडे चंदनें ॥४॥
४१५.डोई वाढवूनि केश । भूते आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हती संतजन । तेथें नाही आत्मखूण॥ध्रु॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापाशीं गोविंद ॥४॥
४१६.गाढवाचें घोडें । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥ चघळी वाहाणा। माघारिया बांडा सुणा ॥२॥ सोंगसंपादणी । तरी करूं शुद्ध वाणी ॥३॥ तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top