
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. ३० ते ५१
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. २०४ ते २४९
- विदेहकृत आर्षभस्तुती (२१५ ते २२३)
- नरदेह (२२४ ते २३९)
- भक्तभेटीचा लाभ (२४० ते २४८)
- विदेहाची आर्षभांना विनंती (२४९ ते २७४)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १८८ ते २००
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. ३० ते ५१
अर्जुन उवाच
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥४॥
देवा, हें एतुलेंवरि । बोलावें नलगे; अवधारीं । आधीं तूंिंच विचारीं । संग्रामु हा ॥३०॥ हें झुंज नव्हे; प्रमादु! । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघड लिंगभेद । वोडवला आम्हां ॥३१॥ देख, मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पाविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं? ॥३२॥ देवा, संतवृंद नमस्कारिजे । कां घडे, तरी पूजिजे । हें वांचूनि; केवीं निंदिजे । स्वये, वाचा? ॥३३॥ तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्म-द्रोणांचें । वर्ततसे ॥३४॥ जयांलागीं मनें विरुं । आम्ही स्वप्नींही न शको धरूं । तयां, प्रत्यक्ष केवीं करूं । घातु, देवा?॥३५॥ वरि जळो हे जियालें । एथ आघवेयांिस हेंचि काय जाहलें? । जे-यांच्या वधीं, अभ्यासिलें । मिरविजे आम्ही?॥३६॥ मी पार्थु, द्रोणाचा केला । येणें धनुर्वेद़ु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें? ॥३७॥ जेथूनिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरुक? । अर्जुन म्हणे ॥३८॥
गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥५॥
देवा, समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥३९॥ हें अपार जें गगन । वरि तयाही होईल मान । परि अगाध, भले, गहन । हृदय ययाचें ॥४०॥ वरि अमृतही विटे । कीं काळवशे वज्रही फुटे । परी, मनोधर्मु न लोटे । विकरविलाही! ॥४१॥ स्नेहालागीं माये । म्हणिये; तें कुरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥४२॥ हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्या-सिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥४३॥ हा येणे मानें महंतु । वरि आम्हांलागीं कृपावंतु । आतां, सांग पां, येथ घातु । चिंतु येईल?॥४४॥ ऐसे हे रणीं वधावे । मग आपण सुखे राज्य भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥४५॥ हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनी भोग सधर । ते असतु येथ; वर । भिक्षा मागतां भली! ॥४६॥ नातरी, देशत्यागें जाइजे । कां, गिरि-कंदर सेविजे । परी, शस्त्र आतां न धरिजे । इयांवरि ॥४७॥ देवा, नव-निशितीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥४८॥ ते, काढूनि काय कीजती? । लिप्त केवी सेविजती? । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं! ॥४९॥ ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे “श्रीकृष्णा, अवधारीं’ । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥५०॥ हें जाणोनि, पार्थु बिहाला! । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे “देवो कां चित्त या बोला । देतीचिना?’॥५१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. २०४ ते २४९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् । प्रीतः संपूजयाञ्चक्र आसनस्थान्यथाऽर्हतः ॥२६॥
त्यांतें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर । त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥४॥ श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चंदन । पूजा मधुपर्कविधान । केलें संपूर्ण यथायोग्य ॥५॥
तान् रोचमानान्स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान्नव । पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥२७॥
निजांगींच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥६॥ निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशले पूर्ण ।तेंचि निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥७॥ मुगुट कुंडलें कंकण । मूर्खाअंगी बाणली पूर्ण । ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर संपूर्ण प्रकाशे ॥८॥ तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपूर्णत्वें विराजमान । तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥९॥ ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान । तें त्यांसी निजशांतिभूषण । मुगुट कंकण तें तुच्छ ॥२१०॥ मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान की अधिक । ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळीक दिसेना ॥११॥ त्यांची यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती । त्यांची यांची एक शांती । भेदु निश्चिती असेना ॥१२॥ त्यांच्याऐसे हे सखे बंधु । त्यांच्याऐसा समान बोधु । त्यांच्याऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥१३॥ ते चौघे हे नव जण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान । त्यांची यांची शांती समान । हे विदेहासी पूर्ण कळू सरलें ॥१४॥
विदेहकृत आर्षभस्तुती (२१५ ते २२३)
ऐसे परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी । मग अतिविनीत होऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥१५॥
विदेह उवाच
मन्ये भगवतः साक्षात्पार्षदान्वो मधुद्विषः । विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥२८॥
सार्वभौम चक्रवर्ती । देही असोनि विदेहस्थिती । तो जनकु आर्षभांप्रती । अतिप्रीती विनवितु ॥१६॥ त्यांच्या भेटीसवें उलथलें सुख । विदेहासी देहेंवीण हरिख । तेणें हरिखेंकरूनियां देख । प्रीतिपूर्वक विनवितु ॥१७॥ तुमचे सामर्थ्य पाहतां येथ । तुम्ही ईश्वररूप समस्त । देहभावें तरी भगवद्भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥१८॥ देवो आपुला आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु । तो साच करूनि वेदार्थु । निजपरमार्थ अनुभवा ॥१९॥ ‘शिव होऊनि शिवु यजिजे’ । हे लक्षण तुम्हांसीच साजे । येरी हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥२२०॥ विष्णूने सृष्टीं जें जें स्रजणें । तें तें तुम्हीं पवित्र करणें । मही विचरायाची कारणे । कृपाळूपणें दीनोद्धारा ॥२१॥ तुम्ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां । आजि लाधलों तुमची सेवा । उद्भट दैवाथिलों मी ॥२२॥ आजि माझें धन्य दैव । आजि माझें धन्य वैभव । आजि धन्य मी सर्वी सर्व । हे चरण अपूर्व पावलों ॥२३॥
नरदेह (२२४ ते २३९)
दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः । तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥२९॥
सकल देहांमाजी पहा हो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो । त्याचिया प्राप्तीचा संभवो । तो अभिप्रावो अतिदुर्गम ॥२४॥ सुकृतदुष्कृत समान समी । तैं पाविजे कर्मभूमी । तेंचि पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥२५॥ समानकर्मी नरदेह जोडे । तरी समस्तां समबुद्धि न घडे । त्यां समांमाजी विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥२६॥ पापाचा एकु महाचिरा । पुण्यें जोखणी चाराचुरा । समान आलिया तुळाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबुद्धी ॥२७॥ वाळू आणि सुवर्ण । जोखितां झाल्याही समान । सोनियालागी वेचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥२८॥ एकाचे पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र । करूनि जोखितां तुळाभार । समान साचार जैं होय ॥२९॥ ऐसेनि कर्मे जे जन्मती । त्यांसी पुण्यावरी अतिप्रीती । पुण्य पाप दोनी झडती । तैं नित्यमुक्ति पाविजे ॥२३०॥ ऐशा अतिसूक्ष्म संकटीं । मनुष्यदेहीं होय भेटी । तेथेही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयांच्या ॥३१॥ मनुष्यदेहींचेनि आयुष्ये । विषयीं सायास करिती कैसे । अमृत देऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥३२॥ गंधर्वनगरींची ठाणीं । घेतली देऊनि चिंतामणी । तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनी नरदेहा ॥३३॥तोडूनि कल्पतरूंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान । तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैशी ॥३४॥ तैसें नरदेह येऊनि नरां । करिती आयुष्याचा मातेरा । पूर्ण व्यवसावो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥३५॥ नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट । कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणे ॥३६॥ नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी । त्यासी जपतां रामनामावळी । पडे दांतखिळी असंभाव्य ॥३७॥ घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणूनु । तेवीं श्रीरामनाम नुच्चारुनु । नाडला जनु नरदेहीं ॥३८॥ करितां नरदेहीं अहंकार । तंव तो देहचि क्षणभंगुर । देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥३९॥
भक्तभेटीचा लाभ (२४० ते २४८)
ज्यांसी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी । त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥२४०॥ ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा । दशावतारांची शोभा । जाहली पद्मनाभा ज्यांचेनि ॥४१॥ ऐसे कृष्णकृपासमारंभे । जे भगवंताचे वालभे । त्यांची भेटी तैचि लाभे । जैं भाग्ये सुलभे पैं होती ॥४२॥ निष्कामता निजदृष्टी । अनंत पुण्यकोट्यनुकोटी । रोकड्या लाभती पाठोवाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥४३॥ व्याघ्रसिंहांचे दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे । परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां ॥४४॥ व्याघ्रसिंहदुधासाठीं । अतिसबळता जोडे पुष्टी । परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठी कदा नव्हे ॥४५॥ म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी । मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचे अमृत निरोगी करी केवीं?॥४६॥ व्याघ्रसिंहदुग्धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती । तैं तेणें दुग्धे ज्यांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥४७॥ जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें । जन्ममरण समूळी उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें ॥४८॥
विदेहाची आर्षभांना विनंती (२४९ ते २७४)
आजि मी भाग्ये सभाग्य पूर्ण । लाधलों तुमचे दर्शन । तरी ‘आत्यंतिक क्षेम’ कोण । तें कृपा । मज सांगा ॥४९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १८८ ते २००
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





