दिवस – १८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥२६॥

अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तर्ही शोचुं न पवसी । पांडुकुमरा ॥५२॥ जे, आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाह अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥५३॥ तें आदि नाहीं खंडलें । समुद्री तरी असे मीनलें । आणि जातचि मध्ये उरलें । दिसे जैसें ॥५४॥ इयें तिन्ही तयापरी । सरसींच, सदा अवधारीं । भूतांसि, कवणी अवसरीं । ठाकती ना ॥५५॥ म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे, स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥५६॥ नातरि, हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे, देखूनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥५७॥ तरी एथ कांहीं । तुज शोकासी कारण नाहीं । हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥५८॥

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें, घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥५९॥ नातरि, उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्म-मरण तैसें । अनिवार जगीं ॥१६०॥ महाप्रळय-अवसरें । हें त्रैलोक्यहि संहरे । म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥६१॥ तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी? । काय, जाणतुचि, नेणसी । धनुर्धरा?॥६२॥ एथ आणीकही एक पार्था । तुज बहुती परी पाहतां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥६३॥

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२८॥

जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेयां ॥६४॥ तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती । देखें, पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥६५॥ येर मध्ये जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारू हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥६६॥ नातरि, पवनें स्पर्शलें नीर । पढियसे तरंगाकार । कां, परापेक्षा अलंकार- । व्यक्ती कनकीं ॥६७॥ तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित! । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥६८॥ तैसें, आदीचि जे नाहीं । तयालागी तूं रुदसी कायी? । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥६९॥ जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागी विरक्त । वनवासिये ॥१७०॥ दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥७१॥


माया (४५४ ते ४६२)

यापरी भगवद्भजनपथा । भय नाहीं गा सर्वथा । ‘अभय’ पुशिलें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥५४॥येथे भयाचे कारण । राया तूं म्हणशील कोण । तेंही सांगों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥५५॥

भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यादीशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः । तन्माययाऽतो बुध आभजेत्तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥३७॥

आत्मा पूर्णत्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख । तेंचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंद्वे ॥५६॥ भयाचें मूळ दृढ अज्ञान । त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान । तेथ कां लागले भगवद्भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडितां ॥५७॥ ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती । हा कृतनिश्चयो आमुच्या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥५८॥ अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिकां न ये आया । गुणमयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दुस्तर ॥५९॥ त्या मायेचे मुख्य लक्षण । स्वस्वरूपाचे आवरण । द्वैतांचें जें स्फुरे स्फुरण । ‘मूळमाया’ जाण तिचें नांव ॥४६०॥ ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । ते स्वरूपी स्फुरे जें मीपण । तेंचि मायेचे जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥६१॥ ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदुःखांचिया कोटी । ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥६२॥

भक्तीने मायानिवृत्ती (४६३ ते ४७३)

ने महामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद्भक्ती । स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थी । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥६३॥ (भगवद्गीताश्लोकार्ध) -“मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥” (अ.७, श्लो. १४) माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद्भजने तिची निवृत्ती । आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥६४॥ हरीची माया हरिभजनें । हरिभक्ती सुखेंचि तरणें । हे निजगुह्य अर्जुनाचेनि कारणे । स्वयें श्रीकृष्णे सांगितलें ॥६५॥ मायेची हेचि निजपुष्टी । स्वरूपी विमुख करी दृष्टी । द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥६६॥ भयाचे जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हे संत सज्ञान बोलती ॥६७॥ ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणे जाण । न करितां भगवद्भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥६८॥ जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद्भजन । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥६९॥ शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती । मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नुपजे ॥४७०॥ हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी । हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घेऊनि माया पळे ॥७१॥ माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये । यालागी हरिमाया पाहें । बाधूं न लाहे हरिभक्तां ॥७२॥ नामाची परम दुर्धर गती । माया साहों न शके निजशक्ती । हरिभक्त माया सुखें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥७३॥

अभक्तांची गती (अभक्तांना दुःख) (४७४ ते ४७८)

सायुज्यादि चारी मुक्ती । अंकी वाढवी भगवद्भक्ती । ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा ॥७४॥ हरिभजनी जे विमुख । त्यांसी सदा द्वैत सन्मुख । महाभयेसी दुःखदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥७५॥ जेवीं एकाएकी दिग्भ्रमु पडे । तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे । तैसी वस्तुविमुखें वाढे । अतिगाढे मिथ्या द्वैत ॥७६॥ द्वैताचिये भेदविहिरे । सुटती संकल्पविकल्पांचे झरे । तेथ जन्ममरणांचेनि पूरें । बुडे एकसरे ब्रह्मांडगोळ ॥७७॥ जन्ममरणांचिया वोढी । नाना दुःखांचिया कोडी । अभक्त सोशिती सांकडीं । हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे ॥७८॥

गुरुमहिमा (४७९ ते ५०७)

भक्तीचे अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन । तें करावया भगवद्भजन । सद्गुरुचरण सेवावे ॥७९॥ निजशिष्याची मरणचिंता । स्वयें निवारी जो वस्तुतां । तोचि सद्गुरु तत्त्वतां । येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें ॥४८०॥ मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आइते । जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्गुरु त्यातें श्रीकृष्ण मानी ॥८१॥ गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां । गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्त्वतां परब्रह्म ॥८२॥ गुरूचे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन । अगाध गुरूचें महिमान । तो भाग्येवीण भेटेना ॥८३॥ निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी । नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद्गुरुकृपा ॥८४॥ सद्गुरुकृपा हाती चढे । तेथें भक्तीचे भांडार उघडे । तेव्हां कळिकाळ पळे पुढे । कायसें बापुडें भवभय ॥८५॥ गुरूतें म्हणों मातापिता । ते एकजन्मी सर्वथा । हा सनातन तत्त्वतां । जाण पां वस्तुता मायबापु ॥८६॥ अधोद्वारे उपजविता । ते लौकिकी मातापिता । अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्गुरु पिता सत्यत्वें शिष्यां ॥८७॥ गुरूतें म्हणों कुळदेवता । तिची कुळकर्मीच पूज्यता । हा सर्व कामी अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थी ॥८८॥ गुरु म्हणों देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण । मग त्या सद्गुरूसमान । देवही जाण तुकेना ॥८९॥ गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यून । गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्गुरूसमान अद्वयत्वें ॥४९०॥ यालागी अगाध गुरुगरिमा । उपमा नाहीं निरुपमा । ब्रह्मीं ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गुरूची ॥९१॥ ब्रह्म सर्वांचे प्रकाशक । सद्गुरु तयाचाही प्रकाशक । एवं गुरूहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वें ॥९२॥ यालागीं गुरूतें मनुष्यबुद्धी । पाहों नये गा त्रिशुद्धी । ऐशिये भावार्थबुद्धी । सहजें चित्तशुद्धी सच्छिष्यां ॥९३॥ ज्यांचा गुरूचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो । गुरुआज्ञा देवो पाळी पहा हो । गुरुवाक्ये स्वयमेवो जड मूढ तारी ॥९४॥ ब्रह्मभावे जे गुरुसेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक । त्यांसी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुलंघी देवो ॥९५॥ देवो गुरुआज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी । एवं उभयतां अभिन्नपणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥९६॥ सद्भावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी । ते भावानुसारे संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥९७॥ ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निजस्वार्थी । ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभें हरिभक्ती कदा नुपजे ॥९८॥ येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता । सकळ साधनांचे माथां । जाण तत्त्वतां सद्भावो ॥९९॥ कोरडिये खांबी धरितां सद्भावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो । मा सद्गुरु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥५००॥ यालागीं गुरुभजनापरता । भजावया मार्ग नाहीं आयता । ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद्गुरुभक्ति ॥१॥ गुरुहूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म । ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥२॥ आम्हां सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम । हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥३॥ ऐशिये गुरुसेवेआंत । प्रल्हाद झाला द्वंद्वातीत । नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्ये विचरत सुरासुरस्थानें ॥४॥ ऐसीचि गुरुसेवा करितां । चुकली अंबरीषाची गर्भव्यथा । ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्तां भवव्यथा बाधों नेदी ॥५॥ ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां । ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥६॥ गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक । जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥७॥


२४९.कुमुदिनी काय जाणे तो परिमळ? । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच ते प्रेमसुख जाणों ॥ध्रु॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥४॥
२५०.काय सांगों तुझ्या चरणींच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघे ॥३॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा, नेणां ऐसें?॥४॥
२५१.देखोनियां तुझा सगुण आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥ तेणें माझ्या चित्ता झाले समाधान । वाटते चरण न सोडावे ॥ध्रु॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळी प्रेमसुखें ॥३॥ तुका म्हणे केले तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥४॥
२५२.आतां येणेंविण नाहीं मज चाड । कोण बडबड करील वायां? ॥१॥ सुख तेंचि दु:ख, पुण्य पाप, खरें । हे तो आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचे आतां काम नाहीं ॥३॥
२५३.बोलों अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणे जनीं आम्हां ॥१॥ भोगी त्याग झाला संगींच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ध्रु॥ तुका म्हणे नव्हें दिसतो मी तैसा । पुसणे ते पुसा पांडुरंगा ॥३॥
२५४.अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हे मग कळों येते ॥ध्रु॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं, करी जगी उपकार ॥३॥
२५५.संवसार तिहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जयां चित्तीं ॥१॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होऊनि ठेला ॥ध्रु॥ तुका म्हणे देह दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥
२५६.देहबुद्धि वसे लोभ जया चित्तीं । आपुले जाणती परावें जे ॥१॥ तयासि चालतां पाहिजे शिदोरी। दु:ख पावे करी असत्य तो ॥ध्रु॥ तुका म्हणे धर्म रक्षायाकारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥
२५७.काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्ति संहार घडामोडी ॥१॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता शेवटी एकाचिया ॥ध्रु॥ तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥
२५८.आणीक या काळे न चले उपाय। धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु॥ अवघे मोकळे अवघिया काळे । उद्धरती कुळे नरनारी ॥३॥ काळ वेळ नाहीं गर्भवास दु:खें । उच्चारितां मुखें नाम एक ॥४॥ तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥५॥
२५९.न मिळों खावया न वाढों संतान । परि हा नारायण कृपा करों ॥१॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेचि सांगें ॥ध्रु॥ विटंबों शरीर होत कां विपत्ती । परि राहों चित्तीं नारायण ॥३॥ तुका म्हणे नाशिवंत हें सकळ । आठवी गोपाळ तेंचि हित ॥४॥
२६०.पिंड पोसावे हे अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥ ‘शरीर रक्षावें हा धर्म’ बोलती । काय असे हाती तयाचिया? ॥ध्रु॥ क्षणभंगुर हे जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥३॥ कर्वतिला देह कांपियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥४॥ तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाव जळे ॥५॥
२६१.जरी माझी कोणी कांपितील मान । तरी नको आन वदों, जिव्हे! ॥१॥ सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परती पांडुरंगा ॥ध्रु॥ आणिकांची मात नाइकावी कानीं । आणिकां नयनीं न पाहावें ॥३॥ चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होऊनि निश्चिंत एकविध ॥४॥ चाला पाय हात हेंचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबासी ॥५॥ तुका म्हणे तुम्हां भय काय करी? । आमुचा कैवारी नारायण ॥६॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top