दिवस – २४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥

नाना दुःखीं प्राप्तीं । जया उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैचिजेना ॥९४॥ अर्जुना, तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणे कहीं । परिपूर्णु तो ॥९५॥ ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि- । भेदरहितु ॥९६॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥

जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजी न म्हणे ॥९७॥ ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रों सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥९८॥ गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥९९॥ ऐसा हरिख-शोकरहितु । जो आत्मबोध-भरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥३००॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥

कां कूर्म जियापरी । उवाइला; अवयव पसरी । नातरी, इच्छावशें आवरी । आपुलें आपण ॥१॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा, जाण, स्थिति । पातली असे ॥२॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥५९॥

अर्जुना आणीकही एक । सांगेन, ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥३॥ श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परी रसने नियम न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥४॥ जैसी, वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा? ॥५॥ तो उदकाचेनि बळें, अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके? । तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥६॥ येरांस इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस, हटें । जे, जीवन हें न घटे । येणेंविण ॥७॥ मग, अर्जुना, स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥८॥ तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभावप्रतीति । प्रगट होय ॥९॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥६०॥

येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहाटताती जतना । निरंतर ॥३१०॥ जयातें अभ्यासाची घरटी । यम-नियमांची ताटी । जे मनातें सदा, मुठी । धरूनि, आहाती ॥११॥ तेहि किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥१२॥ देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धि-सिद्धि-चेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥१३॥ तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठौठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥१४॥


भक्तांची तापनिवृत्ती (७६२ ते ७७०)

जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती । त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥६२॥

भगवत उरुविक्रमाङ्‌घ्रिशाखानखमणिचन्द्रिकया निरस्ततापे । हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥५४॥

थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम । ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्ये ॥६३॥ ते पदद्रुमीचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका । अग्री अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥६४॥ ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृते नित्य स्रवत । भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥६५॥ त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती । जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे ॥६६॥ जे हरिचरणचंद्र-चकोर । स्वप्नीही संसारताप न ये त्यांसमोर । ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षे वर्णी ॥६७॥ ‘देहे वै स हरेः प्रियः’ । येणे श्लोकें गा विदेह्या । दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तूं राया सुनिश्चित ॥६८॥ ‘न यस्य स्वः पर इति’ । येणे त्याची धर्मस्थिती । राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥६९॥ ‘यादृश’ म्हणिजे कैसे असती । भगवद्भजनें स्वानंदतृप्ति । त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त ॥७७०॥

लक्षणांची सारस्थिती-उत्तम भक्त (७७१ ते ७९२)

आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं । तेचि ते संक्षेपाकारी । उपसंहारी हरि सांगे ॥७१॥ सकळ लक्षणांची सारस्थिती । प्रेमळाची परमप्रीती । उल्लंघू न शके श्रीपती । तेही श्लोकार्थी हरि सांगे ॥७२॥

विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्धरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः । प्रणयरशनया धृताङ््घ्रिपद्म: स भवति भागवतप्रधान उक्तः ॥५५॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे निमिजायन्तसंवादे द्वितीयोऽध्यायः॥

अवचटें तोंडा आल्या ‘हरी’ । सकळ पातकें संहारी । तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरी गर्जती ॥७३॥ ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं । ते धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जतु ॥७४॥ सप्रेम सद्भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण । वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥७५॥ नामासरिसाच हरी । रिघे हृदयामाझारी । तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥७६॥ तेव्हां प्रपंच सांडोनि ‘वासना’ । जडोनि ठाके जनार्दना । ‘अहं’कारु सांडोनि अहंपणा । ‘सोहं’ सदनामाजी रिघे ॥७७॥ ‘चित्त’ विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता । ‘मनाची’ मोडली मनोगतता । संकल्पविकल्पता करूं विसरे ॥७८॥ कृतनिश्चयेंसीं ‘बुद्धी’ । होऊनि ठाके समाधी । ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥७९॥ हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी । तो निघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरी कृपाळू ॥७८०॥ भक्तं प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं । निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥८१॥ भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी । तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥८२॥ जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोवळ्या कमळामाझारी । भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारी कुचंबो नेदी ॥८३॥ तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती । तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थाप्रती बळ न चले ॥८४॥ बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला । तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥८५॥ तेवीं निजभक्त लळेवाड । त्याचे प्रेम अत्यंत गोड । निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥८६॥ ऐसें ज्याचे अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण । तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडीना पूर्ण प्रेमभावें ॥८७॥ हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी । हरीची प्रीति त्या तैसी । जे अनन्य हरीपाशीं । हरि त्यांसी अनन्य सदा ॥८८॥ ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजी प्रधान । वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ‘भागवतोत्तम’ ॥८९॥ गौण करूनि चारी मुक्ती । जगी श्रेष्ठ भगवद्भक्ती । त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बालिलों राया ॥७९०॥ पूर्ण भक्तीचें निरूपण । सांगतां वेदां पडलें मौन । सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥९१॥ ते भक्तीची एकांशता । तुज म्यां सांगितली हे कथा । यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥९२॥

दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार (७९३ ते ८००)

हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्तकथा । तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥९३॥ तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळी स्वेद आला । श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥९४॥ पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी । थोर निवालों निरूपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥९५॥


३३७.स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा कोणीकडे ॥१॥ परि हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु॥ रूप वर्णावया कोठे पुरे मति? । रोमी होती जातीं ब्रह्मांडें हीं ॥३॥ तुका म्हणे तूंचि ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा झाली नाहीं ॥४॥
३३८.तुज वर्णी ऐसा तुजविण नाहीं । दुजा कोणी तिहीं त्रिभुवनी ॥१॥ सहस्रमुखें शेष शिणला बापुडा। चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु॥ अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा। निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा!॥३॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥४॥ तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरीच नारायणा कळों येसी ॥५॥
३३९.पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधू विठ्ठलसांगडी । पोहूनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ॥ध्रु॥ हें तो नाहीं सर्वकाळ । अमूप आनंदाचे जळ ॥३॥ तुका म्हणे थोरा पुण्ये । ओघ आला पंथें येणें ॥४॥
३४०.आणीक दुसरे मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासूनियां ॥१॥ पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥ध्रु॥ पडिले वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाही दुजा ॥३।। तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥४॥
३४१.आतां मी अनन्य येथें अधिकारी। होईन कोणे परी, नेणों देवा! ॥१॥ पुराणींचा अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु॥ इंद्रियांची आम्ही पांगिलों अंकित। त्यांचे रंगी चित्त रंगलेंसें ॥३॥ येकाचेही मज न घडे दमन। अवघी नेमून कैसीं राखों ॥४॥ तुका म्हणे जरी मोकलिसी आतां । तरी मी अनंता वायां गेलों ॥५॥
३४२.लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढे ॥१॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु॥ व्यापूनि वेगळे राहिलेंसे दूरी । सकळा अंतरी निर्विकार ॥३॥ रूप नाहीं रेखा नामही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥४॥ अंत नाही पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥५॥ अचेत चेतलें भक्तिचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥६॥
३४३.कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥ कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥ध्रु॥ कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणु कैसा तुज ॥३॥ कैसा गाऊं गीती कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति दावी मज ॥४॥ तुका म्हणे जैसें दास केलें देवा! । तैसें हे अनुभवा आणीं मज ॥५॥
३४४.निगमाचें वन । नका शोधूं करूं शीण ॥१॥ या रे गौळियाचें घरीं । बांधलें तें दावेंवरी॥ध्रु॥ पीडलेती भ्रमें । वाटा न कळतां वर्मे ॥३॥ तुका म्हणे भार । माथां टाका अहंकार ॥४॥
३४५.मन वोळी मना। बुद्धि बुद्धि क्षणक्षणां ॥१॥ मीच मज राखण झालों । ज्याने तेथेंचि धरिलों ॥ध्रु॥ जें जें जेथें उठी । तें तें तया हातें खुंटी॥३॥ भांजणी खांजनी। तुका साक्ष उरला दोन्ही ॥४॥
३४६.ब्रह्म न लिंपे त्या मेळे। कर्मा अकर्मा वेगळें ॥१॥ तोचि एक तया जाणे । पावे अनुभविले खुणें ॥ध्रु॥ शौच अशौचाचे संधीं । तन आळा तनामधीं ॥३॥ पापपुण्या नाहीं ठाव। तुका म्हणे सहज भाव ॥४॥
३४७.काय दरा करील वन । समाधान नाही जंव ॥१॥ तरी काय तेथें असती थोडी? । काय जोडी तयांसी? ॥ध्रु॥ रिघतां धांवा पेंवामधीं । जोडे सिद्धि ते ठायीं? ॥३॥ काय भस्म करील राख? । अंतर पाख नाहीं तो ॥४॥ वर्ण आश्रमाचे धर्म । जाती श्रम झालिया ॥५॥ तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस ते हित ॥६॥
३४८.तेंही नव्हे, जे करितां कांहीं । ध्यातां ध्यायी तेही नव्हे ॥१॥ तेंही नव्हे जे जाणवी जना । वाटे मना तेही नव्हे ॥२॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तेंही नव्हे ॥३॥ तेंही नव्हे जे भोंवती भोवे । नागवें धांवे तेंही नव्हे ॥४॥ तुका म्हणे एकचि आहे । सहजिं पाहे सहज॥५॥
३४९.बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु॥ विष खावें ग्रासोग्रासी। धन्य तोचि एक सोसी ॥३॥ तुका म्हणे करूनि दावी। त्याचे पाय माझे जीवीं ॥४॥
३५०.होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥ हाचि माझा नेम धर्म । मुखीं विठोबाचें नाम ॥ध्रु॥ हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥३॥ तुका म्हणे देवा! । हेचि माझी भोळी सेवा ॥४॥
३५१.सांठविला हरि । जिहीं हृदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली येरझार । झाला सफळ व्यापार ॥ध्रु॥ हरि आला हाता। मग कैंची भय चिंता? ॥३॥ तुका म्हणे हरि । कांहीं उरों नेदी उरी ॥४॥
३५२.मोक्ष तुमचा देवा! । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरी ते गोडी ॥ध्रु॥ आपुल्या प्रकारा । करा जतन दातारा! ॥३॥ तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटीं ॥४॥
३५३.नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी। हे सुख सगुणी अभिनव ॥१॥ तरी आम्ही झालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु॥ द्यावें घ्यावें ऐसा येथें उरे भाव । जाय ठाया ठाव पुसोनियां ॥३॥ तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top