
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. २९४ ते ३१४
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. ७६२ ते ७९५
- भक्तांची तापनिवृत्ती (७६२ ते ७७०)
- लक्षणांची सारस्थिती-उत्तम भक्त (७७१ ते ७९२)
- दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार (७९३ ते ८००)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ३३७ ते ३५३
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. २९४ ते ३१४
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥
नाना दुःखीं प्राप्तीं । जया उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैचिजेना ॥९४॥ अर्जुना, तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणे कहीं । परिपूर्णु तो ॥९५॥ ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि- । भेदरहितु ॥९६॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजी न म्हणे ॥९७॥ ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रों सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥९८॥ गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥९९॥ ऐसा हरिख-शोकरहितु । जो आत्मबोध-भरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥३००॥
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥
कां कूर्म जियापरी । उवाइला; अवयव पसरी । नातरी, इच्छावशें आवरी । आपुलें आपण ॥१॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा, जाण, स्थिति । पातली असे ॥२॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥५९॥
अर्जुना आणीकही एक । सांगेन, ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥३॥ श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परी रसने नियम न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥४॥ जैसी, वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा? ॥५॥ तो उदकाचेनि बळें, अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके? । तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥६॥ येरांस इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस, हटें । जे, जीवन हें न घटे । येणेंविण ॥७॥ मग, अर्जुना, स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥८॥ तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभावप्रतीति । प्रगट होय ॥९॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥६०॥
येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहाटताती जतना । निरंतर ॥३१०॥ जयातें अभ्यासाची घरटी । यम-नियमांची ताटी । जे मनातें सदा, मुठी । धरूनि, आहाती ॥११॥ तेहि किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥१२॥ देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धि-सिद्धि-चेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥१३॥ तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठौठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥१४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ७६२ ते ७९५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
भक्तांची तापनिवृत्ती (७६२ ते ७७०)
जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती । त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥६२॥
भगवत उरुविक्रमाङ्घ्रिशाखानखमणिचन्द्रिकया निरस्ततापे । हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥५४॥
थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम । ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्ये ॥६३॥ ते पदद्रुमीचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका । अग्री अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥६४॥ ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृते नित्य स्रवत । भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥६५॥ त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती । जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे ॥६६॥ जे हरिचरणचंद्र-चकोर । स्वप्नीही संसारताप न ये त्यांसमोर । ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षे वर्णी ॥६७॥ ‘देहे वै स हरेः प्रियः’ । येणे श्लोकें गा विदेह्या । दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तूं राया सुनिश्चित ॥६८॥ ‘न यस्य स्वः पर इति’ । येणे त्याची धर्मस्थिती । राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥६९॥ ‘यादृश’ म्हणिजे कैसे असती । भगवद्भजनें स्वानंदतृप्ति । त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त ॥७७०॥
लक्षणांची सारस्थिती-उत्तम भक्त (७७१ ते ७९२)
आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं । तेचि ते संक्षेपाकारी । उपसंहारी हरि सांगे ॥७१॥ सकळ लक्षणांची सारस्थिती । प्रेमळाची परमप्रीती । उल्लंघू न शके श्रीपती । तेही श्लोकार्थी हरि सांगे ॥७२॥
विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्धरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः । प्रणयरशनया धृताङ््घ्रिपद्म: स भवति भागवतप्रधान उक्तः ॥५५॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे निमिजायन्तसंवादे द्वितीयोऽध्यायः॥
अवचटें तोंडा आल्या ‘हरी’ । सकळ पातकें संहारी । तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरी गर्जती ॥७३॥ ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं । ते धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जतु ॥७४॥ सप्रेम सद्भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण । वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥७५॥ नामासरिसाच हरी । रिघे हृदयामाझारी । तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥७६॥ तेव्हां प्रपंच सांडोनि ‘वासना’ । जडोनि ठाके जनार्दना । ‘अहं’कारु सांडोनि अहंपणा । ‘सोहं’ सदनामाजी रिघे ॥७७॥ ‘चित्त’ विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता । ‘मनाची’ मोडली मनोगतता । संकल्पविकल्पता करूं विसरे ॥७८॥ कृतनिश्चयेंसीं ‘बुद्धी’ । होऊनि ठाके समाधी । ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥७९॥ हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी । तो निघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरी कृपाळू ॥७८०॥ भक्तं प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं । निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥८१॥ भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी । तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥८२॥ जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोवळ्या कमळामाझारी । भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारी कुचंबो नेदी ॥८३॥ तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती । तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थाप्रती बळ न चले ॥८४॥ बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला । तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥८५॥ तेवीं निजभक्त लळेवाड । त्याचे प्रेम अत्यंत गोड । निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥८६॥ ऐसें ज्याचे अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण । तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडीना पूर्ण प्रेमभावें ॥८७॥ हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी । हरीची प्रीति त्या तैसी । जे अनन्य हरीपाशीं । हरि त्यांसी अनन्य सदा ॥८८॥ ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजी प्रधान । वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ‘भागवतोत्तम’ ॥८९॥ गौण करूनि चारी मुक्ती । जगी श्रेष्ठ भगवद्भक्ती । त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बालिलों राया ॥७९०॥ पूर्ण भक्तीचें निरूपण । सांगतां वेदां पडलें मौन । सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥९१॥ ते भक्तीची एकांशता । तुज म्यां सांगितली हे कथा । यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥९२॥
दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार (७९३ ते ८००)
हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्तकथा । तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥९३॥ तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळी स्वेद आला । श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥९४॥ पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी । थोर निवालों निरूपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥९५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ३३७ ते ३५३
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





