
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३. ओवी क्र. १ ते ३१
अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥१॥
मग, आइका अर्जुनें म्हणितलें । “देवा, तुम्ही जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें । कमलापति ॥१॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचि ना, पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥२॥ तरी, मातें केवीं श्रीहरी । म्हणसी “पार्था संग्रामु करीं” । इये लाजसी ना; महाघोरीं । कर्मीं सुतां ॥३॥ हां गा, कर्म तूं चि अशेष । निराकारिसी निःशेष । तरी मजकरवीं हे हिंसक । कां करविसी?॥४॥ तरी हेंचि विचारी ऋषीकेशा । तूं मानूं नेदसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवीत आहासी!’ ॥५॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥
देवा, तुवां चि ऐसें बोलावें । तरी, आम्हीं नेणती काय करावें? । आतां संपलें म्हणे पां, आघवें । विवेकाचें ॥६॥ हां गा, उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंश तो कैसा? । आतां पुरला आम्हां धिवसा । आत्मबोधाचा ॥७॥ वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये? । सांगै मज ॥८॥ जैसें आंधळें सुइजे आह्वांटा । कां, माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां!॥९॥ मी आधींचि कांहीं नेणें । वरि कवळिलों मोहें येणे । श्रीकृष्णा, विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥१०॥ तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी, अनुसरलिया, काई । ऐसें कीजे?॥११॥ आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोळंगावें । आणि तुवां चि ऐसें करावें? । तरी सरलें म्हणे ॥१२॥ आतां ऐसियापरी बोधिसी । तरी “निकें” आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी? । अर्जुन म्हणे ॥१३॥ तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणीक एक असे जाहलें । जें-थितें; हें डहुळलें । मानस माझें ॥१४॥ तेवीं चि, श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणें मिषें ॥१५॥ नातरी, झकवीतु आहासी मातें । कीं, तत्त्वचि कथिसी ध्वनितें । हें अवगमितां; निरुतें । जाणवेना ॥१६॥ म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मऱ्हाटा, जी ॥१७॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही; निकें परियसे । श्रीकृष्णा, बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥१८॥ देखें, रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥१९॥ तैसें सकळार्थभरित । तत्त्व तरी सांगावें उचित । परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥२०॥ देवा, तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं? । एथ भीड कवणाची धरूं? । तूं माय आमुची ॥२१॥ हां गां, कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे?॥२२॥ जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांझेचें कवण सांकडे? । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना?॥२३॥ देखें, अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहानाचि जरी फुटावें । तरी सायास कां करावे । मागील ते?॥२४॥ तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितो श्रीकमलापति । तो तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥२५॥ तरी आपुलिया स्वेच्छा । कां न मागावासि परेशा? । देवा, सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥२६॥ देखें, सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जहाले । विजयी माझे ॥२७॥ जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥२८॥ जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥२९॥ तैसें देवा, तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधी ॥३०॥ तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें, एक निश्चित । पार्थु म्हणे ॥३१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ८५ ते १४९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः । एकधा दशधाऽऽत्मानं विभजञ्जुषते गुणान् ॥४॥
याप्रमाणे (आपणच उत्पन्न केलेल्या) पंचभूतांच्या साहाय्याने अनंत निरनिराळी भूते निर्माण करून त्यांत परमात्म्याने (अंतर्यामी) प्रवेश केला असून जीवरूपाने व दशेंद्रियरूपाने तो त्या त्या विषयांचा भोग घेत राहिला आहे.॥४॥
ऐशी स्रजिली भूतें महाभूतें । जी जड मूढ अचेते । त्यांसी वर्तावया व्यापारार्थे । विभागी आपणातें तत्प्रवेशीं ॥८५॥
सृष्टीची स्थिती (८६ ते १४९)
पंचधा पंचमहाभूतें । तें कार्यक्षम व्हावया येथें । पंचधा विभागे श्रीअनंतें । प्रवेशिजे तेथें तें ऐक राया ॥८६॥ ‘गंध’ रूपें पैं पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥८७॥ पृथ्वी प्रवेशला भगवंतु । यालागीं ते आवरण जळांतु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥८८॥ धरा धरी धराधर । यालागीं विरवू न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणें वाहे ॥८९॥ ‘स्वाद’ रूपें उदकांतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । द्रवत्वें राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥९०॥ जीवनी प्रवेशे जगज्जीवन । याकारणे आवरण तेंचि जाण । न शोषितां उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरीचें ॥९१॥ तेजाचे ठायीं होऊनि ‘रूप’ । प्रवेशला हरि सद्रूप । यालागी नयनीं तेज अमूप । जठरी देदीप्य जठराग्नि जाहला ॥९२॥ रूपयोगें लवलाहीं । हरि प्रवेशे तेजाच्या ठायीं । तें आवरण-वायूमाजी पाहीं । न मावळे कांहीं यालागीं राया ॥९३॥ वायूमाजी ‘स्पर्श’योगें । प्रवेशु कीजे श्रीरंगें । यालागी प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥९४॥ वायूच्या ठायीं हृषीकेश । स्पर्शरूपें करी प्रवेश । यालागीं वायूचा ग्रास । सर्वथा आकाश करूं न शके ॥९५॥ ‘शब्द’ गुणें हृषीकेश । आकाशी करी प्रवेश । यालागीं भूतांसी अवकाश । सावकाश वर्तावया ॥९६॥ शब्दगुणे गगनीं । प्रवेशला चक्रपाणी । यालागीं तें निजकारणीं । लीन होऊनि जाऊ न शके ॥९७॥ महाभूती निरंतर । स्वाभाविक नित्य वैर । येरांतें ग्रासावया येर । अतितत्पर सर्वदा ॥९८॥ जळ विरवू पाहे पृथ्वीतें । तेज शोषू पाहे जळातें । वायु प्राशूं धांवे तेजातें । आकाश वायूतें गिळू पाहे ॥९९॥ तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्यांतें करोनियां निर्वैर । तेचि येरामाजी येर । उल्हासें थोर नांदवी ॥१००॥ एवं पंचभूतां साकारता । आकारली भूताकारता । तेथें जीवरूपें वर्तविता । जाहला पैं तत्त्वतां प्रकृतियोगें ॥१॥ त्यासी ब्रह्मांडी ‘पुरुष’ हे नांव । पिंडी त्यातें म्हणती ‘जीव’ । हा मायेचा निजस्वभाव । प्रतिबिंबला देव जीवशिवरूपें ॥२॥ शिवीं जे ‘योगमाया’ विख्याती । जीवीं तीतें ‘अविद्या’ म्हणती । हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती । स्वप्नस्थिती संसारू ॥३॥ ज्यातें म्हणती ‘दीर्घस्वप्न’ । तो हा मायावी संसार संपूर्ण । निद्रेमाजी दिसे जें भान । तें जीवाचे स्वप्न अविद्यायोगें ॥४॥ येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न । बोध जाहलिया मिथ्या भवभान । हे अवघे मायेचें विंदान । राया तूं जाण निश्चित ॥५॥ आतां जीवाची विषयावस्था । विषयरसी विषयभोक्ता । एकधा दशधा विभागता । आईक नृपनाथा सांगेन ॥६॥ एकधा भागें अंतःकरण । स्वयें झाला जनार्दन । मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभागें ॥७॥ जीव आपुल्या परिपूर्णता । ‘अहं’ म्हणे निजात्मसत्ता । तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥८॥ अहंकारु वाढवितां देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विषयचिंता । तेचि ‘चित्त’ तत्त्वतां महामाया ॥९॥ देहअहंता अतिचपळ । तीतेंच म्हणती ‘मन’ चंचळ । नाना संकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय-शोक-दुःख ॥११०॥ देहअहंतेचे शहाणपण । तिये नांव गा ‘बुद्धि’ जाण । ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण । आम्हां जन्ममरण अनिवार ॥११॥ एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टयअवस्था । मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥१२॥ अहंकार धरी सोहंपण । तैं चित्तीं प्रगटे चैतन्यघन । तेव्हां मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं ॥१३॥ समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कैंचें मन । बुडे चित्ताचें चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥१४॥ ‘एकधा’ विभाग अंतःकरण । त्याची उणखूण निजलक्षण । राया सांगितलें संपूर्ण । आतां ‘दशधा’ लक्षण तें ऐक ॥१५॥ दशधा इंद्रियें अचेतन । तयांतें चेतविता नारायण । दशधारूपें प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥१६॥ दृष्टीमाजी झाला ‘देखणें’ । दृश्य प्रकाशी दृश्यपणें । ऐसेनि प्रकाशकपणें । दृश्याभरणे दाखवी ॥१७॥ श्रवणी झाला तो ‘ऐकणे’ । शब्द प्रकाशी शब्दलक्षणें । मग अर्थावबोधकपणें । शब्दविंदाने ऐकवी ॥१८॥ रसी ‘रसस्वादु’ नारायण । रसने तोचि रसस्वादन । यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजी ॥१९॥ सुमनीं श्रीहरि ‘सुगंध’ । घ्राणी तोचि जाणे गंधावबोध । यापरी सुमनमकरंद । भोगवी गोविंद निजांगयोगें ॥१२०॥ शीत-उष्ण-मृदु-कठिण । ‘स्पर्श’ प्रकाशिता नारायण । त्वचेमाजीं तोचि स्पर्शज्ञ । यापरी जगजीवन भोगवी स्पर्श ॥२१॥ वाचेचा ‘वाचकु’ कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती । नाना शब्दार्थव्युत्पत्ती । वदवी निश्चितीं वाचाळपणें ॥२२॥ करांच्या ठायीं ‘देती घेती’ । अकर्तेनि कर्तव्यशक्ती । चरणा आचरणें निगुती । ‘गमनस्थिती गोविंदें’ ॥२३॥ उपस्थसुखाची ‘सुखप्राप्ती’ । तेणें सुखें सुखावे श्रीपती । स्त्रीपुरुषमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिप्रीतीं पुरुषोत्तमु ॥२४॥ गुदाचे ठायीं जें का ‘क्षरण’ । तेंही अक्षरें होय जाण । यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देहीं ॥२५॥ यापरी गा देहयोगें । विलासे विषयसंभोगें । भोग्य भोक्ता उभय भागें । प्रकाशूनि अंगें स्वयें भोगी ॥२६॥ जेवीं साळईच्या रुखा । साळईचि बीज देखा । साळईचि शाखोपशाखा । न विकारतां असका वृक्ष होये ॥२७॥ जेवीं कां ऊंस बीजीं पडे । तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे । जरी भिन्न भिन्न कांडे चढे । तरी मागे पुढे रस एकु ॥२८॥ तेवीं विषय आणि करणे । प्रकाशूनि एकपणें । मग विषयरस सेवणें । जीवपणे स्वयें सेवी ॥२९॥
गुणैर्गुणान् स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः । मन्यमान इदं सृष्टमात्मानमिह सज्जते ॥५॥
प्रभूने आत प्रवेश करून प्रकाशित केलेल्या इंद्रियांच्या द्वारे तो जीव अनेक विषयांचा भोग घेतो व उत्पन्न झालेल्या शरीर-मन-इंद्रियादिकांना स्वतःच समजून त्यांमध्ये आसक्त होतो (आपले स्वरूप विसरतो). (हीच ईश्वराची माया होय.) ॥५॥
इंद्रियां आणि विषयांसी । सहजें अंतर्यामी प्रकाशी । जीव सेवूनि त्या विषयांसी । पावे आसक्तीसी अहंभावें ॥१३०॥ म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचे पुरे कोड । तंव इंद्रियांची खवळे चाड । विषय वाड भोगावया ॥३१॥ इंद्रियां विषयांची आसक्ती । देहाभिमाने वाढे वृत्ती । मावळोनि मूळींची स्फूर्ती । मोहममतास्थिती दृढ वाढे ॥३२॥ मग मी म्हणे देहातें । देहसंबंधी जें तें आप्तें । विषयांचिये लोलुपते । उसंतु चित्तें असेना ॥३३॥ प्रकृतिस्वभावें कर्म जाहलें । तें तें म्हणे म्यां केलें । देहअहंतेचें नाथिलें । काविरें चढले अनिवार ॥३४॥ देहअहंता अतिउद्भट । तेथें मोहममता अतिदुर्घट । तेणें जन्ममरणांची वाट । घडघडाट प्रवाहे ॥३५॥
कर्माणि कर्मभिः कुर्वन् सनिमित्तानि देहभृत् । तत्तत्कर्मफलं गृह्णन् भ्रमतीह सुखेतरम् ॥६॥
हा देहधारी जीव कर्मेंद्रियांच्या द्वारा संकल्पयुक्त कर्मे करतो व त्या त्या कर्मानुसार सुखदुःखात्मक फळे भोगून ह्या (विषय, फल व कर्मरूप) संसारात फिरत राहतो. ॥६॥
मनी धरोनि विषयकाम । कर्मेंद्रियीं करितां कर्म । तेथें निपजती धर्माधर्म । बाधक परम पुरुषातें ॥३६॥ कल्पिला फळभोग घडे । त्यासारिखें देह धरणे पडे । देहें देहाची खाणी उघडे । मरणही वाढे तैसेंचि ॥३७॥ फळाशा कर्म अतिदारुण । अमरां आणी अमित मरण । अजन्म्या अंगी जन्म पूर्ण । पुनः पुनः जाण आदळती ॥३८॥ एवं स्वर्ग आणि संसारा । जन्ममरणांच्या येरझारा । नाना योनि अपारा । निजकर्मद्वारा स्वयें भोगी ॥३९॥ डोळे बांधोनि जुंपिला घाणा । तेलियाचा ढोरु जाणा । करकरीतु परिभ्रमणा । अविश्रम जाणा भोंवतसे ॥१४०॥ तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे । भोगू जातां निजकर्मफळे । तंव जन्ममरणांचे सोहळे । भोगी आगळे अनिवार ॥४१॥ उदोअस्तांचेनि प्रमाणे । जैसें सूर्यासी पडे भंवणें । तैशी ही जन्ममरणें । अतिदारुणे स्वयें सोशी ॥४२॥ शिणशिणों जंव जन्म कंठी । सवेंच मरण ये त्यापाठीं । जैसी जावळी फळें एक देठीं । तैशा जन्ममरणकोटी भोगी स्वयें ॥४३॥
इत्थं कर्मगतीर्गच्छन् बह्वभद्रवहाः पुमान् । आभूतसंप्लवात्सर्गप्रलयावश्नुतेऽवशः ॥७॥
ह्याप्रमाणे जीव कर्माच्या आधीन होतो व अनेक दु:खे देणाऱ्या कर्ममूलक योनीस जाऊन जगाचा प्रलय होईपर्यंत जन्म-मृत्यू भोगीत राहतो. ॥७ ॥
होता पूर्णत्वें जो स्वतंत्र । तो झाला कर्मपरतंत्र । नानाकर्मगतिपात्र । दुःखसुखक्षेत्र सदा वाहे ॥४४॥ मानोनि विषयांचे सुख । देखतदेखतां घेतलें विख । त्याचे अगणित असुख । जन्मकोटी दुःख सोशितां न सरे ॥४५॥ दुःखावरी दुःखांचे आवर्त । मोहशोकांचे गर्ती पडत । अतियातनेमाजी बुडत । सदा उकडत काळाग्नी ॥४६॥ ऐसे सोशितां दुःखशोक । पुढे अवचितां एकाएक । महाप्रळयाचा भडका देख । निकट सन्मुख अंगी वाजे ॥४७॥ तेथे मागे न वचे काढिला पावो । पुढे निघावया नाही वावो । निजकर्मे बांधिला पहा वो । प्रळयाचा घावो मस्तकी वाजे ॥४८॥ उत्पत्तिस्थितिप्रकरण । तुज सांगितलें संपूर्ण । आतां प्रळयाचे लक्षण । सावधान अवधारीं ॥४९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ३९७ ते ४१६
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





